Category Archives: सेलेब्रिटी

पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास

‘हॉस्पिटल’ हा शब्द ऐकला की माझ्या काळजाचा (की हृदयाचा?) ठोका चुकतो. त्यामुळे डॉक्टरांनाही मी आजारी असल्याचं घोषित करणं सोपं जातं… साध्या डासाच्या रक्तानंदेखील मला गरगरतं. पूर्वी एस. टी. च्या मोटारीखाली आलेली म्हैस बघण्यासाठी पुढे सरसावलेला मी रक्ताचा ओघळ पाहून मागे परतलो होतो… हॉस्पिटलमधे जायचे प्रसंगही तसे माझ्यावर कमीच आले. नाही म्हणायला आमच्याकडे ‘दुष्यंत’ नावाचा कुत्रा जेव्हा होता, तेव्हा त्यानं केलेल्या स्वागतात सापडलेल्या पाहुण्यांना भेटायला (संबंध बिघडू नयेत म्हणून) मी हॉस्पिटलमधे गेलो होतो!यावेळी मात्र मामला वेगळा होता. माझी प्रकृती थोडी नरम वाटल्यामुळे (किंवा कुठलीही गोष्ट मी नरमपणे घेत नसल्यामुळे) मंडळींनी मला हॉस्पिटलमधे नेण्याचा ‘घाट’ घातला. (अलीकडे ‘वळण’ जरी ‘सरळ’पणाकडे ‘झुकत’ असलं, तरी ‘घाटा’चा ‘कल’ मात्र अजूनही अवघडपणाकडेच आहे हे यावेळी माझ्या लक्षात आलं.) हॉस्पिटलमधे जायचा पूर्वानुभव फारसा नसल्यामुळे मी काय काय गोष्टी बरोबर नेता येतील, याचा विचार करू लागलो… पण मी नेसत्या वस्त्रांनिशीच जायचं आहे आणि कपड्यांची पिशवी मागाहून येईल असा खुलासा मला करण्यात आला. बाहेर पडताना मात्र मला उगाचच एच. मंगेशरावांनी बटाट्याच्या चाळीचं शिष्टमंडळ पाठवताना लावलेली ‘ओ दूर जानेवाले’ ची रेकॉर्ड आठवली.हॉस्पिटलच्या खोलीत दाखल झाल्यावर मात्र, मी स्वतःवर आजारपण बिंबवण्याचा वगैरे प्रयत्न करायला लागलो. (उगाच डॉक्टरांचा हिरमोड होऊ नये म्हणून!) डॉक्टर तपासत असताना मी चेहरा शक्य तितका गंभीर ठेवला होता. अर्थात मला तपासणाऱ्या डॉक्टरचा हिरमोड झाला नसावा, हे तो त्याच्या सहकाऱ्यांशी ज्या अगम्य भाषेतून बोलला, त्यावरून मी ताडलं. (बारा भाषांमधे मौन पाळता येणाऱ्या आचार्य बाबा बर्व्यांच्या सान्निध्यात काही काळ गेल्यामुळे काही अगम्य भाषांमधल्या संभाषणाचा रोख कुठे असावा, हे मी ओळखू शकत होतो. हे डॉक्टर्स जी भाषा बोलतात तिला ‘मेडिकल लँग्वेज’ म्हणतात आणि ती इंग्रजीच्या बरीच ‘जवळून’ जाते हे मी तुम्हांला खात्रीपूर्वक सांगतो!) …
त्यानंतर काही वरिष्ठ डॉक्टरांनीही येऊन मला तपासलं. आता माझी खात्री झाली की आजार खरोखर गंभीर असावा आणि मी चेहऱ्यावर गांभीर्य नाही आणलं तरी चालेल.अशा रीतीनं माझं हॉस्पिटलमधलं बस्तान बसू लागलं, बसत होतं – एवढ्यात नकळतपणे – मला हॉस्पिटलमधे दाखल केल्याची ‘बातमी फुटली’! (फुटते ती बातमी आणि फुटतो तो परीक्षेचा पेपर अशी एक आधुनिक व्याख्या मी मनाशी जुळवू लागलो.) पण काय सांगू? बातमी फुटल्याबरोबर मला भेटायला अनेक मंडळी येऊ लागली. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे जेवढं खरं आहे तेवढंच ‘व्यक्ती तितके सल्ले’ हे माझ्या लक्षात आलं. किंबहुना ‘एका व्यक्तीमागे दहा सल्ले, तर अमुक व्यक्तींमागे किती’ अशी गणितंही मी मनात सोडवू लागलो. (मला दामले मास्तर आठवले.) लोकांचे सल्ले मात्र चालूच होते… ‘स्वस्थ पाडून राहा’, ‘विश्रांती घ्या’ इथपासून ‘पर्वती चढून-उतरून या’ इथपर्यंत सूचना मिळाल्या. (एकानं ‘सिंहगड’सुद्धा सुचवला!) ‘प्राणायाम’, ‘योगासनं’ पासून ‘रेकी’पर्यंत अतिरेकी सल्लेही मिळाले!
काही उत्साही परोपकारी मंडळींनी जेव्हा ‘मसाज’, ‘मालिश’ असे शब्द उच्चारले, तेव्हा मात्र डॉक्टरांनी मला तऱ्हेतऱ्हेच्या नळ्यांनी आणि सुयांनी जखडून टाकलं आणि लोक चार हात दूर राहूनच मला पाहू लागले.हळूहळू माझ्या भोवतीचा हा सुया-नळ्यांचा वेढा वाढू लागला. (अगदी दिलेरखान आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी घातलेल्या पुरंदरच्या वेढ्यासारखा!… मला हा विचार मनात येताच हरितात्या आठवले.) यानंतर माझी रवानगी आय. सी. यु.मधे (बालेकिल्ल्यावर?) करण्यात आली… अशा विचारांतच मला झोप लागली…मी डोळे उघडले तेव्हा आय. सी. यु.च्या काचेतून मला बघणारी माणसं मला दिसली. मी हसायचा प्रयत्न केला; पण जमत नव्हतं. अरे! पण हे काय? या सगळ्या माणसांचे चेहरे असे का? यांच्या डोळ्यांत पाणी का? मी हे असे शून्यात नजर लावलेले, भकास, उदास चेहरे कधीच पाहिले नव्हते आत्तापर्यंत! (अगदी ‘बटाट्याच्या चाळी’च्या कार्यक्रमाच्या वेळेची लोकांची कुरकुरही बटाट्याच्या चाळीबद्द्ल नसून बटाट्याच्या वेफर्सची आहे हे जाणून घेतलं होतं मी!) आणि हे असे सगळे चेहरे माझ्यामुळे? ज्यांनी हसावं म्हणून मी कायम प्रयत्न करत आलो, त्यांचे चेहरे माझ्यामुळेच असे व्हावेत?नव्हतं सहन होत मला हे. (आणि त्यांनाही.) मी डोळ्यांनी सुचवून पाहिलं मला काय म्हणायचं होतं ते. त्यांना कळलंच नाही ते! की कळूनही उपयोग नव्हता?… ते सगळे लोक समोर तसेच होते. अखेर मीच पुन्हा डोळे मिटले… अगदी कायमचेच

पु. लं. च्या अखेरच्या प्रवासाबद्दलचा एक सुरेख लेख दै. लोकसत्तेत श्री. कुमार जावडेकरांनी लिहिला होता. पु. लं. च्या शैलीची पदोपदी आठवण करून देणारा हा लेख —

वरिल लेख ‘प्रसाद कुलकर्णी’ यांनी महाराष्ट्र माझा साठी पाठवला, धन्यवाद प्रसाद आणि श्री. कुमार जावडेकर.

कोण आहेत मॅगसेसे विजेते दीप जोशी?

फिलीपिन्स सरकारतर्फे देण्यात येणारा यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार सामाजिक चळवळीत रमणाऱ्या दीप जोशी यांना जाहीर झाला. अन, एकदम दीप जोशी हे नाव प्रकाशझोतात आले. देशाच्या ग्रामीण भागाच्या स्वयंपूर्णतेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संस्थांना दीप जोशी हे नाव नवखे नाही. तीस वर्षांहूनही अधिक काळ ते समाजकारणात कार्यरत आहेत. अमेरिकेतील मॅसॅच्युएटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी येथून त्यांनी इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम पुरा केला. तसेच सोलनस्कूल येथून त्यांनी व्यवस्थापनातील पदवी प्राप्त केली. मुळातच सामाजिक कामांची आवड असणाऱ्या श्री. जोशी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सामाजिक कार्याचा धडा गिरवला आहे. त्यात सिस्टिम रिसर्च इन्स्टिट्यूट आणि फोर्ड फाउंडेशन यांचा समावेश आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळवून इतकी वर्षे झाल्यानंतरही ग्रामीण भागाची भीषण अवस्था त्यांना स्वस्थ बसू देईना. ग्रामीण भाग हेच आपले जीवितध्येय समजून त्यांनी १९८३ मध्ये नवी दिल्ली येथे प्रदान (PRADAN) या संस्थेची स्थापना केली. आज देशातील सातपेक्षा अधिक राज्यांमधील सुमारे ३०४४ पेक्षां ही जास्त खेड्यांमध्ये संस्थेचे कार्य विस्तारले आहे. ग्रामीण भागांची स्वयंपूर्णता याविषयावर वाहून घेतलेल्या या संस्थेतर्फे महिला सक्षमी करणासाठी बचत गट, गावे रोजगारक्षम करणे, अपारंपरिक साधनांच्या मदतीने उर्जा निर्माण करणे आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. आगामी दहा वर्षांत देशभरातील आणखी दीड कोटी सामान्य जनतेपर्यंत पोचण्याचा संस्थेचा मानस आहे.

संस्थेचे आधारस्तंभ
ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून, शहरीकरणाचा वाढता वेग नियंत्रणात आणणे हे काही येरा गबाळ्याचे काम नव्हे. ही कामे स्वत:च्या खांद्यावर झेलून उद्दिष्टाप्रत पोचविण्यासाठी संस्थेचे अनेक तरुण कार्यकर्ते सज्ज आहेत. तरुण कार्यकर्त्यांची संघटना अशी प्रदानची दुसरी ओळख आहे. संस्थेकडे असणाऱ्या एकूण कार्यकर्त्यांची कामाच्या दृष्टीने ३१ तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून, या तुकड्या देशाच्या निरनिराळ्या भागात कार्यरत आहेत. देशाच्या दूर दुर्गम भागातील आदिवासी आणि इतर जमातींसाठीही प्रदानचे कार्यकर्ते सक्रीय आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी बचतगट चळवळ
संस्थेच्या आकडेवारीनुसार राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, छत्तीसगढ आणि ओरिसा या सात राज्यात मिळून सध्या ७ हजार ५१२ महिला बचतगट संस्थेअंतर्गत कार्यरत आहेत. त्याचा लाभ सुमारे एक लाख सात हजार ग्रामीण कष्टकरी महिला घेत आहेत. या बचतगटांच्या माध्यमातून सुमारे २२.५० कोटी रुपयांची बचत करण्यात या महिलांना यश आले आहे. या आर्थिक सुबत्तेच्या गंगेचे व्यवस्थापन करण्यासाठी संस्थेतर्फे काही महिलांना संगणक प्रशिक्षित करण्यात आले आहे.

साधनसंपत्ती रक्षण
प्रदान संस्थेचे कार्य प्रामुख्याने आदिवासीबहुल राज्यात चालू असल्याने त्यांचा संबंध आदिवासी, जंगले आणि साधनसंपत्तीशी येतो. नैसर्गिक साधनसंपत्तीला कोणताही धोका न पोचविता त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांची विक्री आणि विपणन करण्याचे आधुनिक शिक्षण या बांधवांना देण्यात येते. याशिवाय शेतीच्या आधुनिक पद्धती, फळबागा व्यवस्थापन आणि माती तसेच पाण्याचे व्यवस्थापन, पाळीव प्राण्यांची निगा, दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुकुटपालन आणि अळिंबी उत्पादन याविषयी ग्रामीण बांधवांना प्रशिक्षित करण्यात येते.

सध्याच्या काळात देशात भारत आणि इंडिया यांच्यातील दरी वाढत असताना खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताला सक्षम करणाऱ्या प्रदान संस्थेला आणि त्यांच्या हजारे तरुण दमाच्या कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा….. अशा या संस्थे

बाळ केशव ठाकरे

हिंन्दुत्वाचा टणत्कार. व्यंगचित्रकार ते हिन्दुह्रुदयसम्राट

तोंड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
तोंडात वाजवुन न्याय मिळवा,
पण न्याय हा झालाच पाहिजे.

बाळ ठाकरे

एक माणुस तुमच्या माझ्या सारखाच, उंचीने आणि वजनाने मात्र कमीच. पाहत होता आपल्या आजुबाजुची परिस्थिती. होणारा मराठी माणसावरचा अन्याय, तोहि महाराष्ट्रातच. मूग गिळुन गप्प बसलेले सरकार. ती चारी बाजुने होणारी गळचेपी. आता काय करावे..आपण हि गप्प बसावे कि आवाज उचलावा. तो माणुस सामान्य नव्हता त्याने शांत बसणे हा विचार कधीच केला नाहि आणि फ़ुंकली तुतारि मराठि अस्मितेसाठी कारण तो होता बाळ ठाकरे. बाळने आपला तोफ़खाना उघडला. बघता बघता मावळे जमु लागले, ताकद वाढु लागली. पण नक्कि करु काय हा प्रश्न होताच. इथेच वडिलांनी प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला..

“बाळ लोके तर जमली पण याला संघटनेचे रुप देणार कि नाही? काहि नाव सुचतय का संघटने साठी?”

बाळ उत्तरला..”विचार तर चालु आहे..पण संघटनेला नाव…”

मि सांगतो नाव…..शिवसेना

१९ जुन १९६६..शिवाजी पार्क..हजारोंनि जमलेला मराठी माणुस. आणि स्थापन झाली शिवसेना. गर्दी आणि ठाकरे हे इथे जुळलेले गणित आजतागायक फ़िसकटलेले नाहिये. नव्वदिचा काळ, राष्ट्रिय नेत्यांनी यात्रा आयोजित केल्या होत्या. हिन्दुत्वाचा आवाज बुलंद होत होता. एकच लक्ष्य “राम मंदिर”. शिवसेनेनेहि हिंदूत्वाचा अंगार हातात घेतलेला. शेवटि ते झालेच. बाबरी मस्जिद आडवी केली गेली. त्या नंतर उसळला तो एकच दंगा. मि मि म्हणणारे आणि स्वतःला हिंदूचे नेते म्हणवुन घेणार्यांचे हि परिस्थिती बघुन धाबे दणाणले. त्यानी सरळसोट जवाबदारी नाकारली. यात आम्हि नव्हतो. यात आमचा एकही माणुस नव्हता असतील तर ते असतील “शिवसैनिक“. त्या वेळि बाळासाहेबांना विचारले गेले..

“काय हे तुमचे शिवसैनिक होते?” या वेळि बाळासाहेब सहज म्हणुन गेले असते कि हे आमचे कोणच नव्हेत… पण छे.. शिवसैनिकांना एकटे टाकुन देणारा हा नेताच नव्हे. त्याने संपुर्णपणे शिवसैनिकांची साथ दिली. आणि इथेच या नेत्यानी सांगीतले..
हे बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.” (हे असे ’स्टेटमेंट्’ द्यायचे धाडस कोण्या नेत्यात असेल?)
हा हिन्दुत्वाचा अंगार भल्याभल्यांना पेलवला नाही अपवाद केवळ एकच.. बाळासाहेब ठाकरे.

मुंबईत दंगल उसळलि होती ९३ साली. त्या वेळि केवळ आणि केवळ शिवसैनिकांमुळेच मुंबई वाचली होती. सगळी बाळासाहेंची कडवट शिस्त, बुलंद हिन्दुत्वाचा बुलंद आवाज शिवसेना. जे कोणताही नेता जाहिर पणे बोलणार नाहि तेच हा नेता अगदी सहज पणे बोलुन जातो. कारण एकच ’आहे खरे तर का बोलु नये?’ आणि विचार एकल्यावर कोणीही म्हणेल..अगदि माझ्या मनातले बोलला. काहि सरकारि कामे होत नाहित नुसत्या फ़ाईली गोळा होतात..काम कोण करणार? कामं का होत नाहित? या वेळि या नेत्याने सांगितले अरे या फ़ायली नुसत्या गोळा करुन काय ठेवताय मंत्रालयात. जर या फ़ायली मंत्रालयात नुसत्या पडुन राहणार असतील तर आग लावीन मंत्रालयाला. भुकंप झाला होता भुकंप या ’स्टेटमेंट’वर.

पाकिस्तानच्या आतंकवादि कारवाया खुपच वाढल्या होत्या. नुसती घुसखोरी होत होती. आणि या सरकारचे काय चालु होते तर पाकिस्तानच्या टिम ला क्रिकेट खेळायला बोलवायचे, बाळासाहेबांचा रोखठोक सवाल..अरे या देशाच्या एवढ्या आतंकवादि कारवाया वाढल्या असताना कसल्या क्रिकेट खेळण्याच्या बाता करता? हे होता कामा नये. आणि बाळासाहेबांनी एकदाच सांगीतले

मी मुंबईत पाकिस्तानच्या टिमला खेळुन देणार नाहि.”

त्या वेळे पासुन ते आजच्या दिवसापर्यंत पाकिस्तान टिमने मुंबईत पाऊल ठेवलेले नाहि, अरे धाडसच नाहि, कोण या अंगाराशी खेळणार?

या बाळासाहेबांनि अनेक पिढ्या पाहिल्या घडवल्या, शिवसैनिक घडवले. हे शिवसैनिक बाळासाहेबांसाठि जिव हि द्यायला तयार. केवळ बाळासाहेबांचा आदेश आहे म्हणुन आपल्या जिवाची फ़िकीर न करता अनेक शिवसैनिकांनी आपले रक्त सांडले आहे. हे केवळ आणि केवळ बाळासाहेबांच्या प्रेमापोटि. जिवाला जिव देणारि लाखो माणसे.
“केवळ एक आदेश द्या साहेब जिवाचीही पर्वा करणार नाहि” हा शब्द आहे शिवसैनिकाचा.

बाळासाहेब एक असं व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना साहेब या नावानी ओळखतो. एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटना बनवतो “शिवसेना”. आज शिवसेनाचा विचार केल्या शिवाय एक हि राजकिय निर्णय घेतला जात नाहि एवढि प्रचंड ताकत. एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो. एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क-“शिवतिर्थ” खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच बाळासाहेब ठाकरे हे नुसते व्यक्तिमत्व नसुन एक चमत्कार आहेत.

मराठि अस्मितेची आग ज्याने महाराष्ट्रातल्या मराठि माणसात धगधगत ठेवली अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.

जय महाराष्ट्र.

आशिष कुलकर्णी