Category Archives: संस्कॄती

मराठी सुविचार

मराठी सुविचार

मराठी सुविचार

 1. ध्येयासाठी मरण्यापेक्षा ध्येयासाठी जगणे अधिक अवघड असते>
 2. जेंव्हा मत्सर आपले भयानक डोके वर काढतो, तेंव्हा ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते सुद्धा आपले वैरी बनतात
 3. जो आपल्या मायबोली विषयी उदासीन आहे, त्याला देशप्रेमी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही
 4. मनुष्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटण्यापेक्षा त्याच्या दुर्गुंणांची लाज वाटली पाहिजे
 5. समाधान माणुसकीत आहे, निर्मळ प्रेमात आहे. खोटे अहंकार, धनाचे गर्व ते काय कामाचे?
 6. समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय
 7. विषयाचे चिंतन हा भोग आहे. इश्वराचे चिंतन हा योग आहे
 8. आईच्या प्रेमळपणाने पाठीवरुन हात फिरवुन केलेला उपदेश सार्या ग्रंथालयातील ज्ञानापेक्षा पवित्र असतो
 9. आपल्यातुन सर्वत्र आनंदाचा वर्षाव करता आला पाहिजे. आपल्या कार्यातुन तो व्यक्त झाला पाहिजे
 10. अंहकाराचा नाश तेथे सुखाचा वास. तुमच्या चांगल्या – वाईट कॄत्यांची नोंद परमेश्वराजवळ आहे
 11. परोपकारी सज्जन त्यांचा विनाशकाळ आला तरी त्यांचा सस्वभाव सोडत नाहीत. तुटता तुटता चंदन कुर्हाडीलाही सुंगंधीत करते
 12. श्रम, विश्रांती व पुजा या मनवाच्या तीन आवश्यक गरजा आहेत, असे प्रत्येक धर्म सांगतो
 13. समाधान म्हणजे मनाची संपत्ती. ज्याला ती गवसली तो सुखी
 14. ज्यावेळी अहंकार नाहिसा होतो, त्यावेळी आत्मा जागृत होतो
 15. आत्मविश्वास हि यशाची गुरुकिल्ली आहे
 16. योग्यता कामावर अवलंबुन नसते, ती काम करणार्यावर व कामावरिल त्याच्या प्रेमावर असते..
 17. क्रोध म्हणजे गांधीलमाशीच्या मोहळावर फेकलेला दगड
 18. मान ज्याने पचवला तो सत्पुरूष झाला
 19. काम थोडे करा किंवा जास्त करा ते कधी फुकट जात नसते, करणार्याची वॄद्धीच होत असते
 20. अनुभव हा उत्तम शिक्षक आहे मात्र तो मोबदला जबरदस्त घेतो
 21. माणसाचे मोल डोक्यावरील मुकुटाने आणि गळातल्या जडजवाहिर्यांनी होत नाही, तर त्याच्या अंतःकरणातील माणुसकीत आणि मनगाटातल्या पराक्रमांनी कळते
 22. आपल्या छोट्या घरात सुद्धा सुखामॄत भरलेले असताना बाहेरिल सुखाच्या मॄगजळामागे जो धावतो तो एक मुर्ख होय
 23. सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतु:सुत्री आहे
 24. स्वतःचा उद्धार स्वतः करा, स्वतःला कमी लेखणे म्हणजे स्वतःची किंमत कमी करणे होय
 25. कॄतज्ञतेचा स्पर्श होताच प्रचंड भार फुलासारखे भासतात, काट्यांची मखमल होते
 26. जो नेहमी दुसर्यांवर टिका करतो, तो दु:खीच होतो, ज्याचे मन सदा धर्मरत राहतं, त्याला देव देखील नमस्कार करतो
 27. वाचन हा जसा आचाराचा सारथी, तसा प्रयत्न हा विधीचा म्हणजे दैवाचा सारथी
 28. माता आणि मातॄभूमी यांचा विसर पडू देऊ नका
 29. खोटे बोलण्याने माणुस काही मिळवेलच असे नाहि, पण स्वतःवरिल लोकांचा विश्वास तो गमावून बसतो
 30. गर्विष्ट मनुष्य आपली स्तुती स्वतःच गातो, तर विनयशील माणसाची स्तुती दुसर्याला करावी लागते
 31. माणुस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व यांचे मिश्रण आहे
 32. ईश्वराचे भय हे सर्व रीतीने मूळ आहे
 33. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते
 34. कोणताही भार आनंदाने उचलला म्हणजे तो हलका होतो
 35. निंदकाची खोड मोडण्यास दुसरे औषध नाही, मात्र उत्तर करू नये व हसण्यावर घालवावे
 36. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाशी गाठ पडलीच

स्वरभास्कर गेले, पंडित भीमसेन जोशी यांना भावपूर्ण आदरांजली

पंडीत भिमसेन जोशी
पंडीत भिमसेन जोशी

भारतरत्न स्वरभास्कर पंडीत भिमसेन जोशी यांचे आज (४ फेब्रुवारी १९२२ -२४ जानेवारी २०११) पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. पंडीतजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली गदग, धारवाडमध्ये झाला होता. पंडित भीमसेन जोशी त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुणे येथे आयोजित करण्यास सुरुवात केली. १९५२ साली सुरू झालेल्या या महोत्सवात आजवर देशभरातल्या अनेक गायकांनी आपली कला पेश केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदयाचा वेग आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांचे हिमोडायलिसीसही करण्यात येत होते. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजून पाच मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. पंडीतजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

पंडीतजींना भावपूर्ण आदरांजली, आई जगदंबा त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

 

सान्ता क्लॉस येतोय !

या ’गोडबोल्या’ व हंसर्‍या चेहर्‍याच्या म्हातार्‍या माणसाच्या आठवणी माझ्या बालपणीच्या अविस्मरणीय आठवणींच्या संग्रहात घर करून आहेत. त्यावेळी मला ’सान्ता क्लॉस’ हा शब्द मराठीत नीट लिहिता येत नव्हता, की त्याचं इंग्रज़ी स्पेलींग सुद्धा येत नव्हतं. सदर्‍याच्या बाहीनं शेंबडं नाक साफ करण्याचा सतत निष्फळ प्रयत्न करणारा छोटासा कारटा होतो मी त्यावेळी. मी लवकर झोपावं म्हणून आई नेहमी मला एका जाडजूड म्हातार्‍याच्या भयानक गोष्टी सांगून घाबरवायची, “तू लवकर झोपला नाहीस तर हा पांढरीशुभ्र दाढीवाला म्हातारा तुला आम्हां सगळ्यांपासून दूर कुठल्यातरी गांवी घेऊन जाईल. त्याचं नाव आहे ’सांता क्लॉस’.” आणि कुणीतरी जादू केल्याप्रमाणे मी लगेच झोपी जायचो. त्या दाढीवाल्या म्हातार्‍याची सॉलीड भीति वाटायची मला त्या वेळी !

हा हसर्‍या (?) चेहर्‍याचा, पण मनात भीती निर्माण करणारे  लालभडक कपडे घातलेला (लाल म्हणजे धोका, हे समीकरण!) म्हातारा मला पुन्हा दिसत असे तो डिसेंबर महिन्याच्या सुमारास बाबांना त्यांच्या ऑफिसमधे मिळणार्‍या ग्रीटींग कार्ड्सवर. ती चित्रं पाहून माझी अगदी खात्रीच पटली होती की त्या म्हातार्‍याच्या पाठीवर असलेल्या मोठ्या लाल पोत्यात माझ्यासारखीच लवकर न झोपणारी बरीच वात्रट पोरं भरलेली होती. आणि म्हणूनच डिसेंबरच्या एका संध्याकाळी, जेव्हां बाबांच्या गोर्‍या साहेबाने दिलेल्या एका मुलांच्या पार्टीत मी त्या हसर्‍या म्हातार्‍याला आपलं लाल पोतं घेऊन नाचत येताना पाहिलं, तेव्हा मला आश्चर्याचा गोड धक्काच बसला. मला अगदी चांगलं  आठवतंय, जेव्हा त्यानं आपल्या पाठीवरचं लाल पोतं जमिनीवर ठेवलं, तेव्हा त्याला तिथं पाहून मी मोठ्यानं किंचाळून पळूनच जाणार होतो. आणि नेमका भीतीने चक्कर येऊन मी जमिनीवर कोसळणार, तेवढ्यात मला आपल्या पोत्यात कोंबण्याऐवजी आपल्या पोत्यातून एक मस्तपैकी भेट काढून त्यानं माझ्या हातात ठेवली. मी अगदी मोठ्याने ओरडलो खरा पण घाबरून नव्हे, तर आनंदाने !

त्या दिवशी घरी पोचल्यावर मी आईशी चक्क भांडलो की तिने मला त्या सफ़ेद दाढीवाल्या, लालभडक कपडे घातलेल्या, प्रेमळ  म्हातार्‍याबद्दल काहीतरी भलत्याच खोट्या दंतकथा सांगून उगीचच घाबरवलं होतं. आणि पहिल्यांदाच माझ्या कोणत्याहि प्रश्नाचं उत्तर आईजवळ नव्हतं. कदाचित याचं कारण हे असणं शक्य होतं की तिच्या मते सांता क्लॉस (एव्हांना मला त्याचं नाव कळून चुकलं होतं !) क्रिस्ती धर्माचं प्रतीक होतं, एक असा धर्म जो ती ना पाळत होती, ना समजत होती. त्या बालपणीच्या आठवणी खूप मागे सोडून मी बरीच वाटचाल केलीय. आता मला जाणवतंय की त्यावेळी मला व इतर मुलांना आपल्यापासून दूर पळताना पाहून सांता क्लॉसला किती वाईट वाटलं असावं. आणि तेसुद्धा तो इतक्या प्रेमाने सगळ्या मुलांना जवळ बोलावीत असतांना. काही मुलं मला पाहून देखील अगदी तसंच वागायची. हो, सांता क्लॉसच्या भावना मी नीट ओळखून चुकलो आहे.

माझ्या एकुलत्या एक भाचीचा वाढदिवस नाताळ सणाच्या दिवशी, म्हणजे २५ डिसेंबरला, येतो. भारत सोडून पैशांची हिरवळ शोधायला म्हणून मी दुबईच्या रुक्ष वाळवंटात गेलॊ (बापरे बाप !) त्यावेळी मी तिचा वाढदिवस तिथं माझ्या काही छोट्या मित्रांच्या संगतीत साजरा करायला सुरवात केली. एकदा जेव्हा माझ्या चिमुकल्या मैत्रीणीनं मला विचारलं, “दोस्त, या पार्टीला सांता क्लॉस येतोय का?”, तेव्हा मी स्वत:लाच विचारलं, “का नाही?” एका म्हातार्‍या क्रिस्ती बाईनं मला लगेच सांता क्लॉसचा झकास पोषाख शिवून दिला, अगदी त्याच्या झुब्बेदार टोपी व लाल पोत्यासकट. तिथल्याच एका सुपर-मार्केटमधून मी पांढरीशुभ्र दाढी असलेला एक मुखवटा विकत घेतला आणि अशा प्रकारे माझ्या सांता क्लॉसच्या रूपाने जन्म झाला.

“सांता क्लॉस येतोय… सांता क्लॉस येतोय,” मुलांच्या उत्साहपूर्ण गलक्याने माझं स्वागत केलं. त्या सगळ्यांच्या निष्पाप चेहर्‍यांवर थोडासा अविश्वास व खूपखूप आनंद भरलेला होता. सगळ्या दिशांतून मुलं येत होतीं … सगळ्या वयाची … सगळ्या धर्मांची … सगळ्या सामाजिक स्तरांची. सांता क्लॉसला प्रत्यक्षात बघायचंय या एकाच इच्छेनं त्या सर्वांना एका सूत्रात बांधलेलं होतं. त्या सर्वांना “याची देही, याची डोळा” सांता क्लॉसला पहायचं होतं, त्याला स्पर्ष करायचा होता, त्याला अनुभवायचं होतं, तो देत असलेल्या अपूर्व आनंदात सहभागी व्हायचं होतं… आणि हो, तो मोकळ्या हातानं वाटत असलेल्या भेटवस्तूंवर ताबा सुद्धा  मिळवायचा होता. या असीम आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या इच्छेनं मी दुबईच्या एका प्रसिद्ध सुपर-मार्केटनं, मोहेबी सेण्टरनं, दिलेल्या जाहिरातीला उत्सुकतेनं प्रतिसाद दिला होता. त्यांना नाताळच्या काही दिवस आधीपासून दुकानात बसायला सांता क्लॉस हवा होता. आणि मला हा अनुभव (व त्याबरोबर मिळणारा आर्थिक मोबदला देखील !) हवा होता. माझ्याकडॆ तयार असलेला लाल पोषाख मला आयता उपयोगी पडला. मी सेण्टरवाल्यांना फक्त काळे बूट द्यायला सांगितलं. मागे अशाच एका प्रसंगी एका लहान मुलीनं मला विचारलं होतं, “सांता क्लॉसचे काळे गमबूट तुझ्याकडे का नाहीत?” या अचानक प्रश्नाने मी थोडावेळ गोंधळून गेलो होतो. पण लगेच मी प्रसंगावधान बाळगून तिला उत्तर दिलं होतं, “दुबईच्या वाळवंटात सांता क्लॉसला त्यांची मुळी गरजच नाही, म्हणून.” त्या थोड्या अवधीत मुलांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांनी मला जणू टाचेवरच ठेवलं होतं.
“सांता, तू इतका बारीक का दिसतोयस? तुला तुझी आई नीट खायला देत नाही का?” एका मुलीनं विचारलं.

“तुझी दाढी इतकी पांढरीशुभ्र कशी?” अजून एकानं विचारलं.

“तू खराखुरा माणूस नाहीस, खरं ना?”, एक अतिचौकस मुलगा म्हणाला.

आणखी एका (आगाऊ) मुलाला माझा मुखवटा काढून माझा खरा चेहरा पहायचा होता. या मुखवट्यामागे खरा चेहरा कुणाचा होता, कुणालाच माहीत नव्हतं. जणूं सारं विश्व अगदी जवळून तसंच खूप अंतरावरून पाहिल्यासारखं होतं.

“बाळा, तू पांचगणीहून केव्हा आलास?” मी हलकेच एका मुलाला कौतुकाने विचारलं, कारण मला माहीत होतं की तो मुलगा पांचगणीच्या एका शाळेत शिकत होता.

“सांता, पण तुला कसं कळलं मी पांचगणीला शिकतोय तें?” त्याने डोळे विस्फारून मला मोठ्या आश्चर्याने विचारलं.

“सांताला सगळं काही माहीत असतं,” मी उत्तरलो.

“सगळं काही?”, तो पुन्हा म्हणाला. “तू माझ्या बाबांना सुद्धा ओळखतोस? ते देखील माझ्याच शाळेत होते, लहान असतांना.”

“माहीत आहे मला. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते तुझ्यापेक्षाहि लहान होते.”

त्याने माझ्या सफ़ेद दाढीकडे पाहिलं आणि आपल्या शंकेचं निरसन झाल्याच्या समाधानाने मान डोलावली.

काही मुलं एकटी आली तर काही घोळक्यात आली. काहींना फक्त सांताला पाहायचं होतं,  काहींना त्याच्याकडे हस्तांदोलन करायचं होतं, काहींना सांताबरोबर फोटो काढून घ्यायचे होते. बरेच जण फुकट मिळणार्‍या भेटवस्तू घेण्यासाठी परत येत होते, तर काही आईबाप आधी मिळालेल्या वस्तू कुठेतरी लपवून आपल्या मुलांना भेटवस्तूंसाठी पुढे ढकलत होते. काहीजण सांताला आपल्या घरी निमंत्रित करण्यासाठी येत होते.

“सांता, तू माझ्या घरी येशील?,” एका मुलाने माझा लाल झगा ओढीत हळूच विचारलं.

“नक्की येईन, माझ्या लाडक्या बाळा.”

“तू माझ्या घरी ईदसाठी येशील?” एकीने विचारलं.

“अन माझ्या घरी दिवाळीच्या वेळी?”, दुसर्‍या एका गोड मुलाने प्रश्न केला.

“त्यांच्या घरी ईद व दिवाळीला जाणार असशील तर माझ्या वाढदिवसाला सुद्धा येशील?” दुसर्‍याने विचारलं.

अन सांता त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला, “वाढदिवसालाच कशाला, तुझ्या लग्नाला सुद्धा येईन बरं.”

हे ऐकून सगळेजण जोरजोराने हंसायला लागले. या सर्व प्रश्नोत्तरांनी त्यांचा सांता क्लॉसच्या अस्तित्वावर असलेला विश्वास दिसून येत होता. या वेळी त्यांच्या मनात सांता क्लॉस केवळ क्रिस्ती धर्माचं प्रतीक राहिलं नव्हतं. काळाचं, वेळेचं किंवा धर्माचं कसलंच बंधन सांताला नव्हतं. तो होता शांति, शुभेच्छा व आनंदाचा अग्रदूत — मग दिवाळी असो, ईद असो, पटेटी असो की नाताळ. कारण एक निष्पाप बालकाला मानवेतेशिवाय दुसर्‍या कुठल्याहि धर्माचं बंधन नसतं. मोठ्यांच्या दुनियेत खूप मोठ्या प्रमाणात असतात ताण, दाह, कलह, द्वेष, मत्सर. अशा परिस्थितीत एकच सत्य असतं. प्रत्येक मूल स्वर्गातील ईश्वराचा हा संदेश घेवून पृथ्वीवर जन्माला येतं की तो, म्हणजे परमेश्वर, मानवाच्या बाबतीत अजून हताश झालेला नाही. कधीतरी हे कलह, ही युद्धं नक्की थांबतील. आणि प्रत्येक नाताळाला सांता क्लॉस याच महत्वपूर्ण संदेशाची पूर्ति करण्यासाठी येतो.
लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)

दिवाळी, दीपावली, दिपोत्सव

ही दिवाळी आणि नवे वर्ष आपणा सर्वांना उत्साहाचे, आनंदाचे आणि उत्कर्षाचे जावो… एका वाक्यात व्यक्त झालेली ही शुभेच्छा किती विविध गोष्टी सांगते पाहा. दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद. दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे माणसा-माणसांच्या मनातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला येणारे उधाण. पण शुभेच्छा देताना एवढेच सांगून माणसे थांबत नाहीत. ती दिवाळीबरोबर नवीन वर्षाचाही उल्लेख करतात. हे विक्रमसंवताचे दिवाळीपासून सुरू होणारे वर्ष आपल्या नेहमीच्या व्यवहारात फारच कमी पाळले जाते, हे खरे. कारण कार्तिंकी प्रतिपदेपासून सुरू होणारा विक्रमसंवत् हा गुजराथी समाजात अधिक पाळला जातो. त्याचे कार्तिकसंवत् असेही नाव आहे. महाराष्ट्रात जी शालिवाहन कालगणना आहे ती चैत्र शुध्द प्रतिपदेपासून सुरू होते. इंग्रजी वर्ष तर एक जानेवारीला सुरू होते. पण व्यवहारात कमी पाळले जाते, मात्र शुभेच्छांमध्ये त्याचा सढळ हाताने वापर केला जातो, असे हे दिवाळीपासून सुरू होणरे नवे वर्ष.

दिवाळी, दीपावली, दिपोत्सवदिवाळी आपल्या सणांची सम्राज्ञी होय. दिवाळीची परंपरा पौराणिक काळाशी नाते सांगणारी असली तरी जवळपास हजारो वर्षांपासून आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या थोर कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण प्रारंभी साजरा केला जाऊ लागला. पुढे कालांतराने या सणाचे स्वरुप एक कौटुंबिक आनंद सोहळा असे झाले. धनत्रयोदशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस, दीपावली पाडवा, आणि भाऊबीज अशा स्वरुपात दिवाळीचा सण साजरा होतो. आसमंतातील अंधार दूर करणारा, अज्ञात अशा मृत्यूचे भय निवारण करणारा ”तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्यो मा अमृतं गमय ।।” अशी थोर इच्छा आकांशा बाळगणारा हा आनंदाची उधळण करणारा हा सण धनत्रयोदशीपासून सुरु होतो.

दिवाळीचा आनंद, दिवाळीचा उत्साह वर्षभर टिकावा, वर्षभर लाभावा अशीच अपेक्षा या शुभेच्छांमधून डोकावत असते. दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश घेऊन येतो. गोविंदाग्रजांची एक कविता आहे,

जी दु:खी कष्टी जीवां दुसरी माता।
वाढत्या वयांतही लोभ जिचा नच सरता।।
त्या निद्रादेवीच्या मी मांडीवरतीं।
शिर ठेउनि पडलों घ्यावया विश्रांति।।…
धडधडां भोंवती तोंच फटाके उडती।
मी जागा होऊनि पाहत बसलों पुढतीं।।
तों कळे उगवला आज दिवस वर्षाचा।
वर्षाव जगावर करीत जो हर्षाचा।।
ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।।
काढिलें फोल विश्वाचें। चाळुनि ।
या रसांत नव तेजाचें। जाळुनी ।
ढीगच्या ढीग हीणाचे ।
सत्त्वाचें बावनकशीच सोनें सारें।
ठेविलें, करा रे लक्ष्मीपूजन या रे।।

निद्रादेवीच्या मांडीवर कवी विश्रांती घेत असताना सकाळी त्यांना फटाक्यांनी जाग आली. तुम्हांला दिवाळीत येते तशीच, आणि कवी म्हणतात,

ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।

दिवाळीत नव्या-जुन्याचा संगम इथे कवीने सांगितला आहे. दिवाळी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते. मात्र बदलत्या कालमानानुसार त्याचे स्वरुप सातत्याने बदलत आले आहे. नीट विचार केला तर ध्यानी येईल, दिवाळी हा धार्मिक आणि अंतर्मनाला सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करणारा असा एक वेगळाआगळा सण आहे आणि आता तर काम करणार्‍या सर्व लोकांना खरेखुरे लक्ष्मीपूजन करता यावे म्हणूनच की काय सरकारी, निमसरकारी, खाजगी सर्वच ठिकाणी दिवाळीपूर्वी बोनसची वाटणी करून सर्वांना सुख आणि आनंद मिळण्याजोगी स्थिती निर्माण केली जाते. वर्षभरातील चिंतेची, अडीअडचणींची मरगळ दूर करून थोडेफार का होईना पण सर्वांना समाधान लाभावे, सणांचा आनंद उपभोगता यावा अशीही तरतूद केली आहे. दिवाळी त्यामुळेच अनेक गोष्टींचा संगम आहे. खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोन्ही पक्ष सारखेच खुशीत असतात, तसेच घरात पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा विविध नात्यांनाही एक वेगळा गोडवा दिवाळी बहाल करते. म्हणूनच हा दिवाळीचा आनंद वर्षभर राहावा, अशी अपेक्षा आपण या दिवाळीत वर्षाच्या प्रारंभी करूया.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

हा लेख ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूज साठी लिहिला आहे.  महाराष्ट्र माझा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व महान्यूज या दोघांचाही आभारी आहे.

सर्वधर्म ‘सण’भाव

दिवाळी सण हिंदूंचा असं म्हटलं, तरी भेंडीबाजारातील मुस्लिम बांधवांचा फटाक्याच्या निमित्ताने यातील सहभाग मानला तर ‘सर्वधर्म ‘सण’ भाव’ असंच म्हणावं लागेल.

काल-परवापासून घराघरातील फराळाचे डबे फस्त होण्यास सुरुवात झाली असेल. सर्वाच्या आवडीचा सण साजरा होतोय. आपल्या धकाधकीच्या जीवनात दिवाळीला असणारं महत्त्व आणि स्थान कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकांना अगदी मनापासून वाट पाहायला लावणारा हा सण अगदी शेकडो वर्षापासून साजरा केला जातो. पाच दिवसांच्या या सणात मुंबई अक्षरश: उजळून निघते. ‘‘या सणाचा मुंबईत उत्साह दिसतो, तसा पृथ्वीवर कोठेच नसेल,’’ असे गोविंद माडगावकर यांनी १८६३ साली लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात म्हटलं आहे.

दीडशे वर्षापूर्वीचं हे वाक्य आजही तंतोतंत खरं आहे. दिवाळीचे वेध म्हणजे काय सांगावे म्हाराजा! गल्लोगल्ली फटाक्यांची दुकानं उघडतात. रात्र-रात्र कष्ट करून बनवलेले आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी येतात. विविध प्रकारचे कंदील आणि दिवे सभोवतालच्या अंधाराला दूर लोटत असतात. कोप-याकोप-यांतील रांगोळीच्या रंगांचे स्टॉल्स लोकांची वाट पाहात असतात. कुटुंबं एकत्र खरेदीसाठी बाहेर पडतात. तरी हल्ली कपडय़ांची खरेदी ही काही नावीन्यपूर्ण बाब राहिलेली नाही. आज लोक दर आठवड्याला वा महिन्याला (आपापल्या ऐपतीप्रमाणे अर्थात) कपडय़ांची खरेदी करतात. पूर्वी लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन वर्षातून एकदाच, दिवाळीला खरेदीसाठी बाहेर पडत.

दादर, लालबाग आणि मोहम्मद अली रोड ही गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईतील दिवाळीच्या काळातील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणं. दादर, लालबागमध्ये दिवाळीचे कंदील, उटणी, पणत्या (ज्यात दरवर्षी काहीबाही अभिनव बदल होत असतात.), फुलं, रंग अशा विविध वस्तू दुकानांमध्ये, रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या असतात. फटाक्यांसाठीचा अंतिम शब्द म्हणजे मोहम्मद अली रोड. दिवाळीचा उल्लेख हिंदू सण म्हणून केला जातो. पण ईसाभाई आणि भेंडीबाजारातच आजूबाजूला असलेल्या इतर मुस्लिम बांधवांच्या फटाक्यांच्या दुकानातील गर्दी पाहता या सणाचा धर्माशी असलेला संबंध विसरून जाऊ. जितक्या आपुलकीने, प्रेमाने आणि उत्साहान सर्व धर्माची माणसं एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, तेवढी जवळीक क्वचितच इतर कुठल्या सणांमध्ये दिसून येते. धार्मिक मूळ असूनही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असणारा हा सण आहे.

आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आणखी एक बदललेली गोष्ट म्हणजे दिवाळीच्या फराळाची विक्री. पूर्वी बायका पंधरा-पंधरा दिवस पूर्वीपासून फराळाची तयारी करत असत. आता नोकरी करणा-या जोडप्याला आसरा आहे, तो दुकानांतील फराळाचाच. आता तर दादरला गाड्यांवरदेखील फराळाची मोठमोठी पाकिटं विकत मिळतात.

आपली सारी दु:खं बाजूला सारून लोक ज्या आनंदाने सगळे दिवाळीला सामोरे जातात, ते अतुलनीय आहे. वर्ष संपायच्या अगोदर येणारा हा दिव्यांचा सण महागाई व इतर दुष्प्रवृत्तींच्या काळोखाला मुळापासून उखडून लावेल आणि येणा-या वर्षाला अधिक धैर्याने सामोरं जाण्याचं बळ देईल, अशी आपण या वर्षीही आशा करूया.

धन्यवाद: ऋत्विक सावंत