Category Archives: मनोरंजन

नाना ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’

Natsamarat Movie Review
Natsamarat Movie Review

वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकावर आधारीत ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’ हा चित्रपट आहे. नाटक आणि चित्रपट यांत जमीन-आस्मानाचं अंतर असतं. चित्रपटाचं माध्यम भव्य आहे. नाटकाला काही मर्यादा असतात. पण मर्यादा हेच नाटकाचं वैशिष्ट्य असतं. त्या मर्यादेत राहून केवळ एका रंगमंचावर तुम्हाला अखंड विश्व उभं करायचं असतं. म्हणून चित्रपट व नाटक ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. यात श्रेष्ठत्व कुणालाच बहाल करता येत नाही. दोन्ही माध्यमं आपापल्या जागी ठामपणे उभी आहेत. तुम्ही जर नटसम्राट हे नाटक पाहिलं असेल, तर ते काही वेळेसाठी विसरुन ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रवेश करावा. त्यामुळे नाटकात असं दाखवलं होतं, चित्रपटात असं नाही दाखवलं. नाटकातले अप्पासाहेब वेगळे होते, चित्रपटातले वेगळे आहेत, वगैरे वगैरे अशी तुलना करणं कटाक्षानं टाळलं जाईल. मुळात नाटक आणि सिनेमाची तुलना होऊ शकत नाही. ८ – १० प्रवेशात तुम्हाला नाटक मांडायचं असतं. चित्रपटांत अनेक सीन्स असतात. चित्रपटाला पटकथा असते. म्हणून मूळ नाटकाचा गाभा हरवून न देता नव्याने पटकथा मांडण्यात आली आहे. स्टोरी लाईनमध्ये म्हणजेच मूळ कथानकामध्ये हलकासा बदल करण्यात आलेला आहे. चित्रपटात दोन नवे प्रमुख पात्र घेण्यात आलेले आहेत. एक सिद्धार्थ, जो आपली विदेशातली प्रशस्त नोकरी सोडून नाटकाच्या वेडाने भारतात परततो, दुरसं पात्र म्हणजे राम अभ्यंकर जो नटसम्राट अप्पासाहेब बेलवकरांचा मित्र आहे व स्वतः एक उत्कृष्ट नट आहे. पण नशीबाने या नटाला साथ दिली नाही.

चित्रपट हा नाटकापेक्षा किती वेगळा असतो याचं भान पहिल्या सीनपासून येतं. चहाच्या किटलीत चहा ओतला जातो इथून सीन उघडतो. एक वयोवृद्ध दाढी वाढलेली व्यक्ती बसलेल्या ग्राहकांना चहा देत आहे व काहीतरी पुटपुटत आहे. तो त्यानेच निभावलेल्या भुमिकांचे संवाद म्हणत असतो. काही लोक आश्चर्यानं व कौतुकानं या माणसाकडे पाहतात. तिथेच सिद्धार्थ बसलेला असतो. सिद्धार्थ हा उच्चशिक्षित तरुण आहे. नाटकाच्या वेडापायी आपली प्रशस्त नोकरी सोडतो. त्याला अप्पासाहेब बेलवकर दिसतात. तो पाहताक्षणी अप्पासाहेबांना ओळखतो. पण हे अप्पासाहेबांपासून लपवून ठेवतो. बेलवलकर जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करतो. बेलवलकरांकडून नाटकाविषयी त्याला जाणून घ्यायचं असतं. बेलवलकर बर्‍याचदा त्याला सांगतात की माझा पाठलाग करु नकोस. पण तो काही ऐकत नाही. एकदा नाट्यगृहाला आग लागली अशी बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि बेलवलकर अस्वस्थ होतात व ते तडक नाट्यगृहाकडे निघतात. त्यांच्या पाठोपाठ सिद्धार्थ जातो आणि आग लागलेल्या नाट्यगृहात फ्लॅशबॅकच्या स्वरुपातून सुरु होते नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची शोकांतिका. हा फरक आहे नाटकातील प्रवेश आणि पटकथेमधला. जळलेलं नाट्यगृह आणि फ्लॅशबॅक ही महेश मांजरेकर यांनी दिलेली मेजवानीच आहे. हे समिकरण खुप छान जमलंय. ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला नट स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. आपली इस्टेट, बचत सर्व काही मुलांच्या नावावर करुन मोकळा होतो. हा निर्णय बेलवलकरांचा मित्र राम अभ्यंकर आणि बेलवलकारांच्या पत्नीला पटत नाही. बेलवलकरांचं स्वच्छंदी, बिनधास्त वागणं त्यांच्या सुनेला आणि मुलाला खटकतं. ते आपल्या मुलीकडे राहायला जातात. पण त्यांचं वागणं मुलीलाही खटकतं व त्यांच्यावर चोरीचा आळ घेण्यात येतो. अर्थात त्यांनी चोरी केलेली नसते हे सिद्ध होतं. ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. मुलीनं बजावलेलं असतं की घर सोडायचं नाही. तरी पावसाळ्या रात्री ते घर सोडतात. त्या प्रवासात बेलवलकरांच्या पत्नीचा मृत्यू होतो. महान नटसम्राट रस्त्यावर राहू लागतो. चहाच्या दुकानात नोकरी करतो. त्यांची मुलं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या कथेमध्ये राम अभ्यंकर या उपेक्षित राहिलेल्या नटाची कथा उत्तमरित्या दखवण्यात आलेली आहे. शिरवाडकरांच्या मूळ नाटकात राम अभ्यंकरांचा उल्लेखही नाही. राम अभ्यंकर हे बेलवकरांपेक्षा उत्तम नट, दिसायला सुंदर. तरीही रसिकांनी बेलवकरांना नटसम्राट बनवलं. ही खंत चित्रपटात अनेकदा अभ्यंकरांच्या तोंडी दाखवली आहेच. एका सीनमध्ये तर बेलवलकरही कबूल करतात की अभ्यंकर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नट आहेत. सिद्धार्थ हे पात्र सुद्धा असंच अनपेक्षितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येतं. पण ते खटकत नाही. उलट चित्रपटाची कथा पुढे ढलकत राहतं.

राम अभ्यंकरांची भुमिका अतिशय समर्थपणे विक्रम गोखले यांनी निभावली आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोघांचे एकत्रीत सीन्स इतके बहारदार झाले आहेत की अभिनयाच्या प्रांगणात वावरणार्‍या कलाकारांसाठी ते अभिनयाची कार्यशाळाच ठरले आहेत. विक्रम गोखले यांचा शेवटचा सीन तर इतका नाटकी तरीही कथानकाला साजेसा आणि गोखलेंच्या अभिनयाचं कौशल्य दाखवणारा आहे. विक्रम गोखलेंचे हाव-भाव कमी अधिक होणारा धीरगंभीर आवाज. यामुळे तो सीन चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट सीन्सपैकी एक आहे. अजित परब (मकरंद, बेलवलकरांचा मुलगा), नेहा पेंडसे (नेहा, बेलवलकरांची सून) यांची भुमिका छान झाली आहे. मृण्मयी देशपांडे (विद्या, बेलवलकरांची मुलगी) हिने उत्तम अभिनय केलाय. तिचं गोड दिसणं, हे तिच्या भुमिकेची जमेची बाजू ठरते. सुनील बर्वे (राहूल बर्वे, बेलवलकरांचा जावई) यांनी अतिशय समतोल राखणारी भुमिका निभावली आहे. हळू आणि कमी बोलणं, जास्त एक्स्रेस न होणं, एक टिपिकल सज्जन माणूस अशी ही भुमिका आहे. नेहमीप्रमाणे बर्वेंचा अभिनय उत्कृष्टच आहे. मेधा मांजरेकर (सरकार, बेलवलकरांच्या पत्नी) या चित्रपटातील महत्वाचे पात्र असूनही यांना फार कमी संवाद आहेत. पण त्यांची बॉडी लॅंग्वेज व त्यांनी डोळ्यांनी केलेला अभिनय जबरदस्त आहे. कमी पण महत्वाचे बोलणे. आपल्या नवर्‍याचा अपमान सहन न होणे. आपला नवरा नट आहे. तो दौर्‍यावर असतो, त्याच्या गैरहाजिरीमध्ये कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. हे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसतात. अभिनयाची दुनिया तशी रंगीत दुनिया. या रंगीत दुनियेत स्त्री पुरुषांचे संबंधही रंगीत असतात. हे ती जाणून आहे, तरीही तिला नवर्‍याबद्दल कुठलीच तक्रार नाही. सीता, सावित्री या ज्या हिंदू धर्माच्या आदर्श स्त्रीया आहेत. त्याची एक झलक म्हणजे नटसम्राटाची पत्नी. तिची हौस सुद्धा खुपच साधी आहे. त्यांच्या गावाच्या घरामागील अंगणात तुळशी वृंदावन बांधणं ही या बाईची राहून गेलेली हौसआहे व ती नवर्‍याला पूर्ण करण्यास सांगते. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली मेधा मांजजेकरांनी भारतातील त्यागवृत्तीच्या स्त्रीचं दर्शन घडवून आणलं आहे. राजा हे मूळ नाटकात असलेलं पात्र इथे वेगळ्या पद्धतीनं पहायला मिळतं. हे पात्र सुद्धा सुंदर रंगवलंय. संदिप पाठकने दारुड्याची भुमिका निभावली आहे. छोट्या भुमिकेत तोही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. जितेंद्र जोशी सुद्धा या चित्रपटात आहे. त्यनेही आपली भुमिका चांगली केलीय. आता महत्वाचं पात्र म्हणजे अप्पासाहेब बेलवलकर. नाना पटेकर यांनी त्यांच्याकडे जे काही होतं. ते सर्व या नटसम्राटाला अर्पण केलं आहे. या चित्रपटाची थीम जरी गंभीर असली तरी हसत खेळत चित्रपट पुढे जातो. सर्व प्रसंगात नाना उजवे ठरतात. नानांनी खुपच वेगळ्या पद्धतीने ही भुमिका साकारली आहे. यात बर्‍याचदा नानांचा टिपिकल स्पर्श होतो. पण तो खटकत नाही. अनेक अग्रेसिव्ह सीन्समध्ये नाना स्पष्टपणे जाणवतात. पण अनेक नटांनी नटसम्राट ही भुमिका साकारली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे ही भुमिका निभावलेली आहे. नाना यांनी त्यांच्या पद्धतीने ही भुमिका साकारली व ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. फ्रेममध्ये असताना त्यांची बॉडी लॅंग्वेज आणि क्लोज अपमध्ये त्यांनी दिलेले एक्स्प्रेशन उत्तम आहेत. हे एका उत्कृष्ट नटालाच जमतं. नानांचा अनुभव, त्यांची इतक्या वर्षांची अभिनयाची तपस्या त्यांनी या भुमिकेत ओतली आहे. नाना पाटेकर यांच्या आयुष्यातली ही सर्वोत्कृष्ट भुमिका आहे. नानांनी सगळ्या भुमिका उत्तम निभावल्या आहेत. परंतु नाना पाटेकर यांच्यामुळे नटसम्राट या भुमिकेला न्याय मिळाला आहे व नटसम्राट या भुमिकेमुळे नानांच्या अभिनय कौशल्याला, प्रवासाला न्याय मिळाला आहे असंच म्हणावसं वाटतं.

उत्तम दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, छायांकन आणि बरंच काही असं या चित्रपटाचं गणीत आहे. महेश मांजरेकरांनी नटसम्राट ही कलाकृती चित्रपटाद्वारे मांडण्याचं आवाहन स्वीकारलं व ते त्यांनी उत्तमरीतीने निभावलं आहे. कथेत थोडासा बदल करुनही शिरवाडकरांच्या मूळ संहितेला कुठेच धक्का बसू दिलेला नाही. शिरवाडकर जर आज असते तर ते मांजरेकरांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणाले असते. नटसम्राटाचा शेवटचा संवाद, यात ते त्यांनी निभवलेल्या भुमिकांचं वर्णन करुन सांगत की मी आहे हॅम्लेट, मी आहे ऑथेलो, असं म्हणत म्हणत ते शेवटी म्हणतात मी आहे नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर… आणि चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या मांडीवर बसलेला माझा साडे-तीन वर्षांचा मुलगा सुद्धा टाळ्या वाजवतो. अप्पासाहेब जमीनीवर कोसळतात, सिद्धार्थ त्यांना धरतो. सगळी प्रमुख पात्रे अप्पासाहेबांच्या जवळ येतात. “कळलं का रे सिद्धार्था, असं असतं नाटक” असं म्हणत, आपल्या रक्ताच्या नातेवाईंकाकडे दुर्लक्ष करत अप्पासाहेब स्तब्ध होतात. ते काहीच बोलत नाहीत. एक अश्रूचा थेंब त्यांच्या डोळ्यांतून गालावर उतरतो. तो अश्रूचा थेंब तुम्हाला प्रत्येक प्रेक्षाकाच्या डोळ्यांतून उतरताना दिसतो. तो अश्रूचा थेंब तुमच्या डोळ्यांतूनही उतरत असतो. न कळत तुमचे हात अश्रूच्या थेबाचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचे प्रयत्न असफल होतात. कारण असे असंख्य अश्रूंचे थेंब तुमच्या डोळ्यातून उतरुन नटसम्राट नाना पाटेकर यांना सलामी देत असतात. खरंच असा नट होणे नाही… आबालवृद्धांनी बर्‍याचदा पहावा असा हा चित्रपट आहे, ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’

एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी

एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी

“चिते कि नज़र, बाझ कि चाल और बाजीराव कि तलवार पर संदेह नही करते, कभी भी मात दे सकती हैं” हा डायलॉग रणवीरने अतिशय उत्तम म्हटला आहे. सुरुवातीला ब्राह्मणी पोशाख परिधान केलेला रणवीर हा संवाद म्हणतो आणि प्रेक्षगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. रणवीर सिंह (राजीराव), दिपिका पदूकोन (मस्तानी), प्रियंका चोप्रा (काशीबाई), महेश मांजरेकर (शाहू महाराज), आदित्य पांचोली (प्रतिनिधी), तन्वी आझमी (राधाबाई, बाजीरावांची आई), मिलिंद सोमण (मंत्री), वैभव तत्ववादी (चिमाजी अप्पा) हे चित्रपटाचे प्रमुख पात्र आहेत. अनूजा गोखले आणि सुखदा खांडेकर या दोन मराठी अभिनेत्री सुद्धा छोट्याशा भुमिकेत आहेत. हा चित्रपट बाजीरावांच्या जीवनावर आधारित आहे. तरी सुद्धा तो बराचसा काल्पनिक आहे, असं चित्रपटाच्या सुरुवातीलाच नमूद करण्यात आलेलं आहे. कोणाच्याही धर्मभावना, संस्कृती वगैरे दुखावण्याचा हेतू नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. चांगली गोष्ट अशी की यामध्ये निनाद बेडेकर व राऊ कादंबरीचे लेखक एन.एस इनामदार यांचे आभार मानण्यात आले आहे. हा चित्रपट मुख्यतः इनामदारांच्या कादंबरीवरच आधारलेला आहे. चित्रपटाची कथा तशी साधीच आहे. लैला-मजनू, हिर-रांझा अशा पद्धतीचा एक स्पर्श (टच) देण्यात आला आहे. महान मराठा योद्धा बाजीराव बुंदेलखंडाला शत्रुपासून वाचवतात आणि इथे मस्तानी व बाजीराव एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग इथे सुरु होतो लव्ह ट्रॅंगल. पण काशीबाईपेक्षा बाजीरावांची आई, चिमाजी अप्पा व बाजीरावांचे पुत्र नानासाहेब हे मस्तानीच्या विरोधात जातात. मस्तानीला जीवे मारण्याचा कट रचला जातो. याची खबर काशीबाईंना आधीच लागते व ती बाजीरावांना खबरदार करते. बाजीराव मस्तानीला वाचवतात. पण राऊ एका मोहिमेवर गेले असताना नानासाहेब मस्तानीला व तिच्या मुलाला कैद करतात. याची खबर बाजीरावांना लागते. त्यांना विरह सहन होत नाही. ते आजारी पडतात आणि समोर असलेल्या सरोवर किंवा नदी (नक्की कळले नाही), त्यात स्वतःला समर्पित करुन प्राण त्यागतात. इथे राऊ वारले हे मस्तानीला टेलिपॅथीनेच कळतं आणि मस्तानी सुद्धा आपला प्राण त्यागते आणि अशाप्रकारे ही कहाणी संपते. एक सर्वसामान्य बॉलिवूडपटाची कथा जशी असावी तशीच कथा या चित्रपटातही आहे. त्यात नवीन काही असेल तर ते बाजीरावांचे चरीत्र. यात संजय लीला भन्साली बर्‍यापैकी यशस्वी झाले आहेत. पण…

हा चित्रपट जरी कादंबरीवर आधारलेला असला तरी यातील पात्र व कथा सत्य आहे. त्यामुळे इतिसाहाच्या बाबतीत सांगायचे झाले तर चित्रपट इतिहासाच्या फारसा जवळ जात नाही. अनेक गोष्टी इतिहासासंदर्भात खटकतात. पण इतिहास बाजूला ठेवून चित्रपट पाहिला तर तसा चित्रपट बरा आहे. कारण अनेक जणांना इतिहास व्यवस्थित माहित नाही आणि या चित्रपटाला अधिकतम हिंदी किंवा अमराठी प्रेक्षक लाभणार असण्यामुळे अनेकांना बाजीराव कोण होते हे सुद्धा माहित नसावे. म्हणून भारतातील अधिकतम प्रेक्षक इतिहास म्हणून हा चित्रपट पाहणार नाहीत. त्यामुळे आपण ऐतिहासिक तथ्ये जरा बाजूला ठेवून विचार करु. चित्रपटाची कथा आणि संवाद चांगले आहेत. पण पटकथा थोडीशी चुकली आहे असे वाटते. ही जरी प्रेमकहाणी असली तरी ती योद्धाची प्रेम कहाणी आहे. तरी सुद्धा चित्रपटात राजकीय डावपेच, युद्ध, बाजीरावांमधला कुशल राजकारणी हे दाखवण्यापेक्षा त्यांच्या प्रेमकहाणीवर अधिक लक्ष देण्यात आलं आहे. चित्रपटात स्पष्ट उल्लेख आहे की बाजीराव ४१ लढाया जिंकलेत. जर असं असेल तर चित्रपटात केवळ दोनच लढाया दाखवल्या आहेत. अर्थात ४१ लढाया दाखवता येत नाही. पण त्या दोन लढाया सुद्धा तोकड्या आहेत. बाजीराव चित्रपटाची तुलना मला बाहूबलीशी करावीशी वाटते. बाहुबली हा सुद्धा एका योद्ध्याच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे. अर्थात तो पूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु चित्रपटात प्रेम, प्रणयदृश्ये, नृत्य वगैरे दाखवूनही बाहूबलीच्या युद्ध व राजकीय कौशल्याला न्याय देण्यात आला आहे. पण बाजीराव चित्रपटात बाजीराव (बाहुबलीप्रमाणे काल्पनिक नव्हे) यांनी खरोखर लढाया लढवल्या आहेत, कुशलतेने राजकारण केले आहे. तरी सुद्धा राऊंच्या कौशल्याला न्याय मिळालेला नाही. काही लोक म्हणतील की ही प्रेम-कथा आहे. म्हणून बाहुबली चित्रपटाचे उदाहरण दिले आहे. चित्रपाटाची पटकथा उगाच लांबवली आहे. त्यामुळे काही सीन्स खुप मोठे आणि रटाळ वाटतात. चित्रपटाचे संगीत चांगले जमले आहे. गाणी व नृत्य चांगले झाले आहे. अर्थात पिंगा आणि मल्हारी गाण्याला अनेकांनी आक्षेप घेतला होता. तो आक्षेप गैर नाही, योग्यच आहे. एखादा सेनापती/पंतप्रधान मग तो सत्यातला असो किंवा कल्पनेतला, तो सैन्यासह अशाप्रकारे नाचणार नाही. सैनिकांशी कितीही मैत्री असली तरी स्वतःचा सेनापतीचा एक वेगळा मान असतो. आता नसेल कदाचित, पण पूर्वी तरी होता. छायांकन व कलादिग्दर्शन अतिशय उत्तम झाले आहेत. अर्थात हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. सगळे सेट्स सुंदर आहेत. देखावा उभारण्यात नेहमीप्रमाणे भन्साली यशस्वी ठरलेत. हिंदवी स्वराज्य, मराठा, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू असे शब्द अभिमानाने उच्चारले आहेत व प्रेक्षकांनी हिंदू या शब्दाला सुद्धा टाळ्यांनी दाद दिली आहे.

बाजीरांच्या भुमिकेत रणवीर तसा चांगला वाटलाय. पण रणवीरने अनेक ठिकाणी बेअरिंग सोडली आहे. बुंदेलखंडातून विजयी झाल्यावर काशीबाईंसोबत ज्यावेळेस बाजीराव आपल्या खोलीत येतात त्यावेळी रणवीर ज्याप्रकारे हलत चालतो, ते विचित्र वाटतं. कधी कधी उगाच लेफ्ट-राईट-लेफ्ट केल्यासारखा चालतो हे तो का करतो कळत नाही. काही मराठी संवाद रणवीरने ठीक म्हटले आहे. पण हा मराठी नट नाही किंवा हे मराठी पात्र नाही असं वाटून राहतं. कधी कधी नाना पाटेकरने रणवीरच्या अंगात प्रवेश केल्याचा भास होतो. काही ठिकाणी तो उगाच हसतो, सैनिकांसोबतच्या त्याच्या गप्पा, त्याचं वागणं हे सर्व बाजीरावांच्या बेअरिंगमधून बाहेर येण्यासारखंच आहे. बर्‍याचदा रणवीरच्या सिरीयस सीनला प्रेक्षक हसतात. इतके ते सीन्स विचित्र झालेत. निजामासोबत (रजा मुराद) त्याचे संवाद यामध्ये चातुर्य दिसतं. पण नंतर रणवीर उगाच मोठ्याने आणि वेगाने डायलॉग बोलतो. ते डायलॉग खुप महत्वाचे व अभिमानास्पद आहेत. पण ते प्रेक्षकांच्या हृदयांपर्यंत पोचवण्यात अयशस्वी ठरतो. त्याचा मुळ छिछोरा स्वभाव अधून मधून दिसत राहतो. कॅमेरा समोर अभिनय करताना कंटिन्यूटी रखणं फारच कठीण असतं. पण ते राखणं हेच तर नटाचं कौशल्य असतं. त्या बाबतीत रणवीर कमी पडला आहे. युद्धाच्या प्रसंगात रणवीर भारी वाटतो. त्याचा लूक पौरुषी असल्यामुळे युद्धाच्या प्रसंगात तो उजवा वाटतो. बाकीचे गंभीर आणि प्रणयदृश्य व प्रेम प्रसंग रणवीरने चांगले निभावले आहेत.
काशीबाईंच्या भुमिकेतील प्रियंका चोप्रा छान दिसली आहे. बॉलिवूडमधली “चुलबुली लडकी” अशी भुमिका प्रियंकाला देण्यात आली आहे. बाजीरावांचं मस्तानीसोबत असलेलं प्रेम जेव्हा काशीबाईंना कळतं. तेव्हा जो चेंज ओव्हर प्रियंकाने आणलाय तो अतिशय उल्लेखनीय आहे. पण काशीबाई चुलबुली होत्या हे जरा मनाला पटत नाही. याबाबत इतिहासकार सविस्तरपणे सांगू शकतात. तो अधिकार माझा नाही. मस्तानीच्या भुमिकेतील दिपिका अतिशय सुंदर दिसली आहे व तिनं अभिनय सुद्धा सुंदर केला आहे. बाजीराव यांच्यावरचं तिचं प्रेम, आपली प्रतिष्ठा, लढाऊपणा, नृत्यातली लवचिकता, हळवेपणा व त्याच बरोबर रजपुतानी कठोरता अतिशय चांगल्या पद्धतीनं दिपिकाने हातळलंय. दिपिका चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. यात अजून एक नट भाव खाऊन जातो तो म्हणजे वैभव तत्ववादी. चिमाजी अप्पांची भुमिका त्याने मस्तच साकारली आहे. फक्त चिमाजी अप्पांना या चित्रपटात बर्‍यापैकी खलनायक दाखवण्यात आलं आहे. म्हणून त्यांनी केलेल्या पराक्रमवर पडता टाकला जातो. अर्थात हा चित्रपट चिमाजी अप्पांसाठी बनवलेलाच नाही. तन्वी आझमी यांनी बाजीरावांच्या आईची भुमिका उत्कृष्टपणे बजावली आहे. अर्थात त्या चित्रपटाच्या खलनायिका आहेत. एक मुसलमान स्त्री पेशव्यांची सून होऊ शकत नाही व तिच्याबद्धलचा तिरस्कार तन्वी यांनी छान दाखवला आहे. त्या एक ज्येष्ठ व कुसल अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी ही भाषा ब्राह्मणी (कोकणी) शैलीत उच्चारण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. मिलिंद सोमण यांनी छान अभिनय केला आहे. आदित्य पांचोली यांची भुमिका चांगली झाली आहे. पण एक, दोन प्रसंगात बाजीरावांना विरोध करणे एवढेच पांचोलींचे काम आहे. शाहूंची भुमिका महेश मांजरेकर यांची चांगली बजावली आहे. यतीन कार्येकर यांनी सनातनी ब्राह्मणाची भुमिका सुंदर निभावली आहे.

तरीही अनेक प्रसंग न पटण्यासारखे आहेत. काशीबाई सहजपणे बागडत बागडत शनीवारवाड्यात वावरतात, हे पटत नाही. शेवटी त्या पेशवीणबाई आहेत. त्यांच्यावर काही बंधनं होती. बाजीरावांचं आगाऊपणे वागणं पटत नाही. नानासाहेबांनी केलेला मस्तानीचा छळ हा अती वाटतो. म्हणजे मस्तानीच्या अंगावर पाणी टाकणे वगैरे टिपिकल व्हिलनप्रमाणे वाटतं. चित्रपटातील समान धागा म्हणजे पाऊस. महत्वाच्या प्रसंगांना पावसाची साथ आहे. चित्रपटात भन्सालींनी खुपच पाऊस पाडलाय. तो कमी केला असता तर बरं झालं असतं. खुप भव्य सेट, रंगेबीरंगी कपडे (देवदासपेक्षा कमी रंगीत), भरगच्च दागीने यामुळे चित्रपट उठून दिसतो. पण तरीसुद्धा चित्रपटात आत्मा नाही असं वाटतं. मध्यांतर नंतर चित्रपट हळूवार जातो. भव्यता पाहून काही वेळाने कंटाळा येतो. इतिहास बाजूला ठेवला तरी बाजीराव मस्तानी हा चित्रपट परीपूर्ण वाटत नाही. अर्थात इतिहास बाजूला ठेवता येत नाही. सुरुवात ते समाप्तीपर्यंत हा चित्रपट संजय लीना भन्सालीचाच आहे, असंच वाटत राहतं. तरी सुद्धा अनेकांना हा चित्रपट आवडेल. कारण यातली स्टार कास्ट व टिपिकल भन्साली टच भुरळ घालणारी आहे. “प्यार करनेवाले कभी डरते नही, जो डरते है वो प्यार करते नही” हा एक दुजे के लियेवाला संदेश किंवा प्रेमाच्या आड नेहमी धर्म येतो तरीही त्याला प्रेम जुमानत नाही असा संदेश या चित्रपटांतून मिळतो. तो प्रेमीयुगुलांना आकर्षित करणारा आहे. पण ही एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटाला अडीच स्टार द्यायला हरकत नाही.

लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री

तु ये ना साजणी.. शेखरचे (विडीओ) गाणे

Marathi Song Saazni by shekharमराठी मध्ये अगदी मनाला आवडणारी गाणी पुर्वी प्रमाणे आजकाल काहि ऐकायला मिळतच नाहित अशी तक्रार असणार्यांसाठी शेखर ने एक मस्त गाणे आणले आहे. अगदी जेमतेम तीन मिनीटांचेच हे गाणे पण अगदि थेट मनाला भिडणारे. आपल्यासाठी खास या मराठी गाण्याचा विडीओ.

 

 

 


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

Jai Jai Maharashtra Majhaजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

* कवी – राजा बढे * संगीतकार – श्रीनिवास खळे
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

 

 

सुविचार… (ट्रक किंवा रिक्शाच्या मागील)

ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार….! Funny Truck Quotes

1) “बघतोस काय ? मुजरा कर …..!”
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
4) ”पाहतेस काय प्रेमात पडशिल”
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) १३ १३ १३ सुरूर !
7) “हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”
8 ) ‘अहो, इकडे पण बघा ना…’
9) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) “लायनीत घे ना भौ”
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या…
15) अयोध्या, बेळगाव, कारवार्, निपाणी, इंदौर, गुलबर्गा, न्यू-जर्सी, ह्युस्टन, सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड, बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) बघ माझी आठवण येते का?
17) नाद खुळा
18) हाय हे असं हाय बग
19) आई तुझा आशिर्वाद.
20) सासरेबुवांची कृपा
21) आबा कावत्यात!
22) पहा पण प्रेमाने
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी…
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये …आणि …मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे.
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा.

38) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये–
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गर्ल्स

39) राजू, चिंटू , सोनू ….! अणि खाली लिहले होते ….. बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
40) मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल .. खाली लिहिले होते…. ड्रायवर शिकत आहे (बारीक़ अक्षरात)
41) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
42) एका टेम्पोच्या मागे.. आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद!

तुम्ही अजून सांगा…