Category Archives: ब्रिटीश नंदी – ढिंग टांग

पुणं कसं वाटलं?

शनिवार वाडा, पुणे
शनिवार वाडा, पुणे

सांप्रतकाळीचे ज्येष्ठ समालोचक आणि गतजन्मीचे कसोटीवीर रवी शास्त्री यांनी गोजिरवाण्या अजु आगरकरला भरमैदानात शंभर नंबरी सवाल टाकला – “पुणं कसं वाटलं?”

भूमंडळ थबकले. आभाळाने कान टवकारले. शनवारवाड्याच्या बुरुजांमधोन एक उसासा वादळतेने धुमसत गेला! लक्ष्मी रोडचा ट्रँफिक जागच्या जागी गोठला. आसमंतात सन्नाटा पसरला…

पुणं कसं वाटलं?
वाचकहो, हा सवाल सामान्य का आहे. आहो, साक्षात यमधर्माला निरुत्तर करणा-या नचिकेताचे बळ या सवालात एकवटले आहे. भांडारकर इन्स्टिट्युटपासोन इतिहास मंडळापर्यंत यच्चयावत संस्थातील रुमालांमध्ये तरी या सवालचे उत्तर सापडेल काय? साक्षात शिवरायांनाही पुण्याचे हे कोडे अखेरीस न उकलल्यामुळेच त्यांनी रायरी गाठला ना! लोकमान्यांना ‘गीतारहस्य’ उकलले, प्रंतु “पुणं कसं वाटलं?” हे काही सांगता आले नाही. पुणं कसं वाटलं, हे ठाऊक नसल्यामुळेच पेशवाईत मराठी झेंडा अटकेपार फडकावावा लागला, नव्हे काय?

या सवालाचे उत्तर सुज्ञ “व्वा! झकास हवा!” ऐसे देतात. वस्तुत: सवाल गावाचा आहे, हवेचा नाही! प्रंतु प्रश्नकर्त्याचा ‘कात्रज’ करणे येथे क्रमप्राप्त ठरते! का की पुणं कसं वाटलं? या प्रश्नास असंख्य पैलू आणि प्रयोजने असतात. मुदलात हा प्रश्न ज्याला विचारला जातो, त्यास ‘तु पुणेकर नाहीस’ ऐसे सांगण्याचाही हा मार्ग असु शकतो. “पुण्यातील ओळखीची दोन माणसे सांगा!” अशा अंगानेही हाच सवाल फेकता येतो. ‘पुण्यातले खड्डे’ या विषयाची सुरुवातही याच सवालाने रंगते. असो.
पुणं कसं वाटलं? आमच्या मते हा सवाल शंभर टक्के पोलिटिकल आहे, आणि याच्या पाठीमागे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे की, शेतीतज्ञ बारामतीकर यांचा (अक्षरशः) हात आहे. त्यांनी “पुणं कसं वाटलं, ते अजितला विचार!” असे सांगितले. शास्त्रीबोवा क्रिकेटपंडित! त्यांना पोलिटिकल कुठले कळायला? त्यांनी भोटसारखा सवाल अजु आगरकरलाच टाकला. (हा आमचा अजु हुशाराय, हां! फास्ट बोलर वाटत नै, पण बुद्धिबळ आँलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या चमुतला विद्यार्थी वाटतो! असो!!) अजु म्हणाला, “पुण्याला खेळायला नेहमीच आवडतं!” हे उत्तर पोलिटिकल नाही, असे कोण म्हणेल? प्रंतु, खरी मेख पुढेच आहे! वस्तुतः बारामतीकरांनी शास्त्रीबोवांना हा सवाल अजितला विचारायला सांगितला पण कोण अजित? आगरकर की पवार? (दादा, द्या उत्तर! पुणं कसं वाटलं?) पहा, वाचकहो, तुम्ही देखील गोंधळलात! आधीच सांगितले होते, प्रश्न सोपा, पण उत्तर कठीण!

ब्रिटिश नंदी

आप्त ! (ब्रिटिश नंदी)

ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदी

– आप्त म्हंजे काय रे भाऊ?

– अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात!

– हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ?

– छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात!

– म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ?

– नव्हे नव्हे रे! छे, आता मात्र मी… तुझ्यापुढे हातच टेकले! अरे, आप्त म्हंजे मित्र आणि नातलग!

– म्हंजे आपलं आघाडी सरकार का रे भाऊ?

– नाही नाही रे! सरकार ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती एक आपोआप चालणारी यंत्रण असते!

– म्हंजे घड्याळ का रे भाऊ?

– छे बुवा! अरे, इतका कसा तु मठ्ठ? जाऊ दे. मी तुला आता एक उधारण देतो. आपल्या मामाचे दर उन्हाळ्याला सुटीत पत्र एते. मी अमुक अमुक तारखेला एत आहे, असे त्याने कळवलेले असते. त्याला आपले बाबा लगीच पत्र टाकतात की आम्हीच बाहेरगावी जात असून तुम्ही एऊ नका!!

– हो रे हो! तसे पत्र मी वाचले आहे!

– असे पत्र लिहुन एखाद्याचा मामा करणारास आप्त असे म्हणतात!

– हा हा! आप्त म्हंजे शत्रु का रे भाऊ?

– नव्हे रे! आप्त हे आपल्याच घरातले किंवा पक्षातले असतात! पण आपल्या विरोधात असतात!

– हां हां, आता कळले! आप्त म्हंजे विरोधक!! बरोबर ना!

– रे, तुला अजुन पुर्ण समजलेले दिसत नाही! आप्त हे एकमेकांबरोबरच असतात, पण तेव्हाच विरोधकही असतात!

– म्हंजे शिवसेना आणि भाजप का रे भाऊ?

– नव्हे नव्हे रे! पुन्हा एक उधारण देतो. आपले बाबा रात्री उशिरा खूप पिऊन आले, की आपली आई काय करते?

– दार बंद करुन खूप शिव्या देते!

– नव्हे रे, बाबांना काय प्यायला देते?

– ताक!

– बरोब्बर! त्याला उतारा असे म्हणतात! आप्त हा एक उताराच असतो व नेहमी उशिरा घरी येणारांना पाजावा लागतो!

– हां, आता कळले मला सारे भाऊ!

– काय कळले?

– हेच की मी तुझा भाऊ असुन आप्तही आहे!!

— ब्रिटिश नंदी

‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)

ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदी

माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात काही असलेले बरे!) रिकाम्या हाताने गेलो (काही नेले तर काढुन घेतील ना!) आणि खुप आशीर्वाद घेऊन आलो! नंतर पलिकडल्या वस्तीत मिठाई वाटली. मा.शि.बा.ठा. यांच्या आ. ने मी दरवषी वाढदिवस असाच साजरा करतो. गेली अनेक वर्षे मी मिठाईचे पुडेच्या पुडे वाटत आहे. (खा लेको, साखर खा! मते द्यायला नकोत! डायबेटिस होवो तुम्हालाही!!)

चि. चिरायू आणि चि. आयुषा या नातवंडानी बुके आणि मुके दिले. मुके गोग्गोड होते; पण शुगर वाढेल म्हणुन एकेकच घेतला! आजोबांचा वाढदिवस म्हणुन चोर शाळेला दांडी मारणार होते. पण मी जन्मजात ‘प्रिं’ आहे. शाळेत पिटाळले. चि. उन्मेषनेही रागरंग पाहुन वेळेत आँफिस गाठले (हा वेळेत हाफिसात जातो; पण उशीरा का येतो?) खरे सांगायचे तर, मा.शि.बा.ठा. यांच्या ‘आ.’ ने वक्तशीरपणा माझ्या आंगात साखरेसारखा भिनलेला. कुठेही मी ठरलेल्या वेळेअगोदर पोचतो. वास्तविक माझा वाढदिवस आज; पण मी तो आदल्या दिवशीच थोडासा साजरा करुन घेतो. तेवढे ‘सावधपण’ अंगी असावेच लागते. त्याचे असे आहे की, शरदराव (पवार) आणि गोपीनाथराव (मुंडे) यांचे वाढदिवस १२ डिसेंबरला, म्हणजे पाठोपाठच येतात. म्हणजे १२ डिसेंबरला डब्बल बार फुटतो! मा.शि.बा.ठा. यांच्या ‘आ.’ ने मी १ आणि २ डिसेंबर अशा दोन तारखा बुक करुन टाकल्या आहेत. त्यांचा डब्बल बार आणि आपली नुसतीक लवंगी असा प्रकार झाला तर मा.शि.बा.ठां. चे आ.बा.च्या भा.म.जा!! असो!!

आजकाल एक बरे आहे! मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दुपारची झोप मस्त होते. अर्थात ‘वर्षा’ वरही थोडी वामकुक्षी होत असे. दिल्लीतही दुपारचा दोनेक तासंचा चुटका होई. पण आता तसे व्यवधान नाही. आज आठवणींनी गर्दी गेली. आयुष्याचे सिंहावलोकन करताना गेली निवडणुक आठवली आणि तोंड आंबट झाले. ‘पित्त झालाय’ म्हणुन पुटपुटत उगीच घरभर फिरलो. बटाट्याची भाजी अती खाऊ नये, असे अनेकवार घोकुन शेवटी खाल्लीच! शिवाय श्रीखंड!! अर्थात श्रीखंडात साखरे ऐवजी ‘इक्वल’ घातले होते, त्यामुळे ऑल श्रीखंडाज आल इक्वल, बट मा.शि.बा.ठां. च्या आ. ने सम आर मोर इक्वल! असो!!

या वाढदिवसला मी सर्वस्वी ‘माजी’ आहे, माजी नगरसेवकापासुन माजी लोकसभाअध्यक्षापर्यंत! बराच प्रवास झाला. आजी ते माजी! मा.शि.बा.ठां.चे आ. आणि बटाट्याची भा. या दोन्ही गोष्टी अशाच लाभत राहिल्या तरी खुप झाले! हे मागणे लई नाहीच!!

– ब्रिटिश नंदी

इस रंग बदलती दुनियामे (ब्रिटिश नंदी)

मी कात्रजचा साधासुधा रंग बिंग बदलणारा शामेलिआँन सरडा आहे. गेल्या आठवड्यात दोन नाकतोडे मटकावून शांतपणे बसलेलो असताना अचानक आमची उचलबांगडी झाली आणि इथे बाद्रयांत येऊन पडलो! इथे आल्यावर लगेचच कळलं, की आपण साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आहोत! (काही काळ पांढरा फटक पडलो होतो! खोटे का बोला?) मा. बाळासाहेबांच्या नातवाचा सरडा निधन पावल्याने आमची नेमणुक झाल्याचेही कळले. नाही म्हंटले तरी आनंद झाला. आम्ही सरडोके असलो, तरी आम्हालाही राजकीय निष्ठा असते, म्हटलं! मा. बाळासाहेबांच्या आदरापोटी मी रोज पंधरा-वीस मिनिटे भगवा रंग धारण करतो. मानेभोवतीचा पंखा फुलवुन ढाण्या वाघाचा आवही आणतो! ज़मून जाते!! कात्रजला येणा-या कित्येक पोराटोरांना मी निव्वळ या अभिनिवेशावर टरकवले आहे! आम्ही शामेलिआँन मंडळी निरुपद्रवी असतो, हे फारसं कुणाला ठाऊक असतं?

 मी गेल्या आठवड्यात या बंगल्यात आलो. आधी इथं राहणारा सरडा सपासप रंग बदलायचा. चांगला पाळीव होता. बंद दाराआड मीटिंग सुरु झाली, की अशी उभी मान हलवायचा! कोकणासंबंधी चर्चा सुरु झाली की, एक पाय पुढे टाकून लेझिम खेळल्यासारखी स्टेप टाकायचा! हुशार होता, पण शेवटच्या मीटिगला तो नव्हता. तेवढ्यात दार ढकलुन आत आले, म्हणाले, ‘माझा रंग बदलणारा सरडा कुठाय?’ ..सोफ्यावर जोशी सर बसले होते. त्यांनी कानात जाँन्सन बड घातली! सुभाष देसाईसाहेब मोबाईलवर एसएमएस करत -हायले. खास(दार) संपादक संजयजी राऊत यांनी झटक्यात समोरचा टीव्हीचा च्यानल बदलला! ‘मला सलमानकडे जायचंय’, असं सांगून राजसाहेब उठून गेले! मिलिंद नार्वेकरनी झटक्यात काँम्प्युटरवर ‘गुगल’वर ‘शँमेलिआँन’ची माहिती मिळवण्यास सुरुवात केली!… “आणू हं आपण दुसरा सरडा!” दादोजी महाराजांनी चिरंजिवांची समजुत काढली. (इथे मिटिंग संपली म्हणे!) इथे मला कोरड्या फिशटँकमध्ये घालुन आणलं. सगळे मला बघायला गोळा झाले होते. खरं तर मला फिशटँकमध्ये ठेवण्याची गरज नव्हती, कितीही मोकळे सोडले, तरी आमच्यासारख्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत, पण याआधीचा सरडा पार कुंपण पार करुन निजधामास गेला! त्यामुळे आमच्या नशिबी हा फिशटँक! असो!! “सव्वा लाखाचा सरडा आहे, राव!” ‘कुणी तरी’ म्हणाले. “सव्वा लाखाचा होता बे, सरडोक्याला कसली आलीये किंमत!” ‘कुणी तरी’ परस्पर उत्तर दिलं. “सरडा पण सव्वा लाखाचा असू शकतो! साधासुधा वाटला की काय हा!! चांगला शामिलिन जातीचा आहे!” ‘कुणी तरी’ मुद्दा सोडत नव्हतं. “फार शामळू असतात हे सरडे! ‘डिस्कव्हरी’वर मी पाहिलाय!” ” अहो, म्हणुन तर त्याला शामिलिआन म्हणतात! हाहाहा!!” ‘कुणी तरी’ अत्यंत टुकार विनोद केला. “सरडा असो वा मासा! झाकलेला असेल तेव्हाच सव्वा लाखाचा असतो!”, असं म्हणत ‘कुणी तरी’ आमच्यावर पिवळा टाँवेल टाकला. तेव्हापासुन आमचीही पिवळी झाली आहे…. कातडी हो!!!

 

 – ब्रिटिश नंदी

भेंडीची भाजी आणि भाकरी शैली! (ब्रिटिश नंदी)

– जय महाराष्ट्र.. साहेब!
– जय महाराष्ट्र! तुम्ही कोण विद्वान?
– तेच ते बुळबुळीत भेंडीची भाजीवाले!
– भेंडीची भाजी! शी! थोडी आमसुले तरी घाला, म्हणावं! तार सुटणार नाही.
– बरं बरं!
– पटापट गरळ ओका आणि तोंड काळं करा! तुमच्यासारख्या दळभद्री, पोटभरु पत्रकारड्यांसाठी वेळ नाही आमच्याकडे! बरीच कामे आहेत आम्हाला!
– फुरशी ठेचण्याचे काम?
– ते आमचे मावळे करतील! आम्ही नाही! पण तुम्हाला कशाला या चौकशा? कामाचं बोला आणि उकिरडे फुंकायला बाहेर टळा!!
– भाषेसंदर्भात तुमच्याकडुन जरा …
– संयमाची अपेक्षा करता? खड्ड्यात जा! ही आमची बाळबोध भाषा आहे! आम्ही असेच बोलणार बरे! आम्हाला शिवराळ म्हणता! हरामखोर, पाजी, पोटभरु, जळाऊ, विकाऊ, कर्मदरीद्री, करंटे, भिकार…
– व्वा! व्वा! काय मराठी भाषेचे सौष्ठव आहे, साहेब!
अहाहाहा!!!
– अहाहा करायला काय झाले? फुरसं चावलं?
– कापराच्या तेलात कापसाचा बोळा बुडवुन लांब काडीने कुणीतरी कानातला मळ काढल्यासारखे वाटलं हो!
– खामोश! आम्ही कानसफाईवाले वाटलो का तेल मालिशवाले! जीभ हासडुन हातात देईन!
– चुकलो, क्षमा करावी! तेवढे भाषेचे…
– आमची शैली बदलणार नाही! नराधमांना हीच भाषा समजते. आमची ही ‘ठाकरी’ शैली आहे! तुमची ‘भाकरी’ शैली! पोटासाठी वळवळनारे शेणकिडे! निकल जाव!!
– गैरसमज होतो आहे साहेब! मराठी भाषेसंदर्भात तुम्ही काही धडे घ्यावेत, अशी विनंती करण्यासाठी आलो होतो, साहेब!
– हे तुमचं काम नव्हे! आमचा झणझणीतपणा तुम्हाला पचणार नाही आणि तुमची बुळबुळीत भेंडीची भाजी आम्हाला मानवणार नाही!
– भेंडीची भाजी येवढी वाईट नसते, साहेब! थोडी खाऊन तर पाहा!
– भेंडीची भाजी? आण्इ आम्ही खाणार? महामूर्ख आहात!
– पोटाला बरी असते साहेब! पचनास हलकी!
– कळली तुमची अक्कल! पचनास हलकी म्हणे! बंडल, बेचव, बुळबुळीत भाजी ती! तिला काय किंमत द्यायची!
– मूळव्याधीला औषध आहे, म्हणे..

ब्रिटिश नंदी