in

उपवासातून आरोग्य

प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.
उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.
लघुभोजनं उपवासो वा लंघनम्‌।।
…चरक चिकित्सास्थान
(हलका आहार किंवा उपवास म्हणजे काही न खाणे हे लंघन होय.)
आयुर्वेदात लंघनाची व्याप्ती बरीच मोठी आहे. उपवास हा लंघनाचा एक भाग झाला; पण शरीरशुद्धी, व्यायाम, सूर्यस्नान, वायुसेवन, पाचन हे सुद्धा लंघनाचेच प्रकार होत. म्हणूनच लंघनाचे जे काही फायदे आहेत ते योग्य प्रकारे केलेल्या उपवासाने मिळू शकतात.
“लाघवकरं कर्मं लंघनम्‌’ म्हणजे हलकेपणा आणणारे ते लंघन अशी लंघनाची व्याख्या असल्याने उपवास केल्यास शरीर हलके होणे अपेक्षित आहे हे समजते. उपवासातून आरोग्य हवे असेल, तर हा उपवास आयुर्वेदातील लंघन संकल्पनेला धरून असायला हवा.
लघुभोजनं उपवासो वा।।
…चरक विमानस्थान
हलके भोजन किंवा उपवास म्हणजे काही न खाणे, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणजेच उपवासातून आरोग्य मिळवायचे असणाऱ्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे स्वरूप ठरवणे अपेक्षित आहे.

महाभूतांचे संतुलन
उपवासामुळे किंवा लंघनामुळे शरीरात आकाश, वायू व अग्नी महाभूतांचे संतुलन होते व यातून पुढील गोष्टी साध्य होतात –
शरीराचे जडत्व दूर होते.
अतिरिक्‍त कफदोष कमी होतो.
प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषाचे पचन होते.
अग्नी प्रदीप्त होतो.
आयुर्वेदात “आमदोष’ अशी एक संकल्पना मांडली आहे. जठराग्नीची ताकद कमी पडल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, की त्यापासून जो अर्धवट कच्चा रस तयार होतो तोच आमदोष होय. हा आम मुख्यत्वे आमाशयाच्या आश्रयाने राहतो; पण जर त्याचे वेळेवर पचन केले नाही, तर तो सर्व शरीरात पसरून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. आमदोषाचे रोगकारित्व इतके जबरदस्त असते, की “आमय’ हा रोगाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, तर जेथे आम नाही ती निरामय, निरोगी अवस्था समजली जाते. शरीरात आमदोष तयार झाला, की मलमूत्राचा अवरोध तयार होतो, ताकद कमी होते, शरीराला जडपणा येतो, आळस प्रतीत होतो, तोंडाची चव नष्ट होते, मळमळते, पोटात दुखते, चक्कर येते, अधोवायूला- शौचाला दुर्गंधी येते, आंबट ढेकर येतात.
अशा प्रकारे अनेक प्रकारची त्रासदायक लक्षणे निर्माण करणारा आमदोष वाढला असता, काहीही न खाता उपवास करणे अपेक्षित असते. यामुळे आम पचायला मदत मिळते. विशेषतः आमामुळे ताप आला असता किंवा आमामुळे अजीर्ण झाले असता काहीही न खाता उपवास करणे उत्तम असते.
अर्थात, आमदोष वाढून त्रास होण्यापर्यंत थांबण्याची आवश्‍यकता असते असे नाही. आठवड्यातून एकदा संध्याकाळचे जेवण न घेण्याची सवय लावून घेतली, तर त्यामुळे आमदोष तयार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले पाणी पिणे हेही आमदोष तयार न होण्यासाठी उत्तम असते.
प्रकृतीला हितावह उपवास
काही न खाता उपवास हा आमदोष पचविण्यासाठी उपयुक्‍त असला, तरी सरसकट सगळ्या प्रकृतीसाठी असा कडक उपवास हितावह ठरेलच असे नाही. विशेषतः दिवसभर किंवा अनेक दिवस फक्‍त फळे खाणे, नुसते दूध पिणे किंवा नुसते पाणीच पिणे अशा प्रकारचा उपवास सर्वांना मानवणारा नसतो. विशेषतः पित्त वा वातप्रधान प्रकृतीमध्ये पचण्यास हलके अन्न खाऊन उपवास करणेच अधिक योग्य असते.
योग्य पद्धतीने उपवास करण्याने लाभणारे काही फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत –
विमलेंद्रियता, मलानां प्रवृत्तिः, गात्रलघुता, रुचिः, क्षुत्तृषोरेककालमुदयः, हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः, रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्‍च।
सर्व इंद्रिये शुद्ध होतात.
मल-मूत्र-स्वेद आदी मलांचे प्रवर्तन यथायोग्य होते.
शरीरावयवात हलकेपणा प्रतीत होतो.
तोंडाला रुची येते.
तहान व भूक हे एकाच वेळी अनुभूत होतात.
शुद्ध ढेकर येतात.
घसा मोकळा वाटतो.
हृदयात हलकेपणा प्रतीत होतो.
रोग असल्यास रोगाचा जोर कमी होतो.
उत्साह उत्पन्न होतो.
झापड नाहीशी होते.
साळीच्या लाह्या, मुगाची डाळ, भाजलेले तांदूळ, ज्वारी-बाजरीची भाकरी, दुधी भोपळा, घोसावळी, दोडके, पडवळ, कारले वगैरेंपैकी साधी भाजी, ताक या गोष्टींचा हलक्‍या अन्नात समावेश होतो.
“एकादशी, दुप्पट खाशी’ नको
उपवासाच्या गोष्टी खाऊन उपवास करायचा असल्यास राजगिऱ्याच्या लाह्या, वरईचा तांदूळ, शिंगाडा, दूध, प्रकृतिनुरूप फळे, थोड्या प्रमाणात साबूदाण्याची खिचडी, थोड्या प्रमाणात उकडलेला बटाटा वगैरे पदार्थ खाता येतात; पण उद्या उपवास करायचा आहे या कारणास्तव आज अधिक खाऊन घेणे योग्य नव्हे; तसेच उपवासाचे पदार्थ चवीला आवडले म्हणून अगदी पोटभर खाणे, पोट जड होईपर्यंत खाणे अयोग्य होय. या प्रकारच्या उपवासातून अनारोग्यास आमंत्रणच मिळू शकते.
एखादी गोष्ट कितीही उत्कृष्ट असली, तरी ती कुणी व कधी करू नये हे माहिती असणे सर्वांत आवश्‍यक असते. उपवास करण्याचे खूप फायदे असले, तरी तो पुढील अवस्थेत न करणे अधिक आरोग्यदायक असते.
क्षयरोग झाला असता.
वातरोग झाला असता.
वातामुळे ताप आला असता.
काम-क्रोध वगैरे मानसिक कारणांमुळे ताप आला असता.
गर्भावस्था असताना.
बाळंतपणाची परिचर्या सांभाळत असताना.
आजारपणात किंवा आजारपणानंतर ताकद कमी झाली असता.
पंचकर्मासारखा शरीरशुद्धीकर उपचार चालू असता.
व्यवहारात बऱ्याच वेळा प्रकृतीला सोसवत नसतानाही मोठमोठे उपवास करण्याचा अट्टहास अनेकांनी धरलेला दिसतो; पण अनारोग्य वाढविणारी कोणतीच गोष्ट सरतेशेवटी स्वहिताची असू शकत नाही. सहन होत नसतानाही नियम म्हणून वर्षानुवर्षे उपवास करत राहणे आणि पोटाला-पचनाला जराही विश्रांती न देता सतत खात राहणे ही दोन्ही टोके टाळून प्रकृतिनुरूप उपवास करण्याचा सुवर्णमध्य साधला तर उपवासातून आरोग्य निश्‍चित मिळू शकेल.
डॉ. श्री बालाजी तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उद्धव-राज रायगडावर महाराजांना भेटतात तेव्हा.

कासरा!