Category Archives: महाराष्ट्र

मला कळालेले पानिपत !

पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की “पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते सांग ?” तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही !  “मराठे संख्यात्मक दृष्ट्या हरले, तर अफगान सैन्य मोहीम फत्ते झाली नाही म्हणुन.” अहमदशाह अब्दालीने त्या महायुद्धातील मराठ्यांच्या संगरतांडवाची अशी काही धसकी घेतली, की त्याला आपला गाशा गुंडाळुन मायदेशी परत जावे लागले. कारण, मराठ्यांचं एक तृतियांश 1/3 सैन्य पानिपतावर अब्दालीशी भिडलं होतं, पण अब्दालीचं सर्वच्या सर्व सैन्य युद्धात होतं त्यापैकी 70% सैन्य मरण पावलं. तिकडे अब्दालीच्या बंधुंनी गादी मिळवण्यासाठी बंड केलं आणि अब्दालीने युद्धानंतर मोहीम सोडुन तडकाफडकी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. 

 

जरा दुसऱ्या बाजुने ह्या महायुद्धाच्या परिणामांचा विचार केला, तर ह्या महायुद्धात मराठे जिंकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठ्यांचे लक्ष्य हे अब्दालीला रोखने आणि दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणे हेच होते. आणि अप्रत्यक्षरित्या मराठ्यांनी ते साध्य केले होते. कारण त्यानंतर अब्दाली मोहीम सोडुन माघारी फिरला आणि स्वत: त्याने पेशव्यांना संबंधित आशयाचे पत्र लिहुन हे कळविले की – “तुम्ही नेमलेल्या दिल्लीचा बादशहाला मी देखिल पुनश्च बादशहा म्हणुन मान्यता देतो, आणि दिल्लीचे रक्षण पुर्वीप्रमाणे मराठ्यांनीच करावे ही विनंती.” हे पत्र स्वत: अहमदशहा अब्दालीने लिहुन पेशव्यांना पाठविणे म्हणजे मराठ्यांचा पानिपतावर अप्रत्यक्षपणे झालेला विजयच.

 

पानिपतचे महायुद्ध संख्यात्मकदृष्ट्या हारण्याची कारणे आणि त्यानंतरचे भारतीय राजकारणावर झालेले परिणाम आणि राजकीय लाभ ह्याचा विचार करता, अब्दाली सरळसरळ संख्यात्मक दृष्ट्या जिंकला होता, परंतु मराठ्यांच्या भिमटोल्याने अब्दालीचे एवढे नुकसान झाले की त्याला त्याच्या उरलेल्या सैनिकांसमवेत दिल्लीवर स्वत:चे राज्य घोषित करुन ते टिकविणे शक्य नव्हते. कारण, मराठ्यांचे दोन तृतियांश  2/3 सैन्य अजुनही महाराष्ट्रात होते, जर मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा सुड घेण्यासाठी परत दिल्लीला धडक मारली, तर माझ्या कबरीचं थडगं नावालापण शिल्लक ठेवणार नाहीत ! ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती ! काय तो काळ जेंव्हा शिवरायांना दिल्ली दरबारी नजरकैदेत ठेवल्या गेलं होतं, आणि एक हा काळ जेथे दिल्लीच्या गादीवरचा (नामधारी) बादशहा मराठ्यांनी तिन वेळा बदलला.

 

पानिपतच्या महायुद्धानंतर राजकीय फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला. फायदा झाला तो उत्तरेतील संस्थानांना ! (म्हणजेच रजपुत, जाट, शिख, गुजर ईत्यादी) कारण अब्दाली म्हणजे राष्ट्रीय संकट आणि मराठे म्हणजे दिल्लीच्या तख्ताचे रक्षणकर्ते ह्यांच्यात युद्ध झाले. दोन्ही बाजुस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या गंभीर हानी झाली, आणि दिल्लीची राजकीय परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली (उत्तरेतल्या हिंदू राजा-महाराजांना अपेक्षित असलेली). पानिपतचा रणसंग्राम चालु असताना मराठ्यांना मदत न करता स्वत:ची कातडी वाचवुन लांबुन नजारा पाहणाऱ्या हिंदू राजे-महाराजांनी वर्षभरानंतर दिल्लीत हातपाय पसरायला सुरुवात केली, आणि दिल्लीच्या (नामधारी) बादशहाचे नियंत्रण मिळविण्यासाठी जाळे विणायला सुरु केले होते. ह्या प्रकाराला मी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणेन, कारण, अब्दाली आणि मराठे अश्या दोन मांजरांचे भांडण चाललय आणि उत्तरेतली माकडं भांडण सरल्यावर दिल्लीचं लोणी खायला उड्या मारत गेले. पानिपतच्या महायुद्धानंतर दिल्लीच्या आणि संपुर्ण भारताच्या राजकारणाला एक वेगळंच असं अनपेक्षित वळण मिळालं. खरं सागायचं झाल्यास पानिपतचं युद्ध हे अटळच होतं. कारण, तेंव्हाची राजकीय परिस्थिती पाहता (दिल्लीवर होणारी आक्रमणे) ह्यांना कुठल्यातरी प्रकारे लगाम लावणे आणि “एकछत्री हिंदूपदपातशाहीचे स्वप्न” अस्तित्वात आणण्यासाठी स्थिर असलेली राजसत्ता दिल्लीत असणे आवश्यक होते. नाझेरखान (अब्दालीचा गुरु) चे अयशस्वी झालेले मनसुबे पुर्ण करण्यासाठी अब्दाली नजिबखानाच्या औपचारिक बोलावण्यावरुन तिसऱ्यांदा स्वारीस आला होता, यापुर्वी जेंव्हा दोन वेळा अब्दाली आला होता, तेंव्हा तो पहिल्यांदा उप-सेनापती व दुसऱ्यांदा सेनापती म्हणुन आला. नाझेरखानच्या मृत्युनंतर अब्दालीने इराण पासुन अफगाणीस्तान वेगळा केला आणि त्याने कंदाहारची माती मौलवी हस्ते कपाळाला लाउन स्वत:ला अफगाणचा राजा घोषित केले. स्वत:चे राज्य स्थापन केल्यानंतर त्याला राज्यकारभारासाठी चांगला खजिना पाहिजे होता, अब्दाली हिंदूस्तानात तिसरी स्वारी करण्याच्या विचारातच होता, त्यात प्रत्यक्ष हिंदूस्तानातुन रोहिल्याच्या नजिबखानाने औपचारिक पत्र पाठविले आणि अब्दाली वादळाप्रमाणे हिंदूस्तानच्या सरहदीवर येऊन धडकला.

 

10 जानेवारी 1760 मध्ये क्रुरकर्म्या नजिबाने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला आणि मल्हारराव होळकरांचा विश्वासघात. नजिब्याने  अयोद्धेचा नवाब सुजाउदौला, दुर्राणी बादशहा अहमदशहा अब्दाली आणि आसपासच्या मुलुखातली वतनदार मुस्लिम सरदार मंडळी इस्लामच्या नावाने जमा केलं. मौलाना सुजावली खान ने ह्या सर्वांना पवित्र “दार-उल-इस्लाम” साठी जिहाद करण्याची शपथ दिली अशी नोंद आहे. (सध्या पाकिस्तानात व अफगाणीस्तानातील तमाम दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा जनक म्हणजे मौलाना सुजावली खान होय. 1857 मध्ये भारतात सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचे धागेदोरे हे मौलाना सुजावली खान पर्यंत पोहचतात). तर दुसरीकडे अहमदशहा अब्दालीची बेगम झिनतने (मराठ्यांचा तोफखाना प्रमुख) इब्राहिम खान गारदीला पवित्र “दार-उल-इस्लाम” ची दिलेली शपथ त्याने झिडकारुन लावली, इब्राहिम खान आणि सदाशिव भाऊंच्या मैत्रीच्या एका आदर्श उदाहरणाची नोंद इतिहासाला करणं भाग पडलं.  नजिब्याने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला, ही बातमी जशी पुण्याला पोहचली तशी शनीवारवाड्यात एकच खळबळ उडाली. पेशव्यांनी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंना उत्तरेच्या मोहीमेकडे नेतृत्व करण्याची संधी दिली खरी, पण पेशविणबाईंच्या दबावाने त्यांनी मोहीम काढली ती चिरंजीव विश्वासरावांच्या नावानेच. पेशव्यांनी भाऊंना संधी दिली पण अधिकार दिला नाही, अश्या अविश्वासाची भाऊंना अपेक्षा नसेल, पण ही वेळ मान-मनसुब्यासाठी झगडा करण्याची नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी अब्दालीला दिल्लीपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशीलपणे लढण्याची आहे. भाऊंच्या पाठीवर लादलेले बाजारबुणगे, शंखफुके भटजी, चिलीमफुके साधूबाबा, बायकालेकरांचे लटांबरं अन् पंढरपुरच्या जत्रंला निघाल्यासारखे टाळ कुटणारे हौशे, गवशे, नवशे म्हणजे खायला काळ अन् भुईला भारंच होते, सैनिकमावळ्यांना ह्या बाजारबुणग्यांच्या लटांबरामुळं अन्नपाणी कमी पडत असे, प्रवासाची गती कमी होत असे. जेंव्हा अब्दालीने मराठ्यांची पंजाबातील रसद तोडली, नदीवर धरण बांधुन पुर्ण पाणी अडवलं, तेंव्हा ह्या तिर्थक्षेत्रासाठी उड्या मारत आलेले शंखफुके, चिलीमफुके, हौशे, गवशे, नवशे ह्यांनी भाऊंना आपल्याला परत पुण्याकडे पाठवण्यासाठी पायी लोटांगण घातले. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या पराभवाचे कारण असु शकते.

 

विश्वासरावांनी आणि भाऊंनी वेळोवेळी पेशव्यांना हलाखीची परिस्थिती सांगुन मदत मागितली, पेशवे सरकार 40 हजाराची सेना घेउन निघाले खरे ! पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल ? ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ?  ह्या विचारानेच मी वेडा होउन जातो. किती ताकदवान असतील ते भाऊंचे शब्द ज्याच्यात हजारो मंत्रांची ऊर्जा संक्रमित झालेली होती. जर भाऊंच्या जागी कदाचित दुसरा कुणी असता तर खचितच तो शरण गेला असता, असं म्हणनं वावगं ठरणार नाही.

 

तानाजी मालुसरे पासुन दत्ताजी शिंदे पर्यंतच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचं कर्ज फेडण्यासाठी शिव-शंभुंना भाऊंनी वाहीलेली श्रद्धांजली म्हणजे पानिपत.

 

राष्ट्ररक्षणासाठी कसलाही जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद न मानता शत्रुला रोखण्यासाठी मर्द मऱ्हाठी मावळ्यांनी “हर हर महादेव” ची गगनभेदी ललकारी देत सणसणित हाणलेला भिमटोला म्हणजे पानिपत.

 

जात, धर्मापेक्षा हे राष्ट्र सर्वोच्च आहे, आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणास्तव “मारीता मारीता मरावे” हा वसा घेऊन रणमैदानी मराठ्यांनी केलेले संगरतांडव म्हणजे पानिपत.

 

मायभूमीचे पांग फेडण्यासाठी परिणामांची पर्वा न करता मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने जिथे भारतमातेचे चरण धुतले ते ठिकाण म्हणजे पानिपत.

 

न भुतो न भविष्यती असे हे पानिपत पानिपत पानिपत !

 

 

~ माहिति संकलन आणि लेखन : सत्यम अवधुतवार

 

(सदरील लेख हा वाचलेल्या साहित्यातुन, दृकश्राव्य माध्यमांतुन, मिळालेल्या माहीतीनुसार मी माझं मतं येथे सविस्तरपणे मांडलेलं आहे)

पुणे दर्शन – पुण्यनगरीत आपले सहर्ष स्वागत आहे

विद्येचे माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कॄतीक राजधानी पुणे, अश्या पुण्याला आपण भेट देणार असाल  तर ‘पुणे दर्शन‘ शिवाय ती भेट अधुरीच म्हणावी लागेल. सर्वांच्या खिश्याला परवडतील अश्या दरांमध्ये ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ’ (पी.एम.पी.एल) पुणे दर्शानाची सुविधा पुरवते जेणे करुन तुम्ही पुण्याच्या विविध रुपांचे दर्शन घेऊ शकाल आणि अनेक भागांना भेटी देऊ शकाल. पुणे पहाण्यासाठी म्हणुन जे आले आहेत त्यांच्या साठी हि एक अतिशय चांगली सुविधा आहे. पुण्यातल्या व पुण्याच्या आसपासच्या अनेक सुंदर, ऐतिहासिक अश्या स्थळांचे दर्शन घडवणारि हि सहल फक्त एका दिवसात पुर्ण होते आणि या मुळेच पर्यटकांच्या वेळेची, पैशाची व ताकतीची बचत होणे शक्य होते.

पुणे दर्शन
पुणे दर्शन (AC Bus)

पुण्याच्या पर्यटन स्थळांमधुन पुण्याची संस्कॄती, वारसा आणि इतिहास झळकतो. समुद्र सपाटी पासुन ५६० मीटर्स उंची वर पुणे वसलेले आहे. सर्वच ऋतुंमध्ये पुणे पाहता येऊ शकते म्हणुनच वर्षाच्या कोणत्याहि महिन्यात आपण पुणे शहर पाहण्यासाठी येऊ शकता. पुण्याने आधुनिकते सोबतच आपली संस्कृतीही जपुन ठेवली आहे हे आपल्याला जाणवते जेंव्हा आपण पुण्यातल्या काहि प्रसिद्ध मंदिरांना भेटी देतो जसे कि – चतुॠंगी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेपती मंदिर, सारसबाग गणपती मंदिर इत्यादी. याच बरोबर दगडांमध्ये काम करुन बनवलेल्या ऐतिहासिक पाताळेश्वर लेण्या व शंकराचे मंदिर, १६ व्या शतकातील शनिवार वाडा, १८९२ मध्ये बांधलेला आगाखान पैलेस यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. पुणे शहरा मध्ये काहि प्रमुख संग्रहालये देखिल आहेत – टिळक संग्रहालय, केळकर संग्रहालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, ट्रायबल संग्रहालय इत्यादी. पुण्याचा प्रचंड असा ऐतिहासिक वारसा व पुण्याचे महाराष्ट्र व देशाच्या जडणघडणी मध्ये असलेले योगदान तुम्हाला पुणे दर्शन मध्ये पाहण्यास मिळेल हे नक्कि.

पुणे दर्शन मध्ये दाखवण्यात येणारी प्रमुख स्थळे:

 • पाताळेश्वर लेण्या
 • पुणे विद्यापीठ
 • चतुॠंगी मंदिर
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय
 • टिळक संग्रहालय
 • शनिवार वाडा
 • लाल महल
 • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर
 • फुलेवाडा
 • सारसबाग गणपती मंदिर
 • पेशवे उद्यान
 • महालक्ष्मी मंदिर
 • स्वामी विवेकानंद संग्रहालय
 • राजीव गांधी प्राणी संग्रहालय, कात्रज (कात्रज स्नेक पार्क)
 • महादजी शिंदे छत्री (समाधी स्थळ)
 • राष्ट्रिय युद्ध स्मारक
 • पुणे ट्रायबल संग्रहालय
 • ओशो गार्डन
 • आगा खान पैलेस

वरिल ठिकाणी पुणे दर्शनची बस जाते, ट्रिपची सुरवात व अंत पुणे रेल्वे स्टेशन इथुन होतो.

पी.एम.पी.एम.एल आपल्या बसने आपला प्रवास सुखाचा व आनंदाचा होवो या साठी प्रयत्न करतेच. पुणे दर्शनची बस पुण्यातुन दोन ठिकाणांहुन सुटते मोलिदीना स्टैंड (पुणे रेल्वे स्टेशन) आणि डेक्कन जिमखाना (डेक्कन बस स्टैंड). बसेस सकाळी ९.०० ला सुटते व परत संध्याकाळी ५.०० ला येतात. पुणे दर्शनची बस तुम्ही सकाळी ८.०० ते ११.३० व दुपारी ३.०० ते ६.०० या वेळांमध्ये आरक्षित करु शकता. येणारा खर्च अंदाजे १५० रु. प्रती व्यक्ती.

कमीत कमी वेळेत, पैशांत व कष्टांत पुणे पहाण्याचा पुणे दर्शन हा अत्यंत किफायतशीर असा मार्ग आहे. जेंव्हा तुम्हि पुण्यामध्ये येण्याची योजना आखाल त्या वेळी पुणे दर्शनाचा पर्याय नक्कि निवडा.

हे लक्षात असु द्या:

 • फुलेवाडा रविवारी बंद असतो
 • पेशवे उद्यान व राजिव गांधी प्राणि संग्रहालय बुधवारी बंद असतात

जैतापूर – महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र सरकार अजून किती दिवस फसवणार आहे?

हि आहे जैतापूर प्रकल्पाची सच्चाई

१. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राचा प्रकल्प आहे. मुळात हा प्रकल्प भारत सरकारचा National Nuclear Project आहे. भारत आणि फ्रांस या दोन देशांमध्ये झालेला हा करार आहे.

२. National Nuclear प्रोजेक्ट असल्यामुळे या जैतापूर प्रकल्पामधून निर्माण होणारी विजेवर देशातील सर्व राज्य यांचा हक्क असणार आहे. महाराष्ट्राला जैतापूर प्रकल्पा मधून फक्त १०% वीज मिळणार आहे आणि ती पण महाराष्ट्राला पैसे देवून विकत घ्यावी लागणार आहे.

३. म्हणजे जमीन, पाणी सगळे महाराष्ट्राचे, धोका राहणार कोकणातील लोकांना आणि फायदा उठवणार देशातील इतर लोक.

४. जैतापूर भागामध्ये २००९ पासून ९२ वेळा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. उद्या जपानसारखा भूकंप जैतापूर मध्ये झाला तर अख्खा महाराष्ट्र नष्ट होवू शकतो.

५. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेला खोटे सांगत आहे कि जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्राला देवून भारत सरकार ने महाराष्ट्राला मदत केलेली आहे. मुळात हा प्रकल्प गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांनी आपल्या राज्यामध्ये उभा करायला नकार दिला होता. शेवटी भारत सरकारने हा जैतापूर प्रकल्प हा महाराष्ट्रजनतेच्या बोकांडी मारलेला आहे.

जैतापूर प्रकल्पाची सच्चाई
जैतापूर प्रकल्पाची सच्चाई

६. अणुप्रकल्प हा समुद्र किनारी असतो कारण त्या प्रकल्प मधून बाहेर टाकले जाणारे अनु जल समुद्राच्या पाण्यामध्ये सोडले जाते. कोकणातील सुंदर समुद्र किनारा, तेथील सुंदर निसर्ग या जैतापूर प्रकल्पामुळे कायमचा नष्ट होवू शकतो.
हजारो कोटीचा हा जैतापूर प्रकल्प असल्यामुळे आणि अमेरिकेचा दबाव या दोन कारणामुळे महाराष्ट्र सरकार कोकणातील जनतेच्या मुळावर उठलेली आहे. पैसे घेवून बातम्या देणार पत्रकार आणी मिडिया जाणूनबुजून बदनामीच्या बातम्या देत आहेत. आमचे महाराष्ट्रा मधील सर्व जनतेला आणि सर्व राजकीय पक्षांना खुले आवाहान आहे कि हा जैतापूर प्रकल्प महाराष्ट्राची भावी पिढी नष्ट करून शकतो हे लक्षात ठेवून महाराष्ट्रातील सर्व जनतेने आणि सर्व राजकीय पक्षांनी या जैतापूर प्रकल्पाला विरोध करावा.

 

आपण आपली मते खाली असलेल्या कमेंट बॊक्स मधुन मांडा.

हिंदू मना बन दगड

Hinduआज हिंदू धर्मावर इतर धर्मीयांचे संकट आहेच. पण तितकेच किंवा त्याहूनही अधिक स्वकीयांचे संकट आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या भारताचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी दिल्लीत एका पोलीस संमेलनात ’भारतात भगवा आतंकवाद अस्तित्वात आहे आणि तो कमी धोकादायक नाही.’ असे विधान केले. भालचंद्र नेमाडेंनी तर ’हिंदू: जगण्याची एक समृद्ध अडगळ’ ही कादंबरी लिहीली. त्यात त्यांनी हिंदूद्वेष्टे विधाने केली आहेत. यावरून अनेक हिंदूंच्या भावना दुखावल्या. अर्थातच हिंदूंनी हवा तसा विरोध केला नाही. नेमाडे काय आणि चिदंबरम काय, दोघेही हिंदूच. हे हिंदूंचे दुर्दैव. आपलेच लोक आपल्या धर्मावर टिका करतात. अन्य धर्मीय त्यांच्या धर्मावर अशी टिका करत नाही. कारण ते संघटित आहेत, आक्रमक आहेत. हिंदू हे अतिसहिष्णू आहेत. गृहमंत्र्यांनी जर “हिरवा आतंकवाद” असे म्हटले असते, तर ह्या हिरव्यांनी त्यांची लूंगी उचलून त्यांच्यावर कोणता प्रसंग आणला असता? याची परिपूर्ण जाणीव चिदंबरम यांना होती. म्हणूनच त्यांना भगव्या आतंकवादाचा साक्षात्कार झाला असावा, असो.

ख्रिश्चन आणि मुस्लिम यांना बायबल आणि कुराण हे बाळकडू म्हणून पाजले जाते. तसे हिंदूंमध्ये होत नाही. हिंदूंना मुळात धर्मशिक्षणच मिळत नाही. म्हणूनच आज हिंदूंमध्ये ब्राम्हण द्वेष वाढत चालला आहे. काही स्वघोशीत ईतिहास संशोधक जन्माला येत आहेत. त्यांनी तर ब्राम्हणांना धारेवरच धरले आहे. मग दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नसतात. समर्थ रामदास शिवरायांना कधी भेटलेच नसतात. ते औरंगझेबाचे हेर असतात. अशा काही भूलथापा हे नव-ईतिहास संशोधक मारत अहेत. रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे दोन्ही महापुरुष ब्राम्हण होते. म्हणूनच त्यांच्यावर असले आरोप होत आहेत. या ईतिहास संशोधकांना इतकेच सांगायचे आहे की त्यांनी भारताच्या ईतिहासाचा सखोल आभ्यास करावा. परकिय आक्रमणांनी हिंदूस्तानात सर्वात जास्त कत्तल ब्राम्हणांची केली. कारण त्यांना ठाऊक होते की ब्राम्हण हे हिंदू धर्माचे तारक आहेत. आज महाराष्ट्राच्या एक टक्का लोकसंख्या सुद्धा ब्राम्हण समाज राहीला नाही. ही हिंदूंची शोकांतिका आहे. इथे इतकेच सांगावासे वाटते की आर्य चाणक्यांपासून ते सावरकरांपर्यंत देशासाठी त्याग करणारे ब्राम्हण होते.

गांधी-नेहरू कुटूंबांनी हिंदूस्तानची सूत्रे हातात घेतली आणि हिंदूस्तानचा इंडिया कधी झाला कळलेच नाही. आज हिंदूंवर पक्षपाती असण्याचा आरोप होत आहे. भारताचा राष्ट्रपती मुसलमान होतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान होतो आणि तरीसुद्धा हिंदू हे पक्षपाती कसे? कधी विचार करून पहा, “बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानचे पंतप्रधान झाले” अहो विचार काय स्वप्न सुद्धा पडणार नाही. जगात चार प्रमुख धर्मांचे लोक राहतात. ख्रिश्चन हे पहील्या क्रमांकावर असून त्यांची अनेक राष्ट्रे आहेत. मुस्लिम हे दुसर्‍या क्रमांकावर असून त्यांचीही अनेक राष्ट्रे आहेत. बौद्ध हे तिसर्‍या क्रमांकावर आहेत आणि त्यांचे सुद्धा काही देश आहेत. हिंदू हे चौथ्या क्रमांकावर असूनही त्यांचा एकही देश ह्या भूतलावर नाही. होय, आपण इंडियात राहतो, हिंदूस्तानात नव्हे. हे प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवले पाहीजे.

जगातील बावन्न मुस्लिम राष्ट्रांपैकी असे एकही राष्ट्र नाही जे हज यात्रेसाठी विशेष सवलती देते. पण भारतात मुस्लिमांना अनेक सवलती आहेत. १९४७च्या फाळणीनंतर पाकिस्तानात २४ टक्के असलेले हिंदू आज केवळ १ टक्का उरले आहेत. बांगलादेशात ३० टक्के असलेले हिंदू आज फक्त ७ टक्के इतकेच आहेत. याउलट भारतात मुस्लिमांची संख्या वाढतच आहे. कसाब आणि अफ़जल गुरुला सरकार पोसत आहे आणि एकिकडे हिंदू धर्माभिमानी साध्वी प्रग्न्यासिंग यांचा छळ होत आहे. बदोद्दात रस्ता रुंदीकरण्यासाठी बारा मंदिरे पाडली. तोपर्यंत सर्वे शांत होते. पण दोन दर्गे पाडायला जाताच दंगे उसळले. तरीसुद्धा आम्ही हिंदू पक्षपाती कसे हो? कारण आम्ही सहीष्णू आहोत म्हणून?

हिंदूंमध्ये अनेक जाती असल्यामुळे ते संघटीत होऊ शकत नाही. ही परधर्मीयांनी मारलेली थाप आहे आणि आपण ती वस्तुस्थिती मानत आलो अहोत. लक्षात ठेवा मुस्लिमांमध्ये ६४० जाती आहेत आणि ख्रिश्चनांमध्ये २४२ पंथ आहेत. तर मग हिंदूंमध्ये अनेक जाती आहेत, अशी बोंब का? ख्रिस्ती धर्मात जाती नाहीत, अशी म्हणणारी मदर टेरेसा, जाती-निहाय आरक्षण मागासवर्गीय ख्रिस्त्यांना मिळावा म्हणून उपोषणाला बसली होती. हा इतर धर्मीयांचा डाव आपण ओळखला पाहीजे.

जगाच्या ईतिहासात हिंदूंनी आपला धर्म कधीच कुणावर लादला नाही. जग जिंकण्याचाही अट्टाहास कधी केला नाही. हिंदू धर्म पसरावा म्हणून मिशनरी, मदरसे उभारले नाहीत. जो कुणी हिंदू नाही तो काफ़र आहे, असे कधीच मानले नाही. उलटपक्षी त्याला आपला बंधूच मानले आहे. त्याचे स्वागतच केले आहे. हिंदूंच्या सहिष्णूतेचा इतर धर्मीयांनी नेहमीच फायदा घेतला आहे. हिंदूंचा छळ केला आहे. यावर एकच अमोघ उपाय “हिंदू संघटन”.

इथे विंदा करंदीकरांची एक कवीता आठवते “माझ्या मना बन दगड”. करंदीकरांच्या कवीतेतलं मन हे जणू हिंदू मन आहे असे वाटते. खरेच हिंदूंना आता कणखर व्हायलाच हवे. विंदा करंदीकरांच्या शैलित सांगायचे झाले तर, हिंदू मना बन दगड…….हिंदू मना बन दगड…….

लेखक: जयेश मेस्त्री

संपर्क: गिरिश केणी चाळ,
पन्नालाल घोश मार्ग,
सुहास टेरेसच्या बाजूला,
राजनपाडा, मालाड (प).
मुंबई- ४०००६४.
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com

हा लेख महाराष्ट्र माझा साठी जयेश मेस्त्री यांनी लिहुन पाठवला, आपणास हि महाराष्ट्र माझा साठी लेख लिहायचा असल्यास संपर्क साधा.

आयोध्या वादाची पार्श्वभुमी

जय श्रीराम
जय श्रीराम
अयोध्येतील जागेच्या वादाला अनेक वर्षांची पार्श्‍वभूमी असली, तरी हा वाद १९४९ नंतर जास्त चिघळला. या जागेवर मालकी सांगणारे वेगवेगळे पाच दावे १९४९ ते १९८९ या काळात न्यायालयात दाखल झाले. याच दाव्यांवर झालेल्या एकत्रित सुनावणीनंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे विशेष न्यायालय गुरुवारी या वादावर निकाल देणार आहे. या वादाचा हा घटनाक्रम..

१५२८ – अयोध्यात मशिदीची उभारणी.हि मशीद रामजन्माच्या जागी उभारल्याचा हिंदुत्ववाद्यांचा दावा.

१८५३ – ह्या भागात पहिल्यांदाच धार्मिक दंगल.

१८५९ – ब्रिटिशांकडून वादग्रस्त भगत निर्बंध.परिसरातील आतील भागात मुस्लिमांना,तर बाहेरील भागात हिंदुना पूजाअर्चा करण्यास परवानगी.

१८८५-८६ – मशिदीला लागून असलेल्या राम चबुतऱ्यावर मंदिर बनवण्याची निर्मोही आखाड्याची मागणी न्यायालयाने फेटाळली साडेतीनशे वर्षापूर्वीची चूक आता दुरुस्त करता येणार नाही,अशी टिप्पणी.

१९४९-(२२-२३ डिसेंबर)- प्रभू रामचंद्राच्या मूर्ती वादग्रस्त ठिकाणी आढळल्या.हिंदुच्या एका गटाने २२ डिसेंबरच्या मध्यरात्री त्या गुपचूप मशिदीत ठेवल्याचा मुस्लीम समाजाचा आरोप.या मूर्ती सापडल्या नंतर परिसरात धार्मिक तणाव.पोलिसांनी तातडीने वादग्रस्त भाग बंद केला.पण शेकडो हिंदुनी तेथे जावून प्रार्थना केली.तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांनी मूर्ती हटवण्याचे आदेश उत्तर प्रदेशाचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांना दिला.तत्कालीन जिल्हाधिकारी क.क.नय्यर ह्यांनी मूर्ती हटवण्यास नकार दिला आणि तेवढ्यावरच न थांबता पदमुक्त करण्याची विनंती केली. नय्यर हे नंतर हिंदू महासभेच्या उमेदवारीवर लोकसभेत गेले.

१९५०-(५ जानेवारी) – धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांकडून बाबरी मशीद हे वादग्रस्त बांधकाम असल्याचे घोषित.जागेला कुलूप.

१) १६ जानेवारी – हिंदू महासभेचा कार्यकर्ता गोपाल सिंग विशारद याची याचिका.अशीच याचिका दिगंबर आखाड्याचे रामचंद्र दास परमहंस यांनी दाखल केली.ती १९८९ मध्ये मागे.हाशीम अन्सारी यांचीही याचिका.वादग्रस्त जागी नमाज पढून देण्याची विनंती.

२) १९ जानेवारी – वादग्रस्त जागेतून मूर्ती न हलवण्याची मागणी आणि पूजाअर्चा करून देण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य तत्कालीन नगराध्यक्षांकडे पुजेची जबाबदारी.

१९५९ – निर्मोही आखाड्याची तिसरी याचिका दाखल वादग्रस्त स्थानी राम मंदिर होते व त्याची मालकी आपल्याकडे होती असा दावा करून जागा हवाली करण्याची मागणी.वादग्रस्त जागी पूर्वापार पूजा होत असल्याची आणि तेथे नमाज पडला जात नसल्याचा दावा.आखाड्याचे महंत भास्कर दास ह्यांनी गेली ५० वर्षे हा खटला हाताळला.

१९६१ – सुन्नी वक्फ बोर्ड आणि स्थानिक मुस्लिमांकडून चौथा खटला दाखल.बादशाह बाबरने १५२८ ला मशीद बांधली.आणि त्यानंतर १९४९ पर्यंत त्या जागी नमाज पडली जात असल्याचा दावा.त्यामुळे वादग्रस्त बांधकाम मशीद म्हणून घोषित करण्याची मागणी.निर्मोही आखाड्याचा दावा राम चाबुताऱ्यापुरता असल्याचाही युक्तिवाद.

१९८४ – विश्व हिंदू परिषदेकडून”रामजन्मभूमी मुक्ती”आणि मंदिराच्या निर्मितीसाठी समिती स्थापन.आंदोलनचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी ह्यांच्याकडे.विश्व हिंदू परिषदेचे तीव्र आंदोलन..कुलूप उघडून आत प्रवेश देण्याची मागणी.

१९८६(१ फेब्रुवारी) – स्थानिक वकील उमेशचंद्र पांडे ह्यांच्या याचिकेवर,वादग्रस्त बांधकामाचे कुलूप उघडून हिंदुना आत जावून पूजा करून देण्याचा फैजाबाद सत्र न्यायाधीशांचा आदेश.त्याआधी पुजार्यांना केवळ वर्षातून एक दिवस आत जावून पूजा करण्याची परवानगी होती.या निर्णयाने सर्व हिंदुना आत प्रवेश मिळाला.

फेब्रुवारी-न्यायालयाच्या निर्णयावर मुस्लीम समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया .बाबरी मशीद संघर्ष समितीची स्थापना.

१९८९
१) (१ जुलै) – विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि माजी न्यायाधीश देवकीनंदन अग्रवाल ह्यांची पाचवी याचिका दाखल.वादग्रस्त जागी मंदिर होते.असा दावा करणारे कथित पुरावे सादर.रामजन्मभूमी न्यासही प्रतिवादी.

२) जुलै १९८९ – फैजाबाद न्यायालयातील पाचही दावे काढून घेवून विशेष न्यायालयामार्फत सुनावणी घेण्याची विनंती अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मान्य,लाखनौ खंडपीठात विशेष न्यायालय.

३) १० नोव्हेंबर-रामजन्मभूमी निर्माण आंदोलनाला वेग.तात्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांची वादग्रस्त भागात मंदिराच्या शिलान्यासाला परवानगी.

४) ११ नोव्हेंबर -पुढील बांधकामाला न्यायालयाची मनाई.

१९९०
१) (२५ सप्टेंबर) – लालकृष्ण अडवाणींची सोमनाथकडून अयोध्येकडे रथयात्रा.

२) नोव्हेंबर-बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव ह्यांनी समस्तीपुर येथे रथयात्रा रोखली.भाजपने विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा पाठींबा काढला.सरकार पडले.

६ डिसेंबर १९९२ – हजारो कारसेवाकांकडून अयोध्येतील वादग्रस्त बांधकाम उध्वस्त.देशभरात दंगलीचा आगडोंब.

१६ डिसेंबर १९९२ – घटनेच्या चौकशीसाठी एम.एस.लिबरहान आयोग स्थापन.

डिसेंबर – केंद्र सरकारकडून वादग्रस्त २.७७ एकर जागा ताब्यात.

१९९३ – उत्तर प्रदेशातील भाजप सरकारकडून वादग्रस्त भागातील ६७ एकर जमीन ताब्यात.आणि विश्व हिंदू परिषदेकडे सुपूर्द.या जागेवर रामकथा पार्क उभारण्याचा दावा.

१९९४ – सर्वोच्च न्यायालयाकडून भाजप सरकारची कारवाई रद्दबातल.वादग्रस्त जागेवर”जैसे थे”स्थिती ठेवण्याचे आदेश.वादग्रस्त जागेवर मंदिर पडून मशीद बांधण्यात आली का?या वादात न पडण्याचा सर्वोच्च न्यायायालायाचा निर्णय.

एप्रिल २००२ – अलाहाबाद उच्च न्यायालयात ३ न्यायाधीशांच्या पीठांपुढे वादग्रस्त जागेच्या मालाकीविशायीच्या सुनावणीला प्रारंभ.या दरम्यानच्या काळात किमान १२ वेळा विशेष न्यायालयाची फेररचना.

२००३-
१) (५ मार्च) – अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जागेत मशिदीच्या जागी पूर्वी मंदिर होते काय,हे शोधण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून वादग्रस्त जागेचे उत्खनन.
२) ऑगस्ट – वादग्रस्त मशिदीच्या खाली मंदिराचा पुरावा मिळाल्याचा पुरातत्व खात्याचा दावा;परंतु मुस्लीम समाजाकडून या दाव्याचे खंडन.

३० जून २००९ – सतरा वर्षाच्या कालावधीत ४८ वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर लिबरहान आयोगाचा अहवाल पंतप्रधानांना सादर.

२७-७-२०१०-रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादवराची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाकडून पूर्ण.

१७ सप्टेबर- तारीख २४ चा निकाल लांबणीवर टाकण्याची विनंती करणारा रमेशचंद्र त्रिपाठी ह्यांचा अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.

२३ सप्टेबर – रमेशचंद्र त्रिपाठी ह्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव.सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल जाहीर करण्यास स्थगिती.

२८ सप्टेबर – त्रिपाठी ह्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.ता ३० सप्टेबर २०१० ला दुपारी साडेतीन वाजता निकाल जाहीर करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.

लेखकः अनामिक