Category Archives: महाराष्ट्र

काय झाले विदर्भ राज्य समितीचे?

जानेवारी महिन्यात केलेला यशस्वी विदर्भ बंद आणि मार्च मधे झालेले फुसके जेल भरो आंदोलन ह्यानंतर विदर्भ राज्य समितीचे काय झाले हा प्रश्न सध्या सगळ्याच विदर्भ वासियांना पडला आहे. धुमधडाक्यात स्थापन झालेल्या या समितीत जांबुवंतराव धोटें व्यतिरिक्त कोण कोण उरले आहे हा हि एक प्रश्नच आहे. काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हणजेच विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे यांनी तर हात आखडते घेतलेच आहे. विदर्भ राज्य समिती पुर्णपणे फसलेली आहे. का फसली समिती? याची कारणे खालीलप्रमाणे देता येइल

१)या समितीत कधिही एकसुत्रीपणा नव्हता. कुणा एकाला कधिच नेता म्हणुन स्विकारल गेल नाही.
२) विदर्भ वेगळा पाहिजे एवढीच मागणी घेवुन सगळे एकत्रीत आले होते पण या विषयाशी संलग्नीत असलेल्या इतर बाजुंविषयी त्यांचे कधिच एकमत झाले नाही.
३) विदर्भ वेगळा झाला तर विकास कसा करता येइल ह्याचा आराखडा कुणाकडेच नव्हता. म्हणुन विदर्भ वेगळा झाल्यानंतर काय? ह्याचे ऊत्तर जनतेला कधिच मिळु शकले नाही.
४)आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही? ह्याची नैतिक जबाबदारी कुणिच घेतली नाही.
५)विदर्भावाद्यांनी पश्चिम महाराष्ट्राला दोष देण्यापलीकडे दुसरे काहीच केले नाही.
६ या समितीत सामान्य जनतेचा कधिच सहभाग राहिलेला नाही. भरणा होता तो फक्त राजकारण्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. राजकारणाच्या कुरघोडीमुळे मतभेद वाढण्यास नेहमिच मदत झाली.
७) विदर्भाच्या आंदोलनातील एकाही नेत्यावर जनतेचा विश्वास उरलेला नाही. प्रत्येक जण स्वार्थासाठी हि मागणी करीत आहे हे जनतेने हेरले.
८) आजतायगत विदर्भाचे आंदोलन इतक्यांदा झाले आणी थंड पडले आहे की, जनतेला हे रटाळवाणे झाले आहे.
९) कॉंग्रेस, भाजप , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या स्वार्थी व्रुत्तीमुळे या आंदोलनाच्या फज्जा उडाला
१०)जांबुवंतरावांनी नक्षल्यांची मदत घेण्याची घेतलेल्या भुमिकेमुळे आंदोलनाची धार आणखीनच बोथट झाली.
११) शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाचा वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याने समितीचे दोष त्यांनी जनतेसमोर मांडले आणि कदाचीत जनतेला ते पटलेही.
१२)तेलंगाणाचे आंदोलनाने जोर पकडताच विदर्भाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. यातुन हे आंदोलन म्हणजे स्वयंस्फुर्त नसुन प्रतिक्रियात्मक आहे हे जनतेला कळुन आले.
१३)महाराष्ट्र दिवसाला काळे झेंडे दाखवुन विदर्भवाद्यांनी नोंदविलेला निषेध कुणालाही आवडला नसेल. महाराष्ट्राला एक अस्मिता आहे आणि त्या अस्मितेचा विदर्भवाद्यांनी केलेला अवमान निश्चितच गैर होता. महाराष्ट्र द्वेषातुन विदर्भाची निर्मिती शक्य नाही.
१४) विदर्भाच्य आंदोलनातील हिंदी भाषिकांचा भरणा पाहता , मराठी माणसाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे शेटजी भटजीचे राज्य तर होणार नाही ना? असा विचार करुन वैदर्भिय मराठी माणसाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

जांबुवंतराव यवतमाळ वर्धेत एक दिवसाच्या लाक्षणीक उपोषणापलिकडे काही करतांना दिसत नाही. आता विदर्भाचे आंदोलन जवळपास ठप्पच झाले आहे. या आंदोलनातील प्रत्येक पक्षाची सहभागाची पार्श्वभुमी बघीतली तर असे दिसुन येते की, भाजपला सुधिर मुनगंटीवारांच्या रुपाने त्यांचा प्रदेशाध्यक्ष मिळाला आणी त्यांनी आंदोलनातुन पाय काढता घेतला. कॉंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीवरुन चपराक बसल्यानंतर त्यांचीतर पाचावर धारणच बसली. राष्ट्रवादी कॉंग्रेस या आंदोलनात होती की नव्हती हे शेवटपर्यंत कळलेच नाही. रिपब्लीकन पार्टींनी या आंदोलनातुन आपला पक्ष बळकट करुन घेण्यापलीकडे काहीच केले नाही. जांबुवंतरावांना कुठलाच पक्ष जवळ करीत नाही त्यामुळे ते एकाकी व्यर्थ झुंज देत आहे.

शेवटी नेहमिप्रमाणेच विदर्भाच्या या आंदोलनाचा पण सफाया झाला आणी जनतेचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. जनतेला विदर्भ वेगळा पाहीजे की नाही हे अजुन नक्की झाले नाही पण विदर्भावादी नेत्यांच्या वागण्यातील स्वार्थाचा फोलपणा मात्र उघडकीस आला. नाकारलेल्या नेत्यांकडुन चालविलेले आंदोलन शेवटी पुर्णत: फसले हे मात्र सत्य. ज्याला ज्याला प्रसिद्धीचा हव्यास आहे त्याने त्याने या आंदोलनात भाग घेऊन आपली पोळी शेकली. ऊरले फक्त जांबुवंतराव! शेवटी प्रश्न हाच उरतो की विदर्भाच्या मागासलेपणाला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार आहे की विदर्भातील कुचकामी नेतेच? जनतेलाही अखंड महाराष्ट्रातच राहुन विदर्भाचा विकास साधुन घ्यावयाचा आहे हे समितीच्या अपयाशातुन दिसुन येत.

सतीश नेमाजी पानपत्ते
ईंजिनिअर
९८२२३६९१९८
मनिष नगर नागपुर

जेम्स लेन आणि आपण.

२३ जुलै ला राजु परुळेकर यांचा “जेम्स (बाबत चुकलेली) लेन” हा लेख अलकेमेस्ट्री या सदरात वाचला. लेख आवडला पण यावर चर्चा होणे आवश्यक आहे, त्या साठी हा लेख इथे पुन्हा देत आहे. आपण नक्कि वाचा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स मधुन कळवा.

Raju Parulekar
Raju Parulekar

जेम्स डब्ल्यू. लेन हा लेखक प्राध्यापक असून तो मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा प्रमुख आहे. टेक्सास विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्याने एमटीएस आणि टी.एचडीच्या पदव्या प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून घेतल्या.

जेम्स लेननं ‘शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ हे वादग्रस्त आणि शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक पुस्तक लिहिलं. या वादग्रस्त पुस्तकात शिवाजी महाराजांची जी विपर्यस्त बदनामी त्याने केली ती करण्यामागचा त्याचा हेतू अजूनही कळलेला नाही. या पुस्तकाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या व भाषणं ठोकणाऱ्या ८० टक्के जणांनी हे पुस्तक वाचलेलंही नाही. या पुस्तकावरून भांडारकर संस्था तोडण्यात आली वगैरे इतिहास आहे.
परंतु या पुस्तकाबाबत एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे, २००४ च्या १६ मार्चला ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात मुलाखत देताना ‘आपण या पुस्तकाच्या बंदीच्या विरोधात आहोत,’’ असं लालकृष्ण आडवाणी देशाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री असताना ठामपणे म्हणाले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर सत्तेचं श्रीखंड खाणारी शिवसेना कुठेच ब्र काढू शकली नाही. शिवाय हिंदुत्त्वाच्या आणि या महान मराठी राज्याच्या अभिमानासाठी सत्ता वा युती तोडण्याची साधी भाषाही केली नाही.

बाकी आताच्या सत्ताधारी पक्षांनी मराठा जातीचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा इश्यू बराच काळ रेंगाळत ठेवला. मग त्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. ती आता न्यायालयाने उठवली आणि पुन्हा राजकारण्यांच्या पावसाळ्यातल्या छत्र्या उघडल्या गेल्या.

जेम्स लेन याचा राग येण्याची जी मुख्य कारणं आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने महाराजांची जी बदनामी केलेली आहे ती एका इतिहास संशोधकाला काळीमा फासणारी आहे. त्यात कोणताही तर्क किंवा विश्लेषणाच्या आधारावर न करता हे सारं त्याने (त्याच्याच म्हणण्याप्रमाणे) सांगोवांगीच्या गप्पांमधून त्याला जे वाटेल ते लिहिलंय. त्याला या सांगोवांगीच्या गप्पांमधून असल्या भंपक गोष्टी कोणी सांगितल्या हा एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. पण ते कोण असू शकतील याचा आपल्या पूर्वग्रहदूषित मतांचा धांडोळा घेऊन आपले द्वेषमूलक स्कोअर सेटल केले जात आहेत. हे जेम्स लेनच्या गुन्ह्याएवढंच भयंकर आहे. शिवाय आपण शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालत होतो किंवा देशातून त्याचं उच्चाटन करणार आहोत ते मुळात नेटवर उपलब्ध आहे. अगदी त्यातल्या भयंकर, विपर्यस्त मजकुरासहीत! मग भांडारकर संस्था फोडून काय मिळवलं?

जेम्स लेनचा जो अधिक भयंकर गुन्हा आहे तो म्हणजे या पुस्तकात ही बदनामी महाराष्ट्रीयांच्या डोक्यावर खापर फोडून केलेली आहे. Maharashtrians tell jokes naughtily… हे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला चरचरवणारं आहे. आणि हार्वर्डसारख्या विद्यापीठात शिकलेल्या इतिहास संशोधकाला लाज वाटणारं आहे. या व्यतिरिक्त मध्ययुगातील मापदंड लावून महाराष्ट्र व भारत यांच्या मूल्यव्यवस्थेची चिकित्सा करणं हे अतिशय धक्कादायक आहे. कारण त्या काळातल्या पाश्चिमात्य व पौर्वात्य मूल्यव्यवस्थेत प्रचंड फरक होता. जग आजच्या प्रमाणे तेव्हा एवढं जवळ आलेलं नव्हतं.

पुस्तकाच्या ९१ क्रमांकाच्या पानावरचा मजकूरही अत्यंत आक्षेपार्ह आहे. तो म्हणजे, ‘‘व्यक्तिगत आयुष्यात शिवाजी महाराजांना सुख नव्हते. त्यांचा जनानखाना होता. त्यांची भूमिका व महत्त्वाकांक्षा मोठा राजा बनण्याची होती. या देशात स्वत:चं राज्य निर्माण करण्याची त्यांची भावना होती. इस्लामिक तख्त उलटवून टाकण्याची त्यांची इच्छाच नव्हती. उलट ते धार्मिक नव्हते. साधुसंतांबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता.’’ ज्यासाठी मराठी माणूस खवळून उठला ती ही वाक्यं नव्हेत. पण ही वाक्यंसुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्र व चारित्र्य ज्याला माहीत आहे त्याचं रक्त खवळून टाकते.

या सर्व काळात केंद्रात भाजपप्रणित शिवसेना पुरस्कृत सरकार होतं हे विशेष. त्यावेळी बराच इतिहास घडून गेलेला आहे.
महाराष्ट्रातल्या घराघरात महाराजांची कहाणी ही मुलामुलींच्या चारित्र्यसंवर्धनासाठी आणि आपल्या महाराष्ट्राचा मूळपुरुष म्हणून सांगितली जाते. न्यायालयांमध्ये काय चालतं हे सर्वानाच माहीत आहे. आता न्यायव्यवस्थेच्या चरित्र व चारित्र्यावर बोट ठेवलं तर बोट भ्रष्टाचाराने बरबटून निघेल. लोकशाहीत जनता सार्वभौम असते, न्यायालय नव्हे. भारताला जनतेनं स्वातंत्र्य मिळवून दिलं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला कारण जनता लढली. तेव्हाही ही न्यायालयं संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून सामान्य जनतेला परावृत्त करण्यासाठी त्यांना जबर शिक्षा ठोठावत होती.
आता प्रश्न उरतो की, काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा या विषयावर लढणाऱ्या प्रत्येकाने नेटवर जाऊन ते पुस्तक वाचायला हवं. आडवाणींना पुन्हा त्यांचं मत तेच आहे का, ते विचारायला हवं (म्हणजे ते रिटायर्ड व्हायला मोकळे.). ते आधी ‘जीना’ चुकले. मग ‘लेन’ चुकले. आता एवढी बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेला त्या वेळी आपल्याच गृहमंत्र्याला जाब का विचारता आला नाही? बाळासाहेब ठाकरेंना हा प्रश्न विचारायला हवा की नको? की सत्ता आणि पैशाचं श्रीखंड मिळालं की महाराज कुणाला आठवतात? सामान्य जनतेला हे राजकारणी मूर्ख बनवतात ते हे असे.

या साऱ्यात दु:खद बाब अशी आहे की, आपण जेम्स लेनचं काहीही वाकडं करू शकणार नाही. आपण भवानी तलवार, वाघनखं, कोहिनूर हिरा तरी कुठे आणू शकलो? आपण गोऱ्या कातडीला फार मानतो. गोऱ्यांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केल्यामुळे हा न्यूनगंड आलेला आहे.
जेम्स लेनसारखे तथाकथित इतिहास संशोधक याचा फायदा उठवतात. बुद्धय़ांकामध्ये मराठी माणसं अनेक गोऱ्यांपेक्षा खूप जास्त पुढे आहेत. एकदा मानसिक गुलामगिरी काढली म्हणजे झालं. जेम्स लेनच्या निमित्ताने जी राजकीय धूळवड चाललेली आहे त्याचा संबंध वास्तविक शिवाजी महाराजांच्या मोठेपणाशी नसून आपण ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ आहोत अशा आरोळ्या मारण्यासाठी आहे. वास्तवात महाराज ते महाराज. त्यांनी शिवाजी पार्कात ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ यांप्रमाणे भाषणे न ठोकताही आपल्याला मराठी माणसाला आत्मसन्मान मिळवून दिला. जेम्स लेनची लायकी ती काय? शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळायची हिंमत खुद्द त्यांच्या शत्रूंनाही झाली नव्हती.

अशा लेनचा बदला घ्यायला मदनलाल धिंग्राच पाहिजेत. हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. इथे चार पुतळे जाळून आणि चार ब्राह्मणांना टरकवून काय होणार? न्यायालयं लेनच्या बाबतीत प्रेमळ असतील तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही लढाई लढली पाहिजे. आपले सर्व नेते मजा मारायला परदेशात शंभरवेळा जातील पण लेनचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन लढाई जिंकण्याची इच्छा यांपैकी कुणात आहे? कुणातही नाही! ते दिवस गेले. श्यामजी कृष्ण शर्मा, मदनलाल धिंग्रा, स्वा. सावरकर, सुभाषबाबू बोस परक्यांच्या भूमीत जाऊन या भूमीची लढाई लढले. असंख्य त्रास, अपमान पचवूनही.

जेम्स लेनच्या पुस्तकावर आपण जेवढं कमी बोलू, लिहू, बोंबाबोंब करू तेवढं लवकर ते पुस्तक मरेल. आपण इथे लेनचे पुतळे जाळून त्या पुस्तकाचं महत्त्व उगाचच वाढवत आहोत आणि लेनलाही मोठा करत आहोत. हे पुस्तक मी नीट वाचलंय. माझं मत हे की, या पुस्तकाला कोणताही खरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा इतिहास संशोधक सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकेल.

कुणाला याविरूद्ध लढाई लढायचीच असेल तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवर लढावी लागेल. तो प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. नाहीतर लेन तिथे बीअरचे घुटके घेत मजा मारतोय आणि आपण आपल्याच संस्था फोडून नि लेनचे पुतळे जाळून आपलंच हसं करून घेत राहू. पण हे ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ यांना कोण समजवणार?

असले प्रश्न सोडवण्यासाठी आधी प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो. पण त्यात कोणालाही रस नाही. तो रस फक्त शिवाजी महाराजांना होता. त्यांना मानाचा मुजरा!
आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधायला जमत नाही म्हणून आपल्या अनुयायांनाच प्रश्नाचा भाग बनवणाऱ्यांपासून सावध राहा. ते जेम्स लेन एवढेच शिवाजीद्रोही आहेत. कळेल तुम्हाला.. हळुहळू..!

आपली प्रतिक्रिया नक्कि कळवा.

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?
कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

काही दिवस वर्षातून एकदाच येतात तर काही क्षण आयुष्यात एकदाच येतात.  आजही माझ्या मनात येते की, माझा जन्म हिंदुस्थान स्वतंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी का नाही झाला. कसे असतील ते दिवस जेव्हा आपल्या लोकांनी ब्रिटीशांविरोधात लढाई जिंकून भारतमातेला स्वतंत्र केलं. १५ ऑगस्ट आले की मन गर्वाने फुलून उठते. तसाच काहीसा क्षण आता काही क्षणात  येत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीस ५० वर्षे झाल्याचा दिवस! अर्थातच स्वतंत्र दिनापेक्षा कमी उत्साह आणि जल्लोषाचा दिवस नक्कीच नाही. ५० वर्षांमागे मुंबईसह महाराष्ट्र एक वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले.
 
दुर्दैव आहे की विदेशी सैन्याविरुद्ध लढून आपण भारतमातेला स्वतंत्र केले तरी महाराष्ट्र मिळवण्यासाठी कॉंग्रेसच्या विरोधात मराठी माणसाला बलिदान द्यावे लागले. ज्याप्रमाणे जनरल डायर ने जालियनवाला हत्याकांड घडवून आणले त्याच प्रमाणे मोरारजी देसाईने निशस्त्र आणि सामान्य मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या यात १०५ हुतात्मे झाले. ५० वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसवाल्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला विरोध केला होता, तोच विरोध आजही कायम असल्याचे दिसत आहे. आजही केंद्र सरकारच्या वेबसाईट www.india.gov.in वर शिवाजी महाराजांचा उल्लेख मुद्दामहुन वगळण्यात आलेला आहे.
 
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राने खुप प्रगती केलेली आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील बऱ्याच मोठ-मोठ्या कंपन्या आपले घर इथेच थाटून आहेत. शेती, संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्ग, इतिहास सगळेच अप्रतिम आहे. आपल्या सणांमध्येही ’गुढी पाडवा’ खास आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मनाला खुप आनंद होतो आणि गर्व होतो की आपण या मातीत जन्माला आलो.
 
पण याच ५० वर्षात हळू हळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. ५० वर्षे उलटून गेले तरी अजुनही मुलभूत प्रश्न तसेच आहेत. विज भारनियमन आहेच,  विदर्भातील शेतकरी  बांधवांची काय परिस्थिती झालेली आहे हे सांगायलाच नको, तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे, बेळगाव-निपाणी मधील मराठी बांधवांवर अत्याचार वाढतच आहे.
 
पंजाब मध्ये हरितक्रांती होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ नये? देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातील असूनही महाराष्ट्राची ही अवस्था असेल तर ते आपले दुर्दैव आहे.  सर्वत्र असलेल्या मिल बंद पडल्या याने तर सर्वसामान्य मराठी कामगारांचे कुटूंबच्या कुटुंबच उध्वस्त झाले आहे. मिलच्या जागांवर मॉल आले त्याचा फायदा फक्त काही मुठभर श्रीमंत लोकांनाच होत आहे, सामान्य माणूस अजूनही सुवर्ण दिवसाची वाट बघत आहे. राज्यात ७५% अजुनही शेती होते, पण जे शेतकरी भर उन्हात घाम गाळत असतात त्यांची अवस्था आपल्याला माहितच आहे. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. तरुण पिढीला इकडे लक्ष न देता आयपीएल मध्ये जास्त रमलेली आहे.

गुजरात जे ५० वर्षापूर्वी मुंबईचा भाग होता आत प्रचंड प्रगती करत आहे. खरेच आज तरी गुजरात ’सुवर्ण गुजरात’ होत आहे. पण आपल्या महाराष्ट्राचे काय? परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे असे आपल्याला वाटत नाही का? याला जबाबदार कोण? राज्यकर्ते? नाहीच! कारण राज्यकर्ते आपणच निवडून देतो. मग? जबाबदार आपणच आहोत. काही छोट्या गोष्टींसाठी आपण चुकीच्या लोकांना सतत निवडून आणतो. आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज आपल्यावर ही वेळ आणली आहे. जसे आपल्याला जन्म देणाऱ्या आईवर आपण प्रेम करतो, तितकेच  प्रेम आपण आपल्या मातीशी असले पाहिजे. ज्या मातीत आपण जन्माला आणि त्याच मातीत उद्या जाणार आहोत त्या मातीशी काही स्वार्थापोटी विकले जायचे? गद्दारी करायची? सुवर्ण महाराष्ट्र तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक तरूण हे मनात आणेल आणि शपथ घेईल हे गाव, शहर, हे राज्य माझे आहे! याला चांगले किंवा वाईट करायला मीच जबाबदार आहे. तरच समृध्द आणि सुवर्ण महाराष्ट्र येणारी पिढी बघू शकेल.
 
परप्रांतियांना दोष द्यायचे सोडून स्वत: हातात मिळेल ते काम करायची तयारी दाखविली पाहिजे. एकमेकांचे पाय खेचायचे सोडून एकमेकांना प्रोत्साहन देऊन नविन उद्योग धंदे निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. त्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. सिनेमा असो की क्रिकेट, की उद्योगधंदे असोत प्रत्येक क्षेत्रांत आपले प्रभुत्व सिद्ध केले पाहिजे. हे तुमच्या मनात आले तर नक्कीच एक दिवस विकसित महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर येईल. जिथे हात जोडून, विनंती करून कामे होत नसतील तिथे कानाखाली आवाज काढून कामे करून घ्या पण चुक आणि अन्याय होत असताना बघत बसू नका आणि स्वत:ही अन्याय करू नका. तरच होईल एका सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
महाराष्ट्र स्थापनेचि ५० वर्षे नक्कीच जल्लोषात साजरे करायचेय. पण म्यानात असलेली तलवार गंज पकडत नाही आहे ना इकडेही लक्ष द्या. तरच होईल …माझ्या सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
जय हिंद ! जय सुवर्ण महाराष्ट्र!
सुनील मंत्री

शिव माहिती व तंत्रज्ञान सेना मेळावा

दि. १३ एप्रिल २०१० हा सोनेरी दिवस आम्ही आजन्म विसरू शकत नाही. कारण या  दिवशी एका आगळ्या वेगळ्या सेनेचा उदय झाला. ४४ वर्षापूर्वी हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांचे जे सागर मंथन केले. त्या मंथनातील  वादळी विचारांचे थेंब हे महाराष्ट्रातच नाही तर उभ्या हिंदुस्तानातील जनमानसात शिंपडले गेले. आणि ह्या  शिंपडलेल्या एकेका थेंबातूनच शिवसेनेच्या वादळी विचारांचा एक महासागर तयार झाला. याच विचार धारेच्या प्रवाहाने प्रेरित होऊन असंख्य तरुणाच्या गळ्यातले आजही ताईत असणारे व्यक्तिमत्व म्हणजे  बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या याच विचार धारेचे शिवधनुष्य पेलून त्यांच्या विचारांची महती त्रिखंडात इंटरनेट च्या माध्यमातून गाजवण्यासाठी ज्या सेनेचा १३ एप्रिल २०१० या दिवशी जन्म झाला ती सेना म्हणजे शिव माहिती व तंत्रज्ञान  सेना.

दि. १३ एप्रिलला हा  सोहळा  ठरल्या प्रमाणे सेनाभवनामधील तिसर्या मजल्यावरील एका प्रशस्त हॉल मध्ये पार पडला. या मेळाव्याला पुणे, नागपूर व नाशिकसह विविध भागातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. मेळाव्याला येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकांचे हॉलच्या  प्रवेश द्वारा जवळच संपर्कासाठी माहिती नोंद केली जात होती. बरोबर ५.३० pm  च्या ठोक्याला कार्यक्रमाला  सुरुवात झाली आणि व्यासपीठावरची  संचालनाची सर्व सूत्र श्री विशेष राणे यांनी आपल्या हातात घेतली. त्यानंतर लगेचच “शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेबांचे आगमन झाले आहे” असे श्री अमोल नाईक यांनी घोषणा करताच टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले.  मा विनायकजी राऊत साहेबांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला गेला. आणि सर्वांच्या शिव गर्जनेने हॉल दणाणून  गेला. आता पर्यंत श्री. राहुल खेडेकर, मा विनायकजी राऊत साहेब , मा मानकर साहेब या सर्व मान्यवरा व्यतिरिक्त  श्री अमित चिविलकर, श्री अनुज म्हात्रे,  श्री अमोल नाईक, नागपूरहून खास आलेले श्री सतीश पानपते तसेच महिला भगिनी मेघा गावडे, अक्षय  महाडिक  पुण्याचे श्री रोनक शहा  हि मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती. ऑर्कुट समुदायाचे नियंत्रक श्री अमित चिविलकर यांनी सुंदर आशय पूर्ण प्रस्तावना सादर केली त्यात त्यांनी इंटरनेट वरील ऑर्कुट समुदायाच्या  जन्मापासून ते आज पर्यंतच्या कार्याचा सर्व लेखाजोखाच सर्वांसमोर मांडला. त्यानंतर श्री अमोल, श्री सतीश पानपते, अक्षया महाडिक, मेघा गावडे या सदस्यांनी हि आपली परखड मते सर्वांसमोर मांडली.  त्यानंतर आम्हा सर्व ऑर्कुट  समुदायातील कार्यकर्त्यांचे लाडके तसेच सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी वडिलकीच्या नात्याने मार्गदर्शन करणारे, प्रसंगी आमच्या पाठीशी खंबीर पणे उभे असणारे मा. श्री जनार्दन मानकर साहेब यांनी आपल्या ओजस्वी भाषणाने सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवसेना सचिव मा. विनायकजी राऊत साहेब यांनी त्यांच्या वक्तशीर अशा भाषणात खूप महत्वाचे मुद्दे या सभेत मांडले “एक अदृश्य शक्ती आज दृश्य स्वरुपात शिवसेना भवनात अवतरली आहे. एकमेकांचे चेहरेहि न पाहता, शिवसेना प्रमुखांना प्रत्यक्ष न भेटता तुम्ही शिवसेनेचं काम एका निष्ठेने करत आहात, या दृष्टीने तुम्हीच खरे शिवसेना प्रमुखांचे खरे दूत आहात.” अशा शब्दात राऊत यांनी समस्त ऑर्कुट समुदायाशी निगडीत असलेल्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.  तसेच “रंग विकत घेता येतात पण त्या रंगातील लोकांची  निष्ठा विकत नाही घेता येत!!” असा टोलाही त्यांनी हाणला. या अभूत पूर्व अशा सोहळ्याला  भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अभिजित पानसे तसेच मुंबई महापलिका स्थायी समिती अध्यक्ष मा. राहुल शेवाळे यांची उपस्तिथी लाभली. मा. अभिजित पानसे तसेच मा. राहुले शेवाळे यांनी आपले मार्गदर्शनपर मते सर्वांसमोर मांडली. माणसाला जर ध्यास, आत्मविश्वास असेल तर त्याला वय, स्थल, काल या कुठल्याच गोष्टी बंधन कारक नसतात. याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तसेच परदेशात राहून  इंटरनेटच्या माध्यमातून  शिवसेनेचा  प्रचार आणि प्रसार करणारे मा. सुनील मंत्रीची उपस्तिथी या कार्यक्रमाला लाभली. तसेच शिवसेने बद्दल त्यांना एवढ्या अपेक्षा तसेच प्रेम का आहे या विषयी त्यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन झाल्यावर श्री अमोल नाईक यांनी या मेळाव्याला उपस्थित असणार्या सर्व मान्यवरांचे नम्रपणे आभार प्रदर्शन केले तसेच या मेळाव्याला प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या सहकार्य केलेल्या सर्व सहकारी, स्वयंसेवकांचे आभार मानायला श्री अमोल नाईक विसरले नाही.    आभार प्रदर्शन प्रकट केल्यावर राष्ट्रगीताने या अभूत पूर्व अशा सोहळ्याची सांगता झाली.

या दिवशी मा. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच तसेच आदित्य ठाकरे यांची उपस्तिथी  लाभणार होती. पण काही अपरिहार्य कारणांमुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांच्या वतीने  या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून उपस्थित असलेल्या समस्त शिवसैनिकांची इथे आम्ही नम्रपणे क्षमा मागतो.

थोडिशी हितगुज

४४ वर्षा पूर्वी इंटरनेट या माध्यमाचा कुठेहि मागमूस नव्हता. पण तरीही तेंव्हाच्या मोगल काँग्रेसी दडपशाही विरुद्ध आवाज जर कोणी उठवला असेल तर तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनीच. हजारोंच्या वरती त्यांनी सभा घेतल्या, उभा महाराष्ट्र त्यांनी पिजून काढला. लोकांच्या उरात मराठी बाण्याच्या,  स्वाभिमानाच्या मशाली पेटवल्या आणि बघता बघता याच मशालींचा धगधगता भगवा वणवा तयार झाला आणि हाच वणवा आजतागायत जिवंत जळत आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो!!! जर इंटरनेट सारखे प्रभावी माध्यम उपलब्ध नसूनही जर मा. बाळासाहेब एवढा भव्य वणवा पेटवू शकतात तर आज हे इंटरनेट चे प्रभावी ब्रम्हास्त्र आपल्याकडे आहे, त्याचा सदुपयोग जर आपण केला तर ते आपल्यासाठी वरदान ठरू शकत पण त्याचा गैर उपयोग जर केला गेला तर तेच मध्यम आपला संहार करू शकत हे लक्षात असुद्या.

आई भवानी ची आन घेउनी गोंधळ घालूया
कास धरुनी माय मराठी हिंदू धर्म वाढवूया
आड आला परी कोणीही तरी तिथेच ठेचुया
शपथ आम्हाला शिवरायांची हि साद घालूया !!

आपला विश्वासू शिवसैनिक
प्रसाद कुलकर्णी.

शिक्षक दिना निम्मित

बाजारातून घरी आल्यावर बायकोने माझ्या हातात एक लिफ़ाफ़ा दिला आणि म्हणाली, “तुझं पत्र आहे.”

मी चेष्टेच्या सुरात म्हणालो, “पत्र नाही, कार्ड आहे. माझ्या विद्यार्थ्याकडून, शिक्षक दिनाचं कार्ड आहे. माहित आहे ना शिक्षक दिन काय असतो ते? इंग्रज़ीमध्ये टीचर्स डे म्हणतात.”

” हो, मी पण होते शिक्षिका. पण शिक्षक दिन गेल्या आठवड्यात होता,” मिसेस टोमणा मारत म्हणाली.

“भारतीय पोस्टाचं काही सांगू नये. बारश्याचं कार्ड लग्नाचे वेळी मिळालं तर नशीब समज,” मी हंसत उत्तरलो. कार्ड माझ्या दुबईमधील नन्दु गोपन नावाच्या विद्यार्थ्यानं पाठवलं होतं. मिसेसच्या हातात ते कार्ड देत मी म्हटलं, “हे पत्र वाच.” “शेवटी पत्रच आहे ना?’, परत एक टोमणा. जाऊंदे. नन्दुच्या हस्तलिखितात लिहिलेला इंग्रजीमधील मजकूर मराठीमध्ये भाषांतर केल्यावर खालीलप्रमाणे होता:

” माझा खूपखूप आवडता सुनील दोस्त/सर/काका, मी काय बोलू आणि कुठे सुरुवात करू? मला तुझी खूपखूप आठवण येते. आपण दुबईला असताना ‘दी इण्डियन हाईस्कूल’ मध्ये केलेल्या धमाल गॊष्टींची आठवण येते. ती एकत्र केलेली नाटकं, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, आंतरवर्गीय आणि आंतरशालेय क्विझ, भाषण, गायन, अभिनय, आणि इतर स्पर्धा, सांस्कॄतिक सम्मेलनें.

तू नेहमी घालायचास तो तुझा आवड़ता निळा चौकटीचा कोट…

तुझा आवडता निळा चौकटीचा कोट

बापरे बाप … पावसाळ्याच्या दिवसात आकाशात दाटून येणार्‍या ढगांप्रमाणे आठवणी माझ्या मनात दाटून येताहेत. काय मस्त दिवस होते ते! अगदी भन्नाट्ट! माझ्या आयुष्यातील एकदम अविस्मरणीय दिवस होते ते!

उन्हाळ्याच्या सुटीतील नाटक The Plane Panic

ह्या पत्राच्या माध्यमाने तुला थॅंक्स द्यायचे होते, म्हणून लिहितोय. मागे वळून पाहताना, आत्ता मला जाणवतेय की मी आज जो काही आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. मला माहित आहे तुला आवडणार नाही, तरीसुद्धा तुझे आभार मानावेसे वाटतात.

हल्लीच लोकप्रिय झाला आहे आमीर खानचा “तारे ज़मीन पर”,

आम्हाला आपला प्रिय आहे तो इंडियन हाईस्कूलचा जोकर.

“खरं सांगू, तुझा पाठिंबा नसता तर माझ्या आई-वडिलांनी मला एवढं विचार-स्वातंत्र्य दिलंच नसतं आणि माझं आयुष्य एखाद्या वाळवंटाप्रमाणे रुक्ष झालं असतं. तुझ्याविषयी मला काय वाटतं हे केवळ शब्दांतून सांगणं अशक्य आहे. कुणाच्याहि मनात प्रेम जागृत करणं सिद्धि आहे; आणि एखाद्याचा आदर मिळवणं पराक्रमाहून कमी नाही, असं मी समजतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं हें फ़क्त तुझ्यासारख्या काही खास व्यक्तींनाच जमेल.

“आतां तू म्हणशील की हे सगळं मुळी सांगायची गरजच नाही, किंवा हे सगळं मी ‘फ़ेसबुक’ किंवा ‘ऑरकुट’ वरही सांगू शकलो असतो. पण खरं सांगू, मला ही ई-कार्डं वगैरे पाठवणं विशेष आवडत नाहीं. एखाद्या व्यक्तीला रिमोटनं ऑपरेट केल्यासारखं वाटतं. माझ्या मतें ह्या माध्यमातून आपल्या खर्‍या भावना इतक्या प्रभावीपणें व्यक्त होवू शकत नाहीत, जितक्या साध्या निळ्या-काळ्या शाईने साध्या सरळ पत्रातून व्यक्त केल्या जाऊ शकतात. तुला नाही असं वाटत? मला माहित आहे तू माझ्याशी सहमत आहेस. म्हणूनच मी तुझा पत्ता घेवून हे पत्ररूपी कार्ड पाठवीत आहे.

“मी ह्या आधी कुणालाहि सांगितलं नाहीं, प्रथम तुलाच सांगतोय. मी शिक्षकाचा व्यवसाय करायचं ठरवलंय. मला वाटत नाही की दुसरा कोणताही व्यवसाय याएवढा महान आहे. आणि माझी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की मला तुझ्याएवढंच यश मिळूं दे. आज १२ वर्षांहून अधिक वर्षं झाली, पण अजूनही त्या आठवणी, त्या भावना आज ताज्या-टवटवीत आणि प्रभावी आहेत. मला ईश्वर एवढी शक्ति देवो की तुझ्याप्रमाणेच मला देखील माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यांत तेंच स्थान मिळू शकेल जे आम्हा सर्वांच्या आयुष्यात तुझं आहे. प्लीज़ तुझ्या रोजच्या प्रार्थनेत माझी आठवण काढत रहा.

“अरे हो, हे सगळं लिहिण्याच्या भरात तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणं राहूनच गेलं. HAPPY TEACHERS’ DAY! असाच सर्वांच्या आयुष्यांत येत रहा. मनानं अन् तब्येतीनं समर्थ रहा. आणि असाच संबंध ठेवत जा. मग तो फ़ेसबुक किंवा ऑर्कुट्च्या माध्यमाने असला तरीही चालेल.”

नंदूचं कार्ड वाचून माझ्या मनात बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. मी दुबईहून भारतात परत यायच्या आधी, म्हणजे १९९९ साली साजरा केलेला ‘शिक्षक दिन’ आठवला. त्या वर्षी दर वर्षांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं मी ठरवलं होतं — रोजच्या प्रमाणे नाच-गाणी, नाटुकलीं, भाषणं, या पेक्षा काहीतरी ‘हट्के’. याच विचाराने एक परिसंवाद आयोजित करायचा ठरवलं, ज्याचा विषय होता, “माझ्या विद्यार्थ्यांकडून माझ्या अपेक्षा!” आणि “माझ्या शिक्षकांकडून माझ्या अपेक्षा!”. आधी सर्वांनीच विरोध केला की विषय खूप विवादात्मक आहे. पण मी वाद घातला की विषय विवादात्मक असला तरीही सर्वांच्या दॄष्टीने आवश्यक होता.

पांच शिक्षकांची आणि पांच विद्यार्थ्यांची निवड केली गेली. दक्षता घ्यायची म्हणून निखिल हरिक्रिश्णन नावाच्या मुलाची निवड केली. त्याला सांगण्यात आलं की विवाद निर्माण होतोय असं वाटलं की “Censored” असा बोर्ड घेवून स्टेजवर दोन चकरा मार. इतर कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी “खास आकर्षण” म्हणून हा परिसंवाद ठेवण्यात आला होता. सुरवात थोडी धीमी झाली, पण लवकरच रंगत वाढत गेली. साहजिकच मुलांचं पारडं भारी होतं. निखिलला बोर्ड घेवून फिरताना नक्कीच नाकी नऊ आले असतील. प्रेक्षकांत बसलेल्या मुलांना प्रश्न विचारायची संधी दिली गेली आणि मुलांनी प्रश्नांचा भडिमार सुरु केला. शेवटी शाळा सुटायची वेळ झाली म्हणून कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. इतक्या वर्षांनी देखील सगळेजण अजूनही त्या परिसंवादाची आठवण काढतात.

त्याच कार्यक्रमात सादर केलेला अजून एक उल्लेखात्मक कार्यक्रम होता एक शिक्षक व ईश्वर या दोघांमधला नाट्‍यपूर्ण संवाद्. मूळ इंग्रजीत सादर केलेल्या संवादाचं मराठी भाषांतर खाली नमूद करतोय. आणि आशा आहे की तुम्हां सर्वांना ते वाचताना तेवढाच आनंद मिळेल जेवढा ते सादर करताना आम्हां सर्वांना झाला होता.

शिक्षक बोलतो

हे ईश्वरा, मी एक शिक्षक आहे. सदा प्रयत्नरत असतो की

माझ्या हातून नेहमी कांहीतरी चांगलं घडावं.

पण नेहमीच यश मिळतं असं नाही.

मग मी स्वत:लाच विचारतो, मी शिक्षक झालो तरी कां?

जास्त पगाराची नोकरी कां नाही स्वीकारली?

देवा, खूप वर्षांनी वर्गातला एक मित्र काल भेटला,

आज एका समृध्द कंपनीत उच्च पदाधिकारी आहे.

माझ्या पगारापेक्षा अनेक पटींनी कमवत असेल.

मग अशा लोकांचा हेवा वाटतो. मनात नैराश्य भरतं

मी विचार करतो त्यांचा, जे माझ्यापेक्षा सुखी आहेत,

माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत.

आणि कामाचा हां असह्य भार, जे शिक्षकाचं नशीबच आहे.

भरीला वर्गात बाकांवर न मावणार्‍या विद्यार्थ्यांची गर्दी;

असंख्य चुकांनी भरलेल्या वह्या-पुस्तकांचं ते ओझं;

वर्गांतल्या धड्यांची घरी करावी लागणारी तयारी;

संदर्भासाठी वाचावी लागणारी पुस्तकं व ग्रंथ;

कधीच न संपणारे सास्कृतिक कार्यक्रम.

कांही काळानं शिकवणं इतकं रटाळ होतं की

शिकवण्याची आस्था व निमित्त निस्तेज होत जातं.

दैनंदिन कामं करायला स्वत:वर बळज़बरी करावी लागते.

अन् परमेश्वरा, एवढंच नाही.

सहकार्‍यांबरोबरचॆ ते गैरसमज़ आणि हेवेदावे;

विद्यार्थ्यांकडून कधीच न मिळणारी कृतज्ञता व आपुलकी.

ते जणूं आम्हा शिक्षकांना गृहीत धरूनच चालतात.

मग अनावर दु:ख होतं, वाटायला लागतं,

शिक्षक म्हणून केलेले सारे त्याग निष्फ़ळ आहेत.

देवा रे, यापुढे ही वाटचाल सहन होणार नाही.

मला तुझ्या मदतीची गरज़ आहे, मला मदत कर!

ईश्वर उत्तर देतो

माझ्या प्रिय बालका, धीर धर. असा निराश नको होऊस.

तुला काय वाटतं मी तुझ्या समस्या ओळखत नाही?

मी समजून आहे तुझ्या उणीवा, तुझं वैफ़ल्य.

शिक्षकाचं काम सोपं नाही, माहीत आहे मला.

पण एका क्षणाकरिता विचार कर.

विचार कर, त्या असंख्य विद्यार्थ्यांचा

ज्यांना तू चिरन्तन जळणारी बुद्धिज्योत देतोस.

ज़रा आठव ती असंख्य तरूण चरित्रं,

जी तू घडवतोस पुढे येणार्‍या भविष्यासाठी.

आज जे धडे तू त्यांना देतोयस्,

दीपस्तंभ बनतील त्यांच्या येणार्‍या आयुष्यासाठी.

उद्याचे नेते आहेत आजची तरूण पिढी,

येणार्‍या प्रगतीशील समाजाची आशेची शिडी.

देशाचं संपूर्ण भविष्य आहे तुझ्याच हाती.

पूर्णपणे समजू शकतो मी तुझ्या भावना

जेव्हां बदल्यात मिळते फक्त प्रतारणा.

कारण मीसुद्धा अनुभवलंय हें सगळं.

कळतंय मला हे सगळं किती दुख: देतं ते.

पण लक्षात ठेव, मी निवडलंय तुला

खास माझा प्रतिनिधि म्हणून,

माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून.

तुझी ही वाटचाल अशीच चालू राहूंदे,

आपण दोघे मिळून एकत्र चालत राहू,

आणि एकमेकांच्या मदतीने निर्माण करू

एक अधिक चांगलं, तेजस्वी व आनंदी विश्व.

एका शिक्षकाचा एक विद्यार्थी त्या शिक्षकाला सांगतो की त्याला एक शिक्षक व्हायचं आहे, याहून अधिक चांगली भेट कोणती असू शकेल एका शिक्षकाला, शिक्षक दिनाच्या निमित्तानं!

लक्ष्मीनारायण हटंगडी

वसई (पूर्व)