Category Archives: पाककॄती

बाकरवडी

साहित्य:
२ कप मैदा
२-३ मोठे चमचे बेसन (चणा पीठ)
चवीपुरते मीठ
१ ते दिड चमचा तेल
१ छोटा चमचा ओवा
सारणासाठी:
१ मोठा चमचा बेसन
१ छोटा चमचा तीळ आणि खसखस
१ छोटा चमचा आले किसून
१ ते दिड चमचा लसूण पेस्ट
३ चमचे लाल तिखट
१ ते दिड चमचा पिठी साखर
१ छोटा चमचा गरम मसाला
१ चमचा धणे पूड
१ छोटा चमचा बडिशेप
१ चमचा किसलेले खोबरे (सुके खोबरे)
३-४ मोठे चमचे बारीक शेव
मीठ

कृती

मैद्याची पोळी:
मैदा आणि बेसन एकत्र करून त्यात मीठ आणि ओवा घालावा.तेल गरम करून पीठात घालावे. आणि पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. आणि झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवावे.

सारण:

१) सर्व प्रथम तीळ आणि खसखस तव्यावर थोडी भाजून घ्यावी.

२) सारणासाठी दिलेले सर्व पदार्थ एकत्र करून १ चमचा तेलावर थोडे परतून घ्यावे.

बाकरवडी:
१) सारण तयार झाल्यावर भिजवलेल्या मैद्याची एक पातळ पोळी करून १-२ चमचे सारण त्यावर समान पसरावे.आणि घट्ट रोल करावा.. (जर रोल घट्ट नाही झाला तर त्यातील सारण बाहेर येते.)
२) सुरीने १ इंच आकाराचे तुकडे करावे.
३) गरम तेलामध्ये गोल्डन ब्राउन तळून घ्यावेत.
४) बाकरवडया थंड झाल्यावर हवाबंद डब्यात ठेवाव्यात.

तयार आहे बाकरवडी.

नारळाच्या वड्या

वाढणी : २० ते २५ वड्या

साहित्य:
१ नारळ
३५० ग्रॅम साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये.

२) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.

३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा.

४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.

५) छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.

६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.

७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.

८) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

टिप:
१) वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.

२) जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबा एकत्र स्वाद अप्रतिम लागतो.

तयार आहेत नारळाच्या वड्या.

चिरोटे.

चिरोट कसे बनवायचे?

वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे

साहित्य:
१ कप मैदा
१/८ कप पातळ केलेले साजूक तूप
१/४ कप दूध
वरून पेरायला पिठी साखर
पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ

कृती:
१) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.

२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.

३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची दाटसर पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.

४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.

५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.

६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.

पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर एकदा उभे आणि एकदा आडवे असे लाटणे फिरवावे.
दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.

७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.

टीप:
१)वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.

तयार आहेत चिरोटे.

रव्याचे लाडु.

रव्याचे लाडु.
साहित्य:
२ वाट्या बारीक रवा
१ वाटी पाणी
दिड वाटी साखर
१/२ वाटी साजूक तूप
१ लहान चमचा वेलची पूड

कृती:
१) प्रथम रवा मध्यम आचेवर तूपावर भाजून घ्यावा. खमंग वास आला कि गॅसवरून उतरवावा.

२) पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून एकतारी पाक करून घ्यावा. (किंवा साखरेचा पाक पारदर्शक झाला कि एक उकळी काढून लगेच उतरवावा.) भाजलेल्या रव्यात पाक ओतावा. गुठळ्या न होता मिक्स करावे. त्यात वेलची पूड घालावी.

३) हे रव्याचे आणि साखरेचे मिश्रण झाकून ठेवावे. काही तासांनी मिश्रण आळते. मग लाडू वळावेत.

टीप:
१) जर लाडवाचे मिश्रण फळफळीत झाले तर अर्धी वाटी पाणी लहान पातेल्यात उकळावे. त्यात २-३ चमचे साखर घालावी. पाक बनवून तो मिश्रणात घालावा. मिक्स करावे. थोड्या वेळाने लाडू वळावेत.

२) रव्याच्या लाडवांसाठी शक्यतो बारीक रवा घ्यावा.

तयार आहेत रव्याचे लाडु.

शंकरपाळ्या (गोड/तिखट)

गोड शंकरपाळ्या:

साहित्य:
१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
साधारण दिड कप मैदा

कृती:
१) दूध, तूप आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. हे मिश्रण थंड करून घ्यावे.
२) मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून मळावे. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.
३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.

तिखट शंकरपाळ्या:

साहित्य:
पट्टी सामोस्याच्या उरलेल्या पट्ट्या
लाल तिखट
मीठ
चाट मसाला
तळण्यासाठी तेल

कृती:
१) पटट्याचे शंकरपाळ्यासारखे चौकोनी तुकडे करावे. व मध्यम आचेवर तेलात तळून काढावे. तळून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावे.
२) नंतर एका बोलमध्ये घेऊन त्याला तिखट, मिठ, चाट मसाला लावून घ्यावा. हे शंकरपाळे एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागतात.

तयार आहेत शंकरपाळ्या.