Category Archives: पाककॄती

चिवडा

चिवडा कसा बनवायचा?

साहित्य:
८ कप पातळ पोहे
दिड ते २ कप कुरमूरे
३/४ ते १ कप शेंगदाणे
१०-१२ काजू बी
१०-१२ हिरव्या मिरच्या
१०-१२ कढीपत्ता पाने
१/२ कप तेल
१/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे
चवीनुसार मीठ, साखर

कृती :

१) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे आणि काजू ब्राऊन रंगाचे झाले कि एका वाडग्यात काढून ठेवावेत.

२) त्याच तेलात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. तळलेले शेंगदाणे, काजू घालून लगेच पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात.

३) गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.

टीप:
१) चिवड्यात मनुका, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, डाळं घालायचे असेल तर शेंगदाण्यांबरोबर ते तळून घ्यावे.

२) फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.

३) चिवड्याला थोडा आंबटपणा हवा असल्यास, चिवडा गरम असताना १ टिस्पून आमचूर पावडर घालून मिक्स करावे.

तयार आहे चिवडा.

अनारसे

साहित्य:
१ कप तांदूळ
१ कप किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल

कृती:

१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.

२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.

३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.

४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.

५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.

६) अनारसे तळताना ब‍र्‍याचदा तो फसफसतो (हसतो). तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.

७) अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे.

तयार आहेत अनारसे.

दिवाळिचा फ़राळ – चकली

साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

चकलीची भाजाणी:
वाढणी : साधारण दिड किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी वेगवेगळ्या ब्राऊन रंग येईस्तोवर भाजून घ्यावेत. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व ईतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

तयार आहे चकली.

शाकाहारी सॅंडवीच

वाढणी – १ सॅन्डविच

साहित्य:
२ ब्रेडचे स्लाईस
काकडीचे पातळ काप ६-७
टोमॅटोचे पातळ काप ५
शिजलेल्या बटाट्याचे पातळ गोल काप ४-५
कांद्याची पातळ चकती १-२
१ टेस्पून बटर
चिमूटभर काळे मिठ

:::::हिरवी चटणी::::
दिड कप कोथिंबीर
४-५ हिरव्या मिरच्या
१ टिस्पून जिरपूड
किंचीत साखर
चवीनुसार मिठ

कृती:
१) सर्वात आधी हिरवी चटणी बनवून घ्यावी. दिड कप कोथिंबीर, ४-५ हिरव्या मिरच्या, १ टिस्पून जिरपूड, चवीनुसार मिठ, साखर आणि थोडे पाणी एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून चटणी करावी.

२) ब्रेडच्या कडा नको असतील तर काढून टाकाव्यात. दोन्ही ब्रेडच्या एका बाजूला आधी बटर आणि चटणी लावून घ्यावी.

३) एका ब्रेडवर आधी काकडीचे काप पसरून लावावेत. त्यावर टोमॅटोचे काप ठेवावेत. त्यावर काळे मिठ भुरभुरावे. त्यावर बटाट्याच्या चकत्या लावाव्यात, किंचीत मिठ पेरावे आणि त्यावर कांद्याची चकती ठेवावी. बटर आणि चटणी लावलेला ब्रेडचा स्लाईस यावर ठेवावा.

सुरीने तुकडे करावेत.

हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

तयार आहे शाकाहारी “सॅंडवीच”