Tag Archives: कामगार दिन

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?
कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

काही दिवस वर्षातून एकदाच येतात तर काही क्षण आयुष्यात एकदाच येतात.  आजही माझ्या मनात येते की, माझा जन्म हिंदुस्थान स्वतंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी का नाही झाला. कसे असतील ते दिवस जेव्हा आपल्या लोकांनी ब्रिटीशांविरोधात लढाई जिंकून भारतमातेला स्वतंत्र केलं. १५ ऑगस्ट आले की मन गर्वाने फुलून उठते. तसाच काहीसा क्षण आता काही क्षणात  येत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीस ५० वर्षे झाल्याचा दिवस! अर्थातच स्वतंत्र दिनापेक्षा कमी उत्साह आणि जल्लोषाचा दिवस नक्कीच नाही. ५० वर्षांमागे मुंबईसह महाराष्ट्र एक वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले.
 
दुर्दैव आहे की विदेशी सैन्याविरुद्ध लढून आपण भारतमातेला स्वतंत्र केले तरी महाराष्ट्र मिळवण्यासाठी कॉंग्रेसच्या विरोधात मराठी माणसाला बलिदान द्यावे लागले. ज्याप्रमाणे जनरल डायर ने जालियनवाला हत्याकांड घडवून आणले त्याच प्रमाणे मोरारजी देसाईने निशस्त्र आणि सामान्य मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या यात १०५ हुतात्मे झाले. ५० वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसवाल्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला विरोध केला होता, तोच विरोध आजही कायम असल्याचे दिसत आहे. आजही केंद्र सरकारच्या वेबसाईट www.india.gov.in वर शिवाजी महाराजांचा उल्लेख मुद्दामहुन वगळण्यात आलेला आहे.
 
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राने खुप प्रगती केलेली आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील बऱ्याच मोठ-मोठ्या कंपन्या आपले घर इथेच थाटून आहेत. शेती, संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्ग, इतिहास सगळेच अप्रतिम आहे. आपल्या सणांमध्येही ’गुढी पाडवा’ खास आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मनाला खुप आनंद होतो आणि गर्व होतो की आपण या मातीत जन्माला आलो.
 
पण याच ५० वर्षात हळू हळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. ५० वर्षे उलटून गेले तरी अजुनही मुलभूत प्रश्न तसेच आहेत. विज भारनियमन आहेच,  विदर्भातील शेतकरी  बांधवांची काय परिस्थिती झालेली आहे हे सांगायलाच नको, तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे, बेळगाव-निपाणी मधील मराठी बांधवांवर अत्याचार वाढतच आहे.
 
पंजाब मध्ये हरितक्रांती होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ नये? देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातील असूनही महाराष्ट्राची ही अवस्था असेल तर ते आपले दुर्दैव आहे.  सर्वत्र असलेल्या मिल बंद पडल्या याने तर सर्वसामान्य मराठी कामगारांचे कुटूंबच्या कुटुंबच उध्वस्त झाले आहे. मिलच्या जागांवर मॉल आले त्याचा फायदा फक्त काही मुठभर श्रीमंत लोकांनाच होत आहे, सामान्य माणूस अजूनही सुवर्ण दिवसाची वाट बघत आहे. राज्यात ७५% अजुनही शेती होते, पण जे शेतकरी भर उन्हात घाम गाळत असतात त्यांची अवस्था आपल्याला माहितच आहे. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. तरुण पिढीला इकडे लक्ष न देता आयपीएल मध्ये जास्त रमलेली आहे.

गुजरात जे ५० वर्षापूर्वी मुंबईचा भाग होता आत प्रचंड प्रगती करत आहे. खरेच आज तरी गुजरात ’सुवर्ण गुजरात’ होत आहे. पण आपल्या महाराष्ट्राचे काय? परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे असे आपल्याला वाटत नाही का? याला जबाबदार कोण? राज्यकर्ते? नाहीच! कारण राज्यकर्ते आपणच निवडून देतो. मग? जबाबदार आपणच आहोत. काही छोट्या गोष्टींसाठी आपण चुकीच्या लोकांना सतत निवडून आणतो. आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज आपल्यावर ही वेळ आणली आहे. जसे आपल्याला जन्म देणाऱ्या आईवर आपण प्रेम करतो, तितकेच  प्रेम आपण आपल्या मातीशी असले पाहिजे. ज्या मातीत आपण जन्माला आणि त्याच मातीत उद्या जाणार आहोत त्या मातीशी काही स्वार्थापोटी विकले जायचे? गद्दारी करायची? सुवर्ण महाराष्ट्र तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक तरूण हे मनात आणेल आणि शपथ घेईल हे गाव, शहर, हे राज्य माझे आहे! याला चांगले किंवा वाईट करायला मीच जबाबदार आहे. तरच समृध्द आणि सुवर्ण महाराष्ट्र येणारी पिढी बघू शकेल.
 
परप्रांतियांना दोष द्यायचे सोडून स्वत: हातात मिळेल ते काम करायची तयारी दाखविली पाहिजे. एकमेकांचे पाय खेचायचे सोडून एकमेकांना प्रोत्साहन देऊन नविन उद्योग धंदे निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. त्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. सिनेमा असो की क्रिकेट, की उद्योगधंदे असोत प्रत्येक क्षेत्रांत आपले प्रभुत्व सिद्ध केले पाहिजे. हे तुमच्या मनात आले तर नक्कीच एक दिवस विकसित महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर येईल. जिथे हात जोडून, विनंती करून कामे होत नसतील तिथे कानाखाली आवाज काढून कामे करून घ्या पण चुक आणि अन्याय होत असताना बघत बसू नका आणि स्वत:ही अन्याय करू नका. तरच होईल एका सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
महाराष्ट्र स्थापनेचि ५० वर्षे नक्कीच जल्लोषात साजरे करायचेय. पण म्यानात असलेली तलवार गंज पकडत नाही आहे ना इकडेही लक्ष द्या. तरच होईल …माझ्या सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
जय हिंद ! जय सुवर्ण महाराष्ट्र!
सुनील मंत्री