Tag Archives: गुप्तरोग

“गुप्तरोग” म्हणजे काय?

गुप्तरोग म्हणजे नक्की काय याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. नपुंसकता आणि हस्तमैथुनाची सवय यांना गुप्तरोग म्हणता येईल का? स्वत:ला गुप्तरोग झाला आहे की नाही हे कसं ओळखावं? कंडोमचा वापर केल्याने गुप्तरोग होत नाही हे कितपत खरं आहे?

लैंगिक संबंधांतून ज्या रोगांचा ‘संसर्ग’ होतो त्या रोगांना गुप्तरोग म्हणतात. त्यांना गुप्तरोग म्हणण्यासाठी दोन कारणं आहेत. एक म्हणजे, असे रोग व्यक्ती स्वत:च गुप्त ठेवते आणि दुसरं म्हणजे, अनेकदा हे रोग स्वत:च गुप्त अवस्थेत राहतात तसेच रोग्याला स्वत:लाही अशा रोगाची लागण झाल्याचं कळत नाही. काही काळ गुप्त राहून हे रोग मोठ्या प्रमाणात उचल खाऊ शकतात आणि प्राणघातकही ठरू शकतात. अशा रोगांना गुप्तरोग अशी संज्ञा जरी असली तरी, या रोगांबाबत गुप्तता न ठेवणंच योग्य. केवळ गुप्तता ठेवण्याने असे रोग जीवघेणे ठरू शकतात. एड्स आणि अलिकडच्या काळात निदर्शनास आलेले इतर काही रोग सोडले तर, बाकी सर्व गुप्तरोगांवर आज औषधं निघाली आहेत. अशा परिस्थितीत गुप्तरोग होऊ शकेल असे लैंगिक संबंध जर कुणाशी ठेवले असतील तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरीत तपासण्या करून घेणंच योग्य.

नपुंसकता, लैंगिक दुर्बलता, शिघ्रपतन अशा लैंगिक तक्रारींबाबतही बहुतांशी वेळा लोक गुप्तता पाळतात पण, यांना गुप्तरोग म्हटलं जात नाही. हस्तमैथुनालाही काहीजण गुप्तरोग मानतात. हस्तमैथुन हा गुप्तरोग तर नाहीच पण, साधा रोगही नाही. हस्तमैथुन हा एक सामान्य प्रकार आहे तो अपायकारकही नाही आणि त्यासाठी कुठल्या औषध उपचारांचीही गरज नाही.

लैंगिक संबंधातून विशिष्ट जंतू, विषाणू किंवा फंगसची लागण झालेल्या रोगांना गुप्तरोग म्हटलं जातं. सिफिलिस, गनोरोया, हपिर्स ही काही गुप्तरोगांची नावं आहेत. कंडोम वापरल्याने गुप्तरोग होत नाहीत, याच्याशी मी सहमत नाही. कंडोमचा वापर करूनही एड्स आणि इतर गुप्तरोग झाल्याची असंख्य उदाहरणं मी पाहिली आहेत. गुप्तरोगांपासून दूर राहायचं असेल तर स्वत:च्या पत्नी व्यतिरिक्त इतर कुणाशीही लैंगिक संबंध न ठेवणं हाच उत्तम उपाय आहे. तुम्हाला गुप्तरोग झाला असल्याचा संशय असेल तर योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासण्या करून घ्या.

-डॉ. राजन भोसले

(तुमचे काहि प्रश्न असतील तर ते कमेंट्स मधुन विचारा.)