Tag Archives: दिवाळी

दिवाळी, दीपावली, दिपोत्सव

ही दिवाळी आणि नवे वर्ष आपणा सर्वांना उत्साहाचे, आनंदाचे आणि उत्कर्षाचे जावो… एका वाक्यात व्यक्त झालेली ही शुभेच्छा किती विविध गोष्टी सांगते पाहा. दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद. दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे माणसा-माणसांच्या मनातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला येणारे उधाण. पण शुभेच्छा देताना एवढेच सांगून माणसे थांबत नाहीत. ती दिवाळीबरोबर नवीन वर्षाचाही उल्लेख करतात. हे विक्रमसंवताचे दिवाळीपासून सुरू होणारे वर्ष आपल्या नेहमीच्या व्यवहारात फारच कमी पाळले जाते, हे खरे. कारण कार्तिंकी प्रतिपदेपासून सुरू होणारा विक्रमसंवत् हा गुजराथी समाजात अधिक पाळला जातो. त्याचे कार्तिकसंवत् असेही नाव आहे. महाराष्ट्रात जी शालिवाहन कालगणना आहे ती चैत्र शुध्द प्रतिपदेपासून सुरू होते. इंग्रजी वर्ष तर एक जानेवारीला सुरू होते. पण व्यवहारात कमी पाळले जाते, मात्र शुभेच्छांमध्ये त्याचा सढळ हाताने वापर केला जातो, असे हे दिवाळीपासून सुरू होणरे नवे वर्ष.

दिवाळी, दीपावली, दिपोत्सवदिवाळी आपल्या सणांची सम्राज्ञी होय. दिवाळीची परंपरा पौराणिक काळाशी नाते सांगणारी असली तरी जवळपास हजारो वर्षांपासून आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या थोर कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण प्रारंभी साजरा केला जाऊ लागला. पुढे कालांतराने या सणाचे स्वरुप एक कौटुंबिक आनंद सोहळा असे झाले. धनत्रयोदशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस, दीपावली पाडवा, आणि भाऊबीज अशा स्वरुपात दिवाळीचा सण साजरा होतो. आसमंतातील अंधार दूर करणारा, अज्ञात अशा मृत्यूचे भय निवारण करणारा ”तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्यो मा अमृतं गमय ।।” अशी थोर इच्छा आकांशा बाळगणारा हा आनंदाची उधळण करणारा हा सण धनत्रयोदशीपासून सुरु होतो.

दिवाळीचा आनंद, दिवाळीचा उत्साह वर्षभर टिकावा, वर्षभर लाभावा अशीच अपेक्षा या शुभेच्छांमधून डोकावत असते. दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश घेऊन येतो. गोविंदाग्रजांची एक कविता आहे,

जी दु:खी कष्टी जीवां दुसरी माता।
वाढत्या वयांतही लोभ जिचा नच सरता।।
त्या निद्रादेवीच्या मी मांडीवरतीं।
शिर ठेउनि पडलों घ्यावया विश्रांति।।…
धडधडां भोंवती तोंच फटाके उडती।
मी जागा होऊनि पाहत बसलों पुढतीं।।
तों कळे उगवला आज दिवस वर्षाचा।
वर्षाव जगावर करीत जो हर्षाचा।।
ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।।
काढिलें फोल विश्वाचें। चाळुनि ।
या रसांत नव तेजाचें। जाळुनी ।
ढीगच्या ढीग हीणाचे ।
सत्त्वाचें बावनकशीच सोनें सारें।
ठेविलें, करा रे लक्ष्मीपूजन या रे।।

निद्रादेवीच्या मांडीवर कवी विश्रांती घेत असताना सकाळी त्यांना फटाक्यांनी जाग आली. तुम्हांला दिवाळीत येते तशीच, आणि कवी म्हणतात,

ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।

दिवाळीत नव्या-जुन्याचा संगम इथे कवीने सांगितला आहे. दिवाळी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते. मात्र बदलत्या कालमानानुसार त्याचे स्वरुप सातत्याने बदलत आले आहे. नीट विचार केला तर ध्यानी येईल, दिवाळी हा धार्मिक आणि अंतर्मनाला सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करणारा असा एक वेगळाआगळा सण आहे आणि आता तर काम करणार्‍या सर्व लोकांना खरेखुरे लक्ष्मीपूजन करता यावे म्हणूनच की काय सरकारी, निमसरकारी, खाजगी सर्वच ठिकाणी दिवाळीपूर्वी बोनसची वाटणी करून सर्वांना सुख आणि आनंद मिळण्याजोगी स्थिती निर्माण केली जाते. वर्षभरातील चिंतेची, अडीअडचणींची मरगळ दूर करून थोडेफार का होईना पण सर्वांना समाधान लाभावे, सणांचा आनंद उपभोगता यावा अशीही तरतूद केली आहे. दिवाळी त्यामुळेच अनेक गोष्टींचा संगम आहे. खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोन्ही पक्ष सारखेच खुशीत असतात, तसेच घरात पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा विविध नात्यांनाही एक वेगळा गोडवा दिवाळी बहाल करते. म्हणूनच हा दिवाळीचा आनंद वर्षभर राहावा, अशी अपेक्षा आपण या दिवाळीत वर्षाच्या प्रारंभी करूया.

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

हा लेख ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूज साठी लिहिला आहे.  महाराष्ट्र माझा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व महान्यूज या दोघांचाही आभारी आहे.

सर्वधर्म ‘सण’भाव

दिवाळी सण हिंदूंचा असं म्हटलं, तरी भेंडीबाजारातील मुस्लिम बांधवांचा फटाक्याच्या निमित्ताने यातील सहभाग मानला तर ‘सर्वधर्म ‘सण’ भाव’ असंच म्हणावं लागेल.

काल-परवापासून घराघरातील फराळाचे डबे फस्त होण्यास सुरुवात झाली असेल. सर्वाच्या आवडीचा सण साजरा होतोय. आपल्या धकाधकीच्या जीवनात दिवाळीला असणारं महत्त्व आणि स्थान कुणाला वेगळं सांगण्याची गरज नाही. लोकांना अगदी मनापासून वाट पाहायला लावणारा हा सण अगदी शेकडो वर्षापासून साजरा केला जातो. पाच दिवसांच्या या सणात मुंबई अक्षरश: उजळून निघते. ‘‘या सणाचा मुंबईत उत्साह दिसतो, तसा पृथ्वीवर कोठेच नसेल,’’ असे गोविंद माडगावकर यांनी १८६३ साली लिहिलेल्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात म्हटलं आहे.

दीडशे वर्षापूर्वीचं हे वाक्य आजही तंतोतंत खरं आहे. दिवाळीचे वेध म्हणजे काय सांगावे म्हाराजा! गल्लोगल्ली फटाक्यांची दुकानं उघडतात. रात्र-रात्र कष्ट करून बनवलेले आकाशकंदील बाजारात विक्रीसाठी येतात. विविध प्रकारचे कंदील आणि दिवे सभोवतालच्या अंधाराला दूर लोटत असतात. कोप-याकोप-यांतील रांगोळीच्या रंगांचे स्टॉल्स लोकांची वाट पाहात असतात. कुटुंबं एकत्र खरेदीसाठी बाहेर पडतात. तरी हल्ली कपडय़ांची खरेदी ही काही नावीन्यपूर्ण बाब राहिलेली नाही. आज लोक दर आठवड्याला वा महिन्याला (आपापल्या ऐपतीप्रमाणे अर्थात) कपडय़ांची खरेदी करतात. पूर्वी लोक आपल्या मुलाबाळांना घेऊन वर्षातून एकदाच, दिवाळीला खरेदीसाठी बाहेर पडत.

दादर, लालबाग आणि मोहम्मद अली रोड ही गेल्या कित्येक वर्षापासून मुंबईतील दिवाळीच्या काळातील सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणं. दादर, लालबागमध्ये दिवाळीचे कंदील, उटणी, पणत्या (ज्यात दरवर्षी काहीबाही अभिनव बदल होत असतात.), फुलं, रंग अशा विविध वस्तू दुकानांमध्ये, रस्त्यांवर ठाण मांडून बसलेल्या असतात. फटाक्यांसाठीचा अंतिम शब्द म्हणजे मोहम्मद अली रोड. दिवाळीचा उल्लेख हिंदू सण म्हणून केला जातो. पण ईसाभाई आणि भेंडीबाजारातच आजूबाजूला असलेल्या इतर मुस्लिम बांधवांच्या फटाक्यांच्या दुकानातील गर्दी पाहता या सणाचा धर्माशी असलेला संबंध विसरून जाऊ. जितक्या आपुलकीने, प्रेमाने आणि उत्साहान सर्व धर्माची माणसं एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात, तेवढी जवळीक क्वचितच इतर कुठल्या सणांमध्ये दिसून येते. धार्मिक मूळ असूनही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असणारा हा सण आहे.

आपल्या बदलत्या जीवनशैलीनुसार आणखी एक बदललेली गोष्ट म्हणजे दिवाळीच्या फराळाची विक्री. पूर्वी बायका पंधरा-पंधरा दिवस पूर्वीपासून फराळाची तयारी करत असत. आता नोकरी करणा-या जोडप्याला आसरा आहे, तो दुकानांतील फराळाचाच. आता तर दादरला गाड्यांवरदेखील फराळाची मोठमोठी पाकिटं विकत मिळतात.

आपली सारी दु:खं बाजूला सारून लोक ज्या आनंदाने सगळे दिवाळीला सामोरे जातात, ते अतुलनीय आहे. वर्ष संपायच्या अगोदर येणारा हा दिव्यांचा सण महागाई व इतर दुष्प्रवृत्तींच्या काळोखाला मुळापासून उखडून लावेल आणि येणा-या वर्षाला अधिक धैर्याने सामोरं जाण्याचं बळ देईल, अशी आपण या वर्षीही आशा करूया.

धन्यवाद: ऋत्विक सावंत