Tag Archives: पाककॄती

चिरोटे.

चिरोट कसे बनवायचे?

वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे

साहित्य:
१ कप मैदा
१/८ कप पातळ केलेले साजूक तूप
१/४ कप दूध
वरून पेरायला पिठी साखर
पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ

कृती:
१) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.

२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.

३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची दाटसर पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.

४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.

५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.

६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.

पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर एकदा उभे आणि एकदा आडवे असे लाटणे फिरवावे.
दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.

७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.

टीप:
१)वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.

तयार आहेत चिरोटे.

चिवडा

चिवडा कसा बनवायचा?

साहित्य:
८ कप पातळ पोहे
दिड ते २ कप कुरमूरे
३/४ ते १ कप शेंगदाणे
१०-१२ काजू बी
१०-१२ हिरव्या मिरच्या
१०-१२ कढीपत्ता पाने
१/२ कप तेल
१/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे
चवीनुसार मीठ, साखर

कृती :

१) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे आणि काजू ब्राऊन रंगाचे झाले कि एका वाडग्यात काढून ठेवावेत.

२) त्याच तेलात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. तळलेले शेंगदाणे, काजू घालून लगेच पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात.

३) गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.

टीप:
१) चिवड्यात मनुका, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, डाळं घालायचे असेल तर शेंगदाण्यांबरोबर ते तळून घ्यावे.

२) फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.

३) चिवड्याला थोडा आंबटपणा हवा असल्यास, चिवडा गरम असताना १ टिस्पून आमचूर पावडर घालून मिक्स करावे.

तयार आहे चिवडा.

दिवाळिचा फ़राळ – चकली

साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टेस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

चकलीची भाजाणी:
वाढणी : साधारण दिड किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी वेगवेगळ्या ब्राऊन रंग येईस्तोवर भाजून घ्यावेत. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व ईतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

तयार आहे चकली.