Tag Archives: ब्रिटिश नंदि

पुणं कसं वाटलं?

शनिवार वाडा, पुणे
शनिवार वाडा, पुणे

सांप्रतकाळीचे ज्येष्ठ समालोचक आणि गतजन्मीचे कसोटीवीर रवी शास्त्री यांनी गोजिरवाण्या अजु आगरकरला भरमैदानात शंभर नंबरी सवाल टाकला – “पुणं कसं वाटलं?”

भूमंडळ थबकले. आभाळाने कान टवकारले. शनवारवाड्याच्या बुरुजांमधोन एक उसासा वादळतेने धुमसत गेला! लक्ष्मी रोडचा ट्रँफिक जागच्या जागी गोठला. आसमंतात सन्नाटा पसरला…

पुणं कसं वाटलं?
वाचकहो, हा सवाल सामान्य का आहे. आहो, साक्षात यमधर्माला निरुत्तर करणा-या नचिकेताचे बळ या सवालात एकवटले आहे. भांडारकर इन्स्टिट्युटपासोन इतिहास मंडळापर्यंत यच्चयावत संस्थातील रुमालांमध्ये तरी या सवालचे उत्तर सापडेल काय? साक्षात शिवरायांनाही पुण्याचे हे कोडे अखेरीस न उकलल्यामुळेच त्यांनी रायरी गाठला ना! लोकमान्यांना ‘गीतारहस्य’ उकलले, प्रंतु “पुणं कसं वाटलं?” हे काही सांगता आले नाही. पुणं कसं वाटलं, हे ठाऊक नसल्यामुळेच पेशवाईत मराठी झेंडा अटकेपार फडकावावा लागला, नव्हे काय?

या सवालाचे उत्तर सुज्ञ “व्वा! झकास हवा!” ऐसे देतात. वस्तुत: सवाल गावाचा आहे, हवेचा नाही! प्रंतु प्रश्नकर्त्याचा ‘कात्रज’ करणे येथे क्रमप्राप्त ठरते! का की पुणं कसं वाटलं? या प्रश्नास असंख्य पैलू आणि प्रयोजने असतात. मुदलात हा प्रश्न ज्याला विचारला जातो, त्यास ‘तु पुणेकर नाहीस’ ऐसे सांगण्याचाही हा मार्ग असु शकतो. “पुण्यातील ओळखीची दोन माणसे सांगा!” अशा अंगानेही हाच सवाल फेकता येतो. ‘पुण्यातले खड्डे’ या विषयाची सुरुवातही याच सवालाने रंगते. असो.
पुणं कसं वाटलं? आमच्या मते हा सवाल शंभर टक्के पोलिटिकल आहे, आणि याच्या पाठीमागे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे की, शेतीतज्ञ बारामतीकर यांचा (अक्षरशः) हात आहे. त्यांनी “पुणं कसं वाटलं, ते अजितला विचार!” असे सांगितले. शास्त्रीबोवा क्रिकेटपंडित! त्यांना पोलिटिकल कुठले कळायला? त्यांनी भोटसारखा सवाल अजु आगरकरलाच टाकला. (हा आमचा अजु हुशाराय, हां! फास्ट बोलर वाटत नै, पण बुद्धिबळ आँलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या चमुतला विद्यार्थी वाटतो! असो!!) अजु म्हणाला, “पुण्याला खेळायला नेहमीच आवडतं!” हे उत्तर पोलिटिकल नाही, असे कोण म्हणेल? प्रंतु, खरी मेख पुढेच आहे! वस्तुतः बारामतीकरांनी शास्त्रीबोवांना हा सवाल अजितला विचारायला सांगितला पण कोण अजित? आगरकर की पवार? (दादा, द्या उत्तर! पुणं कसं वाटलं?) पहा, वाचकहो, तुम्ही देखील गोंधळलात! आधीच सांगितले होते, प्रश्न सोपा, पण उत्तर कठीण!

ब्रिटिश नंदी