Tag Archives: महाराष्ट्र

मला कळालेले पानिपत !

पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की “पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते सांग ?” तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही !  “मराठे संख्यात्मक दृष्ट्या हरले, तर अफगान सैन्य मोहीम फत्ते झाली नाही म्हणुन.” अहमदशाह अब्दालीने त्या महायुद्धातील मराठ्यांच्या संगरतांडवाची अशी काही धसकी घेतली, की त्याला आपला गाशा गुंडाळुन मायदेशी परत जावे लागले. कारण, मराठ्यांचं एक तृतियांश 1/3 सैन्य पानिपतावर अब्दालीशी भिडलं होतं, पण अब्दालीचं सर्वच्या सर्व सैन्य युद्धात होतं त्यापैकी 70% सैन्य मरण पावलं. तिकडे अब्दालीच्या बंधुंनी गादी मिळवण्यासाठी बंड केलं आणि अब्दालीने युद्धानंतर मोहीम सोडुन तडकाफडकी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. 

 

जरा दुसऱ्या बाजुने ह्या महायुद्धाच्या परिणामांचा विचार केला, तर ह्या महायुद्धात मराठे जिंकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठ्यांचे लक्ष्य हे अब्दालीला रोखने आणि दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणे हेच होते. आणि अप्रत्यक्षरित्या मराठ्यांनी ते साध्य केले होते. कारण त्यानंतर अब्दाली मोहीम सोडुन माघारी फिरला आणि स्वत: त्याने पेशव्यांना संबंधित आशयाचे पत्र लिहुन हे कळविले की – “तुम्ही नेमलेल्या दिल्लीचा बादशहाला मी देखिल पुनश्च बादशहा म्हणुन मान्यता देतो, आणि दिल्लीचे रक्षण पुर्वीप्रमाणे मराठ्यांनीच करावे ही विनंती.” हे पत्र स्वत: अहमदशहा अब्दालीने लिहुन पेशव्यांना पाठविणे म्हणजे मराठ्यांचा पानिपतावर अप्रत्यक्षपणे झालेला विजयच.

 

पानिपतचे महायुद्ध संख्यात्मकदृष्ट्या हारण्याची कारणे आणि त्यानंतरचे भारतीय राजकारणावर झालेले परिणाम आणि राजकीय लाभ ह्याचा विचार करता, अब्दाली सरळसरळ संख्यात्मक दृष्ट्या जिंकला होता, परंतु मराठ्यांच्या भिमटोल्याने अब्दालीचे एवढे नुकसान झाले की त्याला त्याच्या उरलेल्या सैनिकांसमवेत दिल्लीवर स्वत:चे राज्य घोषित करुन ते टिकविणे शक्य नव्हते. कारण, मराठ्यांचे दोन तृतियांश  2/3 सैन्य अजुनही महाराष्ट्रात होते, जर मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा सुड घेण्यासाठी परत दिल्लीला धडक मारली, तर माझ्या कबरीचं थडगं नावालापण शिल्लक ठेवणार नाहीत ! ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती ! काय तो काळ जेंव्हा शिवरायांना दिल्ली दरबारी नजरकैदेत ठेवल्या गेलं होतं, आणि एक हा काळ जेथे दिल्लीच्या गादीवरचा (नामधारी) बादशहा मराठ्यांनी तिन वेळा बदलला.

 

पानिपतच्या महायुद्धानंतर राजकीय फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला. फायदा झाला तो उत्तरेतील संस्थानांना ! (म्हणजेच रजपुत, जाट, शिख, गुजर ईत्यादी) कारण अब्दाली म्हणजे राष्ट्रीय संकट आणि मराठे म्हणजे दिल्लीच्या तख्ताचे रक्षणकर्ते ह्यांच्यात युद्ध झाले. दोन्ही बाजुस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या गंभीर हानी झाली, आणि दिल्लीची राजकीय परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली (उत्तरेतल्या हिंदू राजा-महाराजांना अपेक्षित असलेली). पानिपतचा रणसंग्राम चालु असताना मराठ्यांना मदत न करता स्वत:ची कातडी वाचवुन लांबुन नजारा पाहणाऱ्या हिंदू राजे-महाराजांनी वर्षभरानंतर दिल्लीत हातपाय पसरायला सुरुवात केली, आणि दिल्लीच्या (नामधारी) बादशहाचे नियंत्रण मिळविण्यासाठी जाळे विणायला सुरु केले होते. ह्या प्रकाराला मी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणेन, कारण, अब्दाली आणि मराठे अश्या दोन मांजरांचे भांडण चाललय आणि उत्तरेतली माकडं भांडण सरल्यावर दिल्लीचं लोणी खायला उड्या मारत गेले. पानिपतच्या महायुद्धानंतर दिल्लीच्या आणि संपुर्ण भारताच्या राजकारणाला एक वेगळंच असं अनपेक्षित वळण मिळालं. खरं सागायचं झाल्यास पानिपतचं युद्ध हे अटळच होतं. कारण, तेंव्हाची राजकीय परिस्थिती पाहता (दिल्लीवर होणारी आक्रमणे) ह्यांना कुठल्यातरी प्रकारे लगाम लावणे आणि “एकछत्री हिंदूपदपातशाहीचे स्वप्न” अस्तित्वात आणण्यासाठी स्थिर असलेली राजसत्ता दिल्लीत असणे आवश्यक होते. नाझेरखान (अब्दालीचा गुरु) चे अयशस्वी झालेले मनसुबे पुर्ण करण्यासाठी अब्दाली नजिबखानाच्या औपचारिक बोलावण्यावरुन तिसऱ्यांदा स्वारीस आला होता, यापुर्वी जेंव्हा दोन वेळा अब्दाली आला होता, तेंव्हा तो पहिल्यांदा उप-सेनापती व दुसऱ्यांदा सेनापती म्हणुन आला. नाझेरखानच्या मृत्युनंतर अब्दालीने इराण पासुन अफगाणीस्तान वेगळा केला आणि त्याने कंदाहारची माती मौलवी हस्ते कपाळाला लाउन स्वत:ला अफगाणचा राजा घोषित केले. स्वत:चे राज्य स्थापन केल्यानंतर त्याला राज्यकारभारासाठी चांगला खजिना पाहिजे होता, अब्दाली हिंदूस्तानात तिसरी स्वारी करण्याच्या विचारातच होता, त्यात प्रत्यक्ष हिंदूस्तानातुन रोहिल्याच्या नजिबखानाने औपचारिक पत्र पाठविले आणि अब्दाली वादळाप्रमाणे हिंदूस्तानच्या सरहदीवर येऊन धडकला.

 

10 जानेवारी 1760 मध्ये क्रुरकर्म्या नजिबाने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला आणि मल्हारराव होळकरांचा विश्वासघात. नजिब्याने  अयोद्धेचा नवाब सुजाउदौला, दुर्राणी बादशहा अहमदशहा अब्दाली आणि आसपासच्या मुलुखातली वतनदार मुस्लिम सरदार मंडळी इस्लामच्या नावाने जमा केलं. मौलाना सुजावली खान ने ह्या सर्वांना पवित्र “दार-उल-इस्लाम” साठी जिहाद करण्याची शपथ दिली अशी नोंद आहे. (सध्या पाकिस्तानात व अफगाणीस्तानातील तमाम दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा जनक म्हणजे मौलाना सुजावली खान होय. 1857 मध्ये भारतात सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचे धागेदोरे हे मौलाना सुजावली खान पर्यंत पोहचतात). तर दुसरीकडे अहमदशहा अब्दालीची बेगम झिनतने (मराठ्यांचा तोफखाना प्रमुख) इब्राहिम खान गारदीला पवित्र “दार-उल-इस्लाम” ची दिलेली शपथ त्याने झिडकारुन लावली, इब्राहिम खान आणि सदाशिव भाऊंच्या मैत्रीच्या एका आदर्श उदाहरणाची नोंद इतिहासाला करणं भाग पडलं.  नजिब्याने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला, ही बातमी जशी पुण्याला पोहचली तशी शनीवारवाड्यात एकच खळबळ उडाली. पेशव्यांनी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंना उत्तरेच्या मोहीमेकडे नेतृत्व करण्याची संधी दिली खरी, पण पेशविणबाईंच्या दबावाने त्यांनी मोहीम काढली ती चिरंजीव विश्वासरावांच्या नावानेच. पेशव्यांनी भाऊंना संधी दिली पण अधिकार दिला नाही, अश्या अविश्वासाची भाऊंना अपेक्षा नसेल, पण ही वेळ मान-मनसुब्यासाठी झगडा करण्याची नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी अब्दालीला दिल्लीपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशीलपणे लढण्याची आहे. भाऊंच्या पाठीवर लादलेले बाजारबुणगे, शंखफुके भटजी, चिलीमफुके साधूबाबा, बायकालेकरांचे लटांबरं अन् पंढरपुरच्या जत्रंला निघाल्यासारखे टाळ कुटणारे हौशे, गवशे, नवशे म्हणजे खायला काळ अन् भुईला भारंच होते, सैनिकमावळ्यांना ह्या बाजारबुणग्यांच्या लटांबरामुळं अन्नपाणी कमी पडत असे, प्रवासाची गती कमी होत असे. जेंव्हा अब्दालीने मराठ्यांची पंजाबातील रसद तोडली, नदीवर धरण बांधुन पुर्ण पाणी अडवलं, तेंव्हा ह्या तिर्थक्षेत्रासाठी उड्या मारत आलेले शंखफुके, चिलीमफुके, हौशे, गवशे, नवशे ह्यांनी भाऊंना आपल्याला परत पुण्याकडे पाठवण्यासाठी पायी लोटांगण घातले. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या पराभवाचे कारण असु शकते.

 

विश्वासरावांनी आणि भाऊंनी वेळोवेळी पेशव्यांना हलाखीची परिस्थिती सांगुन मदत मागितली, पेशवे सरकार 40 हजाराची सेना घेउन निघाले खरे ! पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल ? ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ?  ह्या विचारानेच मी वेडा होउन जातो. किती ताकदवान असतील ते भाऊंचे शब्द ज्याच्यात हजारो मंत्रांची ऊर्जा संक्रमित झालेली होती. जर भाऊंच्या जागी कदाचित दुसरा कुणी असता तर खचितच तो शरण गेला असता, असं म्हणनं वावगं ठरणार नाही.

 

तानाजी मालुसरे पासुन दत्ताजी शिंदे पर्यंतच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचं कर्ज फेडण्यासाठी शिव-शंभुंना भाऊंनी वाहीलेली श्रद्धांजली म्हणजे पानिपत.

 

राष्ट्ररक्षणासाठी कसलाही जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद न मानता शत्रुला रोखण्यासाठी मर्द मऱ्हाठी मावळ्यांनी “हर हर महादेव” ची गगनभेदी ललकारी देत सणसणित हाणलेला भिमटोला म्हणजे पानिपत.

 

जात, धर्मापेक्षा हे राष्ट्र सर्वोच्च आहे, आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणास्तव “मारीता मारीता मरावे” हा वसा घेऊन रणमैदानी मराठ्यांनी केलेले संगरतांडव म्हणजे पानिपत.

 

मायभूमीचे पांग फेडण्यासाठी परिणामांची पर्वा न करता मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने जिथे भारतमातेचे चरण धुतले ते ठिकाण म्हणजे पानिपत.

 

न भुतो न भविष्यती असे हे पानिपत पानिपत पानिपत !

 

 

~ माहिति संकलन आणि लेखन : सत्यम अवधुतवार

 

(सदरील लेख हा वाचलेल्या साहित्यातुन, दृकश्राव्य माध्यमांतुन, मिळालेल्या माहीतीनुसार मी माझं मतं येथे सविस्तरपणे मांडलेलं आहे)

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?
कधी होणार सुवर्ण महाराष्ट्राचा उदय?

काही दिवस वर्षातून एकदाच येतात तर काही क्षण आयुष्यात एकदाच येतात.  आजही माझ्या मनात येते की, माझा जन्म हिंदुस्थान स्वतंत्र्याच्या आंदोलनाच्या वेळी का नाही झाला. कसे असतील ते दिवस जेव्हा आपल्या लोकांनी ब्रिटीशांविरोधात लढाई जिंकून भारतमातेला स्वतंत्र केलं. १५ ऑगस्ट आले की मन गर्वाने फुलून उठते. तसाच काहीसा क्षण आता काही क्षणात  येत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीस ५० वर्षे झाल्याचा दिवस! अर्थातच स्वतंत्र दिनापेक्षा कमी उत्साह आणि जल्लोषाचा दिवस नक्कीच नाही. ५० वर्षांमागे मुंबईसह महाराष्ट्र एक वेगळे राज्य म्हणून अस्तित्वात आले.
 
दुर्दैव आहे की विदेशी सैन्याविरुद्ध लढून आपण भारतमातेला स्वतंत्र केले तरी महाराष्ट्र मिळवण्यासाठी कॉंग्रेसच्या विरोधात मराठी माणसाला बलिदान द्यावे लागले. ज्याप्रमाणे जनरल डायर ने जालियनवाला हत्याकांड घडवून आणले त्याच प्रमाणे मोरारजी देसाईने निशस्त्र आणि सामान्य मराठी माणसांवर गोळ्या झाडल्या यात १०५ हुतात्मे झाले. ५० वर्षांपूर्वी केंद्रात सत्तेत असलेल्या कॉंग्रेसवाल्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला विरोध केला होता, तोच विरोध आजही कायम असल्याचे दिसत आहे. आजही केंद्र सरकारच्या वेबसाईट www.india.gov.in वर शिवाजी महाराजांचा उल्लेख मुद्दामहुन वगळण्यात आलेला आहे.
 
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राने खुप प्रगती केलेली आहे. मुंबई आजही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. जगातील बऱ्याच मोठ-मोठ्या कंपन्या आपले घर इथेच थाटून आहेत. शेती, संस्कृती, खाद्यपदार्थ, निसर्ग, इतिहास सगळेच अप्रतिम आहे. आपल्या सणांमध्येही ’गुढी पाडवा’ खास आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता मनाला खुप आनंद होतो आणि गर्व होतो की आपण या मातीत जन्माला आलो.
 
पण याच ५० वर्षात हळू हळू आपले राज्य कुठल्या दिशेने जात आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. ५० वर्षे उलटून गेले तरी अजुनही मुलभूत प्रश्न तसेच आहेत. विज भारनियमन आहेच,  विदर्भातील शेतकरी  बांधवांची काय परिस्थिती झालेली आहे हे सांगायलाच नको, तर दुसरीकडे वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे, बेळगाव-निपाणी मधील मराठी बांधवांवर अत्याचार वाढतच आहे.
 
पंजाब मध्ये हरितक्रांती होऊ शकते तर महाराष्ट्रात का होऊ नये? देशाचे कृषीमंत्री महाराष्ट्रातील असूनही महाराष्ट्राची ही अवस्था असेल तर ते आपले दुर्दैव आहे.  सर्वत्र असलेल्या मिल बंद पडल्या याने तर सर्वसामान्य मराठी कामगारांचे कुटूंबच्या कुटुंबच उध्वस्त झाले आहे. मिलच्या जागांवर मॉल आले त्याचा फायदा फक्त काही मुठभर श्रीमंत लोकांनाच होत आहे, सामान्य माणूस अजूनही सुवर्ण दिवसाची वाट बघत आहे. राज्यात ७५% अजुनही शेती होते, पण जे शेतकरी भर उन्हात घाम गाळत असतात त्यांची अवस्था आपल्याला माहितच आहे. त्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. तरुण पिढीला इकडे लक्ष न देता आयपीएल मध्ये जास्त रमलेली आहे.

गुजरात जे ५० वर्षापूर्वी मुंबईचा भाग होता आत प्रचंड प्रगती करत आहे. खरेच आज तरी गुजरात ’सुवर्ण गुजरात’ होत आहे. पण आपल्या महाराष्ट्राचे काय? परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे असे आपल्याला वाटत नाही का? याला जबाबदार कोण? राज्यकर्ते? नाहीच! कारण राज्यकर्ते आपणच निवडून देतो. मग? जबाबदार आपणच आहोत. काही छोट्या गोष्टींसाठी आपण चुकीच्या लोकांना सतत निवडून आणतो. आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज आपल्यावर ही वेळ आणली आहे. जसे आपल्याला जन्म देणाऱ्या आईवर आपण प्रेम करतो, तितकेच  प्रेम आपण आपल्या मातीशी असले पाहिजे. ज्या मातीत आपण जन्माला आणि त्याच मातीत उद्या जाणार आहोत त्या मातीशी काही स्वार्थापोटी विकले जायचे? गद्दारी करायची? सुवर्ण महाराष्ट्र तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक तरूण हे मनात आणेल आणि शपथ घेईल हे गाव, शहर, हे राज्य माझे आहे! याला चांगले किंवा वाईट करायला मीच जबाबदार आहे. तरच समृध्द आणि सुवर्ण महाराष्ट्र येणारी पिढी बघू शकेल.
 
परप्रांतियांना दोष द्यायचे सोडून स्वत: हातात मिळेल ते काम करायची तयारी दाखविली पाहिजे. एकमेकांचे पाय खेचायचे सोडून एकमेकांना प्रोत्साहन देऊन नविन उद्योग धंदे निर्माण करण्यास हातभार लावला पाहिजे. त्यासाठी योजना आखल्या पाहिजेत. सिनेमा असो की क्रिकेट, की उद्योगधंदे असोत प्रत्येक क्षेत्रांत आपले प्रभुत्व सिद्ध केले पाहिजे. हे तुमच्या मनात आले तर नक्कीच एक दिवस विकसित महाराष्ट्र राज्य आपल्यासमोर येईल. जिथे हात जोडून, विनंती करून कामे होत नसतील तिथे कानाखाली आवाज काढून कामे करून घ्या पण चुक आणि अन्याय होत असताना बघत बसू नका आणि स्वत:ही अन्याय करू नका. तरच होईल एका सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
महाराष्ट्र स्थापनेचि ५० वर्षे नक्कीच जल्लोषात साजरे करायचेय. पण म्यानात असलेली तलवार गंज पकडत नाही आहे ना इकडेही लक्ष द्या. तरच होईल …माझ्या सुवर्ण महाराष्ट्राचा उदय!
 
जय हिंद ! जय सुवर्ण महाराष्ट्र!
सुनील मंत्री

एकांकिका- “लक्ष्मी हरवली आहे”

पात्रे : ७०- ७५ वर्षीय आजोबा
४५ वर्षीय वडील: श्री
१९ – २० वर्षीय मुलगा: कुमार

काळ : आजचा

प्रसंग :  १ मेचा दिवस, सकाळी तिघांचे पेपर वाचन चालू आहे.

पार्श्वसंगीत : “जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा”

कुमार  :  आजोबा, मुंबई महाराष्ट्रात असावी या करता आंदोलने का करावी लागली? तिन्ही बाजूंनी महाराष्ट्राने वेढली असतानादेखील, गुजरातने मुंबईवर हक्क कसा काय सांगितला?   

आजोबा :  कुमार, तुझं म्हणण अगदी बरोबर आहे. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रात असण स्वाभावीक होत. त्यामळे तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्राची असल्याचा निर्णय दिला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

श्री  :   बाबा, तुम्ही म्हणता ते मला भौगोलिकदृष्ट्या पटत आहे. पण तरीही, मुंबई महाराष्ट्राची, असं आपण का म्हणावे?    

आजोबा :  श्री, तू एक मराठी माणूस असून असं कसं म्हणतोस? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात किती मराठी लोकांचं रक्त सांडलं आहे हे माहित आहे का तुला?

श्री  : बाबा, मी जे बोलतो आहे, ते माझ्या अनुभवातून बोलतो आहे; पूर्ण विचारांती बोलतो आहे.

कुमार  : बाबा तुम्हाला नक्की म्हणायचय तरी काय?

श्री  :  सांगतो कुमार. बाबा, माझ्यापेक्षा तुम्हाला त्याकाळचे जास्त बरोबर सांगता येईल. इंग्लिश लोक गेल्यावर, येथील कारखाने कोणी वाढवले?

आजोबा :  बऱ्याचशा कापड गिरण्या इंग्लिश लोक पारशी लोकांना देऊन गेले. बाकी गिरण्या व कारखाने गुजराथी, मारवाडी लोकांनी विकत घेतले, किंवा उभारले.

श्री  :    आणि सिंधी, पंजाबी लोकांचे काय?

आजोबा  :   ते लोक फाळणीनंतर आले. प्रचंड हलाखीतून, अत्यंत कष्टाने व बरेचसे धूर्तपणाने ते वर आले. त्यांनीही कारखानदारी, स्वतंत्र व्यवसायात मुसंडी मारली.

श्री  :  ह्या सर्व आर्थिक उलाढालीमध्ये मराठी माणूस कुठे होता?    

आजोबा  :    अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मराठी कारखानदार होते. पण मराठी लोकांची दुकाने मात्र होती त्याकाळी.

कुमार  :   खरंच आजोबा? आज तर सर्वत्र गुजराथी, मारवाडी, सिंधी आणि पंजाबी लोकांचीच दुकाने दिसतात. एखादे मराठी माणसाचे दुकान दिसते. ते सुद्धा अगदी जुनाट असते.

आजोबा  :  अरे गम्मत नाही. खरंच मराठी माणसांची दुकाने होती त्याकाळी. पण दुकानांना छान किंमती मिळाल्या आणि जरा शिकल्यावर नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे ९०% मराठी दुकानदारांनी दुकाने विकून नोकऱ्या पत्करल्या. त्याकाळी धंदेवाईक लोकांशी सोयरीक करायला लोक तयार नसत. त्यांना शिकलेला, नोकरीवाला नवरा मुलगा हवा असे.

श्री  :  मला नेमकं हेच म्हणायचं आहे. मुंबईतील कारखाने गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी आणि पंजाबी लोकांनी उभारले, वाढवले. आर्थिक धारिष्ट्य ह्याच लोकांनी दाखवलं. त्यांनी आपापसात एकजूट देवळी, एकमेकांना मदत केली. काळाची पावले ओळखून मोठी उत्पादकता असणारे कारखाने उभारले, मोठा नफा कमावला आणि मुंबई आर्थिकदृष्ट्या काबीज केली.

आजोबा :  अरे पण मुंबईच्या प्रगतीमध्ये, आर्थिक सुबत्तेमध्ये मराठी माणसाचे श्रेय आहेच की. आता तुझे “मेकेनिकल ईंजीनीअर” काका प्रीमियर ऑटोमोबिलमध्ये  Production Manager होतेच ना? तुझ्या मावशीचे यजमान Textile engineer होते आणि तेही Bombay Dyeing मध्ये Production  manager होते. मी स्वतः M. Sc. Analytical Chemistry होतो आणि मीही Pharmaceutical Industry मध्ये उच्चपदांवर कामे केली आहेत.

श्री  :  प्रश्नच नाही. तुम्ही सर्वांनी त्याकाळी प्रचंड अभ्यास करून, उच्चपदस्थ नोकऱ्या केल्यात, आम्हाला शिकवलत, घडवलत. तुम्ही स्वतःची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडलीत. अत्यंत सात्विक, सुसंस्कृत असं आयुष्य तुम्ही जगलात. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.

( पार्श्वसंगीत :  कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था …)

कुमार :  खरंच आजोबा, आजकालच टी. व्ही. सिरीअलमधील भंगार बोलणे, चालणे बघतो; नंतर तुमचे वागणे बघता ते देवतास्वरूपच वाटत. तुमचं पूजा करणं, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हणणे, धूप फिरवणे, सगळे कसे पवित्र, मंगल आणि प्रसन्न वाटते.

आजोबा :  अरे हीच आपली मंगलमय अशी संस्कृती आहे. ती जपण आपल कर्तव्य आहे. आणि संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हटल्याने नको ती प्रलोभने, म्हणजे मित्रांबरोबर दारू पार्टी करणे वगैरे आपसूक होत नाही.  तिहेरी फायदा:  एक, मुलांना घरी प्रसन्न वातावरण मिळत. दोन : दारूत पैसे वाया जात नाहीत, तीन : त्यामुळे व्यसन लागूच शकत नाही.

कुमार  : एव्हढ आदर्श जीवन तुम्ही “साहजिकपणे” जगलात. पण तुम्हाला, किंवा मावशीच्या मिस्टरांना किंवा काकांना कोणालाही स्वतःचा कारखाना काढावासा का वाटला नाही? तुम्ही तुमच्या बुद्धीचा, कौशल्याचा वापर परप्रांतीयांना मोठ करण्यासाठी केलात हे लक्षात येत आहे का तुम्हाला?

आजोबा  :  (५ सेकंद स्तब्ध). मला हे कधी जाणवलाच नाही. आम्हाला जे मिळत होत, तेच भरपूर होत. त्यात आम्ही सुखी, समाधानी होतो.

श्री :   हाच कळीचा मुद्दा आहे. परप्रांतीयांनी पैसा लावला, आर्थिक धोका पत्करला. कारखाने उभारले. तुम्ही तुमचे ज्ञान, कौशल्य त्यांना काही पगाराच्या मोबदल्यात देऊ केलेत. मराठी कामगार तुटपुंज्या पगारावर राबले. आणि परप्रांतीय मोठे झाले.

कुमार  : पण आज मी बर्याच मराठी कामगार सदृश माणसांना दारू पिउन रस्त्यात लोळताना बघतो. कफल्लक अवस्थेत त्यांना फिरताना बघून त्यांची कीव येते हो मला.

आजोबा  :  अरे ह्याच कामगारांना कारखान्यांमध्ये चांगला पगार मिळत असे. ८५ – ८६ साली आमच्या कंपनीत कामगारांना महिना ६००० रुपये पगार होता. तरीसुद्धा त्यांनी जबर संप केले, मारामाऱ्या केल्या. कारखाना  बंद पाडला. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नव्हे, मी तर म्हणेन कुऱ्हाडीवर पाय मारला.मालकांनी सुरत, अंकलेश्वर येथे कारखाना हलवला. कोणालाही

Gratuity, Provident fund व इतर Retirement Benefits, काहीही दिले नाही. म्हणाले जा कोर्टात.   मला स्वतःला एक छदामसुद्धा मिळाला नाही. कामगार रस्त्यावर आले. त्यांच्या बायका १० घराची धुणीभांडी करायला लागल्या. कामगार नैराश्याने दारूत आकंठ बुडाले. असेच चित्र सर्व गिरणगावात होते, सर्वत्र संप, मारामाऱ्या आणि नंतर लॉक आऊट. सर्व गिरणगावात अवकळा पसरली होती. तरी दारू पिऊन गणपतीसमोर नाचणे ठरलेले. परप्रांतीय अशा मराठी “मामांना” हसून म्हणत, ह्या लोकांना स्वतःच्या वाईट परिस्थितीबद्दल काहीच कसं वाटत नाही? स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची वाताहत झाली असताना हे  दारू पिऊन नाचू कसे शकतात?

( पार्श्वसंगीत  : कर्तव्याला मुकता माणूस; माणूस ना उरतो SSS…)

नाही म्हणायला काही कामगारांनी रस्त्यावर बनियन, रुमाल विकायला सुरुवात केली, काहींनी रिक्षा, टक्सी चालवायला सुरुवात केली.

श्री   :   आणि हे सर्व माझी Career सुरू होताना घडत होते. १९८६ मध्ये मी नामांकीत कॉलेजमधून Distinction ने Chemical Engineer म्हणून उत्तीर्ण झालो. तीन चार वर्षांनी माझ्या शाळेतील गुजराथी मित्र भेटला,   हाय, हेल्लो झाल्यावर त्याने विचारले, काय कामधंदा करतोस?

मी मोठ्या अभिमानाने छाती फुगवून सांगितले की मी केमिकल इंजिनीयर आहे, आणि एका नामांकीत  Chemical Company मध्ये नोकरीला लागलो आहे आणि मला दरमहा ४००० पगार आहे.

तो म्हणाला बस! एव्हढ शिकून एव्हढीच कमाई? मी फक्त १० वी पास आहे. आणि माझी दोन दुकानं आहेत,   आणि मी एका दिवसात तुझ्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमावतो.

त्या दिवशी ठरवलं की पाच सहा वर्ष स्वतःची कंपनी असल्यागत रममाण होऊन काम करायचं, जबर अनुभव घ्यायचा, आणि स्वतःचा व्यवसाय काढायचा. आणि जसं ठरवलं तसं केलं.

( पार्श्वसंगीत  : आकाशी झेप घे रे पाखरा SS;  सोडी सोन्याचा पिंजराSS.)    

घर किंवा गाडीसाठी लोन ना काढता ९३ – ९४ साली व्यवसायासाठी एका खाजगी बँकेचे लोन मी काढले. मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा मला मिळाला. शेयर्समध्येही मला भरपूर फायदा झाला. तो सगळा मी आपल्या व्यवसायात ओतला. बाबा तुमच्या आणि माझ्या ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी घेऊन आपण आपली कंपनी स्थापन केली.

आपलं ज्ञान, अनुभव मोलाचा ठरला. आपण आपले सर्व कामगार मराठीच ठेवले. त्यांना पगार व्यवस्थित दिला. कंपनीच्या जमाखर्चाचा ताळेबंद पारदर्शकपाने सांगत गेलो; त्यामुळे त्यांनीही कंपनीच्या उत्कर्षासाठी आपल्याला उत्तम सहकार्य दिलं. आपणही त्यांना योग्य तो बोनस देत आलो.

कुमार  :  बरोबर आहे. सुसंवाद असला की वाद होऊच शकणार नाही. ह्यातून दुसर एक शिकायला मिळालं की, आपण जे शालेय, महाविद्यालयीन घेतो ते शेवटी अर्थार्जनासाठी वापरायचे असते. मग नोकरी करून अर्थार्जन मर्यादित का ठेवावे? लोनस् इतक्या सहजी उपलब्ध असताना, स्वतःचा व्यवसाय काढून तल्लीनपणाने काम करून तो वाढवावा. मोठ्या भरार्या माराव्यात.

( पार्श्वसंगीत : भाग्य चालते कर्मपदाने, जाण खऱ्या वेदार्था SSS..)

श्री :   Perfect!!   प्रचंड ज्ञान घ्यायचे, मग कमाई मर्यादित का ठेवायची? परप्रांतीयांना का मोठे करायचे? आपण होऊन आपल्या राज्याचे अर्थकारण दुसर्यांच्या हातात का द्यावे. मुळात तेच कारखानदारी करू शकतात, आणि आपण त्यांच्याकडे नोकरी करायची हा न्यूनगंड आपण का ठेवायचा? कोणी दुसरा येईल, कारखाना काढेल, व मला नोकरी देईल, हे समीकरण चुकीचे आहे. आपल्या राज्यात आपणच कारखाने काढावेत, वाढवावेत. स्वतःचे ज्ञान स्वतःसाठी वापरून श्रीमंतच व्हायचे. मराठी लोकांनी एकमेकांना मदत करायची. ठरवून मराठी दुकानदारांकडून माल विकत घ्यायचा. मग तो वाणी असो, बेकरीवाला असो, सराफ असो, कपड्याचा दुकानदार असो, व चप्पल बूटवाला असो. मराठी हॉटेलातच जावं. अशानेच मराठी कुटुंबांचे अर्थकारण सुदृढ होईल. सरस्वतीबरोबर, लक्ष्मीपूजन करून मराठी कुटुंब श्रीमंत झाली पाहिजेत. आणि मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे अर्थकारण परप्रांतीयांच्या हातून निसटून ते बळकट मराठी हातात आले पाहिजे.

कुमार : आणि मगच आपण ताठ म्हणू शकू की, मुंबई आमची आहे!!

आजोबा : तुम्हा दोघांचे विचार बरोबर आहेत. समस्त मराठी कुटुम्बांचा, समाजाचा साम्पत्तीक उत्कर्ष व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर आपण सर्व समाजाभिमुख राहू, समाजाप्रती कृतार्थ राहू, आपल्याकडे दातृत्वगुण असावा अशीही सदिच्छा करतो.

कुमार : तुम्ही दोघांनी किती छान सांगितलत. वर्षापूर्वी १२ वी आणि CET मध्ये कमी मार्क मिळाले, त्यामुळ पाहिजे त्या कॉलेजमध्ये केमिकल ईंजीनीअरींग ला प्रवेश मिळाला नाही. त्याचे मला नैराश्य आले होते. पण आपल्या घराच्या व्यवसायाला योग्य म्हणून मी  बी.एस्सी केमीस्ट्री ला प्रवेश घेतला.

आता नैराश्य झटकून मी तल्लीन होऊन एकाग्रचित्ताने व्यवसायाभिमुख शिक्षण घेईन. त्यायोगे माझ्या व्यवसायात मी आत्मविश्वासपूर्ण असेन. व्यावसायीक  ज्ञान, तल्लीनता, आत्मविश्वास आणि चिकाटी ह्यांच्या बळावर मी आपल्या व्यवसायात कर्तव्यरत होईन, तो वाढवीन. माल विकत घेताना जास्त करून मराठी माणसाकडूनच घ्यायचा प्रयत्न करीन. पण विकताना अशी बंधने ठेवणार नाही. स्वतः श्रीमंत झाल्यावर इतर मराठी व्यावसायिकांना मदत करीन.  सतत सत्कर्म करून समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न करीन. टिळक, सावरकरांचा वंशज आहे त्याचे सार्थक करीन. आणि हो आजोबा, इतकी वर्ष लक्ष्मी हरवली होती खरी, पण आता लक्ष्मीची आराधना करायला मराठी माणूस शिकला आहे. त्याला लक्ष्मी मिळवायचे सन्मार्ग सापडले आहेत. आणि ती मिळवणारच.

 आजोबा  व श्री  :   ( आशीर्वाद देत )  तथास्तु!!

( पार्श्वसंगीत   :  मराठी पाऊल पडते पुढे ….)

_________________________________________________

लेखकः मनोज लोंढे
७२, क्लेमेंट कोर्ट, अमरहिंद मंडळासमोर,
गोखले रोड, दादर ( पश्चिम) ,
मुंबई ४०० ०२८

महाराष्ट्र विधानसभा २००९, अंतिम निर्णय

भाजपा शिवसेना: 92, काँग्रेस राष्ट्रवादी:142, मनसे:13, इतर:41

उत्तर महाराष्ट्र
नंदूरबार
1   अक्कलकुवा (एसटी) के.सी.पाडवी (काँग्रेस)
2   शहादा (एसटी) पद्माकर वळवी (काँग्रेस)
3   नंदूरबार (एसटी) विजयकुमार गावित (राष्ट्रवादी)
4   नवापूर (एसटी) शरद गावित (सपा)

धुळे
5   साक्री (एसटी) योगेश भोये (काँग्रेस)
6   धुळे ग्रामीण  शरद पाटील (शिवसेना)
7   धुळे शहर  अनिल गोटे (लोकसंग्राम)
8   शिंदखेडा  जयकुमार रावळ ( भाजप)
9   शिरपूर (एसटी) काशीराम पावरा (काँग्रेस)

जळगाव
10   चोपडा (एसटी) जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
11   रावेर  शिरीष चौधरी ( काँग्रेस बंडखोर)
12   भुसावळ (एससी) संजय सावकारे (राष्ट्रवादी)
13   जळगाव शहर सुरेश जैन (शिवसेना)
14   जळगाव ग्रामीण गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
15   अमळनेर  साहेबराव पाटील (अपक्ष)
16   एरंडोल  चिमण पाटील (शिवसेना)
17   चाळीसगाव  राजीव देशमुख (राष्ट्रवादी)
18   पाचोरा  दिलीप वाघ (राष्ट्रवादी)
19   जामनेर  गिरीश महाजन (भाजप)
20   मुक्ताईनगर  एकनाथ खडसे (भाजप)

नाशिक
21   नांदगाव  पंकज भुजवळ (राष्ट्रवादी)
22   मालेगाव मध्य मौलाना मुफ्ती इस्माईल (जनसुराज्य)
23   मालेगाव बाह्य दादा भुसे (शिवसेना)
24   बागलाण (एसटी) उमाजी बोरसे (भाजप)
25   कळवण (एसटी) ए.टी.पवार (राष्ट्रवादी)
26   चांदवड  शिरीष कोतवाल (अपक्ष)
27   येवला  छगन भुजबळ (राष्ट्रवादी)
28   सिन्नर   माणिकराव कोकाटे (काँग्रेस)
29   निफाड  अनिल कदम (शिवसेना)
30   दिंडोरी (एसटी) धनराज महाले (शिवसेना)
31   नाशिक पूर्व उत्तमराव ढिकले (मनसे)
32   नाशिक मध्य वसंत गिते (मनसे)
33   नाशिक पश्चिम  नितीन भोसले (मनसे)
34   देवळाली (एससी) बबन घोलप (शिवसेना)
35   इगतपुरी (एसटी) निर्मला गावित (काँग्रेस)

विदर्भ
बुलडाणा
1   मलकापूर  चैनसुख संचेती (भाजप)
2   बुलडाणा  विजयराज शिंदे (शिवसेना)
3   चिखली   राहुल बोंद्रे (काँग्रेस)
4   सिंदखेड राजा राजेन्द्र शिंगणे (राष्ट्रवादी)
5   मेहकर (एससी) संजय रायमूलकर (शिवसेना)
6   खामगाव  दिलीप सानंदा (काँग्रेस)
7   जळगाव जामोद डॉ.संजय कुटे (भाजप)

अकोला
8   अकोट  संजय गावंडे (शिवसेना)
9   बाळापूर  बळीराम शिरोसकर (भारिप-बम)
10   अकोला पश्चिम गोवर्धन शर्मा (भाजप)
11   अकोला पूर्व हरिदास भदे (भारिप-बम)
12   मूर्तिजापूर  हरिश पिंपळे (भाजप)

वाशिम
13   रिसोड  सुभाष झनक (काँग्रेस)
14   वाशिम (एससी) लखन मलिक (भाजप)
15   कारंजा  प्रकाश डहाके (राष्ट्रवादी)

अमरावती
16   धामनगाव रेल्वे वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)
17   बडनेरा  रवीकुमार राणा (अपक्ष)
18   अमरावती  रावसाहेब शेखावत (काँग्रेस)
19   तिवसा  यशोमती ठाकूर (काँग्रेस)
20   दर्यापूर (एससी) अभिजीत अडसूळ (शिवसेना)
21   मेळघाट (एसटी) केवलराम काळे (काँग्रेस)
22   अचलपूर  बच्चू कडू (अपक्ष-रिडालोस)
23   मोर्शी  अनिल बोंडे (अपक्ष)

वर्धा
24   आर्वी  दादाराव केचे (भाजप)
25   देवळी  रणजीत कांबळे (काँग्रेस)
26   हिंगणघाट  अशोक शिंदे (शिवसेना)
27   वर्धा  सुरेश देशमुख (राष्ट्रवादी बंडखोर)
28   काटोल  अनिल देशमुख (राष्ट्रवादी)

नागपूर
29   सावनेर  सुनील केदार (काँग्रेस)
30   हिंगणा   विजय घोडमारे (भाजप)
31   उमरेड (एससी) सुधीर पारवे (भाजप)
32   नागपूर दक्षिण पश्चिम देवेन्द्र फडणवीस (भाजप)
33   नागपूर दक्षिण दिनानाथ पडोळे (काँग्रेस)
34   नागपूर पूर्व  कृष्णा खोपडे (भाजप)
35   नागपूर मध्य विकास कुंभारे (भाजप)
36   नागपूर पश्चिम सुधाकर देशमुख (भाजप)
37   नागपूर उत्तर (एससी) नितीन राऊत (काँग्रेस)
38   कामठी  चंद्रशेखऱ बावनकुळे (भाजप)
39   रामटेक  मल्लिकार्जून रेड्डी (गोंगपा)

भंडारा
40   तुमसर  अनिल बावनकर (काँग्रेस)
41   भंडारा (एससी) नरेन्द्र भोंडकर (शिवसेना)
42   साकोली  नाना पटोले (भाजप)

गोंदिया
43   अर्जूनी मोरगाव (एससी) राजकुमार बडोले (भाजप)
44   तिरोडा  डॉ. खुशाल बोपचे (भाजप)
45   गोंदिया  गोपाल अगरवाल (काँग्रेस)
46   आमगाव (एसटी) रामरतन राऊत (काँग्रेस)

गडचिरोली
47   आरमोरी (एसटी) आनंदराव गेडाम (काँग्रेस)
48   गडचिरोली (एसटी) नामदेव हुंसेंडी (काँग्रेस)
49   अहेरी (एसटी) दीपक अत्राम (अपक्ष)

चंद्रपूर
50   राजुरा  सुभाष धोटे ( काँग्रेस)
51   चंद्रपूर (एससी) नाना श्यामकुळे (भाजप)
52   बल्लारपूर  सुधीर मुनगंटीवार (भाजप)
53   ब्रह्मपुरी  अतुल देसकर (भाजप)
54   चिमूर  विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
55   वरोरा  संजय देवताळे (काँग्रेस)

यवतमाळ
56   वणी  वामनराव कासावार (काँग्रेस)
57   राळेगाव (एसटी) वसंत पुरके (काँग्रेस)
58   यवतमाळ (एसटी) निलेश पारवेकर (काँग्रेस)
59   दिग्रस  संजय राठोड (शिवसेना)
60   आर्णी (एसटी) शिवाजीराव मोघे (काँग्रेस)
61   पुसद  मनोहर नाईक (राष्ट्रवादी)
62   उमरखेड (एससी) विजय खडसे (काँग्रेस)

मराठवाडा
नांदेड
1   किनवट  प्रदीप नाईक (राष्ट्रवादी)
2   हदगाव  माधवराव पवार (काँग्रेस)
3   भोकर  अशोक चव्हाण (काँग्रेस)
4   नांदेड उत्तर  डी.पी.सावंत (काँग्रेस)
5   नांदेड दक्षिण ओमप्रकाश पोकर्णा (काँग्रेस)
6   लोहा  शंकरअण्णा धोंडगे (राष्ट्रवादी)
7   नायगाव  वसंत चव्हाण (अपक्ष)
8   देगलूर (एसटी) रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
9   मुखेड  हनुमंत पाटील-बेटमोगरेकर(काँग्रेस)

हिंगोली
10   बसमत  जयप्रकाश दांडेगावकर (राष्ट्रवादी)
11   कळमनुरी  राजीव सातव (काँग्रेस)
12   हिंगोली  भाऊराव पाटील (काँग्रेस)

परभणी
13   जिंतूर  रामप्रसाद बोर्डीकर (काँग्रेस)
14   परभणी  संजय बंडू जाधव (शिवसेना)
15   गंगाखेड  सीताराम घनदाट (अपक्ष)
16   पाथरी  मीरा रेंगे-पाटील (शिवसेना)

जालना
17   परतूर  सुरेशकुमार जेठलिया (अपक्ष)
18   घनसांगवी राजेश टोपे (राष्ट्रवादी)
19   जालना  कैलास गोरंट्याल (काँग्रेस)
20   बदनापूर (एससी) संतोष सांबरे (शिवसेना)
21   भोकरदन  चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी)

औरंगाबाद
22   सिल्लोड  अब्दुल सत्तार (काँग्रेस)
23   कन्नड  हर्षवर्धन रायभान जाधव (मनसे)
24   फुलंब्री  कल्याण काळे (काँग्रेस)
25   औरंगाबाद मध्य प्रदीप जैस्वाल (शिवसेना बंडखोर)
26   औरंगाबाद पश्चिम(एससी)संजय शिरसाट (शिवसेना)
27   औरंगाबाद पूर्व राजेन्द्र दर्डा (काँग्रेस)
28   पैठण  संजय वाकचौरे (राष्ट्रवादी)
29   गंगापूर  प्रशांत बंग (अपक्ष)
30   वैजापूर  आर.एम.वाणी (शिवसेना)

बीड
31   गेवराई  बदामराव पंडित (राष्ट्रवादी)
32   माजलगाव प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी)
33   बीड  जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी)
34   आष्टी  सुरेश धस (राष्ट्रवादी)
35   केज (एससी) विमल मुंदडा (राष्ट्रवादी)
36   परळी  पंकजा मुंडे-पालवे (भाजप)

लातूर
37   लातूर ग्रामीण  वैजनाथ शिंदे (काँग्रेस)
38   लातूर शहर अमित देशमुख (काँग्रेस)
39   अहमदपूर बाबासाहेब पाटील (रिडालोस रासप)
40   उदगीर (एससी) सुधाकर भालेराव (भाजप)
41   निलंगा  शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
42   औसा  बसवराज पाटील (काँग्रेस)

उस्मानाबाद
43   उमरगा  ज्ञानराज चौगुले (शिवसेना)
44   तुळजापूर  मधुकर चव्हाण (काँग्रेस)
45   उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
46   परांडा  राहुल मोटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

मुंबई शहर आणि उपनगर

मुंबई उपनगर
1   बोरिवली गोपाळ शेट्टी (भाजप)
2   दहीसर विनोद घोसाळकर (शिवसेना)
3   मागाठणे प्रवीण दरेकर (मनसे)
4   मुलुंड आंबोली सरदार तारासिंह (भाजप)
5   विक्रोळी मंगेश सांगळे (मनसे)
6   भांडुप पश्चिम शिशीर शिंदे (मनसे)
7   जोगेश्वरी पूर्व रविन्द्र वायकर (शिवसेना)
8   दिंडोशी राजहंस सिंह (काँग्रेस)
9   कांदिवली पूर्व रमेश सिंग ठाकूर (काँग्रेस)
10  चारकोप योगेश सागर (भाजप)
11   मालाड पश्चिम अस्लम शेख (काँग्रेस)
12   गोरेगाव सुभाष देसाई (शिवसेना)
13   वर्सोवा  बलदेव खोसा (काँग्रेस)
14   अंधेरी पश्चिम अशोक जाधव (काँग्रेस)
15   अंधेरी पूर्व सुरेश शेट्टी (काँग्रेस)
16   विले पार्ले  कृष्णा हेगडे (काँग्रेस)
17   चांदिवली  नसीम खान (काँग्रेस)
18   घाटकोपर पश्चिम राम कदम (मनसे)
19   घाटकोपर पूर्व प्रकाश मेहता (भाजप)
20   मानखुर्द – शिवाजीनगर अबू आझमी (सपा)
21   अणुशक्तीनगर नबाब मलिक (राष्ट्रवादी)
22   चेंबूर  चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस)
23   कुर्ला (एससी) मिंलिंद कांबळे (राष्ट्रवादी)
24   कलिना   कृपाशंकर सिंग (काँग्रेस)
25   वांदरे पूर्व  बाळा सावंत (शिवसेना)
26   वांदरे पश्चिम वावा सिद्दीकी (काँग्रेस)

मुंबई शहर
27   धारावी (एससी) वर्षा गायकवाड (काँग्रेस)
28   सायन-कोळीवाडा जगन्नाथ शेट्टी (काँग्रेस)
29   वडाळा  कालिदास कोळमकर (काँग्रेस)
30   माहीम  नितीन सरदेसाई (मनसे)
31   वरळी  सचिन अहिर (राष्ट्रवादी)
32   शिवडी  बाळा नांदगावकर (मनसे)
33   भायखळा  मधुकर चव्हाण (काँग्रेस)
34   मलबार हिल मंगलप्रभात लोढा (भाजप)
35   मुंबादेवी  अमिन पटेल (काँग्रेस)
36   कुलाबा  ऍनी शेखर (काँग्रेस)

ठाणे आणि कोकण
ठाणे
1   डहाणू (एसटी) राजाराम ओझरे (माकप)
2   विक्रमगड (एसटी) चिंतामण वणगा (भाजपा)
3   पालघर (एसटी) राजेन्द्र गावित (काँग्रेस)
4   बोईसर (एसटी) विलास तरे (बीव्हीए)
5   नालासोपारा क्षितीज ठाकूर (बीव्हीए)
6   वसई विवेक पंडित(सेना पुरस्कृत)
7   भिवंडी ग्रामीण ( एसटी) विष्णु सावरा (भाजप)
8   शहापूर (एसटी) दौलत दरोडा (शिवसेना)
9   भिवंडी पश्चिम  रशिद ताहीर मोमीन(सपा)
10   भिवंडी पूर्व अबू आझमी (सपा)
11   कल्याण पश्चिम प्रकाश भोईर (मनसे)
12   मुरबाड  किसन कथोरे (राष्ट्रवादी)
13   अंबरनाथ (एससी) डॉ.बालाजी किणीकर(शिवसेना)
14   उल्हासनगर कुमार ऐलानी (भाजप)
15   कल्याण पूर्व गणपत गायकवाड (अपक्ष)
16   डोंबिवली रविन्द्र चव्हाण (भाजप)
17   कल्याण ग्रामीण रमेश पाटील (मनसे)
18   मीरा भायंदर गिल्बर्ट मेंडोसा (राष्ट्रवादी)
19   ओवळा – माजिवडा प्रताप सरनाईक (शिवसेना)
20   कोपरी – पाचपाखाडी एकनाथ शिंदे (शिवसेना)
21   ठाणे राजन विचारे (शिवसेना)
22   मुंब्रा – कळवा जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी)
23   ऐरोली संदीप नाईक (राष्ट्रवादी)
24   बेलापूर गणेश नाईक (राष्ट्रवादी)

रायगड
25   पनवेल प्रशांत ठाकूर (काँग्रेस)
26   कर्जत सुरेश लाड (राष्ट्रवादी)
27   उरण विवेक पाटील (शेकाप)
28   पेण धैर्यशील पाटील (शेकाप)
29   अलीबाग मीनाक्षी पाटील (शेकाप)
30   श्रीवर्धन सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
31   महाड भरत गोगावले (शिवसेना)

रत्नागिरी
32   दापोली सूर्यकांत दळवी (शिवसेना)
33   गुहागर भास्कर जाधव (राष्ट्रवादी)
34   चिपळूण संगमेश्वर सदानंद चव्हाण (शिवसेना)
35   रत्नागिरी उदय सामंत (राष्ट्रवादी)
36   राजापूर राजन साळवी (शिवसेना)

सिंधुदुर्ग
37   कणकवली प्रमोद जठार (भाजप)
38   कुडाळ नारायण राणे (काँग्रेस)
39   सावंतवाडी दीपक केसरकर (राष्ट्रवादी)

पश्चिम महाराष्ट्र
पुणे
1   जुन्नर वल्लभ बेणके (राष्ट्रवादी)
2   आंबेगाव दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
3   खेड आळंदी दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
4   शिरूर  अशोक पवार (राष्ट्रवादी)
5   दौंड रमेश थोरात ( राष्ट्रवादी बंडखोर)
6   इंदापूर हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
7   बारामती अजित पवार (राष्ट्रवादी)
8   पुरंदर विजय शिवथरे (शिवसेना)
9   भोर संग्राम थोपटे (काँग्रेस)
10   मावळ बाळा भेगडे (भाजप)
11   चिंचवड लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी बंडखोर)
12   पिंपरी (एससी) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
13   भोसरी  विलास लांडे (राष्ट्रवादी बंडखोर)
14   वडगाव शेरी बापू पाठारे (राष्ट्रवादी)
15   शिवाजीनगर विनायक निम्हण (काँग्रेस)
16   कोथरूड चंद्रकांत मोकाटे (शिवसेना)
17   खडकवासला  रमेश वांजळे (मनसे)
18   पर्वती  माधुरी मिसाळ (भाजप)
19   हडपसर महादेव बाबर (शिवसेना)
20   पुणे छावणी (एससी) रमेश बागवे (काँग्रेस)
21   कसबा पेठ गिरीश बापट (भाजप)

अहमदनगर
22   अकोले (एसटी) मधुकर पिचड (राष्ट्रवादी)
23   संगमनेर बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
24   शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील (काँग्रेस)
25   कोपरगाव अशोकराव काळे (काँग्रेस)
26   श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
27   नेवासा शंकरराव गडाख (राष्ट्रवादी)
28   शेवगाव चंद्रशेखर घुले (राष्ट्रवादी)
29   राहुरी शिवाजीराव कर्डिले (भाजप)
30   पारनेर विजय औटी (शिवसेना)
31   अहमदनगर शहर अनिल राठोड (शिवसेना)
32   श्रींगोंदा बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी)
33   कर्जत जामखेड राम शिंदे (भाजप)

सोलापूर
34   करमाळा श्यामल बागल (राष्ट्रवादी)
35   माढा बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)
36   बार्शी दिलीप सोपल (राष्ट्रवादी बंडखोर)
37   मोहोळ (एससी) लक्ष्मण ढोबळे (राष्ट्रवादी)
38   सोलापूर शहर उत्तर विजयकुमार देशमुख (भाजप)
39   सोलापूर शहर मध्य प्रणिती शिंदे (काँग्रेस)
40   अक्कलकोट सिद्रामप्पा पाटील (भाजप)
41   सोलापूर दक्षिण दिलीप माने (काँग्रेस)
42   पंढरपूर भारत भालके (राष्ट्रवादी बंडखोर)
43   सांगोले गणपतराव देशमुख (शेकाप)
44   माळशिरस (एससी) हणमंत डोळस (राष्ट्रवादी)

सातारा
45   फलटण (एससी) दीपक चव्हाण (राष्टवादी)
46   वाई मकरंद पाटील (राष्ट्रवादी बंडखोर)
47   कोरेगाव शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी)
48   माण जयकुमार गोरे (काँग्रेस बंडखोर)
49   कराड उत्तर बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी बंडखोर)
50   कराड दक्षिण विलासकाका उंडाळकर (काँग्रेस)
51   पाटण विक्रमसिंह पाटणकर (राष्ट्रवादी)
52   सातारा शिवेन्द्रराजे भोसले (राष्ट्रवादी)

कोल्हापूर
53   चंदगड बाबासाहेब कुपेकर(राष्ट्रवादी)
54   राधानगरी के.पी.पाटील (राष्ट्रवादी)
55   कागल हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
56   कोल्हापूर दक्षिण सतेज पाटील (राष्ट्रवादी)
57   करवीर चंद्रदीप नरके (शिवसेना)
58   कोल्हापूर उत्तर राजेश क्षीरसागर (शिवसेना)
59   शाहूवाडी विनय कोरे (जनसुराज्य)
60   हातकणंगले डॉ. सुजीत मेणचेकर (शिवसेना)
61   इचलकरंजी सुरेश हळवणकर (भाजप)
62   शिरोळ सा.रे.पाटील (काँग्रेस)

सांगली
63   मिरज (एससी) सुरेश खाडे (भाजप)
64   सागंली वाळवा संभाजी पवार (भाजप)
65   इस्लामपूर जयंत पाटील (राष्ट्रवादी)
66   शिराळा मानसिंग नाईक (राष्ट्वादी बंडखोर)
67   पळूस – कडेगाव पतंगराव कदम (काँग्रेस)
68   खानापूर सदाशिव पाटील (काँग्रेस)
69   तासगाव – कवठे महांकाळआर.आर.पाटील (राष्ट्रवादी)
70   जत प्रकाश शेंडगे (भाजप)

जय हिंद….! जय भारत….! जय माहाराष्ट्र….!