in

‘माजी’ डायरी! (ब्रिटिश नंदी)

ब्रिटिश नंदी
ब्रिटिश नंदी

माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज सकाळी उठलो. तसा मी रोज त्यांच्याच आशीर्वादाने उठतो. पण मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने आज मी सदुसष्ट वर्षांचा झालो. अभीष्टचिंतनाचा वर्षाव होतो आहे. किती हे लोकांचे प्रेम! (मते द्यायला काय होते यांना?) सकाळीच मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दात घासुन ‘मातोश्री’वर गेलो.(वाक्य उलटसुलट झाले आहे!) न्याहरी आधीच केली होती. (बंगल्यावर जाताना पोटात काही असलेले बरे!) रिकाम्या हाताने गेलो (काही नेले तर काढुन घेतील ना!) आणि खुप आशीर्वाद घेऊन आलो! नंतर पलिकडल्या वस्तीत मिठाई वाटली. मा.शि.बा.ठा. यांच्या आ. ने मी दरवषी वाढदिवस असाच साजरा करतो. गेली अनेक वर्षे मी मिठाईचे पुडेच्या पुडे वाटत आहे. (खा लेको, साखर खा! मते द्यायला नकोत! डायबेटिस होवो तुम्हालाही!!)

चि. चिरायू आणि चि. आयुषा या नातवंडानी बुके आणि मुके दिले. मुके गोग्गोड होते; पण शुगर वाढेल म्हणुन एकेकच घेतला! आजोबांचा वाढदिवस म्हणुन चोर शाळेला दांडी मारणार होते. पण मी जन्मजात ‘प्रिं’ आहे. शाळेत पिटाळले. चि. उन्मेषनेही रागरंग पाहुन वेळेत आँफिस गाठले (हा वेळेत हाफिसात जातो; पण उशीरा का येतो?) खरे सांगायचे तर, मा.शि.बा.ठा. यांच्या ‘आ.’ ने वक्तशीरपणा माझ्या आंगात साखरेसारखा भिनलेला. कुठेही मी ठरलेल्या वेळेअगोदर पोचतो. वास्तविक माझा वाढदिवस आज; पण मी तो आदल्या दिवशीच थोडासा साजरा करुन घेतो. तेवढे ‘सावधपण’ अंगी असावेच लागते. त्याचे असे आहे की, शरदराव (पवार) आणि गोपीनाथराव (मुंडे) यांचे वाढदिवस १२ डिसेंबरला, म्हणजे पाठोपाठच येतात. म्हणजे १२ डिसेंबरला डब्बल बार फुटतो! मा.शि.बा.ठा. यांच्या ‘आ.’ ने मी १ आणि २ डिसेंबर अशा दोन तारखा बुक करुन टाकल्या आहेत. त्यांचा डब्बल बार आणि आपली नुसतीक लवंगी असा प्रकार झाला तर मा.शि.बा.ठां. चे आ.बा.च्या भा.म.जा!! असो!!

आजकाल एक बरे आहे! मा.शि.बा.ठा. यांच्या आशीर्वादाने दुपारची झोप मस्त होते. अर्थात ‘वर्षा’ वरही थोडी वामकुक्षी होत असे. दिल्लीतही दुपारचा दोनेक तासंचा चुटका होई. पण आता तसे व्यवधान नाही. आज आठवणींनी गर्दी गेली. आयुष्याचे सिंहावलोकन करताना गेली निवडणुक आठवली आणि तोंड आंबट झाले. ‘पित्त झालाय’ म्हणुन पुटपुटत उगीच घरभर फिरलो. बटाट्याची भाजी अती खाऊ नये, असे अनेकवार घोकुन शेवटी खाल्लीच! शिवाय श्रीखंड!! अर्थात श्रीखंडात साखरे ऐवजी ‘इक्वल’ घातले होते, त्यामुळे ऑल श्रीखंडाज आल इक्वल, बट मा.शि.बा.ठां. च्या आ. ने सम आर मोर इक्वल! असो!!

या वाढदिवसला मी सर्वस्वी ‘माजी’ आहे, माजी नगरसेवकापासुन माजी लोकसभाअध्यक्षापर्यंत! बराच प्रवास झाला. आजी ते माजी! मा.शि.बा.ठां.चे आ. आणि बटाट्याची भा. या दोन्ही गोष्टी अशाच लाभत राहिल्या तरी खुप झाले! हे मागणे लई नाहीच!!

– ब्रिटिश नंदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जिथे मराठी माणसांना एकमेकात भांडण्यास मनाई आहे.

’झेंडा’ विडीओ