ही दिवाळी आणि नवे वर्ष आपणा सर्वांना उत्साहाचे, आनंदाचे आणि उत्कर्षाचे जावो… एका वाक्यात व्यक्त झालेली ही शुभेच्छा किती विविध गोष्टी सांगते पाहा. दिवाळी म्हणजे मूर्तिमंत आनंद. दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे माणसा-माणसांच्या मनातील सद्भावनांच्या ऐश्वर्याला येणारे उधाण. पण शुभेच्छा देताना एवढेच सांगून माणसे थांबत नाहीत. ती दिवाळीबरोबर नवीन वर्षाचाही उल्लेख करतात. हे विक्रमसंवताचे दिवाळीपासून सुरू होणारे वर्ष आपल्या नेहमीच्या व्यवहारात फारच कमी पाळले जाते, हे खरे. कारण कार्तिंकी प्रतिपदेपासून सुरू होणारा विक्रमसंवत् हा गुजराथी समाजात अधिक पाळला जातो. त्याचे कार्तिकसंवत् असेही नाव आहे. महाराष्ट्रात जी शालिवाहन कालगणना आहे ती चैत्र शुध्द प्रतिपदेपासून सुरू होते. इंग्रजी वर्ष तर एक जानेवारीला सुरू होते. पण व्यवहारात कमी पाळले जाते, मात्र शुभेच्छांमध्ये त्याचा सढळ हाताने वापर केला जातो, असे हे दिवाळीपासून सुरू होणरे नवे वर्ष.
दिवाळी आपल्या सणांची सम्राज्ञी होय. दिवाळीची परंपरा पौराणिक काळाशी नाते सांगणारी असली तरी जवळपास हजारो वर्षांपासून आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाच्या थोर कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण प्रारंभी साजरा केला जाऊ लागला. पुढे कालांतराने या सणाचे स्वरुप एक कौटुंबिक आनंद सोहळा असे झाले. धनत्रयोदशी, गोवत्स द्वादशी, वसुबारस, दीपावली पाडवा, आणि भाऊबीज अशा स्वरुपात दिवाळीचा सण साजरा होतो. आसमंतातील अंधार दूर करणारा, अज्ञात अशा मृत्यूचे भय निवारण करणारा ”तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्यो मा अमृतं गमय ।।” अशी थोर इच्छा आकांशा बाळगणारा हा आनंदाची उधळण करणारा हा सण धनत्रयोदशीपासून सुरु होतो.
दिवाळीचा आनंद, दिवाळीचा उत्साह वर्षभर टिकावा, वर्षभर लाभावा अशीच अपेक्षा या शुभेच्छांमधून डोकावत असते. दिवाळीचा दिवस उजाडताना जणू नवा प्रकाश घेऊन येतो. गोविंदाग्रजांची एक कविता आहे,
जी दु:खी कष्टी जीवां दुसरी माता।
वाढत्या वयांतही लोभ जिचा नच सरता।।
त्या निद्रादेवीच्या मी मांडीवरतीं।
शिर ठेउनि पडलों घ्यावया विश्रांति।।…
धडधडां भोंवती तोंच फटाके उडती।
मी जागा होऊनि पाहत बसलों पुढतीं।।
तों कळे उगवला आज दिवस वर्षाचा।
वर्षाव जगावर करीत जो हर्षाचा।।
ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।।
काढिलें फोल विश्वाचें। चाळुनि ।
या रसांत नव तेजाचें। जाळुनी ।
ढीगच्या ढीग हीणाचे ।
सत्त्वाचें बावनकशीच सोनें सारें।
ठेविलें, करा रे लक्ष्मीपूजन या रे।।
निद्रादेवीच्या मांडीवर कवी विश्रांती घेत असताना सकाळी त्यांना फटाक्यांनी जाग आली. तुम्हांला दिवाळीत येते तशीच, आणि कवी म्हणतात,
ही जुनी दिवाळी नव्या दमानें आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गालीं।
दिवाळीत नव्या-जुन्याचा संगम इथे कवीने सांगितला आहे. दिवाळी आपल्याकडे फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते. मात्र बदलत्या कालमानानुसार त्याचे स्वरुप सातत्याने बदलत आले आहे. नीट विचार केला तर ध्यानी येईल, दिवाळी हा धार्मिक आणि अंतर्मनाला सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करणारा असा एक वेगळाआगळा सण आहे आणि आता तर काम करणार्या सर्व लोकांना खरेखुरे लक्ष्मीपूजन करता यावे म्हणूनच की काय सरकारी, निमसरकारी, खाजगी सर्वच ठिकाणी दिवाळीपूर्वी बोनसची वाटणी करून सर्वांना सुख आणि आनंद मिळण्याजोगी स्थिती निर्माण केली जाते. वर्षभरातील चिंतेची, अडीअडचणींची मरगळ दूर करून थोडेफार का होईना पण सर्वांना समाधान लाभावे, सणांचा आनंद उपभोगता यावा अशीही तरतूद केली आहे. दिवाळी त्यामुळेच अनेक गोष्टींचा संगम आहे. खरेदी करणारे आणि विक्री करणारे दोन्ही पक्ष सारखेच खुशीत असतात, तसेच घरात पती-पत्नी, भाऊ-बहीण अशा विविध नात्यांनाही एक वेगळा गोडवा दिवाळी बहाल करते. म्हणूनच हा दिवाळीचा आनंद वर्षभर राहावा, अशी अपेक्षा आपण या दिवाळीत वर्षाच्या प्रारंभी करूया.
ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
हा लेख ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी महान्यूज साठी लिहिला आहे. महाराष्ट्र माझा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर व महान्यूज या दोघांचाही आभारी आहे.