निरपराध्यांचे रक्त सांडणा-या नराधम अतिरेक्यांवर खटले कसले चालवता ? त्यांना बचावाची संधी कसली देता ? लोकशाही व न्याय प्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? असा भडिमार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. त्याची काहीएक गरज नसून त्या एकमेव जिवंत नराधमास, रक्तपिपासू अतिरेक्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. ज्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये त्याने हिंसेचे तांडव केले त्याच टर्मिनससमोर त्या नराधमास फासावर लटकवा. एकदा नाही, शंभरवेळा फासावर लटकवा, असे फर्मान ठाकरे यांनी जारी केले आहे.
जगाने कसाबला निर्घृण हत्याकांड करताना पाहिले. तेव्हा पुरावे कसले तपासता, चौकशांचे फार्स कसले करता ? असा परखड सवाल बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या ‘ सामना ’ या मुखपत्रातील संपादकीय लेखात केला आहे. अतिरेकी उद्या एखाद्या विमानाचे अपहरण करुन प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात कसाबच्या मुक्ततेची मागणी होईल आणि ती सुटका केली जाईल. कसाबला घेऊन एक खास विमान लाहोर किंवा कराचीला उतरेल. शेवटी त्या मसूद अजहर मसूदला सोडण्यासाठी पाकड्यांनी तोच डाव रचला. कसाबच्या बाबतीत ते घडू नये असे वाटत असेल तर त्याला फासावर लटकवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कसाबचे वकिलपत्र घेऊ इच्छिणा-या ‘ मानवतावादी ’ वकिलांनाही ठाकरे यांनी जोरदार तडाखा दिला आहे. कसाबसारख्या नराधमाचे वकिलपत्र घेण्याची हिंमत आमच्याच मातीतले बेइमान करतात. दहशतवादी हल्ल्यातील रक्त सुकण्याआधीच त्या कसाबच्या बचावासाठी वकिलांनी काळे डगले चढविले. ज्यांना या कसाबचा पुळका आला आहे, त्यांनी आपले प्रियजन कसाब नावाच्या या कसायाच्या तावडीत द्यावेत व मगच दयावान बनून त्याच्या बचावासाठी उभे राहावे. दुस-याचे रक्त सांडते तेव्हा फक्त हळहळ व्यक्त केली जाते, आपले प्रियजन दहशतवादी हल्ल्यात मरत नाहीत तोपर्यंतच या लोकांना मानवता वगैरे फडतूस गोष्टी आठवतात. उगाच आगीशी खेळू नका. कसाबच्या वकिलपत्रास हात लावाल तर जनक्षोभ उसळेलच उसळेल व शिवसेनाही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
आपली प्रतिक्रीया जरुर लिहा..
Resp rajsaheb.