in ,

मला कळालेले पानिपत !

पानिपत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. पानिपतचे नाव ऐकताच ज्याचे रक्त सळसळणार नाही, अश्या थंड रक्ताचा प्राणी दक्खनात सापडणे दूर्मिळच. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी हिरोशिमा-नागासाकीला काही लाखभर माणसे मरायला एक आठवड्याचा कालावधी गेला असेल, पण पानिपताच्या रणमैदानी अवघ्या 6 तासात दोन्ही बाजुची लाखभर सैनिकं मृत्युमुखी पडली होती. मला जर कुणी विचारलं की “पानिपतच्या युद्धात कोण जिंकलं ते सांग ?” तर माझं उत्तर नकारात्मक असेल. कारण, पानिपतात कुणीच जिंकलं नाही !  “मराठे संख्यात्मक दृष्ट्या हरले, तर अफगान सैन्य मोहीम फत्ते झाली नाही म्हणुन.” अहमदशाह अब्दालीने त्या महायुद्धातील मराठ्यांच्या संगरतांडवाची अशी काही धसकी घेतली, की त्याला आपला गाशा गुंडाळुन मायदेशी परत जावे लागले. कारण, मराठ्यांचं एक तृतियांश 1/3 सैन्य पानिपतावर अब्दालीशी भिडलं होतं, पण अब्दालीचं सर्वच्या सर्व सैन्य युद्धात होतं त्यापैकी 70% सैन्य मरण पावलं. तिकडे अब्दालीच्या बंधुंनी गादी मिळवण्यासाठी बंड केलं आणि अब्दालीने युद्धानंतर मोहीम सोडुन तडकाफडकी मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला. 

 

जरा दुसऱ्या बाजुने ह्या महायुद्धाच्या परिणामांचा विचार केला, तर ह्या महायुद्धात मराठे जिंकले असं म्हणायला हरकत नाही. कारण मराठ्यांचे लक्ष्य हे अब्दालीला रोखने आणि दिल्लीच्या तख्ताचे रक्षण करणे हेच होते. आणि अप्रत्यक्षरित्या मराठ्यांनी ते साध्य केले होते. कारण त्यानंतर अब्दाली मोहीम सोडुन माघारी फिरला आणि स्वत: त्याने पेशव्यांना संबंधित आशयाचे पत्र लिहुन हे कळविले की – “तुम्ही नेमलेल्या दिल्लीचा बादशहाला मी देखिल पुनश्च बादशहा म्हणुन मान्यता देतो, आणि दिल्लीचे रक्षण पुर्वीप्रमाणे मराठ्यांनीच करावे ही विनंती.” हे पत्र स्वत: अहमदशहा अब्दालीने लिहुन पेशव्यांना पाठविणे म्हणजे मराठ्यांचा पानिपतावर अप्रत्यक्षपणे झालेला विजयच.

 

पानिपतचे महायुद्ध संख्यात्मकदृष्ट्या हारण्याची कारणे आणि त्यानंतरचे भारतीय राजकारणावर झालेले परिणाम आणि राजकीय लाभ ह्याचा विचार करता, अब्दाली सरळसरळ संख्यात्मक दृष्ट्या जिंकला होता, परंतु मराठ्यांच्या भिमटोल्याने अब्दालीचे एवढे नुकसान झाले की त्याला त्याच्या उरलेल्या सैनिकांसमवेत दिल्लीवर स्वत:चे राज्य घोषित करुन ते टिकविणे शक्य नव्हते. कारण, मराठ्यांचे दोन तृतियांश  2/3 सैन्य अजुनही महाराष्ट्रात होते, जर मराठ्यांनी पानिपतच्या पराभवाचा सुड घेण्यासाठी परत दिल्लीला धडक मारली, तर माझ्या कबरीचं थडगं नावालापण शिल्लक ठेवणार नाहीत ! ही भिती अब्दालीच्या मनात घर करुन होती. कारण मराठ्यांची दहशतच तशी होती ! काय तो काळ जेंव्हा शिवरायांना दिल्ली दरबारी नजरकैदेत ठेवल्या गेलं होतं, आणि एक हा काळ जेथे दिल्लीच्या गादीवरचा (नामधारी) बादशहा मराठ्यांनी तिन वेळा बदलला.

 

पानिपतच्या महायुद्धानंतर राजकीय फायदा ना मराठ्यांना झाला ना अब्दालीला. फायदा झाला तो उत्तरेतील संस्थानांना ! (म्हणजेच रजपुत, जाट, शिख, गुजर ईत्यादी) कारण अब्दाली म्हणजे राष्ट्रीय संकट आणि मराठे म्हणजे दिल्लीच्या तख्ताचे रक्षणकर्ते ह्यांच्यात युद्ध झाले. दोन्ही बाजुस प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या गंभीर हानी झाली, आणि दिल्लीची राजकीय परिस्थिती पुर्वपदावर येऊ लागली (उत्तरेतल्या हिंदू राजा-महाराजांना अपेक्षित असलेली). पानिपतचा रणसंग्राम चालु असताना मराठ्यांना मदत न करता स्वत:ची कातडी वाचवुन लांबुन नजारा पाहणाऱ्या हिंदू राजे-महाराजांनी वर्षभरानंतर दिल्लीत हातपाय पसरायला सुरुवात केली, आणि दिल्लीच्या (नामधारी) बादशहाचे नियंत्रण मिळविण्यासाठी जाळे विणायला सुरु केले होते. ह्या प्रकाराला मी दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ असे म्हणेन, कारण, अब्दाली आणि मराठे अश्या दोन मांजरांचे भांडण चाललय आणि उत्तरेतली माकडं भांडण सरल्यावर दिल्लीचं लोणी खायला उड्या मारत गेले. पानिपतच्या महायुद्धानंतर दिल्लीच्या आणि संपुर्ण भारताच्या राजकारणाला एक वेगळंच असं अनपेक्षित वळण मिळालं. खरं सागायचं झाल्यास पानिपतचं युद्ध हे अटळच होतं. कारण, तेंव्हाची राजकीय परिस्थिती पाहता (दिल्लीवर होणारी आक्रमणे) ह्यांना कुठल्यातरी प्रकारे लगाम लावणे आणि “एकछत्री हिंदूपदपातशाहीचे स्वप्न” अस्तित्वात आणण्यासाठी स्थिर असलेली राजसत्ता दिल्लीत असणे आवश्यक होते. नाझेरखान (अब्दालीचा गुरु) चे अयशस्वी झालेले मनसुबे पुर्ण करण्यासाठी अब्दाली नजिबखानाच्या औपचारिक बोलावण्यावरुन तिसऱ्यांदा स्वारीस आला होता, यापुर्वी जेंव्हा दोन वेळा अब्दाली आला होता, तेंव्हा तो पहिल्यांदा उप-सेनापती व दुसऱ्यांदा सेनापती म्हणुन आला. नाझेरखानच्या मृत्युनंतर अब्दालीने इराण पासुन अफगाणीस्तान वेगळा केला आणि त्याने कंदाहारची माती मौलवी हस्ते कपाळाला लाउन स्वत:ला अफगाणचा राजा घोषित केले. स्वत:चे राज्य स्थापन केल्यानंतर त्याला राज्यकारभारासाठी चांगला खजिना पाहिजे होता, अब्दाली हिंदूस्तानात तिसरी स्वारी करण्याच्या विचारातच होता, त्यात प्रत्यक्ष हिंदूस्तानातुन रोहिल्याच्या नजिबखानाने औपचारिक पत्र पाठविले आणि अब्दाली वादळाप्रमाणे हिंदूस्तानच्या सरहदीवर येऊन धडकला.

 

10 जानेवारी 1760 मध्ये क्रुरकर्म्या नजिबाने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला आणि मल्हारराव होळकरांचा विश्वासघात. नजिब्याने  अयोद्धेचा नवाब सुजाउदौला, दुर्राणी बादशहा अहमदशहा अब्दाली आणि आसपासच्या मुलुखातली वतनदार मुस्लिम सरदार मंडळी इस्लामच्या नावाने जमा केलं. मौलाना सुजावली खान ने ह्या सर्वांना पवित्र “दार-उल-इस्लाम” साठी जिहाद करण्याची शपथ दिली अशी नोंद आहे. (सध्या पाकिस्तानात व अफगाणीस्तानातील तमाम दहशतवादी संघटनांच्या विचारसरणीचा जनक म्हणजे मौलाना सुजावली खान होय. 1857 मध्ये भारतात सुरु झालेल्या खिलाफत चळवळीचे धागेदोरे हे मौलाना सुजावली खान पर्यंत पोहचतात). तर दुसरीकडे अहमदशहा अब्दालीची बेगम झिनतने (मराठ्यांचा तोफखाना प्रमुख) इब्राहिम खान गारदीला पवित्र “दार-उल-इस्लाम” ची दिलेली शपथ त्याने झिडकारुन लावली, इब्राहिम खान आणि सदाशिव भाऊंच्या मैत्रीच्या एका आदर्श उदाहरणाची नोंद इतिहासाला करणं भाग पडलं.  नजिब्याने सेनापती दत्ताजी शिंदेंचा खुन केला, ही बातमी जशी पुण्याला पोहचली तशी शनीवारवाड्यात एकच खळबळ उडाली. पेशव्यांनी राघोबादादांऐवजी सदाशिवभाऊंना उत्तरेच्या मोहीमेकडे नेतृत्व करण्याची संधी दिली खरी, पण पेशविणबाईंच्या दबावाने त्यांनी मोहीम काढली ती चिरंजीव विश्वासरावांच्या नावानेच. पेशव्यांनी भाऊंना संधी दिली पण अधिकार दिला नाही, अश्या अविश्वासाची भाऊंना अपेक्षा नसेल, पण ही वेळ मान-मनसुब्यासाठी झगडा करण्याची नव्हे तर राष्ट्ररक्षणासाठी अब्दालीला दिल्लीपासुन दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशीलपणे लढण्याची आहे. भाऊंच्या पाठीवर लादलेले बाजारबुणगे, शंखफुके भटजी, चिलीमफुके साधूबाबा, बायकालेकरांचे लटांबरं अन् पंढरपुरच्या जत्रंला निघाल्यासारखे टाळ कुटणारे हौशे, गवशे, नवशे म्हणजे खायला काळ अन् भुईला भारंच होते, सैनिकमावळ्यांना ह्या बाजारबुणग्यांच्या लटांबरामुळं अन्नपाणी कमी पडत असे, प्रवासाची गती कमी होत असे. जेंव्हा अब्दालीने मराठ्यांची पंजाबातील रसद तोडली, नदीवर धरण बांधुन पुर्ण पाणी अडवलं, तेंव्हा ह्या तिर्थक्षेत्रासाठी उड्या मारत आलेले शंखफुके, चिलीमफुके, हौशे, गवशे, नवशे ह्यांनी भाऊंना आपल्याला परत पुण्याकडे पाठवण्यासाठी पायी लोटांगण घातले. हा प्रकार अप्रत्यक्षरित्या पराभवाचे कारण असु शकते.

 

विश्वासरावांनी आणि भाऊंनी वेळोवेळी पेशव्यांना हलाखीची परिस्थिती सांगुन मदत मागितली, पेशवे सरकार 40 हजाराची सेना घेउन निघाले खरे ! पण, पैठण मुक्कामी त्यांनी आंगाला हळद फासुन, गुडघ्याला बांशिंग बांधले. 40 हजाराच्या सेनेचं लग्णाच्या वऱ्हाडात रुपांतर झालं, ही बातमी जेंव्हा भाऊंना कळाली तेंव्हा भाऊंना किती मोठा मानसिक धक्का बसला असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. एकीकडे सैन्य एक आठवड्यापासुन उपाशी आहे, नदीकाठची शाडुची माती, गांजरगवत, कंदमुळं खाउन सैन्य दिवस काढित होतं, आणि ज्या श्रीमंत पेशव्यांची भाऊ वाट पाहत बसले होते, ते आपल्या सैनिकांसोबत नविन सासुरवाडीत पाहुनचार घेत होते. ही अजुन एक बाब पराभवासाठी प्रत्यक्षपणे कारणीभुत होती. जर श्रीमंत पेशवे तडकाफडकी 40 हजाराच्या फौजेसोबत पानिपतावर उतरले असते तर अब्दालीची कबर रणमैदानात खणुन त्याचा अध्यायच संपवला असता. प्रत्यक्ष रणमैदानात युद्धप्रसंगी सदाशिवभाऊंनी आणि इब्राहिमखान यांनी बनविलेली गोलाकार व्युहरचना गायकवाड, विंचुरकर मोडुन पुढे गेले नसते तर अब्दालीच्या सैन्याला व्युहात प्रवेश करता आला नसता. दूपारी 3 पर्यंत इब्राहिम खानच्या तोफांनी अन् भाऊंच्या युद्धनितीने साधारणपणे युद्धाची परिस्थिती मराठ्यांच्या हातातच होती, पण गायकवाड अन् विंचुरकरांच्या एका चुकीमुळे व्युहरचना मोडली, शत्रु आत घुसला, समयसुचकतेच्या अभावाने, आणि भावनाविवश होउन मराठ्यांनी हातातील परिस्थिती गमावली. रक्ताचा सडा टाकुन मिळवलेलं हे युद्ध शेवटच्या तासात मराठ्यांना गमवावं लागलं. एवढ्या बिकट परिस्थितीत मराठे लढले, लढता लढता ह्या मातीत एकरुप झाले. कोणत्याही मदती शिवाय, युद्ध सुरु होण्यापुर्वी सकाळच्या पहिल्या घटकेपर्यंत भाऊंची मनस्थिती कशी असेल ? ह्याचा अंदाजच लावता येत नाही. कोणाचीही कसलीही मदत न घेता आठवड्याभराचा अन्नपाण्याशी चाललेला संघर्ष, श्रीमंतांनी केलेला विश्वासघात, उत्तरेतील हिंदू राजांनी केलेले दुर्लक्ष, ह्यांना न जुमानणाऱ्या भाऊंनी लाखभर मावळ्यांच्या हृदयात प्राणज्योत पेटवली तरी कशी ?  ह्या विचारानेच मी वेडा होउन जातो. किती ताकदवान असतील ते भाऊंचे शब्द ज्याच्यात हजारो मंत्रांची ऊर्जा संक्रमित झालेली होती. जर भाऊंच्या जागी कदाचित दुसरा कुणी असता तर खचितच तो शरण गेला असता, असं म्हणनं वावगं ठरणार नाही.

 

तानाजी मालुसरे पासुन दत्ताजी शिंदे पर्यंतच्या मर्द मावळ्यांच्या रक्ताचं कर्ज फेडण्यासाठी शिव-शंभुंना भाऊंनी वाहीलेली श्रद्धांजली म्हणजे पानिपत.

 

राष्ट्ररक्षणासाठी कसलाही जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद न मानता शत्रुला रोखण्यासाठी मर्द मऱ्हाठी मावळ्यांनी “हर हर महादेव” ची गगनभेदी ललकारी देत सणसणित हाणलेला भिमटोला म्हणजे पानिपत.

 

जात, धर्मापेक्षा हे राष्ट्र सर्वोच्च आहे, आणि ह्या राष्ट्राच्या रक्षणास्तव “मारीता मारीता मरावे” हा वसा घेऊन रणमैदानी मराठ्यांनी केलेले संगरतांडव म्हणजे पानिपत.

 

मायभूमीचे पांग फेडण्यासाठी परिणामांची पर्वा न करता मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने जिथे भारतमातेचे चरण धुतले ते ठिकाण म्हणजे पानिपत.

 

न भुतो न भविष्यती असे हे पानिपत पानिपत पानिपत !

 

 

~ माहिति संकलन आणि लेखन : सत्यम अवधुतवार

 

(सदरील लेख हा वाचलेल्या साहित्यातुन, दृकश्राव्य माध्यमांतुन, मिळालेल्या माहीतीनुसार मी माझं मतं येथे सविस्तरपणे मांडलेलं आहे)

One Comment

Leave a Reply
  1. पानिपतची लढाई मराठे हरले असतील तर त्यानंतर मराठ्यानी गाजविलेल्या पराक्रमाचा अर्थ कसा लावता येईल? उलट त्यानंतर खैबरखिंडीतून आक्रमक कां आले नाहीत या सवालाला काय उत्तर आहे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लालक्रांती

लालक्रांती : रक्तरंजित वाटेवर धावणारे मृगजळ

The Face Shop Real Nature Green Tea Face Mask

फेस शॉप रियल नेचर ग्रीन टी फेस मास्क – उत्पादनाची समीक्षा