in

एकांकिका- “लक्ष्मी हरवली आहे”

पात्रे : ७०- ७५ वर्षीय आजोबा
४५ वर्षीय वडील: श्री
१९ – २० वर्षीय मुलगा: कुमार

काळ : आजचा

प्रसंग :  १ मेचा दिवस, सकाळी तिघांचे पेपर वाचन चालू आहे.

पार्श्वसंगीत : “जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा”

कुमार  :  आजोबा, मुंबई महाराष्ट्रात असावी या करता आंदोलने का करावी लागली? तिन्ही बाजूंनी महाराष्ट्राने वेढली असतानादेखील, गुजरातने मुंबईवर हक्क कसा काय सांगितला?   

आजोबा :  कुमार, तुझं म्हणण अगदी बरोबर आहे. भौगोलिकदृष्ट्या मुंबई महाराष्ट्रात असण स्वाभावीक होत. त्यामळे तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने मुंबई महाराष्ट्राची असल्याचा निर्णय दिला. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

श्री  :   बाबा, तुम्ही म्हणता ते मला भौगोलिकदृष्ट्या पटत आहे. पण तरीही, मुंबई महाराष्ट्राची, असं आपण का म्हणावे?    

आजोबा :  श्री, तू एक मराठी माणूस असून असं कसं म्हणतोस? संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात किती मराठी लोकांचं रक्त सांडलं आहे हे माहित आहे का तुला?

श्री  : बाबा, मी जे बोलतो आहे, ते माझ्या अनुभवातून बोलतो आहे; पूर्ण विचारांती बोलतो आहे.

कुमार  : बाबा तुम्हाला नक्की म्हणायचय तरी काय?

श्री  :  सांगतो कुमार. बाबा, माझ्यापेक्षा तुम्हाला त्याकाळचे जास्त बरोबर सांगता येईल. इंग्लिश लोक गेल्यावर, येथील कारखाने कोणी वाढवले?

आजोबा :  बऱ्याचशा कापड गिरण्या इंग्लिश लोक पारशी लोकांना देऊन गेले. बाकी गिरण्या व कारखाने गुजराथी, मारवाडी लोकांनी विकत घेतले, किंवा उभारले.

श्री  :    आणि सिंधी, पंजाबी लोकांचे काय?

आजोबा  :   ते लोक फाळणीनंतर आले. प्रचंड हलाखीतून, अत्यंत कष्टाने व बरेचसे धूर्तपणाने ते वर आले. त्यांनीही कारखानदारी, स्वतंत्र व्यवसायात मुसंडी मारली.

श्री  :  ह्या सर्व आर्थिक उलाढालीमध्ये मराठी माणूस कुठे होता?    

आजोबा  :    अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मराठी कारखानदार होते. पण मराठी लोकांची दुकाने मात्र होती त्याकाळी.

कुमार  :   खरंच आजोबा? आज तर सर्वत्र गुजराथी, मारवाडी, सिंधी आणि पंजाबी लोकांचीच दुकाने दिसतात. एखादे मराठी माणसाचे दुकान दिसते. ते सुद्धा अगदी जुनाट असते.

आजोबा  :  अरे गम्मत नाही. खरंच मराठी माणसांची दुकाने होती त्याकाळी. पण दुकानांना छान किंमती मिळाल्या आणि जरा शिकल्यावर नोकऱ्या मिळत होत्या. त्यामुळे ९०% मराठी दुकानदारांनी दुकाने विकून नोकऱ्या पत्करल्या. त्याकाळी धंदेवाईक लोकांशी सोयरीक करायला लोक तयार नसत. त्यांना शिकलेला, नोकरीवाला नवरा मुलगा हवा असे.

श्री  :  मला नेमकं हेच म्हणायचं आहे. मुंबईतील कारखाने गुजराथी, मारवाडी, पारशी, सिंधी आणि पंजाबी लोकांनी उभारले, वाढवले. आर्थिक धारिष्ट्य ह्याच लोकांनी दाखवलं. त्यांनी आपापसात एकजूट देवळी, एकमेकांना मदत केली. काळाची पावले ओळखून मोठी उत्पादकता असणारे कारखाने उभारले, मोठा नफा कमावला आणि मुंबई आर्थिकदृष्ट्या काबीज केली.

आजोबा :  अरे पण मुंबईच्या प्रगतीमध्ये, आर्थिक सुबत्तेमध्ये मराठी माणसाचे श्रेय आहेच की. आता तुझे “मेकेनिकल ईंजीनीअर” काका प्रीमियर ऑटोमोबिलमध्ये  Production Manager होतेच ना? तुझ्या मावशीचे यजमान Textile engineer होते आणि तेही Bombay Dyeing मध्ये Production  manager होते. मी स्वतः M. Sc. Analytical Chemistry होतो आणि मीही Pharmaceutical Industry मध्ये उच्चपदांवर कामे केली आहेत.

श्री  :  प्रश्नच नाही. तुम्ही सर्वांनी त्याकाळी प्रचंड अभ्यास करून, उच्चपदस्थ नोकऱ्या केल्यात, आम्हाला शिकवलत, घडवलत. तुम्ही स्वतःची कर्तव्ये व्यवस्थित पार पाडलीत. अत्यंत सात्विक, सुसंस्कृत असं आयुष्य तुम्ही जगलात. याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.

( पार्श्वसंगीत :  कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था …)

कुमार :  खरंच आजोबा, आजकालच टी. व्ही. सिरीअलमधील भंगार बोलणे, चालणे बघतो; नंतर तुमचे वागणे बघता ते देवतास्वरूपच वाटत. तुमचं पूजा करणं, संध्याकाळी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हणणे, धूप फिरवणे, सगळे कसे पवित्र, मंगल आणि प्रसन्न वाटते.

आजोबा :  अरे हीच आपली मंगलमय अशी संस्कृती आहे. ती जपण आपल कर्तव्य आहे. आणि संध्याकाळी घरी देवासमोर दिवा लावून रामरक्षा म्हटल्याने नको ती प्रलोभने, म्हणजे मित्रांबरोबर दारू पार्टी करणे वगैरे आपसूक होत नाही.  तिहेरी फायदा:  एक, मुलांना घरी प्रसन्न वातावरण मिळत. दोन : दारूत पैसे वाया जात नाहीत, तीन : त्यामुळे व्यसन लागूच शकत नाही.

कुमार  : एव्हढ आदर्श जीवन तुम्ही “साहजिकपणे” जगलात. पण तुम्हाला, किंवा मावशीच्या मिस्टरांना किंवा काकांना कोणालाही स्वतःचा कारखाना काढावासा का वाटला नाही? तुम्ही तुमच्या बुद्धीचा, कौशल्याचा वापर परप्रांतीयांना मोठ करण्यासाठी केलात हे लक्षात येत आहे का तुम्हाला?

आजोबा  :  (५ सेकंद स्तब्ध). मला हे कधी जाणवलाच नाही. आम्हाला जे मिळत होत, तेच भरपूर होत. त्यात आम्ही सुखी, समाधानी होतो.

श्री :   हाच कळीचा मुद्दा आहे. परप्रांतीयांनी पैसा लावला, आर्थिक धोका पत्करला. कारखाने उभारले. तुम्ही तुमचे ज्ञान, कौशल्य त्यांना काही पगाराच्या मोबदल्यात देऊ केलेत. मराठी कामगार तुटपुंज्या पगारावर राबले. आणि परप्रांतीय मोठे झाले.

कुमार  : पण आज मी बर्याच मराठी कामगार सदृश माणसांना दारू पिउन रस्त्यात लोळताना बघतो. कफल्लक अवस्थेत त्यांना फिरताना बघून त्यांची कीव येते हो मला.

आजोबा  :  अरे ह्याच कामगारांना कारखान्यांमध्ये चांगला पगार मिळत असे. ८५ – ८६ साली आमच्या कंपनीत कामगारांना महिना ६००० रुपये पगार होता. तरीसुद्धा त्यांनी जबर संप केले, मारामाऱ्या केल्या. कारखाना  बंद पाडला. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. नव्हे, मी तर म्हणेन कुऱ्हाडीवर पाय मारला.मालकांनी सुरत, अंकलेश्वर येथे कारखाना हलवला. कोणालाही

Gratuity, Provident fund व इतर Retirement Benefits, काहीही दिले नाही. म्हणाले जा कोर्टात.   मला स्वतःला एक छदामसुद्धा मिळाला नाही. कामगार रस्त्यावर आले. त्यांच्या बायका १० घराची धुणीभांडी करायला लागल्या. कामगार नैराश्याने दारूत आकंठ बुडाले. असेच चित्र सर्व गिरणगावात होते, सर्वत्र संप, मारामाऱ्या आणि नंतर लॉक आऊट. सर्व गिरणगावात अवकळा पसरली होती. तरी दारू पिऊन गणपतीसमोर नाचणे ठरलेले. परप्रांतीय अशा मराठी “मामांना” हसून म्हणत, ह्या लोकांना स्वतःच्या वाईट परिस्थितीबद्दल काहीच कसं वाटत नाही? स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची वाताहत झाली असताना हे  दारू पिऊन नाचू कसे शकतात?

( पार्श्वसंगीत  : कर्तव्याला मुकता माणूस; माणूस ना उरतो SSS…)

नाही म्हणायला काही कामगारांनी रस्त्यावर बनियन, रुमाल विकायला सुरुवात केली, काहींनी रिक्षा, टक्सी चालवायला सुरुवात केली.

श्री   :   आणि हे सर्व माझी Career सुरू होताना घडत होते. १९८६ मध्ये मी नामांकीत कॉलेजमधून Distinction ने Chemical Engineer म्हणून उत्तीर्ण झालो. तीन चार वर्षांनी माझ्या शाळेतील गुजराथी मित्र भेटला,   हाय, हेल्लो झाल्यावर त्याने विचारले, काय कामधंदा करतोस?

मी मोठ्या अभिमानाने छाती फुगवून सांगितले की मी केमिकल इंजिनीयर आहे, आणि एका नामांकीत  Chemical Company मध्ये नोकरीला लागलो आहे आणि मला दरमहा ४००० पगार आहे.

तो म्हणाला बस! एव्हढ शिकून एव्हढीच कमाई? मी फक्त १० वी पास आहे. आणि माझी दोन दुकानं आहेत,   आणि मी एका दिवसात तुझ्या महिन्याच्या पगारापेक्षा जास्त पैसे कमावतो.

त्या दिवशी ठरवलं की पाच सहा वर्ष स्वतःची कंपनी असल्यागत रममाण होऊन काम करायचं, जबर अनुभव घ्यायचा, आणि स्वतःचा व्यवसाय काढायचा. आणि जसं ठरवलं तसं केलं.

( पार्श्वसंगीत  : आकाशी झेप घे रे पाखरा SS;  सोडी सोन्याचा पिंजराSS.)    

घर किंवा गाडीसाठी लोन ना काढता ९३ – ९४ साली व्यवसायासाठी एका खाजगी बँकेचे लोन मी काढले. मुक्त अर्थव्यवस्थेचा फायदा मला मिळाला. शेयर्समध्येही मला भरपूर फायदा झाला. तो सगळा मी आपल्या व्यवसायात ओतला. बाबा तुमच्या आणि माझ्या ज्ञान आणि अनुभवाची शिदोरी घेऊन आपण आपली कंपनी स्थापन केली.

आपलं ज्ञान, अनुभव मोलाचा ठरला. आपण आपले सर्व कामगार मराठीच ठेवले. त्यांना पगार व्यवस्थित दिला. कंपनीच्या जमाखर्चाचा ताळेबंद पारदर्शकपाने सांगत गेलो; त्यामुळे त्यांनीही कंपनीच्या उत्कर्षासाठी आपल्याला उत्तम सहकार्य दिलं. आपणही त्यांना योग्य तो बोनस देत आलो.

कुमार  :  बरोबर आहे. सुसंवाद असला की वाद होऊच शकणार नाही. ह्यातून दुसर एक शिकायला मिळालं की, आपण जे शालेय, महाविद्यालयीन घेतो ते शेवटी अर्थार्जनासाठी वापरायचे असते. मग नोकरी करून अर्थार्जन मर्यादित का ठेवावे? लोनस् इतक्या सहजी उपलब्ध असताना, स्वतःचा व्यवसाय काढून तल्लीनपणाने काम करून तो वाढवावा. मोठ्या भरार्या माराव्यात.

( पार्श्वसंगीत : भाग्य चालते कर्मपदाने, जाण खऱ्या वेदार्था SSS..)

श्री :   Perfect!!   प्रचंड ज्ञान घ्यायचे, मग कमाई मर्यादित का ठेवायची? परप्रांतीयांना का मोठे करायचे? आपण होऊन आपल्या राज्याचे अर्थकारण दुसर्यांच्या हातात का द्यावे. मुळात तेच कारखानदारी करू शकतात, आणि आपण त्यांच्याकडे नोकरी करायची हा न्यूनगंड आपण का ठेवायचा? कोणी दुसरा येईल, कारखाना काढेल, व मला नोकरी देईल, हे समीकरण चुकीचे आहे. आपल्या राज्यात आपणच कारखाने काढावेत, वाढवावेत. स्वतःचे ज्ञान स्वतःसाठी वापरून श्रीमंतच व्हायचे. मराठी लोकांनी एकमेकांना मदत करायची. ठरवून मराठी दुकानदारांकडून माल विकत घ्यायचा. मग तो वाणी असो, बेकरीवाला असो, सराफ असो, कपड्याचा दुकानदार असो, व चप्पल बूटवाला असो. मराठी हॉटेलातच जावं. अशानेच मराठी कुटुंबांचे अर्थकारण सुदृढ होईल. सरस्वतीबरोबर, लक्ष्मीपूजन करून मराठी कुटुंब श्रीमंत झाली पाहिजेत. आणि मुंबईचे आणि पर्यायाने महाराष्ट्राचे अर्थकारण परप्रांतीयांच्या हातून निसटून ते बळकट मराठी हातात आले पाहिजे.

कुमार : आणि मगच आपण ताठ म्हणू शकू की, मुंबई आमची आहे!!

आजोबा : तुम्हा दोघांचे विचार बरोबर आहेत. समस्त मराठी कुटुम्बांचा, समाजाचा साम्पत्तीक उत्कर्ष व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना. त्याचबरोबर आपण सर्व समाजाभिमुख राहू, समाजाप्रती कृतार्थ राहू, आपल्याकडे दातृत्वगुण असावा अशीही सदिच्छा करतो.

कुमार : तुम्ही दोघांनी किती छान सांगितलत. वर्षापूर्वी १२ वी आणि CET मध्ये कमी मार्क मिळाले, त्यामुळ पाहिजे त्या कॉलेजमध्ये केमिकल ईंजीनीअरींग ला प्रवेश मिळाला नाही. त्याचे मला नैराश्य आले होते. पण आपल्या घराच्या व्यवसायाला योग्य म्हणून मी  बी.एस्सी केमीस्ट्री ला प्रवेश घेतला.

आता नैराश्य झटकून मी तल्लीन होऊन एकाग्रचित्ताने व्यवसायाभिमुख शिक्षण घेईन. त्यायोगे माझ्या व्यवसायात मी आत्मविश्वासपूर्ण असेन. व्यावसायीक  ज्ञान, तल्लीनता, आत्मविश्वास आणि चिकाटी ह्यांच्या बळावर मी आपल्या व्यवसायात कर्तव्यरत होईन, तो वाढवीन. माल विकत घेताना जास्त करून मराठी माणसाकडूनच घ्यायचा प्रयत्न करीन. पण विकताना अशी बंधने ठेवणार नाही. स्वतः श्रीमंत झाल्यावर इतर मराठी व्यावसायिकांना मदत करीन.  सतत सत्कर्म करून समाजाचे ऋण फेडायचा प्रयत्न करीन. टिळक, सावरकरांचा वंशज आहे त्याचे सार्थक करीन. आणि हो आजोबा, इतकी वर्ष लक्ष्मी हरवली होती खरी, पण आता लक्ष्मीची आराधना करायला मराठी माणूस शिकला आहे. त्याला लक्ष्मी मिळवायचे सन्मार्ग सापडले आहेत. आणि ती मिळवणारच.

 आजोबा  व श्री  :   ( आशीर्वाद देत )  तथास्तु!!

( पार्श्वसंगीत   :  मराठी पाऊल पडते पुढे ….)

_________________________________________________

लेखकः मनोज लोंढे
७२, क्लेमेंट कोर्ट, अमरहिंद मंडळासमोर,
गोखले रोड, दादर ( पश्चिम) ,
मुंबई ४०० ०२८

5 Comments

Leave a Reply
  1. Dhanyavaad. Shevatacha upay nakki karava. Tharavoon marathi dukanatoon maal vikat ghyava, hi kalakaleechee vinanti.

  2. Marathi asmita Japanesathi ashaparakare marathi man jagruk hone atantaya jaruriche ahai ,appan kharokarch ssurwat karuya anni magach adhikarasathi ladhave.

    • Yes, We can start from small things. We “SHOULD” start buying day to day requirements from only MARATHI shop owners. That should be first step. I have a Marathi grocer, I go to marathi restaurants only (fortunately I stay at Dadar) like Gypsy, Aswad, Prakash, Diva Maharashtracha, Party. I buy shoes from Raju sports, Paul who are again Marathi. We buy jewelllery from Pethes, Pendurkars, Vaidyas. We buy stationery from Swami Samarth, Our medical shop is also Swami samarth. We take our bakery products from Swami Samarth/ Prasad bakery, Again a Marathi. So we try from our side to keep Marathi money with maharashtrians, & in the process they are also having their business.
      Secondly we must stop thinking that somebody from other state will come and start a industry in Maharashtra & give jobs to Marathis. “WE MUST START INDUSTRIES” after getting good experience. And employ Marathi youth.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

यू-ट्युब वर आता संपुर्ण चित्रपट

www.GoogleGoogleGoogleGoogle.Com