in

लग्नाआधी … लग्नानंतर…

बर्‍याच दिवसांनी शेजारच्या मल्टीप्लेक्समधे मराठी सिनेमा लागला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर सिनेमा दाखवला गेला. नाहीतर अनुभव असा असतो की सगळी कामं आटपून चित्रगृहात जावं तर प्रेक्षक नसल्यामुळे शो रद्द करण्यात येतो. पण या वेळेला तसं झालं नाही. बघताबघता दहापंधरा लोक जमले व तिकीट देऊन त्या लोकांना खरोखर प्रेक्षागृहात “दाखला” मिळाला. मंडळी, हा लेख त्या सिनेमाचं परीक्षण म्हणून लिहीला जात नाहीय. अरे हो, वरातीमागून घोडं असा प्रकार होण्याआधी सिनेमाचं नाव सांगतो. सिनेमाचं नाव होतं, लग्नानंतरची गोष्ट. या लेखाचं नाव आहे, लग्नाआधी … लग्नानंतर. मला इथं कबूल करायचं आहे की मी स्वत: खूपच रोमॅण्टीक आहे. (माझी सौ. हे सत्य कधीच मान्य करीत नाही ही वेगळी गोष्ट. तसं पाहिलं तर बायका, खास करून लग्नानंतर, सत्य, म्हणजे वस्तुस्थिती, कुठॆ कबूल करतात म्हणा!)  हा सिनेमा पाहिल्यानंतर मलाहि वाटायला लागलं की ’लग्न’ या संस्थेविषयी माझेही काही हलके-फुलके विचार वाचकमित्रांपुढे मांडावेत. तसं म्हटलं तर “लग्नसंस्था” विषयावर विचार मांडणे येरागबाळ्याचे काम नव्हे. अहो, मोठ्यामोठ्यांनी हात टेकले आहेत, तर मी “किस खेतकी मूळी”! मुळी हा विषय हाताळण्याचं धाडस मी जरा घाबरतघाबरतच करतोय. वाचकमित्रांनो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे हे पूर्णत: माझे वैयक्तिक विचार आहेत आणि तेही हलकेफुलके. म्हणून सांगतोय, शक्य असेल तर मला फार गंभीरपणे घेऊं नका. डोळे बंद करा, वाचा आणि विसरून जा. पहा, एवढ्या गंभीर विषयावर बोलतांना माझं डोकं जरा सटकलंच. डोळे बंद करून वाचणं कसं शक्य आहे? पण हो, जर तुमच्या प्रतिक्रिया म्हणून तुमचेही काही हलकेफुलके (किंवा गंभीर!) अनुभव असले तर या यादीत जोडा. तर तय्यार आहात?
लग्नाआधी (यापुढे फक्त ल.आ.) : ए चंद्रमुखी, कित्ती सुंदर दिसतेयस तू!
लग्नानंतर (यापुढे फक्त ल.नं) : हं, आतां मला कळलं त्या चंद्रावर इतके खड्डे आणि बुरूज कुठून आले ते!
ल.आ. : प्रिये, यापुढचं आपलं आयुष्य आपण हसतखेळत एकत्र घालवूया … अगदी मृत्यू आपल्याला वेगळं करेपर्यंत!
ल.नं   : कायद्याच्या भाषेत सक्त मजूरीची जन्मठेप कशाला म्हणतात ते आत्ता माझ्या लक्षात आलं. मांजर बिचार्‍या उंदराच्या जिवाशी खेळतं तशी तू माझ्या जिवाशी खेळतेयस. या जीवघेण्या खेळापेक्षा मरण पत्करलं. हे मृत्यूदेवा, तू माझी साथ कधीच सोडू नकॊस. एकवेळ तुझ्या छायेत रहाणं मी बिनतक्रार पत्करेन, पण …
ल.आ. : हे प्रिये, माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी दुसर्‍या कोणत्याही चेहर्‍याकडे ढुंकून सुद्धा पहाणार नाही. हे मृगनयनी, हे वचन दिलें मी तुला!
ल.नं.  : तुला पहाण्याआधी इतर कोणाला पाहिलं नाही, इतर तरूणींकडे वळून सुद्धा नजर टाकली नाही, त्याचीच शिक्षा भोगतोय मी. माझे फक्त डोळेच नाही, माझं डोकं सुद्धा खराब झालं होतं बहुतेक! (मूर्खा, तोंड बंद ठेवून फाशीवर चढ आत्तां!)
ल.आ. : लाडके, मला तू जे काही खायला घालशील ते कसलीहि तक्रार न करता मी आनंदाने खाईन.
ल.नं.  : अग ए, तू इतकी वर्षं अन्न म्हणून जो काही प्रकार माझ्यापुढे ढकलत आलीस तो मी कसा पचवला ते माझं मलाच माहीत! त्यापेक्षा बाज़ारात विषाचे जे काही प्रकार असतील ते सगळे आनंदाने मी खाल्ले आणि पचवलेही असते.
ल.आ. : प्राणप्रिये, मी तुझ्या या “बिनधास्त” जगण्याच्या पद्धतीवर फिदा झालोय.
ल.नं.: : अग चेटकिणे, घरभर अस्ताव्यस्त पसरलेल्या या वस्तूंकडे जरा एक नजर टाक आणि मला सांग, तुझ्या घरी तुझ्या आईबाबांनी हे.. हेच शिकवलं का तुला? त्यापेक्षा एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तिथल्या मामूली शेंबड्या मोलकरणीबरोबर रहाणं पसंद करीन मी.
ल.आ. : खोलीभर या वातावरणात पसरलेला तुझ्या शरीराचा हा सुगंध जीव अगदी वेडा करून टाकतो, प्रिये!
ल.नं.  : अग ए, निदान आत्तातरी तुझ्या या अंगावरचे कपडे आणि त्या पलंगावरच्या चादरी बदल. या दुर्गंधाने माझा श्वास गुदमरायला लागलाय. त्यापेक्षा सकाळी ती भंगीण येते ना कचरा गोळा करायला, तिच्याबरोबर रात्र घालवणं आवडेल मला.

मित्रहो, मला आता इथंच थांबावं लागणार. माझ्या बायकोच्या पाहुलांची चाहूल लागतेय बहुतेक. तिने दरवाजा तोडून आत धडक मारायच्या आत मला या प्रकरणाला पूर्णविराम द्यावा लागणार. नाहीतर माझ्या भाबड्या जिवाला भयंकर धोका आहे. तर, निघतो मी. पण मी आधी सांगितलेलं लक्षात आहे ना. तुम्ही आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहून कळवा. पण शक्य तो, आपली बायको किटी पार्टीला गेली असेल तेव्हांच हे जीवघेणं धाडस करा.

लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)

One Comment

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अहम्

फोटोज.. हिन्दूह्रुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे