– आप्त म्हंजे काय रे भाऊ?
– अरे आप्त ही काही वस्तु नव्हे रे! आपापल्या तप्त तव्यावर पोळी भाजुन घेणारास ‘आप्त’ असे म्हणतात!
– हां हां! म्हंजे हितचिंतक का रे भाऊ?
– छे छे! हितचिंतक नावाची वस्तु वेगळीच असते! जे कायम आपल्या हिताची चिंता करतात त्यांना हितचिंतक म्हणतात!
– म्हंजे काँग्रेसवाले का रे भाऊ?
– नव्हे नव्हे रे! छे, आता मात्र मी… तुझ्यापुढे हातच टेकले! अरे, आप्त म्हंजे मित्र आणि नातलग!
– म्हंजे आपलं आघाडी सरकार का रे भाऊ?
– नाही नाही रे! सरकार ही एक वेगळीच गोष्ट आहे. ती एक आपोआप चालणारी यंत्रण असते!
– म्हंजे घड्याळ का रे भाऊ?
– छे बुवा! अरे, इतका कसा तु मठ्ठ? जाऊ दे. मी तुला आता एक उधारण देतो. आपल्या मामाचे दर उन्हाळ्याला सुटीत पत्र एते. मी अमुक अमुक तारखेला एत आहे, असे त्याने कळवलेले असते. त्याला आपले बाबा लगीच पत्र टाकतात की आम्हीच बाहेरगावी जात असून तुम्ही एऊ नका!!
– हो रे हो! तसे पत्र मी वाचले आहे!
– असे पत्र लिहुन एखाद्याचा मामा करणारास आप्त असे म्हणतात!
– हा हा! आप्त म्हंजे शत्रु का रे भाऊ?
– नव्हे रे! आप्त हे आपल्याच घरातले किंवा पक्षातले असतात! पण आपल्या विरोधात असतात!
– हां हां, आता कळले! आप्त म्हंजे विरोधक!! बरोबर ना!
– रे, तुला अजुन पुर्ण समजलेले दिसत नाही! आप्त हे एकमेकांबरोबरच असतात, पण तेव्हाच विरोधकही असतात!
– म्हंजे शिवसेना आणि भाजप का रे भाऊ?
– नव्हे नव्हे रे! पुन्हा एक उधारण देतो. आपले बाबा रात्री उशिरा खूप पिऊन आले, की आपली आई काय करते?
– दार बंद करुन खूप शिव्या देते!
– नव्हे रे, बाबांना काय प्यायला देते?
– ताक!
– बरोब्बर! त्याला उतारा असे म्हणतात! आप्त हा एक उताराच असतो व नेहमी उशिरा घरी येणारांना पाजावा लागतो!
– हां, आता कळले मला सारे भाऊ!
– काय कळले?
– हेच की मी तुझा भाऊ असुन आप्तही आहे!!
— ब्रिटिश नंदी