जानेवारी महिन्यात केलेला यशस्वी विदर्भ बंद आणि मार्च मधे झालेले फुसके जेल भरो आंदोलन ह्यानंतर विदर्भ राज्य समितीचे काय झाले हा प्रश्न सध्या सगळ्याच विदर्भ वासियांना पडला आहे. धुमधडाक्यात स्थापन झालेल्या या समितीत जांबुवंतराव धोटें व्यतिरिक्त कोण कोण उरले आहे हा हि एक प्रश्नच आहे. काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हणजेच विलास मुत्तेमवार, दत्ता मेघे यांनी तर हात आखडते घेतलेच आहे. विदर्भ राज्य समिती पुर्णपणे फसलेली आहे. का फसली समिती? याची कारणे खालीलप्रमाणे देता येइल
१)या समितीत कधिही एकसुत्रीपणा नव्हता. कुणा एकाला कधिच नेता म्हणुन स्विकारल गेल नाही.
२) विदर्भ वेगळा पाहिजे एवढीच मागणी घेवुन सगळे एकत्रीत आले होते पण या विषयाशी संलग्नीत असलेल्या इतर बाजुंविषयी त्यांचे कधिच एकमत झाले नाही.
३) विदर्भ वेगळा झाला तर विकास कसा करता येइल ह्याचा आराखडा कुणाकडेच नव्हता. म्हणुन विदर्भ वेगळा झाल्यानंतर काय? ह्याचे ऊत्तर जनतेला कधिच मिळु शकले नाही.
४)आतापर्यंत विदर्भाचा विकास का झाला नाही? ह्याची नैतिक जबाबदारी कुणिच घेतली नाही.
५)विदर्भावाद्यांनी पश्चिम महाराष्ट्राला दोष देण्यापलीकडे दुसरे काहीच केले नाही.
६ या समितीत सामान्य जनतेचा कधिच सहभाग राहिलेला नाही. भरणा होता तो फक्त राजकारण्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. राजकारणाच्या कुरघोडीमुळे मतभेद वाढण्यास नेहमिच मदत झाली.
७) विदर्भाच्या आंदोलनातील एकाही नेत्यावर जनतेचा विश्वास उरलेला नाही. प्रत्येक जण स्वार्थासाठी हि मागणी करीत आहे हे जनतेने हेरले.
८) आजतायगत विदर्भाचे आंदोलन इतक्यांदा झाले आणी थंड पडले आहे की, जनतेला हे रटाळवाणे झाले आहे.
९) कॉंग्रेस, भाजप , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या स्वार्थी व्रुत्तीमुळे या आंदोलनाच्या फज्जा उडाला
१०)जांबुवंतरावांनी नक्षल्यांची मदत घेण्याची घेतलेल्या भुमिकेमुळे आंदोलनाची धार आणखीनच बोथट झाली.
११) शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाचा वेगळ्या विदर्भाला विरोध असल्याने समितीचे दोष त्यांनी जनतेसमोर मांडले आणि कदाचीत जनतेला ते पटलेही.
१२)तेलंगाणाचे आंदोलनाने जोर पकडताच विदर्भाच्या आंदोलनाला सुरुवात झाली. यातुन हे आंदोलन म्हणजे स्वयंस्फुर्त नसुन प्रतिक्रियात्मक आहे हे जनतेला कळुन आले.
१३)महाराष्ट्र दिवसाला काळे झेंडे दाखवुन विदर्भवाद्यांनी नोंदविलेला निषेध कुणालाही आवडला नसेल. महाराष्ट्राला एक अस्मिता आहे आणि त्या अस्मितेचा विदर्भवाद्यांनी केलेला अवमान निश्चितच गैर होता. महाराष्ट्र द्वेषातुन विदर्भाची निर्मिती शक्य नाही.
१४) विदर्भाच्य आंदोलनातील हिंदी भाषिकांचा भरणा पाहता , मराठी माणसाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. हे शेटजी भटजीचे राज्य तर होणार नाही ना? असा विचार करुन वैदर्भिय मराठी माणसाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली.
जांबुवंतराव यवतमाळ वर्धेत एक दिवसाच्या लाक्षणीक उपोषणापलिकडे काही करतांना दिसत नाही. आता विदर्भाचे आंदोलन जवळपास ठप्पच झाले आहे. या आंदोलनातील प्रत्येक पक्षाची सहभागाची पार्श्वभुमी बघीतली तर असे दिसुन येते की, भाजपला सुधिर मुनगंटीवारांच्या रुपाने त्यांचा प्रदेशाध्यक्ष मिळाला आणी त्यांनी आंदोलनातुन पाय काढता घेतला. कॉंग्रेसच्या नेत्यांना दिल्लीवरुन चपराक बसल्यानंतर त्यांचीतर पाचावर धारणच बसली. राष्ट्रवादी कॉंग्रेस या आंदोलनात होती की नव्हती हे शेवटपर्यंत कळलेच नाही. रिपब्लीकन पार्टींनी या आंदोलनातुन आपला पक्ष बळकट करुन घेण्यापलीकडे काहीच केले नाही. जांबुवंतरावांना कुठलाच पक्ष जवळ करीत नाही त्यामुळे ते एकाकी व्यर्थ झुंज देत आहे.
शेवटी नेहमिप्रमाणेच विदर्भाच्या या आंदोलनाचा पण सफाया झाला आणी जनतेचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला. जनतेला विदर्भ वेगळा पाहीजे की नाही हे अजुन नक्की झाले नाही पण विदर्भावादी नेत्यांच्या वागण्यातील स्वार्थाचा फोलपणा मात्र उघडकीस आला. नाकारलेल्या नेत्यांकडुन चालविलेले आंदोलन शेवटी पुर्णत: फसले हे मात्र सत्य. ज्याला ज्याला प्रसिद्धीचा हव्यास आहे त्याने त्याने या आंदोलनात भाग घेऊन आपली पोळी शेकली. ऊरले फक्त जांबुवंतराव! शेवटी प्रश्न हाच उरतो की विदर्भाच्या मागासलेपणाला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार आहे की विदर्भातील कुचकामी नेतेच? जनतेलाही अखंड महाराष्ट्रातच राहुन विदर्भाचा विकास साधुन घ्यावयाचा आहे हे समितीच्या अपयाशातुन दिसुन येत.
सतीश नेमाजी पानपत्ते
ईंजिनिअर
९८२२३६९१९८
मनिष नगर नागपुर
5 Comments
Leave a Reply