चिवडा कसा बनवायचा?
साहित्य:
८ कप पातळ पोहे
दिड ते २ कप कुरमूरे
३/४ ते १ कप शेंगदाणे
१०-१२ काजू बी
१०-१२ हिरव्या मिरच्या
१०-१२ कढीपत्ता पाने
१/२ कप तेल
१/२ टिस्पून हिंग, १ टिस्पून हळद, १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जीरे
चवीनुसार मीठ, साखर
कृती :
१) पातेल्यात तेल गरम करावे. सर्वात आधी शेंगदाणे, काजू थोडे तळून घ्यावेत. शेंगदाणे आणि काजू ब्राऊन रंगाचे झाले कि एका वाडग्यात काढून ठेवावेत.
२) त्याच तेलात मोहोरी, जीरे, हिंग, हळद, मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. तळलेले शेंगदाणे, काजू घालून लगेच पोहे आणि कुरमुरे घालावे आणि सर्व पोह्यांना तेल लागेल असे मिक्स करावे. हे करताना गॅस बारीक ठेवावा. नाहीतर तळाला पोहे जळू शकतात.
३) गॅस बंद करून चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर घालावी. आणि व्यवस्थित ढवळून घ्यावे.
टीप:
१) चिवड्यात मनुका, सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, डाळं घालायचे असेल तर शेंगदाण्यांबरोबर ते तळून घ्यावे.
२) फोडणी करताना लसणीच्या पाकळ्या कापून घातल्यास चिवड्याला लसणीचा छान स्वाद येतो.
३) चिवड्याला थोडा आंबटपणा हवा असल्यास, चिवडा गरम असताना १ टिस्पून आमचूर पावडर घालून मिक्स करावे.
तयार आहे चिवडा.