in ,

मुख्यमंत्र्यांचा खासगी ‘ई-मेल’!

अमेरिकेतील बराक ओबामांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुख्यमंत्री अशोक

चव्हाण यांनी जनसंपर्कासाठी ‘ ई-मेल ‘ चा हायटेक पर्याय स्वीकारला खरा… पण त्यासाठी अधिकृत सरकारी वेबसाइटवर अविश्वास दाखवत खासगी ई-मेल सेवेचा आधार घेतलाय. मुख्यमंत्र्यांचा हा ‘ अविश्वास ’ सार्थ ठरवत सरकारी वेबसाइटनेही अद्याप विलासराव देशमुखांनाच मुख्यमंत्रीपदी बसवले आहे.

जनतेच्या मनात सरकार आणि प्रशासनासंदर्भात असलेले प्रश्न तसेच सूचना मुख्यमंत्र्यांना थेट पाठविता याव्यात यासाठी अशोक चव्हाण यांनी नवा ई-मेल जाहीर केला आहे. ashokchavanmind@rediffmail.com असा पत्ता त्यांनी आज प्रसारमाध्यमांमार्फत महाराष्ट्रातील जनतेसाठी पाठवला. मुळात सरकारी साइटवर मुख्यमंत्र्यांचा chiefminister@maharashtra.gov.in हा अधिकृत ईमेल पत्ता असताना , चव्हाण यांनी ‘ रेडिफ ’ या खासगी कंपनीवर विश्वास दाखवला आहे.

महाराष्ट्र शासनाची http://maharashtra.gov.in/ ही स्वतःची अधिकृत वेबसाइट असून , त्यावर ‘ महा आयटी राष्ट्र ‘ असे कौतुक मिरवले आहे. पण आयटीचा एवढा उदोउदो करणा-या या साइटवर अविश्वास दाखवत मुख्यमंत्र्यांनी आपला खासगी ई-मेल लोकांसाठी खुला केला आहे.
त्यांचे हे वागणे चुकीचे आहे , असेही म्हणायला नको. कारण महा-आयटी-राष्ट्राच्या या अधिकृत साइटने अजून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून मान्यताच दिलेली नाही. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे जगभरातून महाराष्ट्रातील सरकारकडे लक्ष असताना या ग्लोबल एडिशनला नवा मुख्यमंत्रीच माहित नाही. त्याच्या मुख्यमंत्र्यांच्या लिंकवर आजही विलासराव देशमुख मुख्यमंत्री असून , बाकीचे मंत्रीही तसेच आहेत.

आर. आर. पाटील गृहखात्यातून पायउतार होऊन आठवडा उलटून गेला , तरी या महा-आयटी-राष्ट्राच्या साइटसाठी ते गृहमंत्रीच आहेत. त्यांच्या चीनच्या दौ-याचे फोटो झळकवीत त्यांच्याच डोक्यावर गृहमंत्रीपदाचा मुकुट ठेवण्यात , या साइटला धन्यता वाटते. त्यामुळेच आता मुख्यमंत्र्यांचे चुकले की या सरकारी साइटचे हे या महा-आयटी-राष्ट्रालाच ठरवावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

‘सुपरफास्ट’ कॉम्प्युटर

कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट