काल (रविवार १७ जाने.०९) पुण्यातील पहिला वहिला मराठी ब्लॉगर्स चा मेळावा पार पडला. कदाचित महाराष्ट्रातील पहिला असावा. ब्लॉगर्स येतील का नाहि? आले तर किती येतील? कोण येईल? कुठुन येतील? या सर्व प्रश्नासंहित व बर्याच उत्सुकतेने मी हि या मेळाव्यास गेलो. प्रतिसाद नक्किच चांगला होता. सुमारे ६० लोके उपस्थित होती, यातील बरेच जण ब्लॉगर्स होती तर काहि जण ब्लॉग्सचे वाचक. नेमके आपण वाचतो ते ब्लॉग लिहितात तरी कोण, हिच उत्सुकता त्यांना मेळाव्यापर्यंत घेऊन आली.
मेळाव्या मध्ये एकमेकांच्या ओळखिचा कार्यक्रम पार पडला आणि मग सुरु झाल्या त्या अनौपचारिक चर्चा. बर्याच दिवसांनी काहि लोके भेटली, दै. सकाळ चे सम्राट फ़डणीस आणि माझी पुन्ह-भेट थेट दिड वर्षांनीच झाली. हिन्दुस्तान टाईम्स मधील योगेश, स्टार माझाचे प्रसन्न हे या मेळाव्या निमित्त पुन्हा भेटले. अनेक नविन ओळखिही झाल्या. महाराष्ट्र टाईम्स.कॉम, झी २४ तास, मातॄभुमी, अक्षरयोगिनी मधिल सहकारी, दिपक शिंदे (भुंगा), राजाशिवाजी.कॉम चे मिलिंद वेर्लेकर यांच्याशी गप्पा-टप्पा झाल्या.
ईसकाळ.कॉम वरती लगेचच रात्री १०.३० च्या सुमारास या ब्लॉगकॅंम्प बद्दल बातमी देण्यात आली. हिच बातमी सोमवारी दै.सकाळ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. तुम्ही मला या बातमीच्या विडिओ फ़िचर मध्ये माझी ओळख करुन देताना आणि कार्यक्रमाबद्दल मत मांडताना पाहु शकता. हाच विडिओ थेट यू-ट्युब वर पाहण्या साठी इथे टिचकी मारा.
ईसकाळ.कॉम वरील बातमी ईथे देत आहे.
पुणे – कोणी सिव्हिल इंजिनिअर, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर, कोणी विद्यार्थी तर कोणी रिटायर्ड ऑफिसर जमलेले 50-60 जण होते ऑनलाईन विश्वात मुशाफिरी करणारे. एकमेकांना न ओळखणारे, फक्त टोपणनावाने ओळखणारे आज (रविवारी) सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात एकत्र आले आणि मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प मोठ्या उत्साहात झाला.
मराठीत नियमित लेखन करणाऱ्या ब्लॉगर्सचा एकमेकांशी परिचय व्हावा या उद्देशाने सुरेश पेठे, अनिकेत समुद्र, पंकज झरेकर, दीपक शिंदे आणि विक्रांत देशमुख यांनी पुढाकार घेत या मेळाव्याचे आयोजन केले. मेळाव्याला पुणे, मुंबई आणि कोल्हापूरसह इतर शहरांतून ब्लॉगर्स उपस्थित होते.
मेळाव्यात उपस्थित असलेल्या प्रत्येकाने सर्वप्रथम आपल्या ब्लॉगविषयी माहिती व आपल्या ब्लॉगवरील लिखाणाची ओळख करून दिली. यापूर्वी* ब्लॉग लिहिणाऱ्या आशिष कुलकर्णी यांनी नव्याने ब्लॉगलेखन सुरू करणाऱ्यांसाठी तांत्रिक मदत व आवश्यक ती सर्व माहिती देण्याचे यावेळी सांगितले; तर काही हौशी लेखकांनी नव्याने ब्लॉग सुरू करण्यासाठी आवश्यक ती माहिती घेण्यासाठी येथे आल्याचे सांगितले. ब्लॉगवर लिहिलेल्या मराठी साहित्याचा उल्लेख मार्चमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्हावा, यासाठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांना भेटण्याचे आज निश्चित करण्यात आले. ब्लॉगर्सनी एकत्रितपणे मिळून काही कार्यक्रम घेण्याबाबतही या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. मराठी ब्लॉगर्सला एकत्र आणण्यासाठी “ई सकाळ’ विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
————–
* छोटेसे करेक्शन: मी अजुन हि ब्लॉग लिहितो
नमस्कार,
मराठी ब्लॉगर्सचा हा पहिला मेळावा आयोजित करून यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन!