in

उद्धवसाहेब ठाकरेंचे मतदारांना खुले पत्र..

प्रिय मतदार बंधू भगिनींनो…

जय महाराष्ट्र!

१३ ऑक्टोबरला महाराष्ट्र निवडणुकीला सामोरा जातोय. आतापर्यंत महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या आयुष्यामध्ये अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. कोण जिंकेल आणि कोण हरेल हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण कर्ते करविते आपणच आहात. या निवडणुकीत मला प्रश्न विचारले जात आहेत, की ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे का? माझ्या पुरता विचार केला तर ही निवडणूक माझ्या आयुष्याची किंवा माझ्या नशिबाची दिशा ठरवत नसून, महाराष्ट्राच्या आयुष्याची दिशा ठरवणारी आहे. गेली पाच वर्षे काँग्रेसच्या सरकारने व आघाडीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये जो घोळ घालून ठेवला आहे, त्याची सगळी वाईट फळं महाराष्ट्र भोगत आहे.

खरं म्हणजे हा महाराष्ट्र अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आहे. कोणतेही क्षेत्र घ्या, इतिहास घ्या, क्रांतिकारक घ्या, समाज प्रबोधन घ्या, संत घ्या, या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रासारख्या संपन्नतेचा वारसा कोणत्याही राज्याला नाही. आणि असा हा महाराष्ट्र दिवसागणिक पाठी चाललेला आहे. गेल्या पाच वर्षांत एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. विजेचे उत्पादन नाही, पाणी नाही, रस्ते नाही, उद्योगाला पोषक असे वातावरणही नाही. शिवशाहीचं सरकार असताना संभाजीनगरमध्ये, म्हणजेच काँग्रेसच्या लेखी औरंगाबाद इथे स्कॉडा गाडीचा कारखाना शिवशाहीच्या सरकारने आणला. गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये नॅनो गाडीच्या कारखाना पहिल्यांदा बंगालमध्ये गेला आणि आता तो गुजरातमध्ये गेला. हा नॅनो कारखाना महाराष्ट्रात यावा असे टाटावाल्यांनाही वाटलं नाही आणि महाराष्ट्र सरकारलाही वाटलं नाही. याचाच अर्थ उद्योगधंद्याला पोषक असे वातावरण निर्माण केले जात नाही व उद्योगपतींनाही कोणीही आमंत्रित करत नाही. याचा परिणाम म्हणून बेकारी वाढते आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी १८ तास, २४ तास भारनियमन आहे. वीजच नसते आणि म्हणूनच उद्योगधंद्यांना पोषक वातावरण नाही.

एका बाजूला अशी व्यथा आहे तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत. आज विदर्भाच्या पट्ट्यामध्ये फिरत असताना, शेतकऱ्यांनी व्यथा कळते. शेतकऱ्यांकडून २५ रुपये किलोने तूरडाळ घेतली जाते आणि तीच तूरडाळ आज १०० रुपये किलोपेक्षा जास्त भावाने आपल्याला मिळते, ही परिस्थिती का यावी? मी आताच म्हटल्याप्रमाणे एखाद्या उद्योगपतीला अद्योग आणायचा म्हटला, तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो, जागा ठरवावी लागते, त्या जागेवर सर्व सुविधा आहेत की नाही ते पडताळून बघावं लागतं. उत्पादन कधी सुरू होईल, माकेर्ट कुठलं असेल, मग घेतलेलं कर्ज कसं परत फेडता येईल या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन तो उद्योग करावा की नाही हे ठरवावं लागतं. आज शेतकरी जे आत्महत्या करत आहेत. त्यांच्याकडे काय आहे? आज शेतकरी, मौसम आल्यानंतर आपली जमीन गहाण ठेवतात, घर गहाण ठेवतात, पत्नीचे दागिने गहाण टाकतात, शेवटचा उपाय म्हणजे आपली जीवाभावाचा बैलसुद्धा गहाण टाकतात आणि कर्ज घेऊन समोर काहीही दिसत नसताना मातीमध्ये पैसे टाकतात. हे धाडस शेतकऱ्यांमध्ये आहे. आणि एवढं धाडस केल्यानंतरही, वेळेला पाऊस पडत नाही, पीक आलं तर त्याला भाव मिळत नाही. पीक समोर दिसलं तरी त्याच्यावर काहीतरी रोग येतो आणि हातातोंडाशी आलेलं सोन्यासारखं पीकही नाहीसं होतं आणि मग कर्जाचा डोंगर वाढत जातो. पैसे वाढत जातात, व्याज वाढत जातं आणि मग आत्महत्येखेरीज कुठचाही उपाय शेतकऱ्यांसमोर उरत नाही आणि म्हणून शिवसेना-भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, सर्व प्रथम शिवशाहीचं सरकार आल्यावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच! हे आमचं तुम्हाला वचन आहे. अनेक ठिकाणी हे ही लक्षात येतं आहे की, जे गरीब शेतमजूर आहेत, त्यांना जोपर्यंत त्यांच्याकडे काम आहे तो पर्यंतच पैसे मिळतात, पण एकदा का त्यांचं वय झालं की त्यांना कोणीही वाली नसतो. म्हणून या शेतमजूरांनासुद्धा वयाच्या ६५ वर्षांपासून आजन्म आम्ही पेन्शन देणार आहोत. शेतमजूर हा अन्नदाता आहे, त्याला पेन्शन ही मिळालीच पाहिजे. अशा अनेक गोष्टी आम्ही वचननाम्यात दिल्या आहेत.

मध्यंतरी सगळीकडे एक भयाचं वातावरण होतं. स्वाइन फ्लू -सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. सगळ्यांच्याच तोंडावर फक्त मास्क. निदान व्हायला किती वेळ लागत होता? याचं कारण, आपल्याकडे जेमतेम एक-दोनच प्रयोगशाळा आहेत. एक ती हाफकिन आणि दुसरी एक ती पुण्याची. इतरत्र महाराष्ट्रात कुठे आहेत? तिकडे ते रक्ताचे नमुने येणार, ते तपासले जाणार आणि नंतर औषधोपचार होणार. असं भयानक चित्र. हा जो मधला वेळ आहे, तो फार महत्त्वाचा असतो. त्या वेळेत जर का रोग्याला औषधोपचार मिळाला तर तो लवकर बरा होईल. त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात आम्ही सुसज्ज अद्ययावत प्रयोगशाळा उभी करणार आहोत. जेणेकरून तिथे ताबडतोब रक्ताने नमुने तपासले जातील आणि तत्काळ निदान होऊन उपचार केले जातील. शिक्षणाचा मुद्दा फार मोठा आहे. घरची परिस्थिती नाही, त्यामुळे मुलांना शिकायला अडचणी निर्माण होतात. मुलांना योग्य शिक्षण मिळावं म्हणून आम्ही मुला व मुलींना दहावीपर्यंत प्राथमिक शिक्षण मोफत देणार आहोत. अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त तुमची साथ हवी आहे.

दहशतवाद! दिवसेंदिवस दहशतवाद आणि असुरक्षिततेचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे. बॉम्बस्फोट काय, दहशतवादी हल्ले काय, दंगली काय… परिस्थिती अशी आहे की, आज मंुबईसारख्या शहरात राहणाऱ्या माणसाला घराबाहेर पडताना, आपण धडधाकट घरी परत येऊ असा विश्वासही वाटत नाही. घरात असलेली कोणाची म्हातारी माय, कुणाची पत्नी, कुणाची बहिण आपलं जीवाभावाचं माणूस सुखरूप घरी येईपर्यंत चिंतेने त्याच्या येण्याच्या वाटेकडे डोळे लावून असतात. महाराष्ट्रात तर दर वीस दिवसांनी एक दंगल होते, असा अहवाल कालच माझ्या कानावर आला आहे. दहशतवादी हल्ल्यात आपल्या कर्तृत्ववान पोलिसांना आपले प्राण गमवावे लागतात. किती दिवस असं घाबरून, जीव मुठीत धरून जगायचं आपण? शिवशाहीच्या या आधीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात एकही दंगल वा हिंसाचार झालेला नाही. पुन्हा शिवशाहीचं सरकार आल्यावर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची आम्ही हमी घेत आहोत. पोलिसांच्या आधुनिकीकरणाचाही विचार आमच्या मनात आहे.

मुंबई आणि शिवसेना हे अभेद्य आणि अतूट असं नातं आहे. मुंबईकरांच्या प्रेमाने आणि जिव्हाळ्याने नेहमीच शिवसेनेला उर्जा प्राप्त करून दिलेली आहे. पण आज मुंबईची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शिवशाहीच्या राज्यात मुंबईच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले गेले होते. मग त्या ४५ उड्डाणपूल असोत, वांदे ते नरिमन पॉइण्ट दरम्यानच्या सागरी सेतूच्या बांधकामाची योजना असो… मुंबईला एक जागतिक दर्जाचे आणि मुख्य म्हणजे पायाभूत सोयींनी समृद्ध शहर बनवण्यासाठी शिवशाही सरकारने महत्त्वाचे प्रयत्न केले होते. येणारे शिवशाही सरकारही मुंबईच्या विकासाची आणि इथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांची विशेष काळजी घेणार आहे. मुंबईच्या विकासासाठी खास पॅकेजही करण्याचे आम्ही ठरवले आहे.

महाराष्ट्राचं खर तर हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण कुठे आहे तो सुवर्ण महाराष्ट्र? पूर्णपणे अंधारच आहे. गणपती झाले, नवरात्र झाली, आता दिवाळी साजरी करण्याची ऐपतही महाराष्ट्राची राहिलेली नाही. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिवाळं काढलेलं आहे. म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे, की हा उद्धव ठाकरे याच्या नशिबाचा प्रश्न नाही तर महाराष्ट्राच्या, म्हणजे तुमच्या नशिबाचा प्रश्न आहे.

तुम्हाला जर हेच सरकार पाहिजे असेल तर मला असं वाटतं की समोर अंधार आहे आणि अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल तर शिवसेना-भारतीय जनता पक्षाखेरीज मला तरी दुसरा कुठचाही मार्ग दिसत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्र आज सरकार बदलू इच्छितो आहे. मी आज जिथे जिथे जातोय, तिथे तिथे सगळे मला सांगताहेत की, उद्धवजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काम करणारं सरकार आम्हाला हवं आहे. जे सरकार येऊन आम्हाला दिलासा देईल, असं सरकार आम्हाला हवं आहे. आणि असं सरकार शिवसेना-भारतीय जनता पक्षच आम्हाला देऊ शकेल. म्हणूनच मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय की आता मनामध्ये अजिबात दुसरा विचार आणू नका. बंडखोरांना थारा देऊ नका. बंडखोर सत्तेचे दलाल बनून त्या वेळी आपली मते विकून मोकळे होतात. आणि पुन्हा नाकर्ते आपल्या डोक्यावर येण्याची भीती असते. म्हणूनच या बंडखोरांना अजिबात थारा देऊ नका. एक समर्थ सरकार आपण या वेळेला आणू शकाल.

या सुवर्ण महोत्सवी वर्षाला आपण महाराष्ट्राला ‘महा-राष्ट्र’ बनवू हे वचन मी तुम्हाला देतो.

– जय महाराष्ट्र!

आपला,
उद्धव ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

शिवसेना प्रचार साहित्य ShivSena Scraps

सुविचार