in

विलासरावांची राणेंवर तोफ

स्वाभिमानाच्या गप्पा मारणारे पक्षातून हकालपट्टीची वाट पाहत नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना शुक्रवारी लगावला. काँग्रेसमधून निलंबित झाल्यापासून राणेंनी विलासरावांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. ‘स्टार माझा’ या न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विलासरावांनी त्या आरोपांची सव्याज परतफेड केली.

देशमुख म्हणाले की, राणे ‘स्वाभिमान’ नावाची संघटना चालवतात. पण त्या संघटनेचे नाव स्वाभिमान ठेवल्याने स्वाभिमान येत नाही. त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे, हा इशारा त्यांच्यासाठी पुरेसा आहे. ते सतत माझ्याबद्दल बोलत आहेत, कारण देशमुखांना ‘टार्गेट’ केले की प्रसिद्धी मिळते हे राणेंना चांगलेच माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केलेल्या आरोपांचाही विलासराव देशमुख यांनी समाचार घेतला. भाजपवाल्यांना गोबेल्स नीती चांगली अवगत असते. गडकरींना या प्रकरणात कुणी माहिती पुरवली याची आपल्याला पूर्ण माहिती आहे. मात्र कुणाकडून माहिती घेताना त्याची खात्री करावी, एवढी तसदीही गडकरींनी घेतली नाही. मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हाही गडकरींनी माझ्यावर अशा प्रकारचे आरोप केले होते. आतापर्यंत त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले. मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. गडकरींच्या आरोपांविरोधात आपण कोर्टात जाणार आहोत, असे ते म्हणाले.

‘ इंडिया बुल्स’ कंपनीशी अमित देशमुख आणि अहमद पटेलांच्या मुलाचे हितसंबंध गंुतले असल्याचा गडकरींनी आरोप केला होता. त्याबाबत बोलताना, या कंपनीशी माझ्या किंवा पटेल यांच्या मुलाचे संबंध असल्याचे गडकरी यांनी सिद्ध करून दाखवावे, असे आव्हानही देशमुख यांनी दिले आहे. माझी मुले आणि अहमद पटेल यांची मुले एकमेकांना ओळखतही नाहीत, असा खुलासा करून गडकरींनी यापूर्वीही बेजबाबदारपणे आरोप केले होते आणि त्यांनी माफीही मागितली होती, असं त्यांनी स्पष्ट केले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आपण गैरहजर असल्याची चर्चा झाली. मात्र वैयक्तिक अडचणींमुळे आपण हजर राहू शकलो नाही. सोमवारी आपण अधिवेशनासाठी जाणार आहोत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कसाबला सीएसटीवर जाहीर फाशी द्या – हिन्दुह्रुदयसम्राट

किल्ले “जंजीरा”