in

चिरोटे.

चिरोट कसे बनवायचे?

वाढणी : साधारण १६ ते १७ चिरोटे

साहित्य:
१ कप मैदा
१/८ कप पातळ केलेले साजूक तूप
१/४ कप दूध
वरून पेरायला पिठी साखर
पेस्ट बनवण्यासाठी ४ चमचे साजूक तूप + ३-४ चमचे तांदूळ पिठ

कृती:
१) मैदा एका भांड्यात घ्यावा त्याला गरम गरम तूपाचे मोहन घालावे. तूप कडक तापवावे, जर मोहनासाठी तूप कमी गरम असेल तर चिरोटे नरम पडतात. दूध घालून मैदा घट्ट भिजवावा. थोडा वेळ झाकून ठेवावे.

२) भिजवलेला मैदा ६ भागात विभागून घ्यावा. त्याचे मध्यम गोळे करून घ्यावे. त्याच्या एकदम पातळ पोळ्या लाटून घ्याव्यात. जितक्या पातळ पोळया तितके चिरोटे हलके होतील आणि चिरोट्यांना छान पदर सुटतील.

३) एक लाटलेली पोळी घ्यावी. त्या पोळीवर पातळ केलेले साजूक तूप आणि तांदूळ पिठ याची दाटसर पेस्ट लावावी. त्यावर दुसरी पोळी ठेवावी परत त्यावर तूप आणि तांदूळ पिठाची पेस्ट लावावी. त्यावर तिसरी पोळी ठेवून परत पेस्ट लावावी.

४) नंतर दोन बाजूंनी गुंडाळी करत मध्यापर्यंत यावे. एका बाजूची गुंडाळी दुसर्या गुंडाळीवर ठेवून थोडे चेपावे. आणि हि तयार गुंडाळी त्यातील तूप सुकेस्तोवर ठेवून द्यावी. अशाच प्रकारे उरलेल्या ३ पोळ्यांची गुंडाळी बनवून घ्यावी.

५) या गुंडाळ्यांचे १ इंचाचे तुकडे करून घ्यावे.

६) हे चिरोटे दोन आकारात बनवता येतात.

पहिली पद्धत म्हणजे प्रत्येक तुकडा वरील बाजूने हाताने हलका चेपून त्यावर एकदा उभे आणि एकदा आडवे असे लाटणे फिरवावे.
दुसरी पद्धत म्हणजे गुंडाळीचे तुकडे वरील बाजूने न लाटता जिथून कापले आहे त्या बाजूला हलके दाबून एकदा उभे आणि आडवे असे लाटणे फिरवावे. या चिरोट्यांचा आकार गोल येतो. आणि दिसायलाही आकर्षक दिसतात. पण यामध्ये आत लावलेली तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट तळताना बाहेर पडते आणि तूप वाया जाते.

७) तळण्यासाठी तेल तापत ठेवावे. तेल गरम झाले कि आच मध्यम करावी. आणि चिरोटे गोल्डन ब्राउन तळून काढावे. पेपरवर काढून लगेच त्यावर २-३ चिमटी पिठीसाखर पेरावी.

टीप:
१)वरील प्रमाणानुसार आपण पिठाच्या एकूण दोन गुंडाळ्या बनवल्या आहेत. तूप आणि तांदूळपिठाची पेस्ट हि प्रत्येक गुंडाळीसाठी वेगवेगळी तयार करावी. कारण तूप घट्ट झाले तर हि पेस्ट पोळीवर पसरवता येत नाही. आणि एकदा तांदूळपिठ घातले कि ते तूप गरमही करता येत नाही.

तयार आहेत चिरोटे.

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रव्याचे लाडु.

नारळाच्या वड्या