प्रीय वैणी,
येवल्याच्या लहानग्या कार्यकर्त्याचा शिसीष्टांग णमस्कार! तुमी सांगितल्याप्रमाणे सायेबान्ला घेऊन सुरक्शित सुरतला पोचलो. प्रवासात काही त्रास झाला नाही. (साहेबांनी धिला नाही! मोटे सायेब डब्यात असल्याने आपले साहेब नीट होते!) ‘हाँलिडे इन’ नावाच्या एका भारीतल्या भारी होटलमध्ये सायेबान्ला आनि इतर मंत्रीलोकांन्ला ठेवले आहे. (रुम गारीगार आहेत!) रेल्वे ष्टेशनवर आमाला नेयाला बैलगाड्या आल्या होत्या. गाड्या सजवलेल्या. बैलं बी सजवलेली. सर्वीकडे पांढ-या कपड्यातले फुडारी. बैल बी सगेद, फुडारी बी सफेद! तेवड्यात एका कार्यकर्त्याने सर्व्यांना गांधीटोप्या घातल्या. घातल्या म्हंजे हातात धिल्या. (डायरेक टोपी घालुन घेनारा कशाला राष्ट्रवादीत येईल?) एका चस्मिष्ट मानसानी ‘मला टोपी द्या ना’ म्हनुन जाम हट्ट केला. शेवटी सायेबांनीच त्याच्या डोक्यावर टोपी चेपली. त्याचे नाव रमेश परभू का काय असल्याचे नंतर कळाले! असो!!
जाम गर्दी झाली. कार्यकर्त्याने बैलांनाबी टोप्या चढवल्या! त्या गर्दीत बैलं कुटं हायेत, हेच कळे ना!! अंदाजानीच मोठ्या सायेबांनी (गाडीवान दा!!दा!!) कासरा हातात घेतला, आणि “हिर्रर्र हिक- हिक..” अशी आणभविक हाळी घातली. पन बैलं ढिम्म, कार्यकर्ते मात्र चालू लागले! मग कुनाच्या तरी लक्षात आले की सायेबांनी कासरा हातात धरलेला नसुन दुस-या कुना मंत्र्याच्या गळ्यातला हार धरला आहे!! मग गरबड उडाली, कुनीतरी खाली पडलेल कासरा सायेबांच्या हातात धिला. बैलं बी हुशार सायेबांच्या हातात कासरा आल्याचे बघुन इमानदारीत चालु पडली! मोठ्या सायेबांनी डायरेक ‘हाँलिडे इन’ पोर्चमध्ये बैलगाडी पार्क केली. बैलाच्या पुठ्ठ्यावर प्रेमानी थाप ठोकुन ते आत गेले. सायेबांनी प्रेमानी थाप मारली, पन त्यो बैल टरकला! हाटेलचे कर्मचारी पोर्च धुताना दिसले!
वैणी, हिते दारुबंदी आहे, आणि जेवन शाकाहारी! (सुरतेला अधिवेशन घेन्याचे हे खरे कारन!) ब-याच कार्यकर्त्यांनी वापीवरुन अपडाऊन करायचे ठरवले आहे. गुजरातमध्ये आपल्या आबा पाटलांची पंचाईत आहे. दारुबंदीमुळे बार नाहीत, डान्सबार नाहीत, म्हंजे आमच्या आबांची बोलती बं! (याला म्हंतात राजकारन!)
आपल्या सायेबान्ला उनाचा थोडा त्रास झाला, पन मी त्यांना पंकजभौचा रेबँन गाँगल नेऊन दिला धिला आहे! (गाँगल घालुन बाळासाहेब ठाक-यांसारखे फिरतात!) इतर काळजीचे काही कारन नाही. एताना दोन किलो खमन ढोकळा आनीन!
मोठ्यांस आर्शिवाद. लहानास नमस्कार!
आपला…
–ब्रिटीश नंदी