in

बत्ती गुल!

नमस्कार मित्रांनो,
बरेच दिवसांपासून तुम्हां सर्वांची भेट घ्यायचा विचार होता, पण काय करणार? ग्रह जुळत नव्हते. या कम्प्युटर नांवाच्या गृहस्थाचे आणि माझेही ग्रह फारसे जुळत नाहीत. कम्प्युटरवर हात चालवायचा माझा मूड असतो तेव्हां साहेबांचा मूड नसतो. आणि जेव्हां दोघांचेही ग्रह जुळतात बरोब्बर तेव्हां “बत्ती गुल” असते. कळतंय ना मी काय म्हणतोय ते! निवडणुकीचा दिवस होता, म्हटलं सगळं नीट जमून येईल, तर कम्प्युटरवर थोडी बोटं फिरवावीत. पहाटे ७.३० वाजतां उठलो आणि कम्प्युटर समोर बसलो.

“कम्प्य़ुटरवर बसायचा विचार दिसतोय”, मिसेस म्हणाली. माझ्या उत्तराची वाट न पहाताच (आत्ता यांत नवीन काय आहे म्हणा!), ती उत्तरली, “बत्ती गुल व्हायचे चान्सेस आहेत.”

आधी मी मोठा उसासा टाकला… मग मोठ्यानं हसलो. “श्रीमतीजी, आज निवडणुकीचा दिवस आहे. बत्ती गुल करायची हिम्मत होणार नाही त्यांची.” मोठ्या थाटाने मी कम्प्युटर ऑन केला. पुढल्याच क्षणी थोडे विचित्र आवाज़ आले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. पाठीमागून एक मोठा उसासा आणि हसण्याचे आवाज़ ऐकू आले. ते आवाज़ कुठून आले हे कळण्यासाठी अर्थांतच मागे वळून पहाण्याची गरज़ नव्हती. (बायकोला ’अर्धांगिनी’ का म्हणतात ते आत्तां लक्षांत आलं! तुमच्याही लक्षात आलं असेलच म्हणा!) कुणातरी अज्ञात व्यक्तीला मनातल्या मनात शिव्या टाकत मी उठलो आणि स्वत:ला पुन्हां पलंगावर झोंकून दिलं.

डोळा लागायच्या आत “अर्धांगिनी”चं खिदळणं कानांवर पडलं. ती म्हणत होती, “इलेक्ट्रिसिटी परत आलीय. तुम्हीं कम्प्युटर सुरु करुं शकता.” मी तोंडावर पाण्याचे चार फवारे मारले आणि परत कम्प्युटर स्टार्ट केला. स्वत:लाच खुष करण्यासाठी मी स्वत:शीच पुटपुटलो, “अरे बाबा, मघाची बत्ती गुल हा केवळ एक अपघात होता. तूं आपलं काम सुरु ठेव.” अखेरीस कम्प्युटर सुरु झाला आणि मी एम.एस.ई.डी.सी. ला धन्यवाद दिले. (कृपया या M.S.E.D.C.चं स्पष्टीकरण द्यायला सांगू नका.) पण “धन्यवादा”तला ’धन्य’ पूर्ण व्हायच्या आधीच परत एकदा कम्प्युटर वर अंधार पसरला. हा अनुभव मला नवीन नव्हता, पण पहिल्यांदाच त्या अंधारलेल्या पडद्यावर मला एक दृश्य दिसूं लागलं ते खालीलप्रमाणे होतं.
इलेक्ट्रिसिटी बोर्डाचं नियंत्रण केंद्र. सकाळची वेळ. दोन-तीन कर्मचारी पेंगाळलेल्या डोळ्यांनी प्रवेश करतात. त्यांची नांवं अशी काहीतरी असावीत: पाण्डू, लाण्डू, माण्डू, साण्डू… किंवा गा….
पाण्डू : अरे भाई, कुणी Evershine Cityची बत्ती गुल केली की नाय?
माण्डू : ऐं, किती वाजले? मला वाटलं की आज एका तासानं बत्ती गुल करायची.
पाण्डू : आरं, तुला काय पण समजत नाय, माण्डू. बत्ती गुल कर …आत्ताच करून टाक बेगीन.
( माण्डू बेगीनशान बत्ती गुल करतो आणि Evershine Cityमध्ये अंधार पसरतो. कर्मचारी माणसं डुलक्या घेवू लागतात. तेवढ्यात लाण्डू जांभया देत आंत येतो. )
लाण्डू : च्यायला मारी.. कुणा गाढवानं Evershineची बत्ती गुल केली?
माण्डू : मला पाण्डूनं सांगितलं म्हणूनशान मी बत्ती गुल केली. काय लोच्या झाला की काय़?
लाण्डू : पाण्डूच्या बैलाचा घॊ. माण्ड्या, तुला म्यां सांगतुय, Evershine City ची बत्ती ऑन कर. आत्ताच्या आत्ता.
( माण्डू switch on करतो. पुन्हा Evershine City चमकायला लागते. नुकताच झोपेतून जागा झालेला गा… आंत येतो. )
गा.. : आयच्या मारी. इथं काय लोचा चाललाय कुणी सांगल का मला? Evershine Cityची बत्ती गुल करायच्या येळला बत्ती चालू कशी काय? बत्ती गुल कर. आत्ता.
माण्डू : पण साहेब, आज निवडणूक हाय न्हवं?
गा.. : च्यायला मारी. निवडणूक गेली खड्ड्यात. हित्तं साहेब कोण? तू … का मी?
माण्डू (लाचारपणे हंसत) : साहेब, साहेब तुम्हीच. काय डाउट हाय की काय?
गा.. : मग मी सांगतो, तस्सं करायचं. समज़लं?
माण्डू : व्हय साहेब. तुमची ऑर्डर म्हणजी ऑर्डर. ही घ्या, Evershineची बत्ती गुल.
( परत एकदा Evershine Cityत अंधारच अंधार पसरतो. हा अंधार आणि प्रकाशाचा खेळ बराच वेळ चालू रहातो. अर्थातच बिचार्‍या Evershineच्या लोकांना बत्ती येतेय का गुल होतेय कळत नाही … त्याच बिचार्‍या गोंधळेलेल्या लोकांपैकी मी ही एक असतो. )
मित्रांनों, तर सांगायचा मुद्दा हा आहे की निवडणूका असोत अथवा नसोत, अंधारात असलेला माणूस अंधारात चाचपडत रहायची सवय लावून घेतो… दुसरं करणार तरी काय, नाही का? आत्ता हा ब्लॉग लिहिणार म्हणून कबूल केलंय तर झोपेच्या वेळी जागं राहून काम करावंच लागणार. काय, कळतय ना मी काय म्हणतोय ते? का झाली बत्ती गुल?

लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई पूर्व

Written by Ashish

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पु. ल. देशपांडे, अखेरचा प्रवास

भेंडीची भाजी आणि भाकरी शैली! (ब्रिटिश नंदी)