लिझ्झीची अन माझी ओळख साधारण आठवड्यापुरती मर्यादित होती. खरं सांगायचं तर सुरवाती-सुरवातीला मला तिचं फारसं कौतुक देखील नव्हतं. पण जसजसे मी तिच्या सहवासात दिवस घालवायला लागलो, तसतशी ती मला हळूहळू आवडूं लागली. आणि तसं पाहिलं तर हे साहजिकच होतं. आपल्या जवळचीं माणसं, आपले नातेवाईक व मित्रमंडळी, आपल्यापासून दूर असली की आपण कुणावर प्रेम करणं किंवा कुणी आपल्यावर प्रेम करणं या गोष्टीचा एक वेगळाच नशा चढायला लागतो. तुम्हां सर्वांबद्दल मी खात्रीदायक सांगूं शकत नाहीं, पण माझ्या बाबतीत हे खरं ठरलं होतं.
ही गोष्ट साठीच्या सुरवातीची आहे … म्हणजे माझ्या साठीतील नाही, पण १९६०च्या सुरवातीची आहे. मी आर्मीत (Army Service Corps) भरती होऊन आठ महिन्यांचा अवधी लोटला होता. १९६२ मध्यें मी सैन्यात भरती झाल्यापासून घरच्या लोकांपासून दूर रहाण्याचं सुरू झालेलं सत्र केव्हां संपेल हे माझं मलाच माहीत नव्हतं. याआधी मी घराचं सुरक्षाचक्र सोडून कधीच दूर गेलेलो नव्हतो. फारफार तर दोनचार दिवसांकरितां गेलेलो असेन, पण एवढ्या दीर्घ अवधीकरितां कधीच नाहीं. सगळ्यांकडेच मिळूनमिसळून न रहायच्या सवयीमुळे जवळचे असे मित्र सुद्धां नव्हते. मी नेहमींच माझ्या घराच्या व घरवाल्यांच्या मर्यादित चौकटीत वावरत असायचो. पण —
पण नोव्हेंबर १९६२च्या त्या एका सकाळी कुणालाहि न सांगतां मी आर्मीत भरती झालो व माझ्या आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरवात झाली. (आतां मी आर्मीत मुळी भरतीच का झालो ही एक वेगळीच कथा आहे !) आणि अगदी पहिल्यांदाच — आणि हे सर्व किती दिवस, महीने किंवा वर्षं चालणार होतं याची मला निदान त्यावेळी तरी किंचितसुद्धां कल्पना नव्हती — मला सर्वांपासून दूर रहावं लागणार होतं. पण या गोष्टीला मी काही एकटाच अपवाद नव्हतों. जसं इतर लोकांच्या बाबतीत घडतं तसं मला सुद्धां असं एकटं रहाण्याची सवय लागत गेली. अर्थातच बर्याच वेळां मला भयंकर एकटं आणि एकाकी वाटायचं.
मी इतर लोकांमध्ये फारसा कधीच मिसळत नव्हतों, पण आसपासच्या छोट्या मित्रमंडळीकडे माझं सूत मस्त जमत गेलं. सुरवातीच्या बेँगलोरमधील (सध्या बंगलुरू असावं बहुतेक!) ट्रेनींगनंतर माझी बदली पुण्याला झाली. मी मनातल्या मनात विचार केला, चला, निदान पुणे बॉंबे (आताचं मुंबई) पासून बरंच जवळ होतं. दुदैर्वाने पुण्यात देखील माझ्या खास ओळखी नव्हत्या. मात्र, लवकरच माझी ओळख कुलकर्णी परिवाराकडे झाली. कुलकर्णी सर आर्मीत (Army Ordinance Corps) मेजरच्या पदवीवर होते. मेजर कुलकर्णी आमच्या सारस्वत समाजातील होते व त्यांनी मला लगेच जवळ करून घेतलं. अर्थांतच माझी जवळीक त्यांच्या मुलांकडे, मुलगा विवेक व मुलगी स्मिता, अधिक होती. मेजर कुलकर्णी दीर्घ काळाकरिता उत्तर भारतात, बर्याच वेळी महिन्याहून जास्त दिवस, बदलीवर असत, त्यामुळे त्यांची व माझी भेट कमीच व्हायची. मी माझा बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायचो. आणि अशाच एका प्रसंगी मी लिझ्झीला पाहिलं. काही दिवसांनी तिच्या विषयी माझ्या मनात एक विचित्र आकर्षण निर्माण झालं. मित्रांनो, हें प्रथमदर्शनी प्रेम होतं अशांतील प्रकार मात्र नव्हता. मी आधीच सांगितल्याप्रमाणॆ जसजसा मी लिझ्झीच्या सहवासात रहात गेलो, तसतसं या आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होत गेलं. कुलकर्णी परिवारात लिझ्झीचा जन्म झालेला नसला तरी त्या सर्वांनी तिला आपल्या परिवारापैकीच एक म्हणून वाढवलं होतं — अगदी ती जन्माला आल्यापासून.
अगदी पहिल्यांदाच मी लिझ्झीच्या घरीं, म्हणजे मेजर कुलकर्णींच्या घरीं गेलो, तेव्हां मी सैन्याचा हिरवा गणवेष परिधान केलेला होता. लिझ्झीने माझा तो ओळखीचा वाटणारा गणवेष पाहिला व ती माझ्याकडे धावत आली. लिझ्झीचं हे विचित्र वागणं विजय व स्मिताला फारसं आवडलेलं दिसलं नाहीं, कारण ती दोघं नेहमी तिच्याचकडे खेळायचीं, आणि त्यांना वाटायचं की लिझ्झीनं फक्त त्यांच्याशीच खेळावं. पण खरं सांगायचं तर मी त्या क्षणीच लिझ्झीच्या प्रेमात पडलो. मी तिला माझ्या मांडीवर बसवून घेतलं व तिचे लाड करायला लागलो. ती सुद्धां भलतीच खुश झाली व तिने मला अंगभर चाटायला सुरवात केली.
माझ्यावर प्रेम करणारे सगेसोयरे माझ्यापासून दूर असल्याने मला लिझ्झीचे ते चाटणं खूपच रोमांचकारी वाटलं. मी काय म्हणतोय ते कळतंय ना तुम्हांला? अशा वेळीं एका कुत्र्याचं (लिझ्झीच्या संदर्भात कुत्रीचं) चाटणं रोमांचक वाटणं अगदी साहजिकच होतं. हो मित्रांनो, लिझ्झी कुलकर्णी परिवारातील एक पाळीव कुत्री होती. पण थांबा, हा आमच्या प्रेमकहाणीचा अंत नव्हता. ही सुरवातच होती म्हणा ना. लवकरच मीसुद्धां त्या परिवाराचा एक अविभाज्य हिस्सा बनलॊ, आणि बराच फावला वेळ त्यांच्या घरी घालवायला लागलो. कधीकधी मी रात्री तिथेच झोपायचो आणि सकाळ झाली की लवकर उठून परत बॅरेक्सवर निघून यायचो. वेळेवर ड्यूटीवर हज़र रहाण्याची खबरदारी घेतली तर एवढं स्वातंत्र्य मला माझ्या वरिष्टांकडून मिळायचं कारण ऑफिसमधे सर्वांनाच माहीत होतं की मी मेजर कुलकर्णींच्या परिवारापैकीच एक होतो.
एका सकाळी तिथं रात्र घालवल्यानंतर नेहमींप्रमाणे मी सकाळी ड्यूटीवर यायला निघालो. चालतांना मला सारखं जाणवत राहिलं की कुणीतरी चपळाईनं माझा पाठलाग करीत होतं. जेव्हां मी अचानक पाठी वळायचो, तेव्हां तो “कुणीतरी” पटकन लपायचा. हा लपंडाव बराच वेळ चालू राहिला. एव्हांपर्यंत त्यांच्या घरापासून बरंच अंतर पार करून मी माझ्या बॅरेक्सच्या जवळ येऊन पोचलॊ होतों. आतां माझ्या लक्षांत आलं होतं की माझा पाठलाग करणारा तो कुणीतरी दुसरातिसरा नसून माझी ’मैत्रीण’ लिझ्झीच होती. माझ्या हे लक्षांत येईपर्यंत एव्हांना खूप उशीर झाला होता आणि मागे वळून तिला परत घरी घेऊन जाणं मला मुळींच परवडलं नसतं. लिझ्झी इतकी चाणाक्ष होती की तिच्या मागावर मला वळलेलं पहातांच ती कुठंतरी लपली असती.
मी तिला माझ्यामागून बॅरेक्सपर्यंत येऊं दिलं. एका कुत्र्याला, सॉरी, कुत्रीला, बॅरेक्सवर ठेवणं आर्मीच्या कायद्याविरुद्ध व शिस्तीविरुद्ध ठरलं असतं, पण माझा अगदीच नाईलाज होता. मी दुसरं कांहीसुद्धां करणं म्हणजे लिझ्झीला गमावण्यासारखं होतं. माझ्या इतर सहकार्यांनी लिझ्झीला खायला घालण्यात व तिच्यासाठी उबदार पलंग तयार करण्यात मला बरीच मदत केली. लिझ्झीच्या गायब होण्याने कुलकर्णींच्या घरी जो कांही गोंधळ माजला असेल त्याची मला संपूर्ण कल्पना नसली तरी एवढं नक्कीच माहीत होतं की लिझ्झीच्या गायब होण्याने सर्वजण काळजीत असतील.
दुसर्या दिवशी भल्या पहाटेच बॅरेक्समधून मी लिझ्झीला घेऊन तिला तिच्या हक्काच्या घरी सोडायला निघालो. आदल्या रात्रीं तिनं केवढी भयंकर भानगड करून ठेवली होती याची थॊडीशी कल्पना एव्हांना लिझ्झीला देखील आली असावी. त्यांच्या घराजवळ पोचतांक्षणींच लिझ्झीनं जोरजोरांत भुंकायला सुरवात केली. तिचं भुंकणं ऐकून विजय व स्मिता बाहेर धावत आले आणि त्यांना पाहता क्षणीच लिझ्झीनं त्यांच्या अंगावर उडी मारून त्यांना प्रेमानं चाटायला सुरवात केली. विजय आणि स्मिताचे डोळे खुशीच्या आसवांनी भरलेले होते. सौ. कुलकर्णी म्हणाल्या की आदल्या रात्री त्यांच्यापैकी कुणाचाहि डोळा लागला नव्हता. बहुतेक त्यांना अंधुकशी कल्पना आली होती, माझा गणवेष पाहून लिझ्झीला वाटलं असावं की ती आपल्या मालकाचाच पाठलाग करीत असावी. पण जेव्हां लिझ्झीला आपली चूक कळाली तोपर्यंत बराच उशीर झालेला होता. असो, म्हटलंच आहे ना, “ज्याचा शेवट गोड असतो …
या प्रसंगाला बरीच वर्षं लोटली आहेत. विजय व स्मिताची लग्नं झाली असतील. त्यांची मुलंसुद्धां आतां मोठी झाली असतील. मी आर्मी सोडून बरीच वर्षं झालीयत व शक्य आहे कुलकर्णी परिवार मला विसरला देखील असेल. त्यांच्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल-नसेल, मला माहीत नाहीं. पाळीव प्राणी माणसाचा मानसिक त्राण कमी करायला उपयुक्त ठरतात असं मानसशास्त्रांत मानलं जातं. पण माझ्या बाबतीत याचं प्रात्यक्षिक मला दिलं होतं लिझ्झीनं !
लक्ष्मीनारायण हटंगडी
(suneelhattangadi@gmail.com)
मस्तच लेख फार आवडला.मी पोलीस खात्यात अशाच भुभुंवर प्रेम करीत असे. ही पहा
http://bit.ly/9GKQUA