in

नाना ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’

Natsamarat Moview Review
Natsamarat Moview Review

वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकावर आधारीत ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’ हा चित्रपट आहे. नाटक आणि चित्रपट यांत जमीन-आस्मानाचं अंतर असतं. चित्रपटाचं माध्यम भव्य आहे. नाटकाला काही मर्यादा असतात. पण मर्यादा हेच नाटकाचं वैशिष्ट्य असतं. त्या मर्यादेत राहून केवळ एका रंगमंचावर तुम्हाला अखंड विश्व उभं करायचं असतं. म्हणून चित्रपट व नाटक ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. यात श्रेष्ठत्व कुणालाच बहाल करता येत नाही. दोन्ही माध्यमं आपापल्या जागी ठामपणे उभी आहेत. तुम्ही जर नटसम्राट हे नाटक पाहिलं असेल, तर ते काही वेळेसाठी विसरुन ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रवेश करावा. त्यामुळे नाटकात असं दाखवलं होतं, चित्रपटात असं नाही दाखवलं. नाटकातले अप्पासाहेब वेगळे होते, चित्रपटातले वेगळे आहेत, वगैरे वगैरे अशी तुलना करणं कटाक्षानं टाळलं जाईल. मुळात नाटक आणि सिनेमाची तुलना होऊ शकत नाही. ८ – १० प्रवेशात तुम्हाला नाटक मांडायचं असतं. चित्रपटांत अनेक सीन्स असतात. चित्रपटाला पटकथा असते. म्हणून मूळ नाटकाचा गाभा हरवून न देता नव्याने पटकथा मांडण्यात आली आहे. स्टोरी लाईनमध्ये म्हणजेच मूळ कथानकामध्ये हलकासा बदल करण्यात आलेला आहे. चित्रपटात दोन नवे प्रमुख पात्र घेण्यात आलेले आहेत. एक सिद्धार्थ, जो आपली विदेशातली प्रशस्त नोकरी सोडून नाटकाच्या वेडाने भारतात परततो, दुरसं पात्र म्हणजे राम अभ्यंकर जो नटसम्राट अप्पासाहेब बेलवकरांचा मित्र आहे व स्वतः एक उत्कृष्ट नट आहे. पण नशीबाने या नटाला साथ दिली नाही.

चित्रपट हा नाटकापेक्षा किती वेगळा असतो याचं भान पहिल्या सीनपासून येतं. चहाच्या किटलीत चहा ओतला जातो इथून सीन उघडतो. एक वयोवृद्ध दाढी वाढलेली व्यक्ती बसलेल्या ग्राहकांना चहा देत आहे व काहीतरी पुटपुटत आहे. तो त्यानेच निभावलेल्या भुमिकांचे संवाद म्हणत असतो. काही लोक आश्चर्यानं व कौतुकानं या माणसाकडे पाहतात. तिथेच सिद्धार्थ बसलेला असतो. सिद्धार्थ हा उच्चशिक्षित तरुण आहे. नाटकाच्या वेडापायी आपली प्रशस्त नोकरी सोडतो. त्याला अप्पासाहेब बेलवकर दिसतात. तो पाहताक्षणी अप्पासाहेबांना ओळखतो. पण हे अप्पासाहेबांपासून लपवून ठेवतो. बेलवलकर जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करतो. बेलवलकरांकडून नाटकाविषयी त्याला जाणून घ्यायचं असतं. बेलवलकर बर्‍याचदा त्याला सांगतात की माझा पाठलाग करु नकोस. पण तो काही ऐकत नाही. एकदा नाट्यगृहाला आग लागली अशी बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि बेलवलकर अस्वस्थ होतात व ते तडक नाट्यगृहाकडे निघतात. त्यांच्या पाठोपाठ सिद्धार्थ जातो आणि आग लागलेल्या नाट्यगृहात फ्लॅशबॅकच्या स्वरुपातून सुरु होते नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर यांची शोकांतिका. हा फरक आहे नाटकातील प्रवेश आणि पटकथेमधला. जळलेलं नाट्यगृह आणि फ्लॅशबॅक ही महेश मांजरेकर यांनी दिलेली मेजवानीच आहे. हे समिकरण खुप छान जमलंय. ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला नट स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. आपली इस्टेट, बचत सर्व काही मुलांच्या नावावर करुन मोकळा होतो. हा निर्णय बेलवलकरांचा मित्र राम अभ्यंकर आणि बेलवलकारांच्या पत्नीला पटत नाही. बेलवलकरांचं स्वच्छंदी, बिनधास्त वागणं त्यांच्या सुनेला आणि मुलाला खटकतं. ते आपल्या मुलीकडे राहायला जातात. पण त्यांचं वागणं मुलीलाही खटकतं व त्यांच्यावर चोरीचा आळ घेण्यात येतो. अर्थात त्यांनी चोरी केलेली नसते हे सिद्ध होतं. ते घर सोडण्याचा निर्णय घेतात. मुलीनं बजावलेलं असतं की घर सोडायचं नाही. तरी पावसाळ्या रात्री ते घर सोडतात. त्या प्रवासात बेलवलकरांच्या पत्नीचा मृत्यू होतो. महान नटसम्राट रस्त्यावर राहू लागतो. चहाच्या दुकानात नोकरी करतो. त्यांची मुलं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. या कथेमध्ये राम अभ्यंकर या उपेक्षित राहिलेल्या नटाची कथा उत्तमरित्या दखवण्यात आलेली आहे. शिरवाडकरांच्या मूळ नाटकात राम अभ्यंकरांचा उल्लेखही नाही. राम अभ्यंकर हे बेलवकरांपेक्षा उत्तम नट, दिसायला सुंदर. तरीही रसिकांनी बेलवकरांना नटसम्राट बनवलं. ही खंत चित्रपटात अनेकदा अभ्यंकरांच्या तोंडी दाखवली आहेच. एका सीनमध्ये तर बेलवलकरही कबूल करतात की अभ्यंकर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नट आहेत. सिद्धार्थ हे पात्र सुद्धा असंच अनपेक्षितपणे प्रेक्षकांच्या भेटीला येतं. पण ते खटकत नाही. उलट चित्रपटाची कथा पुढे ढलकत राहतं.

राम अभ्यंकरांची भुमिका अतिशय समर्थपणे विक्रम गोखले यांनी निभावली आहे. नाना पाटेकर आणि विक्रम गोखले या दोघांचे एकत्रीत सीन्स इतके बहारदार झाले आहेत की अभिनयाच्या प्रांगणात वावरणार्‍या कलाकारांसाठी ते अभिनयाची कार्यशाळाच ठरले आहेत. विक्रम गोखले यांचा शेवटचा सीन तर इतका नाटकी तरीही कथानकाला साजेसा आणि गोखलेंच्या अभिनयाचं कौशल्य दाखवणारा आहे. विक्रम गोखलेंचे हाव-भाव कमी अधिक होणारा धीरगंभीर आवाज. यामुळे तो सीन चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट सीन्सपैकी एक आहे. अजित परब (मकरंद, बेलवलकरांचा मुलगा), नेहा पेंडसे (नेहा, बेलवलकरांची सून) यांची भुमिका छान झाली आहे. मृण्मयी देशपांडे (विद्या, बेलवलकरांची मुलगी) हिने उत्तम अभिनय केलाय. तिचं गोड दिसणं, हे तिच्या भुमिकेची जमेची बाजू ठरते. सुनील बर्वे (राहूल बर्वे, बेलवलकरांचा जावई) यांनी अतिशय समतोल राखणारी भुमिका निभावली आहे. हळू आणि कमी बोलणं, जास्त एक्स्रेस न होणं, एक टिपिकल सज्जन माणूस अशी ही भुमिका आहे. नेहमीप्रमाणे बर्वेंचा अभिनय उत्कृष्टच आहे. मेधा मांजरेकर (सरकार, बेलवलकरांच्या पत्नी) या चित्रपटातील महत्वाचे पात्र असूनही यांना फार कमी संवाद आहेत. पण त्यांची बॉडी लॅंग्वेज व त्यांनी डोळ्यांनी केलेला अभिनय जबरदस्त आहे. कमी पण महत्वाचे बोलणे. आपल्या नवर्‍याचा अपमान सहन न होणे. आपला नवरा नट आहे. तो दौर्‍यावर असतो, त्याच्या गैरहाजिरीमध्ये कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. हे सगळे भाव त्यांच्या डोळ्यात दिसतात. अभिनयाची दुनिया तशी रंगीत दुनिया. या रंगीत दुनियेत स्त्री पुरुषांचे संबंधही रंगीत असतात. हे ती जाणून आहे, तरीही तिला नवर्‍याबद्दल कुठलीच तक्रार नाही. सीता, सावित्री या ज्या हिंदू धर्माच्या आदर्श स्त्रीया आहेत. त्याची एक झलक म्हणजे नटसम्राटाची पत्नी. तिची हौस सुद्धा खुपच साधी आहे. त्यांच्या गावाच्या घरामागील अंगणात तुळशी वृंदावन बांधणं ही या बाईची राहून गेलेली हौसआहे व ती नवर्‍याला पूर्ण करण्यास सांगते. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली मेधा मांजजेकरांनी भारतातील त्यागवृत्तीच्या स्त्रीचं दर्शन घडवून आणलं आहे. राजा हे मूळ नाटकात असलेलं पात्र इथे वेगळ्या पद्धतीनं पहायला मिळतं. हे पात्र सुद्धा सुंदर रंगवलंय. संदिप पाठकने दारुड्याची भुमिका निभावली आहे. छोट्या भुमिकेत तोही प्रेक्षकांच्या लक्षात राहतो. जितेंद्र जोशी सुद्धा या चित्रपटात आहे. त्यनेही आपली भुमिका चांगली केलीय. आता महत्वाचं पात्र म्हणजे अप्पासाहेब बेलवलकर. नाना पटेकर यांनी त्यांच्याकडे जे काही होतं. ते सर्व या नटसम्राटाला अर्पण केलं आहे. या चित्रपटाची थीम जरी गंभीर असली तरी हसत खेळत चित्रपट पुढे जातो. सर्व प्रसंगात नाना उजवे ठरतात. नानांनी खुपच वेगळ्या पद्धतीने ही भुमिका साकारली आहे. यात बर्‍याचदा नानांचा टिपिकल स्पर्श होतो. पण तो खटकत नाही. अनेक अग्रेसिव्ह सीन्समध्ये नाना स्पष्टपणे जाणवतात. पण अनेक नटांनी नटसम्राट ही भुमिका साकारली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारे ही भुमिका निभावलेली आहे. नाना यांनी त्यांच्या पद्धतीने ही भुमिका साकारली व ती प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. फ्रेममध्ये असताना त्यांची बॉडी लॅंग्वेज आणि क्लोज अपमध्ये त्यांनी दिलेले एक्स्प्रेशन उत्तम आहेत. हे एका उत्कृष्ट नटालाच जमतं. नानांचा अनुभव, त्यांची इतक्या वर्षांची अभिनयाची तपस्या त्यांनी या भुमिकेत ओतली आहे. नाना पाटेकर यांच्या आयुष्यातली ही सर्वोत्कृष्ट भुमिका आहे. नानांनी सगळ्या भुमिका उत्तम निभावल्या आहेत. परंतु नाना पाटेकर यांच्यामुळे नटसम्राट या भुमिकेला न्याय मिळाला आहे व नटसम्राट या भुमिकेमुळे नानांच्या अभिनय कौशल्याला, प्रवासाला न्याय मिळाला आहे असंच म्हणावसं वाटतं.

उत्तम दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, छायांकन आणि बरंच काही असं या चित्रपटाचं गणीत आहे. महेश मांजरेकरांनी नटसम्राट ही कलाकृती चित्रपटाद्वारे मांडण्याचं आवाहन स्वीकारलं व ते त्यांनी उत्तमरीतीने निभावलं आहे. कथेत थोडासा बदल करुनही शिरवाडकरांच्या मूळ संहितेला कुठेच धक्का बसू दिलेला नाही. शिरवाडकर जर आज असते तर ते मांजरेकरांच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणाले असते. नटसम्राटाचा शेवटचा संवाद, यात ते त्यांनी निभवलेल्या भुमिकांचं वर्णन करुन सांगत की मी आहे हॅम्लेट, मी आहे ऑथेलो, असं म्हणत म्हणत ते शेवटी म्हणतात मी आहे नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर… आणि चित्रपटगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या मांडीवर बसलेला माझा साडे-तीन वर्षांचा मुलगा सुद्धा टाळ्या वाजवतो. अप्पासाहेब जमीनीवर कोसळतात, सिद्धार्थ त्यांना धरतो. सगळी प्रमुख पात्रे अप्पासाहेबांच्या जवळ येतात. “कळलं का रे सिद्धार्था, असं असतं नाटक” असं म्हणत, आपल्या रक्ताच्या नातेवाईंकाकडे दुर्लक्ष करत अप्पासाहेब स्तब्ध होतात. ते काहीच बोलत नाहीत. एक अश्रूचा थेंब त्यांच्या डोळ्यांतून गालावर उतरतो. तो अश्रूचा थेंब तुम्हाला प्रत्येक प्रेक्षाकाच्या डोळ्यांतून उतरताना दिसतो. तो अश्रूचा थेंब तुमच्या डोळ्यांतूनही उतरत असतो. न कळत तुमचे हात अश्रूच्या थेबाचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचे प्रयत्न असफल होतात. कारण असे असंख्य अश्रूंचे थेंब तुमच्या डोळ्यातून उतरुन नटसम्राट नाना पाटेकर यांना सलामी देत असतात. खरंच असा नट होणे नाही… आबालवृद्धांनी बर्‍याचदा पहावा असा हा चित्रपट आहे, ‘नटसम्राट… असा नट होणे नाही’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी

नाटकार रा. ग. गडकरि

राज संन्यास – नाटकार रा. ग. गडकरि कि संभाजी ब्रिगेड?