in

इस रंग बदलती दुनियामे (ब्रिटिश नंदी)

मी कात्रजचा साधासुधा रंग बिंग बदलणारा शामेलिआँन सरडा आहे. गेल्या आठवड्यात दोन नाकतोडे मटकावून शांतपणे बसलेलो असताना अचानक आमची उचलबांगडी झाली आणि इथे बाद्रयांत येऊन पडलो! इथे आल्यावर लगेचच कळलं, की आपण साक्षात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आहोत! (काही काळ पांढरा फटक पडलो होतो! खोटे का बोला?) मा. बाळासाहेबांच्या नातवाचा सरडा निधन पावल्याने आमची नेमणुक झाल्याचेही कळले. नाही म्हंटले तरी आनंद झाला. आम्ही सरडोके असलो, तरी आम्हालाही राजकीय निष्ठा असते, म्हटलं! मा. बाळासाहेबांच्या आदरापोटी मी रोज पंधरा-वीस मिनिटे भगवा रंग धारण करतो. मानेभोवतीचा पंखा फुलवुन ढाण्या वाघाचा आवही आणतो! ज़मून जाते!! कात्रजला येणा-या कित्येक पोराटोरांना मी निव्वळ या अभिनिवेशावर टरकवले आहे! आम्ही शामेलिआँन मंडळी निरुपद्रवी असतो, हे फारसं कुणाला ठाऊक असतं?

 मी गेल्या आठवड्यात या बंगल्यात आलो. आधी इथं राहणारा सरडा सपासप रंग बदलायचा. चांगला पाळीव होता. बंद दाराआड मीटिंग सुरु झाली, की अशी उभी मान हलवायचा! कोकणासंबंधी चर्चा सुरु झाली की, एक पाय पुढे टाकून लेझिम खेळल्यासारखी स्टेप टाकायचा! हुशार होता, पण शेवटच्या मीटिगला तो नव्हता. तेवढ्यात दार ढकलुन आत आले, म्हणाले, ‘माझा रंग बदलणारा सरडा कुठाय?’ ..सोफ्यावर जोशी सर बसले होते. त्यांनी कानात जाँन्सन बड घातली! सुभाष देसाईसाहेब मोबाईलवर एसएमएस करत -हायले. खास(दार) संपादक संजयजी राऊत यांनी झटक्यात समोरचा टीव्हीचा च्यानल बदलला! ‘मला सलमानकडे जायचंय’, असं सांगून राजसाहेब उठून गेले! मिलिंद नार्वेकरनी झटक्यात काँम्प्युटरवर ‘गुगल’वर ‘शँमेलिआँन’ची माहिती मिळवण्यास सुरुवात केली!… “आणू हं आपण दुसरा सरडा!” दादोजी महाराजांनी चिरंजिवांची समजुत काढली. (इथे मिटिंग संपली म्हणे!) इथे मला कोरड्या फिशटँकमध्ये घालुन आणलं. सगळे मला बघायला गोळा झाले होते. खरं तर मला फिशटँकमध्ये ठेवण्याची गरज नव्हती, कितीही मोकळे सोडले, तरी आमच्यासारख्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत, पण याआधीचा सरडा पार कुंपण पार करुन निजधामास गेला! त्यामुळे आमच्या नशिबी हा फिशटँक! असो!! “सव्वा लाखाचा सरडा आहे, राव!” ‘कुणी तरी’ म्हणाले. “सव्वा लाखाचा होता बे, सरडोक्याला कसली आलीये किंमत!” ‘कुणी तरी’ परस्पर उत्तर दिलं. “सरडा पण सव्वा लाखाचा असू शकतो! साधासुधा वाटला की काय हा!! चांगला शामिलिन जातीचा आहे!” ‘कुणी तरी’ मुद्दा सोडत नव्हतं. “फार शामळू असतात हे सरडे! ‘डिस्कव्हरी’वर मी पाहिलाय!” ” अहो, म्हणुन तर त्याला शामिलिआन म्हणतात! हाहाहा!!” ‘कुणी तरी’ अत्यंत टुकार विनोद केला. “सरडा असो वा मासा! झाकलेला असेल तेव्हाच सव्वा लाखाचा असतो!”, असं म्हणत ‘कुणी तरी’ आमच्यावर पिवळा टाँवेल टाकला. तेव्हापासुन आमचीही पिवळी झाली आहे…. कातडी हो!!!

 

 – ब्रिटिश नंदी

Written by Ashish

One Comment

Leave a Reply
  1. भटक्या आणि ब्रिटीश नंदी

    माझ्या लहानपणी ‘भटक्या’ या टोपणनावाने ‘नवशक्ती’त लिहिणारया स्तंभलेखकाचे लिखाण मला आवडायचं. हा माणूस नंतर शिवसेनेचा आमदार वगैरे झाला व कांही काळानंतर त्याने त्याचं लिखाण थांबविले. ‘भटक्या’ फक्त मुंबईवर लिहायचा. या महानगरांत त्याच्या दृष्टीने जे कांही वावगं दिसेल तिथं तो अचूक पोहोचायचा व त्यावर भरभरून व निर्भिडपणे लिहायचा.

    अलीकडे ‘सकाळ’ मध्ये ‘ब्रिटीश नंदी’ या टोपणनावाने लिहिणारा स्तंभलेखक देखिल मला खूप आवडायला लागलाय. विनोदाची झालर असलेलं इतकं सहजसुंदर ‘राजकीय उपहासात्मक’ (political satire) लिखाण माझ्या नजरेत आत्तापर्यंत आलेलं नाही. ‘ब्रिटीश नंदी’ चं अजून एक वैशिष्टय म्हणजे तो प्रादेशिक उपभाषेचा (regional dialect) बेमालूम वापर करतो; मग ती मालवणी असुदेत की वऱ्हाडी किंवा ‘पश्चिम महाराष्ट्रीय’. आजचा त्याचा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री व गोव्याचे मुख्यमंत्री या दोघांतील मालवणी व कोंकणीतील संवाद तर एक masterpieceच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

भेंडीची भाजी आणि भाकरी शैली! (ब्रिटिश नंदी)

माझं सुद्धा क्रिकेट!