in

जेम्स लेन आणि आपण.

२३ जुलै ला राजु परुळेकर यांचा “जेम्स (बाबत चुकलेली) लेन” हा लेख अलकेमेस्ट्री या सदरात वाचला. लेख आवडला पण यावर चर्चा होणे आवश्यक आहे, त्या साठी हा लेख इथे पुन्हा देत आहे. आपण नक्कि वाचा आणि आपली प्रतिक्रिया कमेंट्स मधुन कळवा.

Raju Parulekar
Raju Parulekar

जेम्स डब्ल्यू. लेन हा लेखक प्राध्यापक असून तो मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा प्रमुख आहे. टेक्सास विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्याने एमटीएस आणि टी.एचडीच्या पदव्या प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून घेतल्या.

जेम्स लेननं ‘शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ हे वादग्रस्त आणि शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक पुस्तक लिहिलं. या वादग्रस्त पुस्तकात शिवाजी महाराजांची जी विपर्यस्त बदनामी त्याने केली ती करण्यामागचा त्याचा हेतू अजूनही कळलेला नाही. या पुस्तकाविरुद्ध आंदोलन करणाऱ्या व भाषणं ठोकणाऱ्या ८० टक्के जणांनी हे पुस्तक वाचलेलंही नाही. या पुस्तकावरून भांडारकर संस्था तोडण्यात आली वगैरे इतिहास आहे.
परंतु या पुस्तकाबाबत एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे, २००४ च्या १६ मार्चला ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात मुलाखत देताना ‘आपण या पुस्तकाच्या बंदीच्या विरोधात आहोत,’’ असं लालकृष्ण आडवाणी देशाचे उपपंतप्रधान व गृहमंत्री असताना ठामपणे म्हणाले होते. तेव्हा त्यांच्याबरोबर सत्तेचं श्रीखंड खाणारी शिवसेना कुठेच ब्र काढू शकली नाही. शिवाय हिंदुत्त्वाच्या आणि या महान मराठी राज्याच्या अभिमानासाठी सत्ता वा युती तोडण्याची साधी भाषाही केली नाही.

बाकी आताच्या सत्ताधारी पक्षांनी मराठा जातीचं ध्रुवीकरण करण्यासाठी हा इश्यू बराच काळ रेंगाळत ठेवला. मग त्या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. ती आता न्यायालयाने उठवली आणि पुन्हा राजकारण्यांच्या पावसाळ्यातल्या छत्र्या उघडल्या गेल्या.

जेम्स लेन याचा राग येण्याची जी मुख्य कारणं आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने महाराजांची जी बदनामी केलेली आहे ती एका इतिहास संशोधकाला काळीमा फासणारी आहे. त्यात कोणताही तर्क किंवा विश्लेषणाच्या आधारावर न करता हे सारं त्याने (त्याच्याच म्हणण्याप्रमाणे) सांगोवांगीच्या गप्पांमधून त्याला जे वाटेल ते लिहिलंय. त्याला या सांगोवांगीच्या गप्पांमधून असल्या भंपक गोष्टी कोणी सांगितल्या हा एका वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. पण ते कोण असू शकतील याचा आपल्या पूर्वग्रहदूषित मतांचा धांडोळा घेऊन आपले द्वेषमूलक स्कोअर सेटल केले जात आहेत. हे जेम्स लेनच्या गुन्ह्याएवढंच भयंकर आहे. शिवाय आपण शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालत होतो किंवा देशातून त्याचं उच्चाटन करणार आहोत ते मुळात नेटवर उपलब्ध आहे. अगदी त्यातल्या भयंकर, विपर्यस्त मजकुरासहीत! मग भांडारकर संस्था फोडून काय मिळवलं?

जेम्स लेनचा जो अधिक भयंकर गुन्हा आहे तो म्हणजे या पुस्तकात ही बदनामी महाराष्ट्रीयांच्या डोक्यावर खापर फोडून केलेली आहे. Maharashtrians tell jokes naughtily… हे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला चरचरवणारं आहे. आणि हार्वर्डसारख्या विद्यापीठात शिकलेल्या इतिहास संशोधकाला लाज वाटणारं आहे. या व्यतिरिक्त मध्ययुगातील मापदंड लावून महाराष्ट्र व भारत यांच्या मूल्यव्यवस्थेची चिकित्सा करणं हे अतिशय धक्कादायक आहे. कारण त्या काळातल्या पाश्चिमात्य व पौर्वात्य मूल्यव्यवस्थेत प्रचंड फरक होता. जग आजच्या प्रमाणे तेव्हा एवढं जवळ आलेलं नव्हतं.

पुस्तकाच्या ९१ क्रमांकाच्या पानावरचा मजकूरही अत्यंत आक्षेपार्ह आहे. तो म्हणजे, ‘‘व्यक्तिगत आयुष्यात शिवाजी महाराजांना सुख नव्हते. त्यांचा जनानखाना होता. त्यांची भूमिका व महत्त्वाकांक्षा मोठा राजा बनण्याची होती. या देशात स्वत:चं राज्य निर्माण करण्याची त्यांची भावना होती. इस्लामिक तख्त उलटवून टाकण्याची त्यांची इच्छाच नव्हती. उलट ते धार्मिक नव्हते. साधुसंतांबद्दल त्यांना फारसा आदर नव्हता.’’ ज्यासाठी मराठी माणूस खवळून उठला ती ही वाक्यं नव्हेत. पण ही वाक्यंसुद्धा शिवाजी महाराजांचं चरित्र व चारित्र्य ज्याला माहीत आहे त्याचं रक्त खवळून टाकते.

या सर्व काळात केंद्रात भाजपप्रणित शिवसेना पुरस्कृत सरकार होतं हे विशेष. त्यावेळी बराच इतिहास घडून गेलेला आहे.
महाराष्ट्रातल्या घराघरात महाराजांची कहाणी ही मुलामुलींच्या चारित्र्यसंवर्धनासाठी आणि आपल्या महाराष्ट्राचा मूळपुरुष म्हणून सांगितली जाते. न्यायालयांमध्ये काय चालतं हे सर्वानाच माहीत आहे. आता न्यायव्यवस्थेच्या चरित्र व चारित्र्यावर बोट ठेवलं तर बोट भ्रष्टाचाराने बरबटून निघेल. लोकशाहीत जनता सार्वभौम असते, न्यायालय नव्हे. भारताला जनतेनं स्वातंत्र्य मिळवून दिलं. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला कारण जनता लढली. तेव्हाही ही न्यायालयं संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ापासून सामान्य जनतेला परावृत्त करण्यासाठी त्यांना जबर शिक्षा ठोठावत होती.
आता प्रश्न उरतो की, काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा या विषयावर लढणाऱ्या प्रत्येकाने नेटवर जाऊन ते पुस्तक वाचायला हवं. आडवाणींना पुन्हा त्यांचं मत तेच आहे का, ते विचारायला हवं (म्हणजे ते रिटायर्ड व्हायला मोकळे.). ते आधी ‘जीना’ चुकले. मग ‘लेन’ चुकले. आता एवढी बोंबाबोंब करणाऱ्या शिवसेनेला त्या वेळी आपल्याच गृहमंत्र्याला जाब का विचारता आला नाही? बाळासाहेब ठाकरेंना हा प्रश्न विचारायला हवा की नको? की सत्ता आणि पैशाचं श्रीखंड मिळालं की महाराज कुणाला आठवतात? सामान्य जनतेला हे राजकारणी मूर्ख बनवतात ते हे असे.

या साऱ्यात दु:खद बाब अशी आहे की, आपण जेम्स लेनचं काहीही वाकडं करू शकणार नाही. आपण भवानी तलवार, वाघनखं, कोहिनूर हिरा तरी कुठे आणू शकलो? आपण गोऱ्या कातडीला फार मानतो. गोऱ्यांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केल्यामुळे हा न्यूनगंड आलेला आहे.
जेम्स लेनसारखे तथाकथित इतिहास संशोधक याचा फायदा उठवतात. बुद्धय़ांकामध्ये मराठी माणसं अनेक गोऱ्यांपेक्षा खूप जास्त पुढे आहेत. एकदा मानसिक गुलामगिरी काढली म्हणजे झालं. जेम्स लेनच्या निमित्ताने जी राजकीय धूळवड चाललेली आहे त्याचा संबंध वास्तविक शिवाजी महाराजांच्या मोठेपणाशी नसून आपण ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ आहोत अशा आरोळ्या मारण्यासाठी आहे. वास्तवात महाराज ते महाराज. त्यांनी शिवाजी पार्कात ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ यांप्रमाणे भाषणे न ठोकताही आपल्याला मराठी माणसाला आत्मसन्मान मिळवून दिला. जेम्स लेनची लायकी ती काय? शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळायची हिंमत खुद्द त्यांच्या शत्रूंनाही झाली नव्हती.

अशा लेनचा बदला घ्यायला मदनलाल धिंग्राच पाहिजेत. हे येऱ्यागबाळ्याचे काम नाही. इथे चार पुतळे जाळून आणि चार ब्राह्मणांना टरकवून काय होणार? न्यायालयं लेनच्या बाबतीत प्रेमळ असतील तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही लढाई लढली पाहिजे. आपले सर्व नेते मजा मारायला परदेशात शंभरवेळा जातील पण लेनचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन लढाई जिंकण्याची इच्छा यांपैकी कुणात आहे? कुणातही नाही! ते दिवस गेले. श्यामजी कृष्ण शर्मा, मदनलाल धिंग्रा, स्वा. सावरकर, सुभाषबाबू बोस परक्यांच्या भूमीत जाऊन या भूमीची लढाई लढले. असंख्य त्रास, अपमान पचवूनही.

जेम्स लेनच्या पुस्तकावर आपण जेवढं कमी बोलू, लिहू, बोंबाबोंब करू तेवढं लवकर ते पुस्तक मरेल. आपण इथे लेनचे पुतळे जाळून त्या पुस्तकाचं महत्त्व उगाचच वाढवत आहोत आणि लेनलाही मोठा करत आहोत. हे पुस्तक मी नीट वाचलंय. माझं मत हे की, या पुस्तकाला कोणताही खरा आंतरराष्ट्रीय दर्जाचा इतिहास संशोधक सरळ कचऱ्याच्या डब्यात टाकेल.

कुणाला याविरूद्ध लढाई लढायचीच असेल तर ती आंतरराष्ट्रीय पातळीवर लढावी लागेल. तो प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. नाहीतर लेन तिथे बीअरचे घुटके घेत मजा मारतोय आणि आपण आपल्याच संस्था फोडून नि लेनचे पुतळे जाळून आपलंच हसं करून घेत राहू. पण हे ‘प्रतिशिवाजी’, ‘अतिशिवाजी’ यांना कोण समजवणार?

असले प्रश्न सोडवण्यासाठी आधी प्रश्न नीट समजून घ्यावा लागतो. पण त्यात कोणालाही रस नाही. तो रस फक्त शिवाजी महाराजांना होता. त्यांना मानाचा मुजरा!
आपल्याला प्रश्नांचं उत्तर शोधायला जमत नाही म्हणून आपल्या अनुयायांनाच प्रश्नाचा भाग बनवणाऱ्यांपासून सावध राहा. ते जेम्स लेन एवढेच शिवाजीद्रोही आहेत. कळेल तुम्हाला.. हळुहळू..!

आपली प्रतिक्रिया नक्कि कळवा.

16 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली…

कोणासारखे काय करावं . . ?