मला आठवतंय मी लहान असतांना बरंच क्रिकेट खेळलं जात असे. पण हल्ली सगळ्या देशभर जेवढं क्रिकेटचं वारं पसरलेलं दिसतं तेवढं आमच्या काळी नक्कीच नसायचं. आपला कामधंदा संभाळून क्रिकेट बघितलं जायचं आणि खेळलं देखील जायचं. आज तसं नाही. जेव्हा पहावं तेव्हा, जिथं पहावं तिथं, ज्याला पहावं त्याला, क्रिकेटचा विषय! शाळेंतून शिक्षक काय किंवा विद्यार्थी, हातांतला ट्रॅंझिस्टर कानाला लावून असलेले दिसतात. बहुतेक सगळी ऑफिसं रिकामी पडललीं. कधीं नव्हे ते सिक लीव्हचे अर्ज साहेबाच्या टेबलावर पडलेले असतात. पण ते अर्ज बघायला साहेब सुद्धा कॅबीन मध्ये नसतो. रस्त्यारस्त्यातून, दुकानांदुकानांतून चालू असलेल्या टीव्ही वरून प्रसारित होत असलेल्या क्रिकेट मॅचेस बघायला ही तुंबड गर्दी! धोनीच्या टीमने दुसर्या टीमची केलेली धुलाई, किंवा दुसर्या टीमच्या हातून होत असलेली धोनीच्या टीमची धुलाई जीव मुठीत घेऊन लोकं पहात असतात. बरेच (आंबट)शौकीन असं म्हणतांना आढळतात, “ह्या लोकांपेक्षा आमच्या गल्लीतली मुलं सुद्धा चांगलं खेळून जिंकली असतीं”. थोडक्यात काय, सगळीकडे फक्त आणि फक्त क्रिकेटचं वारं! ह्या अशा वातावरणांत थोडं वारं माझ्याहि अंगात शिरलं तर नवल नाही. म्हणूनच आज मी माझ्या वाचक दोस्तांना माझे क्रिकेटविषयीचे काही निवडक अनुभव सांगणार आहे.
इतर प्रसिद्ध क्रिकेटपटुंप्रमाणॆ मी देखील अगदी लहानपणींच क्रिकेट खेळायला सुरवात केली. “मुलाचॆ पाय पाळण्यांत दिसतात या उक्तीप्रमाणे मी सुद्धा पहिला चेंडू पाळण्यात असतानांच फेकला होता.तेव्हां मी सुमारे एक वर्षाचा असेन. आमच्या घरी बर्याच बायका जमल्या होत्या. (त्यांची बडबड सहन होईना म्हणून असेल कदाचित) मी जोरजोराने रडायला सुरवात केली. मला शांत करायला म्हणून आईनं माझ्या हातांत एक रबरी चेंडू दिला. कांही वेळ गप्प राहून मी परत जोराचं भोकांड पसरलं. काय होतंय हे कुण्याच्या लक्षात यायच्या आधीच मी हातातला चेंडू नेम न धरताच बाहेर फेकला. माझं रडणं शांत झालं ते एका बाईच्या (ओ)रडण्याचा आवाज ऐकून. माझा नेम एकदम अचूक त्या बाईच्या नाकावर बसून तिचं नाक लाल-लाल झालं होतं. अर्थांतच ही होती माझी पहिली विकेट.
मी दुसरा बॉल फेकला त्यावेळी साधारण तीन-साडेतीन वर्षांचा असेन. मी एक वर्षाचा असताना गाजवलेले प्रताप विसरून बाबांनी मला परत चेंडूच खेळायला दिला होता. यावेळी मात्र मी माणसांवर नेम न रोखतां चेंडू थेट दिवाणखान्यातील महागड्या आरशावर फेकून मारला होता. किचनमधलं काम सोडून येऊन आईनं माझ्या मुस्काटीत दोन मारल्या तेव्हां मला माझा पराक्रम कळला. फरक एवढाच की ह्या वेळेला तोंड माझं लाल झालं होतं. एव्हांना माझ्या मनात क्रिकेटची भलतीच आवड निर्माण झाली होती. जरासा मोठा झाल्यावर देखील मी क्रिकेटचा नाद सोडला नव्हता. आमच्या कॉलनीच्या शेजारीच एक फ़िल्म स्टुडिओ होता. मुलं खेळताहेत असा एखादा सीन असला की स्टुडिओवाले आम्हां पोरांनाच बोलवायचे. पण माझ्या सोबतचीं पोरं इतकी दांडगट की मला कधी कॅमेराच्या समोर येऊंच ध्यायची नाहीं. एकदा मी सॉलीड वैतागलो आणि माझी बॅट काढून त्यांच्या टाळक्यात हाणली. माझ्या स्ट्रोक मध्य़े इतका ज़ोर होता की माझी बॅट तर फुटलीच, शिवाय त्या मूर्ख डायरेक्टरनं मलाच दांडगट म्हणून मलाच स्टुडिओचा दरवाज़ा दाखवला. माझं डोकं सॉलीड तापलं होतं. मी माझी फुटलेली बॅट त्याचा अंगावर फेकून जोरात ओरडलो, “अरे, तुमचं सिनेमांतलं क्रिकेट गेलं खड्ड्यात, मी खरंखुरं खेळीन, पतौडीसारखं. मग याल मला मस्का लावायला.” असं म्हणून मी मात्र पहिल्या बॉललाच विकेट गेलेल्या खेळाडूसारखा पाय आणि हातांत शिल्लक राहिलेल्या बॅटचं हॅण्डल आपटीत स्टुडिओबाहेर पडलो.
मोठ्या शाळेत आल्यावर सुद्धा इतर मुलांच्या विरोधामुळे मला क्रिकेट टीमपासून दूरच ठेवण्यात आलं होतं. पण मी कधीच धीर सोडला नाही. कधी तरी चान्स मिळेलच म्हणून मी कॉलनीतल्या लहान मुलांबरोबर टेनीसच्या बॉलनं प्रॅक्टीस करीत राहिलो. तरीहि काही जमलं नाही म्हणून मी हळूंहळूं आमच्या क्रिकेट कॅप्टनला आणि क्रिकेट कोचला मस्का लावायचं शहाणपण दाखवायचं ठरवलं. माझं हे धोरण मात्र उपयोगी ठरलं आणि अखेरीस माझं नांव शाळेच्या क्रिकेट टीम मध्यें झळकू लागलं. तीन वर्षं सतत मस्का लावून लावून पिच बरंच नरम झालेलं होतं. माझी पहिलीवहिली मॅच खेळायच्या दिवशी मी अगदी भल्या पहाटेच मैदानावर जाऊन बसलो होतो. अखेरीस दहा वाजले व मॅचला सुरवात झाली. खास ह्याच दिवसासाठी शिवून घेतलेले पांढरेशुभ्र कपडे चढवून, नवीन बॅट फिरवीत मी आघाडीचा खेळाडू म्हणून थाटात चालत मैदानावर गेलो. (ही ओपनींग बॅट्समनची जागा मिळवण्यासाठी मला कायकाय करावं लागलं होतं हे माझं मलाच माहीत! शिवाय त्या काळीं मस्का आजच्याइतका महाग नव्हता हें फायद्याचंच ठरलं होतं!!) दुसर्या टीमचा ओपनींग बोलर आपल्या सफ़ेद पॅण्टीवर लालभडक चेंडू खुन्नसने चोळीत स्टार्ट घ्यायला धावला. खरं सांगायचं तर त्याचा तो पवित्रा पाहून मी तर जागच्या जागीच खलास झालो होतो. देवाचं नांव घेऊन मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि बॅट विकेटच्या समोर धरली. टाळ्या ऐकून मी डोळे उघडले तर पाहतो काय, बॉल सीमापार झाला होता. माझा आत्मविश्वास आता बळावत चालला होता. मी डोळे उघडे ठेवायचं धाडस केलं तर गोलंदाजाच्या डोळ्यांत मला अधिकच खुन्नस दिसून आला. मी परत डोळे मिटून घेतले. परत डोळे उघडले ते “कॅच” ह्या ओरडण्याने. मी बावरून इथंतिथं पहात होतो तेवढ्यात अंपायरने “नो बॉल” म्हणून खूण केली. बोलरनं तिसर्यांदा स्टार्ट घेतला. मी डोळे उघडले ते परत एकदा गर्दीतून ओरडण्याचा आवाज ऐकून. मी मागे पाहिलं तर मला एकच स्टम्प दिसला. बाकीचे दोन स्टम्प्स कुणी, कुठं आणि कशासाठी नेले असावेत याचा विचार करत असतांनाच समोर पाहिलं तर अम्पायरचा हात वर गेलेला दिसला. समोरून गोलंदाज मला चिडवीत घरी जायच्या खुणा करतांना दिसला.
लक्ष्मीनारायण हटंगडी
वसई (पूर्व)
स्वत:बद्दल स्वत:च
मी एक ६७ वर्षांचा तरूण म्हातारा आहे. २५ वर्षं दुबाईमध्ये घालवल्यानंतर मुंबईला परतलो. तिथे असतानाही बर्याच ’उचापती’ केल्या… दुबाई विमानतळावर, Gulf News या वर्तमानपत्रात, आणि The Indian High School मध्ये शिक्षकाची नोकरी केली. मराठी, हिंदी, इंग्रज़ी नाटकांतून अभिनय केला; नाटकं लिहिली, बसवली, टीव्ही वर कामं केली. शाळेत आणि शाळेबाहेर नाटकांची workshops घेतली. परतल्यावर परत काही नाटकं केली; मराठी व हिंदी चित्रपट आणि सीरीयल्समधून कामं केली. इंग्रज़ीतून काही पुस्तकं प्रकाशित केलीं. ऑगस्ट २००० मध्ये झालेल्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे गेल्या दोन वर्षांपासून अभिनय कमी व लिखाणावर लक्ष केन्द्रित करायचा “लढा” चालू आहे. काही लढे नेहमी चालूच ठेवावे लागतात, खरं ना? मित्रमंडळींची साथ मिळाली की मार्ग सोपा होतो हेहीं तितकंच खरं, नाही का? धन्यवाद!
Daduli, your article is very nice and hilarious. Keep it up!All the best