in

तंत्रज्ञान- माहिती ह्वी? इथे मिळेल.

रोजच्या प्रमाणे नेट सर्फ करत होतो आणि नजरेस पडला तो एक ब्लॉग, या ब्लॉग वर मला हवी ती माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे हा ब्लॉग मराठीत आहे. www.2know.in टेक्निकल टर्म्स या ठिकाणी अगदी छानरित्या समजावुन सांगितल्या आहेत. अनेक लेख या ब्लॉग वर आहेत, त्यातील मला आवडलेले म्हणजे भाषांतर करा गुगल ट्रांसलेट बटण, ऑर्कुट कम्युनिटी समुदाय तयार करा, इंटरनेट वरील जाहिराती पासून सुटका, जीमेल ऑर्कुट गुगल ची थीम बदला. या इथे १०० हुन अधिक लेख आहेत जे आपल्याला तांत्रिक गोष्टींची माहिती करुन देतात. या विषयावर भाष्य करणारा “महाराष्ट्र माझा” मधे हि एक विभाग आहेच, पण तंत्रज्ञान या विषयावर भाष्य करणारे मराठी ब्लॉग कमीच असल्यामुळे या ब्लॉग ची दखल घ्यावी असे माझे मत पडले.  मी थेट या ब्लॉग चे लेखक रोहन जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी साधलेला हा संवाद खास आपल्या साठी.साधलेला हा संवाद खास आपल्या साठी.

आपल्या बद्दल थोडे काहि..
नमस्कार! माझं नाव रोहन जगताप आणि मी  इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. पण मला वाटतं त्याहीपेक्षा अधिक मी लेखकच आहे. मी एकदा मन लावून लिहायला सुरुवात केल्यावर तासंतास लोटलेले मला समजत नाहीत. यावरून तरी असंच वाटतं की, कदाचीत हेच माझं सर्वात आवडतं काम असावं! 🙂 डिसेंबर २००७ मध्ये मी मराठी ब्लॉगविश्वात प्रवेश केला. त्याआधी काही महिने मी मनोगतवर लिहित होतो. ‘कथा ना व्यथा’ आणि ‘मनात राहिलं मन एक’ हे दोन ब्लॉग कदाचीत जुन्या ब्लॉगर्सना माहित असतील. दोन वर्षांपूर्वी मी ‘मनात राहिलं मन एक’ हा कवितासंग्रह प्रकाशीत केला आणि सध्या त्याच्या पुनः प्रकाशनाची तयारी करत आहे. दरम्यान 2know.in हा तंत्रज्ञानावर आधारीत ब्लॉग मी जानेवारी १० मध्ये सुरु केला आणि आता त्याला अगदी उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

2know.in
2know.in

2know.in चालु करण्यामागची संकल्पना काय?
इंटरनेटवर एखादी वेबसाईट यशस्वीरित्या चालवायची असेल, तर त्यासाठी आपल्याला आपल्या वेबसाईटवर सतत काही ना काही लिहित राहावं लागतं! दोन वर्ष मी एक हौशी लेखक, कवी म्हणून जालावर वावरत होतो आणि आता मला माझी एखादी प्रोफेशनल वेबसाईट हवी होती. माझी ही ईच्छा पूर्ण करणारा एक उत्तम मार्ग म्हणून आपण 2know.in च्या उगमस्थानाकडे पाहू शकतो. कारण तंत्रज्ञानावर आधारित ही वेबसाईट चालवण्यासाठी लागणारी ज्ञानसंपदा मी मागिल दोन वर्षात कमावली होती. त्यामुळे विषयांची कमी नव्हती, आणि ‘तंत्रज्ञान’ हा विषय असल्याने 2know.in ला प्रोफेशनल टच देखील मिळणार होता.

2know.in नक्कि आहे तरि काय?
‘इंटरनेट, मोबाईल, संगणक’ या तीन शब्दांत 2know.in चे सर्व विषय सामावलेले आहेत. यात देखील बहुतेक लेख हे ‘इंटरनेट’शी संबंधीत विषयांवरच लिहिले गेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की, नुकतेच 2know.in चे १०० लेख पूर्ण झाले आहेत. योगायोगाने त्याच्या आदल्या दिवशीच माझ्या अ‍ॅडसेन्स अकाऊंटनेही पहिल्यांदाच $१०० टप्पा गाठला. पण तो विषय वेगळा आहे!

या वेबसाईट साठी आपण कुठुन माहिती गोळा करता?
हम्‌म्‌ऽऽऽ ‘आज काय लिहायचं!?’ हा प्रत्येक प्रोफेशनल ब्लॉगर समोरचा एक मोठा प्रश्न असतो. कधी हा प्रश्न लगेच सुटतो, तर कधी या प्रश्नाचा शोध घ्यावा लागतो. बहुतेक वेळा सहज म्हणून इंटरनेट सर्फ करत असतानाच मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत राहतं. पण कधीकधी खास हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील मला इंटरनेट सर्फ करावा लागतो. एखादा विषय मिळाल्यानंतर त्याअनुषंगाने जालावर त्याचा शोध घेतला जातो आणि मिळणार्‍या माहिती सोबत मग लेख तयार होत राहतो.

इंटरनेटची जागतिक भाषा हि ईंग्रजी असताना आपल्या वाचकांशी संवाद साधण्यासाठी आपण मराठी भाषा का निवडली?
खरं तर दुसर्‍या एका वेबसाईटवर मी इंग्रजी लेख लिहतो. पण तरीही मला वाटतं की, मी माझ्या मातृभाषेतूनच अधिक चांगल्याप्रकारे व्यक्त होऊ शकतो. आणि हीच मराठी भाषा निवडण्यामागे माझी मुळ संकल्पना होती. आपण जे लिहित आहे ते मनापासून लिहिल्याचे समाधान लाभावे हा देखील एक सुक्ष्म हेतू त्यामागे होता. आणि येत्या काही महिन्यात, वर्षात ‘गुगल ट्रांसलेट’ मराठीसाठी काम करु लागले, तर भाषेची समस्या उरणार नाही, हा देखील एक विचार माझ्या मनात होता.

किती वेळा आपण वेबसाईट अपडेट करता आणि सध्द्या आपल्या वेबसाईटला किती लोके भेट देतात?
मार्च महिन्यात मी रोज एक लेख लिहायचो, पण सध्या माझ्याकडे कमी वेळ असल्याने, अत्यंत नाईलाजाने मला लेखांची फ्रिक्वेंसी कमी करावी लागत आहे. मे महिन्याच्या आकडेवारीनुसार ज्यादिवशी माझा लेख प्रकाशीत होतो, त्यादिवशी माझ्या साईटला साधारणतः १००-१२५ लोक भेट देतात आणि ज्यादिवशी लेख प्रकाशीत होत नाही, त्यादिवशी ४०-७५ लोक साईटला भेट देतात. ‘सर्च इंजिन ट्रॅफिक’ ही मराठी वेबसाईट समोरील खूप मोठी समस्या आहे. 2know.in हायली सर्च इंजिन ऑप्टिमाईज्ड आहे. 2know.in वरील कोणताही शब्द तुम्ही मराठी गुगल वर सर्च केलात तर 2know.in अनेकदा पहिल्या पाच क्रमांकात येते. (उदा. फेसबुक, ट्विटर, मराठी वेबसाईट इ.) पण दुर्देवाने १० करोड लोकसंख्येच्या महाराष्ट्रात मराठीतून सर्च करणार्‍यांचे, मराठी गुगल वापरणार्‍यांचे प्रमाण नगन्य आहे. माझा १ इंग्रजी लेख काहीही न करता सर्च इंजिनच्या माध्यमातून दिवसाला १५० भेटी मिळवतो. याऊलट मराठीची स्थिती आहे. सर्च मध्ये इतक्या वर असूनही १०० हून अधिक लेखांचा समावेश असलेल्या 2know.in ला सर्चच्या माध्यमातून एकूण भेटींच्या केवळ १२% ते १५% भेटी मिळतात. तरीही एकंदरीत विचार केल्यास परिस्थिती समाधानकारकच म्हणावी लागेल.

दर महिना किती विसीटर्स असावेत, किती लोकांनी आपली वेबसाईट पहावी, आपले काहि लक्ष्य आहे का?
ऍलेक्सा वेबसाईटच्या जागतीक क्रमावारीत १ लाखाच्या आत प्रवेश मिळवणं! हे माझं प्राथमिक उद्दीष्ट आहे. आणि भेटींच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिवसाला ५ ते १० हजार व्हिजिटर्स माझ्या वेबसाईटला मिळायलाच हवेत असं मला वाटतं. आणि १० करोड लोक जी भाषा बोलतात, त्या भाषेच्या बाबतीत असं का घडू नये!? अशी अपेक्षा ठेवायला नक्कीच काही हरकत नाही.

आपल्या वेबसाईट सद्ध्या कुठे आणि कुणापर्यंत पोहचली आहे?
मराठी ब्लॉग, वेबसाईट हे बहुतेक करुन पुणे, मुंबई किंवा परदेशस्त राहणार्‍या उच्च मध्यमवर्गीय मराठी लोकांचं माध्यम आहे. आणि गंमतीची गोष्ट म्हणजे कोणत्याही ब्लॉगला मिळणारे बहुतेक व्हिजिटर्स हे ऑफिसच्या संगणकावरुन आलेले असतात. कारण शनिवार, रविवारी डाऊन झालेली ट्रॅफिक तुम्ही पाहू शकता 🙂 मला वाटतं प्रत्येक घरात संगणक पोहचायला हवा. इंटरनेटचा वापर करणारे मराठी लोक फारच कमी आहेत. त्यातही त्यावर मराठीचा वापर करणारे मराठी लोक कमी आहेत. तर ही संख्या वाढायला हवी. मी असं म्हणत नाही, की ते हे जाणूनबजुन करतात! कारण ते मग असं होईल, जसं की, मराठी चित्रपटसृष्टीतले काही लोक म्हणतात,‘मराठी माणसाने मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवली’. स्वतः दर्जाहीन कलाकृती सादर करुन त्याचं खापर दुसर्‍याच्या माथी मारणं हे अगदी मूर्खपणाचंच आहे. पण मी मराठी लोकांना सांगू ईच्छितो की, मराठी ब्लॉग मराठी चित्रपटांसारखे दर्जाहीन नाहीयेत. तर त्यांचा प्रचार होत नसल्याने ते मराठी माणसांपासून दूर आहेत. पण कोणतीही गोष्ट खरी देदिप्यमान असेल, तर त्याचं तेज कोणीही रोखू शकत नाही. मराठी ब्लॉगलाही लवकरच चांगले दिवस येतील.

आपल्या वेबसाईट वर अनेक शब्द हे टेकनिकल आहेत (technical jargonस), आपल्या मराठी वाचकांना याचा कसा फायदा होईल आणि या गोष्टी मराठी वाचकांसाठी या गोष्टी समजण्यास सोप्या होत आहेत का?
माझ्या कित्येक मित्रांना ऑर्कुट आणि ईमेल च्या पलिकडे इंटरनेटवरील काहीही समजत नाही. मला सांगताना आश्चर्य वाटतं, पण त्यांना माझी वेबसाईटदेखील समजत नाही! म्हणजे त्यात आहे काय!? जायचं आणि वाचायचं! पण ऍड्रेस बारमध्ये जाऊन पत्ता टाईप करण्यापासून त्यांना सांगावं लागतं. इंटरनेट बाबत इतकं घोर अज्ञान आजच्या पिढीत पाहायला मिळतं, तर मग २०-४० वर्ष पुढे असणार्‍या एक दोन पिढ्यांचे काय? म्हणजे याला काही सन्माननीय अपवाद आहेतच! खरं तर जालावर मराठी माणसासाठी मराठीतून शिकण्यासारखं खूप काही आहे. मी जेंव्हा इंटरनेटच्या संपर्कात आलो तेंव्हा मला त्यातलं अ की ब कळत नव्हतं. सारं काही मी स्वतः वाचून शकत राहिलो. आज जी माहिती मराठीतून मिळत आहे, ती त्यावेळी उपलब्ध असती, तर माझा प्रवास हा कदाचीत अधिक सोपा झाला असता. तरीही मला एका गोष्टीचं समाधान वाटतं, आनंद वाटतो, की आज मी इतरांचा प्रवास सोपा करत आहे. आणि अनेक मराठी लोकांच्या मला त्याबाबत सकारात्मक प्रतिक्रियाही मिळत आहेत. आपल्या मातृभाषेतून मिळणारं शिक्षण हे कधीही सोपं असतं!

आपल्या पुढच्या वाटचाली साठी काय योजना आहेत?
खरं तर करण्यासारखं खूप काही आहे. ‘लिहिणं’ ही माझी आवड आहे. जालावर भ्रमंती करत असताना डोक्यात मध्येच एखादी युक्ती चमकून जाते. आणि मग ती सत्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होणार, हे जसं लक्षात येतं, तसं मी ती युक्ती माझ्या मोबाईलवर टिपून ठेवतो. जेणेकरुन योग्य वेळी मला त्यावर काम करता येईल. आर्थिक दृष्ट्या मोठ्या आणि एकाहून अधिक लोकांचा समावेश करता येईल अशा अनेक संकल्पना मराठीत आणता येतील. पण मला वाटतं त्यालाही अजून ५-१० वर्ष जावी लागतील. 2know.in च्याच बाबतीत बोलायचं झालं तर वर सांगितल्याप्रमाणे रँक आणि ट्रॅफिकचं उद्दीष्ट तर आहेच, शिवाय दर्जाच्या बाबतीत मी नेहमीच जागरुक असतो. आज जसं काम मी करत आहे, त्यातच अधिक चांगली भर मला टाकायची आहे.

आपल्या वाचकांसाठी काहि संदेश?
वाचकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून आत्तापर्यंत मला भरभरून पाठिंबा दिला आहे. असंच सदैव माझ्या पाठिशी रहा, यातूनच मला अधिकाधिक चांगलं काम करण्याचं बळ मिळत राहिल. जालावर, इंटरनेटवर अधिकाधिक मराठीचा वापर करा. शोध घेण्यासाठी मराठी गुगलचा मराठीतून वापर कराल, तरच तुमच्यासाठी मराठीत उपलब्ध असणारं ज्ञानभांडार उघडलं जाईल. तंत्रज्ञानावरील नवनवीन माहितीसाठी 2know.in ला सदैव भेट देत रहा!

शेवटी, आपले “महाराष्ट्र माझा” बद्दलचे मत..
मला वाटतं ‘महाराष्ट्र माझा’ या नावातच सारं काही आहे! 🙂 जितकं सहज सुंदर नाव! तितकीच सहज आणि सुंदर अशी ही वेबसाईट आहे. जीवनातील सर्व बाजूंना या वेबसाईटने स्पर्श केला आहे. त्याबाबत मी या वेबसाईटचे मालक आशिष कुलकर्णी यांचे अभिनंदन करतो. त्यांनी असंच दर्जेदार काम करत रहावं अशी माझी मनोमन ईच्छा आहे. ‘महाराष्ट्र माझा’ च्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तर हे होते टुनो.इन चे रोहन जगताप.

Written by Ashish

2 Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

उद्धव विरुद्ध राज

तुरुंगात जाण्याची वेळ येताच चक्कर आली…