in

शिक्षक दिना निम्मित

बाजारातून घरी आल्यावर बायकोने माझ्या हातात एक लिफ़ाफ़ा दिला आणि म्हणाली, “तुझं पत्र आहे.”

मी चेष्टेच्या सुरात म्हणालो, “पत्र नाही, कार्ड आहे. माझ्या विद्यार्थ्याकडून, शिक्षक दिनाचं कार्ड आहे. माहित आहे ना शिक्षक दिन काय असतो ते? इंग्रज़ीमध्ये टीचर्स डे म्हणतात.”

” हो, मी पण होते शिक्षिका. पण शिक्षक दिन गेल्या आठवड्यात होता,” मिसेस टोमणा मारत म्हणाली.

“भारतीय पोस्टाचं काही सांगू नये. बारश्याचं कार्ड लग्नाचे वेळी मिळालं तर नशीब समज,” मी हंसत उत्तरलो. कार्ड माझ्या दुबईमधील नन्दु गोपन नावाच्या विद्यार्थ्यानं पाठवलं होतं. मिसेसच्या हातात ते कार्ड देत मी म्हटलं, “हे पत्र वाच.” “शेवटी पत्रच आहे ना?’, परत एक टोमणा. जाऊंदे. नन्दुच्या हस्तलिखितात लिहिलेला इंग्रजीमधील मजकूर मराठीमध्ये भाषांतर केल्यावर खालीलप्रमाणे होता:

” माझा खूपखूप आवडता सुनील दोस्त/सर/काका, मी काय बोलू आणि कुठे सुरुवात करू? मला तुझी खूपखूप आठवण येते. आपण दुबईला असताना ‘दी इण्डियन हाईस्कूल’ मध्ये केलेल्या धमाल गॊष्टींची आठवण येते. ती एकत्र केलेली नाटकं, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, आंतरवर्गीय आणि आंतरशालेय क्विझ, भाषण, गायन, अभिनय, आणि इतर स्पर्धा, सांस्कॄतिक सम्मेलनें.

तू नेहमी घालायचास तो तुझा आवड़ता निळा चौकटीचा कोट…

तुझा आवडता निळा चौकटीचा कोट

बापरे बाप … पावसाळ्याच्या दिवसात आकाशात दाटून येणार्‍या ढगांप्रमाणे आठवणी माझ्या मनात दाटून येताहेत. काय मस्त दिवस होते ते! अगदी भन्नाट्ट! माझ्या आयुष्यातील एकदम अविस्मरणीय दिवस होते ते!

उन्हाळ्याच्या सुटीतील नाटक The Plane Panic

ह्या पत्राच्या माध्यमाने तुला थॅंक्स द्यायचे होते, म्हणून लिहितोय. मागे वळून पाहताना, आत्ता मला जाणवतेय की मी आज जो काही आहे त्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. मला माहित आहे तुला आवडणार नाही, तरीसुद्धा तुझे आभार मानावेसे वाटतात.

हल्लीच लोकप्रिय झाला आहे आमीर खानचा “तारे ज़मीन पर”,

आम्हाला आपला प्रिय आहे तो इंडियन हाईस्कूलचा जोकर.

“खरं सांगू, तुझा पाठिंबा नसता तर माझ्या आई-वडिलांनी मला एवढं विचार-स्वातंत्र्य दिलंच नसतं आणि माझं आयुष्य एखाद्या वाळवंटाप्रमाणे रुक्ष झालं असतं. तुझ्याविषयी मला काय वाटतं हे केवळ शब्दांतून सांगणं अशक्य आहे. कुणाच्याहि मनात प्रेम जागृत करणं सिद्धि आहे; आणि एखाद्याचा आदर मिळवणं पराक्रमाहून कमी नाही, असं मी समजतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करणं हें फ़क्त तुझ्यासारख्या काही खास व्यक्तींनाच जमेल.

“आतां तू म्हणशील की हे सगळं मुळी सांगायची गरजच नाही, किंवा हे सगळं मी ‘फ़ेसबुक’ किंवा ‘ऑरकुट’ वरही सांगू शकलो असतो. पण खरं सांगू, मला ही ई-कार्डं वगैरे पाठवणं विशेष आवडत नाहीं. एखाद्या व्यक्तीला रिमोटनं ऑपरेट केल्यासारखं वाटतं. माझ्या मतें ह्या माध्यमातून आपल्या खर्‍या भावना इतक्या प्रभावीपणें व्यक्त होवू शकत नाहीत, जितक्या साध्या निळ्या-काळ्या शाईने साध्या सरळ पत्रातून व्यक्त केल्या जाऊ शकतात. तुला नाही असं वाटत? मला माहित आहे तू माझ्याशी सहमत आहेस. म्हणूनच मी तुझा पत्ता घेवून हे पत्ररूपी कार्ड पाठवीत आहे.

“मी ह्या आधी कुणालाहि सांगितलं नाहीं, प्रथम तुलाच सांगतोय. मी शिक्षकाचा व्यवसाय करायचं ठरवलंय. मला वाटत नाही की दुसरा कोणताही व्यवसाय याएवढा महान आहे. आणि माझी ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की मला तुझ्याएवढंच यश मिळूं दे. आज १२ वर्षांहून अधिक वर्षं झाली, पण अजूनही त्या आठवणी, त्या भावना आज ताज्या-टवटवीत आणि प्रभावी आहेत. मला ईश्वर एवढी शक्ति देवो की तुझ्याप्रमाणेच मला देखील माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यांत तेंच स्थान मिळू शकेल जे आम्हा सर्वांच्या आयुष्यात तुझं आहे. प्लीज़ तुझ्या रोजच्या प्रार्थनेत माझी आठवण काढत रहा.

“अरे हो, हे सगळं लिहिण्याच्या भरात तुला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणं राहूनच गेलं. HAPPY TEACHERS’ DAY! असाच सर्वांच्या आयुष्यांत येत रहा. मनानं अन् तब्येतीनं समर्थ रहा. आणि असाच संबंध ठेवत जा. मग तो फ़ेसबुक किंवा ऑर्कुट्च्या माध्यमाने असला तरीही चालेल.”

नंदूचं कार्ड वाचून माझ्या मनात बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. मी दुबईहून भारतात परत यायच्या आधी, म्हणजे १९९९ साली साजरा केलेला ‘शिक्षक दिन’ आठवला. त्या वर्षी दर वर्षांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं मी ठरवलं होतं — रोजच्या प्रमाणे नाच-गाणी, नाटुकलीं, भाषणं, या पेक्षा काहीतरी ‘हट्के’. याच विचाराने एक परिसंवाद आयोजित करायचा ठरवलं, ज्याचा विषय होता, “माझ्या विद्यार्थ्यांकडून माझ्या अपेक्षा!” आणि “माझ्या शिक्षकांकडून माझ्या अपेक्षा!”. आधी सर्वांनीच विरोध केला की विषय खूप विवादात्मक आहे. पण मी वाद घातला की विषय विवादात्मक असला तरीही सर्वांच्या दॄष्टीने आवश्यक होता.

पांच शिक्षकांची आणि पांच विद्यार्थ्यांची निवड केली गेली. दक्षता घ्यायची म्हणून निखिल हरिक्रिश्णन नावाच्या मुलाची निवड केली. त्याला सांगण्यात आलं की विवाद निर्माण होतोय असं वाटलं की “Censored” असा बोर्ड घेवून स्टेजवर दोन चकरा मार. इतर कार्यक्रम झाल्यानंतर सर्वात शेवटी “खास आकर्षण” म्हणून हा परिसंवाद ठेवण्यात आला होता. सुरवात थोडी धीमी झाली, पण लवकरच रंगत वाढत गेली. साहजिकच मुलांचं पारडं भारी होतं. निखिलला बोर्ड घेवून फिरताना नक्कीच नाकी नऊ आले असतील. प्रेक्षकांत बसलेल्या मुलांना प्रश्न विचारायची संधी दिली गेली आणि मुलांनी प्रश्नांचा भडिमार सुरु केला. शेवटी शाळा सुटायची वेळ झाली म्हणून कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. इतक्या वर्षांनी देखील सगळेजण अजूनही त्या परिसंवादाची आठवण काढतात.

त्याच कार्यक्रमात सादर केलेला अजून एक उल्लेखात्मक कार्यक्रम होता एक शिक्षक व ईश्वर या दोघांमधला नाट्‍यपूर्ण संवाद्. मूळ इंग्रजीत सादर केलेल्या संवादाचं मराठी भाषांतर खाली नमूद करतोय. आणि आशा आहे की तुम्हां सर्वांना ते वाचताना तेवढाच आनंद मिळेल जेवढा ते सादर करताना आम्हां सर्वांना झाला होता.

शिक्षक बोलतो

हे ईश्वरा, मी एक शिक्षक आहे. सदा प्रयत्नरत असतो की

माझ्या हातून नेहमी कांहीतरी चांगलं घडावं.

पण नेहमीच यश मिळतं असं नाही.

मग मी स्वत:लाच विचारतो, मी शिक्षक झालो तरी कां?

जास्त पगाराची नोकरी कां नाही स्वीकारली?

देवा, खूप वर्षांनी वर्गातला एक मित्र काल भेटला,

आज एका समृध्द कंपनीत उच्च पदाधिकारी आहे.

माझ्या पगारापेक्षा अनेक पटींनी कमवत असेल.

मग अशा लोकांचा हेवा वाटतो. मनात नैराश्य भरतं

मी विचार करतो त्यांचा, जे माझ्यापेक्षा सुखी आहेत,

माझ्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत.

आणि कामाचा हां असह्य भार, जे शिक्षकाचं नशीबच आहे.

भरीला वर्गात बाकांवर न मावणार्‍या विद्यार्थ्यांची गर्दी;

असंख्य चुकांनी भरलेल्या वह्या-पुस्तकांचं ते ओझं;

वर्गांतल्या धड्यांची घरी करावी लागणारी तयारी;

संदर्भासाठी वाचावी लागणारी पुस्तकं व ग्रंथ;

कधीच न संपणारे सास्कृतिक कार्यक्रम.

कांही काळानं शिकवणं इतकं रटाळ होतं की

शिकवण्याची आस्था व निमित्त निस्तेज होत जातं.

दैनंदिन कामं करायला स्वत:वर बळज़बरी करावी लागते.

अन् परमेश्वरा, एवढंच नाही.

सहकार्‍यांबरोबरचॆ ते गैरसमज़ आणि हेवेदावे;

विद्यार्थ्यांकडून कधीच न मिळणारी कृतज्ञता व आपुलकी.

ते जणूं आम्हा शिक्षकांना गृहीत धरूनच चालतात.

मग अनावर दु:ख होतं, वाटायला लागतं,

शिक्षक म्हणून केलेले सारे त्याग निष्फ़ळ आहेत.

देवा रे, यापुढे ही वाटचाल सहन होणार नाही.

मला तुझ्या मदतीची गरज़ आहे, मला मदत कर!

ईश्वर उत्तर देतो

माझ्या प्रिय बालका, धीर धर. असा निराश नको होऊस.

तुला काय वाटतं मी तुझ्या समस्या ओळखत नाही?

मी समजून आहे तुझ्या उणीवा, तुझं वैफ़ल्य.

शिक्षकाचं काम सोपं नाही, माहीत आहे मला.

पण एका क्षणाकरिता विचार कर.

विचार कर, त्या असंख्य विद्यार्थ्यांचा

ज्यांना तू चिरन्तन जळणारी बुद्धिज्योत देतोस.

ज़रा आठव ती असंख्य तरूण चरित्रं,

जी तू घडवतोस पुढे येणार्‍या भविष्यासाठी.

आज जे धडे तू त्यांना देतोयस्,

दीपस्तंभ बनतील त्यांच्या येणार्‍या आयुष्यासाठी.

उद्याचे नेते आहेत आजची तरूण पिढी,

येणार्‍या प्रगतीशील समाजाची आशेची शिडी.

देशाचं संपूर्ण भविष्य आहे तुझ्याच हाती.

पूर्णपणे समजू शकतो मी तुझ्या भावना

जेव्हां बदल्यात मिळते फक्त प्रतारणा.

कारण मीसुद्धा अनुभवलंय हें सगळं.

कळतंय मला हे सगळं किती दुख: देतं ते.

पण लक्षात ठेव, मी निवडलंय तुला

खास माझा प्रतिनिधि म्हणून,

माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणून.

तुझी ही वाटचाल अशीच चालू राहूंदे,

आपण दोघे मिळून एकत्र चालत राहू,

आणि एकमेकांच्या मदतीने निर्माण करू

एक अधिक चांगलं, तेजस्वी व आनंदी विश्व.

एका शिक्षकाचा एक विद्यार्थी त्या शिक्षकाला सांगतो की त्याला एक शिक्षक व्हायचं आहे, याहून अधिक चांगली भेट कोणती असू शकेल एका शिक्षकाला, शिक्षक दिनाच्या निमित्तानं!

लक्ष्मीनारायण हटंगडी

वसई (पूर्व)

Written by Ashish

One Comment

Leave a Reply
  1. नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात ती पूर्ण करण्यासाठी ध्येय वेड होऊन स्वताला झोकून द्याव लागत हे ही तुम्हीच शिकवलत.

Leave a Reply to Jyotiram More Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एक मेळावा “मराठी ब्लॉगर्स” चा.

Pune has the biggest Porn Market