बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. “तू काय काय करू शकतोस?‘ असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले.
मुलगा म्हणाला, “वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !’ वेगळं वाटलं. शेतकऱ्याला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते.
तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.
नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता ? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!
कुठलंही काम, प्रॉजेक्टू, कुठलीही कंपनी आणि कुठलाही अमेरिकन, युरोपियन क्लातएंट तुमच्या जिवापेक्षा मोठा नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या, कंपन्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही. कृपा करून जमेल, झेपेल एवढंच काम हातात घ्या; त्यासाठी आग्रह धरा. प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका.
तुमच्या जिवापेक्षा मौल्यवान काहीही नाही, याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम ऑफिसमधल्या कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देणारं ठरतं. ऑफिसमधले ताणतणाव, स्पर्धा, पक्षपात इ. इ. घरी घेऊन न येता, तिथंच विसरून या. स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या. ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढवली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जिवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही, याबद्दल खात्री बाळगा.
ज्यांच्या सगळ्या आशा-अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आई-वडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचाच हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी स्वस्थ आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडी-निवडी जपा, स्वतःसाठी थोडातरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इ.चा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं. तरीही आपण धावतो- ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही.
दोन तत्त्वं :
“एक म्हणजे क्षुल्लक गोष्टींसाठी ताण निर्माण करू नका.”
“दुसरं म्हणजे आयुष्याच्या अखेरीस सगळ्या गोष्टी क्षुल्लकच असतात.”
nice
agdi barobar . lekh chan ahe.
Really very nice article
really, khadkan dole ukhale maze, nurvasness ka yeto yache ans varil ahe, great
ekam sahi lihile aahe
mala swatachi janiv jhali
khup chhan..mast lekh aahe..
Khup Chhan Mast lekh aahe