एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका बाजीराव मस्तानी
“चिते कि नज़र, बाझ कि चाल और बाजीराव कि तलवार पर संदेह नही करते, कभी भी मात दे सकती हैं” हा डायलॉग रणवीरने अतिशय उत्तम म्हटला आहे. सुरुवातीला ब्राह्मणी पोशाख परिधान केलेला रणवीर हा संवाद म्हणतो आणि प्रेक्षगृहात टाळ्यांचा कडकडाट होतो. रणवीर सिंह (राजीराव), दिपिका पदूकोन (मस्तानी), प्रियंका चोप्रा (काशीबाई), महेश मांजरेकर (शाहू महाराज), आदित्य पांचोली (प्रतिनिधी), तन्वी आझमी (राधाबाई, बाजीरावांची आई), मिलिंद सोमण (मंत्री), वैभव तत्ववादी (चिमाजी अप्पा) हे चित्रपटाचे प्रमुख पात्र आहेत. अनूजा गोखले आणि सुखदा खांडेकर या दोन मराठी अभिनेत्री सुद्धा छोट्याशा भुमिकेत आहेत. हा चित्रपट बाजीरावांच्या जीवनावर आधारित आहे. तरी सुद्धा तो बराचसा काल्पनिक आहे, असं चित्रपटाच्या सुरुवातीलाच नमूद करण्यात आलेलं आहे. कोणाच्याही धर्मभावना, संस्कृती वगैरे दुखावण्याचा हेतू नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. चांगली गोष्ट अशी की यामध्ये निनाद बेडेकर व राऊ कादंबरीचे लेखक एन.एस इनामदार यांचे आभार मानण्यात आले आहे. हा चित्रपट मुख्यतः इनामदारांच्या कादंबरीवरच आधारलेला आहे. चित्रपटाची कथा तशी साधीच आहे. लैला-मजनू, हिर-रांझा अशा पद्धतीचा एक स्पर्श (टच) देण्यात आला आहे. महान मराठा योद्धा बाजीराव बुंदेलखंडाला शत्रुपासून वाचवतात आणि इथे मस्तानी व बाजीराव एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग इथे सुरु होतो लव्ह ट्रॅंगल. पण काशीबाईपेक्षा बाजीरावांची आई, चिमाजी अप्पा व बाजीरावांचे पुत्र नानासाहेब हे मस्तानीच्या विरोधात जातात. मस्तानीला जीवे मारण्याचा कट रचला जातो. याची खबर काशीबाईंना आधीच लागते व ती बाजीरावांना खबरदार करते. बाजीराव मस्तानीला वाचवतात. पण राऊ एका मोहिमेवर गेले असताना नानासाहेब मस्तानीला व तिच्या मुलाला कैद करतात. याची खबर बाजीरावांना लागते. त्यांना विरह सहन होत नाही. ते आजारी पडतात आणि समोर असलेल्या सरोवर किंवा नदी (नक्की कळले नाही), त्यात स्वतःला समर्पित करुन प्राण त्यागतात. इथे राऊ वारले हे मस्तानीला टेलिपॅथीनेच कळतं आणि मस्तानी सुद्धा आपला प्राण त्यागते आणि अशाप्रकारे ही कहाणी संपते. एक सर्वसामान्य बॉलिवूडपटाची कथा जशी असावी तशीच कथा या चित्रपटातही आहे. त्यात नवीन काही असेल तर ते बाजीरावांचे चरीत्र. यात संजय लीला भन्साली बर्यापैकी यशस्वी झाले आहेत. पण…
हा चित्रपट जरी कादंबरीवर आधारलेला असला तरी यातील पात्र व कथा सत्य आहे. त्यामुळे इतिसाहाच्या बाबतीत सांगायचे झाले तर चित्रपट इतिहासाच्या फारसा जवळ जात नाही. अनेक गोष्टी इतिहासासंदर्भात खटकतात. पण इतिहास बाजूला ठेवून चित्रपट पाहिला तर तसा चित्रपट बरा आहे. कारण अनेक जणांना इतिहास व्यवस्थित माहित नाही आणि या चित्रपटाला अधिकतम हिंदी किंवा अमराठी प्रेक्षक लाभणार असण्यामुळे अनेकांना बाजीराव कोण होते हे सुद्धा माहित नसावे. म्हणून भारतातील अधिकतम प्रेक्षक इतिहास म्हणून हा चित्रपट पाहणार नाहीत. त्यामुळे आपण ऐतिहासिक तथ्ये जरा बाजूला ठेवून विचार करु. चित्रपटाची कथा आणि संवाद चांगले आहेत. पण पटकथा थोडीशी चुकली आहे असे वाटते. ही जरी प्रेमकहाणी असली तरी ती योद्धाची प्रेम कहाणी आहे. तरी सुद्धा चित्रपटात राजकीय डावपेच, युद्ध, बाजीरावांमधला कुशल राजकारणी हे दाखवण्यापेक्षा त्यांच्या प्रेमकहाणीवर अधिक लक्ष देण्यात आलं आहे. चित्रपटात स्पष्ट उल्लेख आहे की बाजीराव ४१ लढाया जिंकलेत. जर असं असेल तर चित्रपटात केवळ दोनच लढाया दाखवल्या आहेत. अर्थात ४१ लढाया दाखवता येत नाही. पण त्या दोन लढाया सुद्धा तोकड्या आहेत. बाजीराव चित्रपटाची तुलना मला बाहूबलीशी करावीशी वाटते. बाहुबली हा सुद्धा एका योद्ध्याच्या जीवनावर आधारीत चित्रपट आहे. अर्थात तो पूर्णपणे काल्पनिक आहे. परंतु चित्रपटात प्रेम, प्रणयदृश्ये, नृत्य वगैरे दाखवूनही बाहूबलीच्या युद्ध व राजकीय कौशल्याला न्याय देण्यात आला आहे. पण बाजीराव चित्रपटात बाजीराव (बाहुबलीप्रमाणे काल्पनिक नव्हे) यांनी खरोखर लढाया लढवल्या आहेत, कुशलतेने राजकारण केले आहे. तरी सुद्धा राऊंच्या कौशल्याला न्याय मिळालेला नाही. काही लोक म्हणतील की ही प्रेम-कथा आहे. म्हणून बाहुबली चित्रपटाचे उदाहरण दिले आहे. चित्रपाटाची पटकथा उगाच लांबवली आहे. त्यामुळे काही सीन्स खुप मोठे आणि रटाळ वाटतात. चित्रपटाचे संगीत चांगले जमले आहे. गाणी व नृत्य चांगले झाले आहे. अर्थात पिंगा आणि मल्हारी गाण्याला अनेकांनी आक्षेप घेतला होता. तो आक्षेप गैर नाही, योग्यच आहे. एखादा सेनापती/पंतप्रधान मग तो सत्यातला असो किंवा कल्पनेतला, तो सैन्यासह अशाप्रकारे नाचणार नाही. सैनिकांशी कितीही मैत्री असली तरी स्वतःचा सेनापतीचा एक वेगळा मान असतो. आता नसेल कदाचित, पण पूर्वी तरी होता. छायांकन व कलादिग्दर्शन अतिशय उत्तम झाले आहेत. अर्थात हीच या चित्रपटाची जमेची बाजू आहे. सगळे सेट्स सुंदर आहेत. देखावा उभारण्यात नेहमीप्रमाणे भन्साली यशस्वी ठरलेत. हिंदवी स्वराज्य, मराठा, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू असे शब्द अभिमानाने उच्चारले आहेत व प्रेक्षकांनी हिंदू या शब्दाला सुद्धा टाळ्यांनी दाद दिली आहे.
बाजीरांच्या भुमिकेत रणवीर तसा चांगला वाटलाय. पण रणवीरने अनेक ठिकाणी बेअरिंग सोडली आहे. बुंदेलखंडातून विजयी झाल्यावर काशीबाईंसोबत ज्यावेळेस बाजीराव आपल्या खोलीत येतात त्यावेळी रणवीर ज्याप्रकारे हलत चालतो, ते विचित्र वाटतं. कधी कधी उगाच लेफ्ट-राईट-लेफ्ट केल्यासारखा चालतो हे तो का करतो कळत नाही. काही मराठी संवाद रणवीरने ठीक म्हटले आहे. पण हा मराठी नट नाही किंवा हे मराठी पात्र नाही असं वाटून राहतं. कधी कधी नाना पाटेकरने रणवीरच्या अंगात प्रवेश केल्याचा भास होतो. काही ठिकाणी तो उगाच हसतो, सैनिकांसोबतच्या त्याच्या गप्पा, त्याचं वागणं हे सर्व बाजीरावांच्या बेअरिंगमधून बाहेर येण्यासारखंच आहे. बर्याचदा रणवीरच्या सिरीयस सीनला प्रेक्षक हसतात. इतके ते सीन्स विचित्र झालेत. निजामासोबत (रजा मुराद) त्याचे संवाद यामध्ये चातुर्य दिसतं. पण नंतर रणवीर उगाच मोठ्याने आणि वेगाने डायलॉग बोलतो. ते डायलॉग खुप महत्वाचे व अभिमानास्पद आहेत. पण ते प्रेक्षकांच्या हृदयांपर्यंत पोचवण्यात अयशस्वी ठरतो. त्याचा मुळ छिछोरा स्वभाव अधून मधून दिसत राहतो. कॅमेरा समोर अभिनय करताना कंटिन्यूटी रखणं फारच कठीण असतं. पण ते राखणं हेच तर नटाचं कौशल्य असतं. त्या बाबतीत रणवीर कमी पडला आहे. युद्धाच्या प्रसंगात रणवीर भारी वाटतो. त्याचा लूक पौरुषी असल्यामुळे युद्धाच्या प्रसंगात तो उजवा वाटतो. बाकीचे गंभीर आणि प्रणयदृश्य व प्रेम प्रसंग रणवीरने चांगले निभावले आहेत.
काशीबाईंच्या भुमिकेतील प्रियंका चोप्रा छान दिसली आहे. बॉलिवूडमधली “चुलबुली लडकी” अशी भुमिका प्रियंकाला देण्यात आली आहे. बाजीरावांचं मस्तानीसोबत असलेलं प्रेम जेव्हा काशीबाईंना कळतं. तेव्हा जो चेंज ओव्हर प्रियंकाने आणलाय तो अतिशय उल्लेखनीय आहे. पण काशीबाई चुलबुली होत्या हे जरा मनाला पटत नाही. याबाबत इतिहासकार सविस्तरपणे सांगू शकतात. तो अधिकार माझा नाही. मस्तानीच्या भुमिकेतील दिपिका अतिशय सुंदर दिसली आहे व तिनं अभिनय सुद्धा सुंदर केला आहे. बाजीराव यांच्यावरचं तिचं प्रेम, आपली प्रतिष्ठा, लढाऊपणा, नृत्यातली लवचिकता, हळवेपणा व त्याच बरोबर रजपुतानी कठोरता अतिशय चांगल्या पद्धतीनं दिपिकाने हातळलंय. दिपिका चित्रपटाची अजून एक जमेची बाजू आहे असं म्हणायला हरकत नाही. यात अजून एक नट भाव खाऊन जातो तो म्हणजे वैभव तत्ववादी. चिमाजी अप्पांची भुमिका त्याने मस्तच साकारली आहे. फक्त चिमाजी अप्पांना या चित्रपटात बर्यापैकी खलनायक दाखवण्यात आलं आहे. म्हणून त्यांनी केलेल्या पराक्रमवर पडता टाकला जातो. अर्थात हा चित्रपट चिमाजी अप्पांसाठी बनवलेलाच नाही. तन्वी आझमी यांनी बाजीरावांच्या आईची भुमिका उत्कृष्टपणे बजावली आहे. अर्थात त्या चित्रपटाच्या खलनायिका आहेत. एक मुसलमान स्त्री पेशव्यांची सून होऊ शकत नाही व तिच्याबद्धलचा तिरस्कार तन्वी यांनी छान दाखवला आहे. त्या एक ज्येष्ठ व कुसल अभिनेत्री आहेत. त्यांनी हिंदी ही भाषा ब्राह्मणी (कोकणी) शैलीत उच्चारण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. मिलिंद सोमण यांनी छान अभिनय केला आहे. आदित्य पांचोली यांची भुमिका चांगली झाली आहे. पण एक, दोन प्रसंगात बाजीरावांना विरोध करणे एवढेच पांचोलींचे काम आहे. शाहूंची भुमिका महेश मांजरेकर यांची चांगली बजावली आहे. यतीन कार्येकर यांनी सनातनी ब्राह्मणाची भुमिका सुंदर निभावली आहे.
तरीही अनेक प्रसंग न पटण्यासारखे आहेत. काशीबाई सहजपणे बागडत बागडत शनीवारवाड्यात वावरतात, हे पटत नाही. शेवटी त्या पेशवीणबाई आहेत. त्यांच्यावर काही बंधनं होती. बाजीरावांचं आगाऊपणे वागणं पटत नाही. नानासाहेबांनी केलेला मस्तानीचा छळ हा अती वाटतो. म्हणजे मस्तानीच्या अंगावर पाणी टाकणे वगैरे टिपिकल व्हिलनप्रमाणे वाटतं. चित्रपटातील समान धागा म्हणजे पाऊस. महत्वाच्या प्रसंगांना पावसाची साथ आहे. चित्रपटात भन्सालींनी खुपच पाऊस पाडलाय. तो कमी केला असता तर बरं झालं असतं. खुप भव्य सेट, रंगेबीरंगी कपडे (देवदासपेक्षा कमी रंगीत), भरगच्च दागीने यामुळे चित्रपट उठून दिसतो. पण तरीसुद्धा चित्रपटात आत्मा नाही असं वाटतं. मध्यांतर नंतर चित्रपट हळूवार जातो. भव्यता पाहून काही वेळाने कंटाळा येतो. इतिहास बाजूला ठेवला तरी बाजीराव मस्तानी हा चित्रपट परीपूर्ण वाटत नाही. अर्थात इतिहास बाजूला ठेवता येत नाही. सुरुवात ते समाप्तीपर्यंत हा चित्रपट संजय लीना भन्सालीचाच आहे, असंच वाटत राहतं. तरी सुद्धा अनेकांना हा चित्रपट आवडेल. कारण यातली स्टार कास्ट व टिपिकल भन्साली टच भुरळ घालणारी आहे. “प्यार करनेवाले कभी डरते नही, जो डरते है वो प्यार करते नही” हा एक दुजे के लियेवाला संदेश किंवा प्रेमाच्या आड नेहमी धर्म येतो तरीही त्याला प्रेम जुमानत नाही असा संदेश या चित्रपटांतून मिळतो. तो प्रेमीयुगुलांना आकर्षित करणारा आहे. पण ही एक फसलेली अतीरंजीत प्रेम-शोकांतीका आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटाला अडीच स्टार द्यायला हरकत नाही.
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री
खरे म्हणजे ह चित्रपट एक तरल पण दुक्खद प्रेम-काव्य आहे. त्यात बाजीरावांचे चे पराक्रमी व्यक्तित्वाल तर न्याय दिला आहेच शिवाय त्यच्या सर्ख्य सर्वोत्तम योद्ध्याचे आपला ब्राम्हण समाज कसे खच्चिकरण करतो , तसेच आपल्या जातीपुढे राज्यहित, देशहित हे सुद्धा ह्याना शुल्लक वाटते हे चित्रपटात ठळकपणाने मांडलेले आहे (ते तर ह्या समाजाने संत ज्ञानोबा-तुकाराम सारख्या प्रभुतिंचे अनादी काळापासुन ते अद्यापही करणे चालुच ठेवलेले आहे! ). एकुणच ह्या चित्रपटाची पट्कथा , संवाद, अभिनय, दिग्दर्शन इत्यादि अंगे अतिउत्तमरित्या सादर केले गेलेले आहे, चित्रपट पाहिल्यावर बाजीराव कोण होता व त्याच्या बाबत अधिक संदर्भ वाचण्यास मराठी व इतर भाषीय समुदायास नक्किच उद्युक्त करतो.